Friday, December 16, 2016

नोटबंदी यशस्वी होत नाहीहे....

भारतातील बरेचसे लोक अप्रामाणिक आहेत म्हणुन नोटबंदी यशस्वी होत नाहीहे असा एक सुर आहे. मुळात नोटबंदी आणली होती तीच काळा पैसा काढून घेण्यासाठी. म्हणजे अप्रामाणिक पैसा आहे आणि  बरेचसे नागरिक अप्रामाणिक आहेत हे हा निर्णय घेण्याआधी मोदींना माहितच होते. त्यांचा पक्षही अप्रामाणिकपणात मागे नाही हे सांगायला त्यांना कोणाची गरज नव्हती. गुजरातच्या विकासाचा जो ढोल बडवला तो किती प्रामाणिक होता हे सर्वांनाच माहीत आहे. एवढ्या घोषणा निवडुन आल्यानंतर केल्या त्याचे काय झाले, किती प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली हेही दिसतेच आहे. पन्नास दिवसात सारे लगोलग सुरळीत होणार आहे असे म्हणनारे कोणत्या नंदनवनात वावरत आहेत हेही दिसतेच आहे. मुळात अप्रामाणिक ज्यामुळे लोक होतात त्याच कारणांवर आघात करण्याऐवजी सर्वसामान्यांचे जीवन रसातळाला नेण्याचा यांना काय अधिकार आहे?
cashless अर्थव्यवस्था करू आणि जे तसे व्यवहार करतील त्यांना इनाम देवू ही घोषणा तावातावाने काहीतरी अलौकिक करत आहोत या थाटात करणे म्हणजे स्वत:ची (देशाची तर झालीच आहे) किती फसवणुक करायची याचेही तारतम्य हरपल्याचे निदर्शक आहे. बाजारपेठांतील विक्री घटत चालली आहे. कारखाने lay off किंवा कामबंदीचे दिवस वाढवत चालले आहेत. लघुउद्योगांना तर कोणी वाली नाही. अत्यावश्यक असल्याखेरीज कोणीही पेटीएम काय नि दुसरे काय, खरेदी करायला तयार नाही. काही लोकांची जबरदस्तीची बचत एकीकडे होत असली तरी दुसरीकडे ज्यांना घटत्या मागणीमुळे उत्पन्नाची साधनेच गमवावी लागत आहेत आणि त्यामुळे नेमके काय होते आहे याचे भान नाही.
सबप्राईम निस्तरायला अमेरिकेला ८ वर्ष लागली. भारताने त्यामुळे निर्माण झालेल्या मंदीला तोंड दिले. पण आता ही मंदीतली मंदी भारतीय अर्थव्यवस्थेला कोठे घेऊन जाईल आणि त्यातुन बाहेर पडायला किती काळ लागेल याचा अंदाज कोणी करू शकत नाही. अर्थव्यवस्थेला यातही उभारी देईल असे सकारात्मक निर्णयही होत नाहीत. यांचा सकारात्मक निर्णय काय तर १५००० बक्षीसे. यातून रोकडविरहित व्यवहार वाढतील हा भ्रम आहे. अर्थव्यवस्थेला उभारी तर अशक्यच आहे. चलन हे शेवटी विनिमयाचे साधन आहे, ते म्हणजे अर्थव्यवस्था नव्हे. पण आज तेही काढून घेतले आहे. म्हणजे आहे त्या मागणीलाही अर्थ रहात नाही कारण असुनही क्रयशक्ती नाही असल्या विचित्र स्थितीत आणुन ठेवले आहे. भविष्यात चलनपुरवठा सुरळीत झाला कि मागणीचे खरेदीत रुपांतर लगोलग चालु होईल असेही नाही. काळा पैसा ज्या कारणांनी निर्माण होतो ती दूर करण्यापेक्षा भविष्यात त्याला उभारीच येईल अशी लक्षणे आताच दिसत आहेत.
नव्या भ्रष्टाचाराच्या विपूल संध्या या चलनकल्लोळाने दिल्या आहेत. मी पुर्वीही म्हणालो होतो कि काळा पैसा यामुळे संपणार नाही, फक्त त्याचे पुनर्वितरण होईल व ज्यांना खड्डा पडलाय ते दुप्पट जोशात तो भरून काढायचा प्रयत्न करतील. भ्रष्टाचार व काळा पैसा आहे तेथेच राहील.
अडाणी-अंबानीच्या हितासाठी हा निर्णय घेतला गेला असेही आरोप होताहेत. तसे असेल तर भ्रष्टाचाराचा कळस खुद्द सरकारनेच गाठला आहे असे म्हणावे लागेल. आणि तसे जर नसेल तर काय विचार करून हा अर्धवट निर्णय घेतला हा प्रश्नही अनुत्तरीत राहील. मोदींचा हा चहा नासला आहे हे मान्य करत सकारात्मक पावले उचलायची दृष्टीही हे आत्ममग्न दाखवत नाहीहेत. अजुनही वेळ गेलेली नाही. अर्थव्यवस्था कोम्यात जायच्या बेतात आली आहे. वेळीच सावध व्हावे ही अपेक्षा सोडुन आपण आज तरी काही करू शकत नाही.

2 comments:

 1. अत्यंत हास्यास्पद प्रतिक्रिया.तुमच्यासारख्या बुद्धिमान माणसाकडून यापेक्षा सविस्तर लिखाणाची अपेक्षा आहे.

  ReplyDelete
 2. संजय सोनवणी यांनी जे विचार मांडले आहेत ते वास्तवाला धरून आहेत . त्याला मैत्रेय सरांनी हास्यांस्पद म्हटले आहे ते कसे ते त्यांनी सांगावे - पळ काढू नये - मैत्रेय हे जर अर्थतज्ञ् असतील तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट आणि सोपी करून विषद करावी म्हणजे आमच्या सारख्या निर्बुद्ध लोकांना त्यातून शिकता येईल . मैत्रेय महाराज जर भाजप चे आंधळरे भक्त असतील तर प्रश्नच मिटला - त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार ?

  संघाचे लोक खरेतर १०० च्या नोटा वितरण करून जनतेचे प्रश्न हलके करू शकले असते नाही का ?

  आज सर्वसामान्य जनता वैतागली आहे . नोटांचा पुरवठा अपुरा आहे आणि त्यामुळे सर्व बाजार चिडचिडा झाला आहे. आपलेच पैसे सामान्य माणसाला काढता येत नाहीत यासारखा घोर अपमान नाही !.
  मोदी हुशार आणि कुशल राज्यकर्ते वाटण्या ऐवजी निर्बुद्ध आणि आत्ममग्न वाटू लागले आहेत . इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीत असेच घडले होते . या सर्वावर पाकिस्तानशी युद्ध हाच जनतेला खुश करण्याचा उपाय मोदींनी अवलंबला तर आश्चर्य वाटायला नको .
  काळाच्या उदरात काय असेल देव जाणे .
  तोवर संजय सरांनी वैदिक किंवा मोहन्जो दारो असे विषय घेऊन जनतेचे मनोरंजन करावे ही विनंती .ते निरुपद्रवी आणि खुसखुशीत तरी असतात - नाही का संजय सर ?

  ReplyDelete