Saturday, April 1, 2017

पुरातन ज्ञानासक्ति कोठे गेली?


Image result for knowledge curiosity


सिंधू संस्कृतीमधील लोकांचा समुद्रमार्गे सुदुर मेसोपोटेमिया, इजिप्तसारख्या प्रदेशांशी व्यापार होत असे हे आपल्याला माहित आहे. पण पहिले जहाज कसे बनले असेल? समुद्रात ते घालण्यासाठी ते कोणत्या तंत्राने बनवले पाहिजे, कोणत्या प्रकारची लाकडे वापरली पाहिजेत, सुकानू-वल्ही-शिडे हा प्रवास कसा केला असेल? कोण हे आद्य तंत्रज्ञ होते? आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे या अत्यंत नव्या तंत्रज्ञानाने बनलेल्या पण वापरच केला गेला नसलेल्या जहाजात बसून क्षितीजापलीकडचे काहीच माहित नसलेल्या अज्ञात सागरात त्या नौका घालण्याचे साहस कोणी केले असेल? पहिल्याच प्रयत्नात यश येत नाही. ते कदाचित दिशाही भरकटुन भलतीकडेच गेले असतील अथवा वादळ-वा-यात सापडून मृतही पावले असतील. तरीही पुन्हा पुन्हा प्रयत्न करत जीवावरची संकटे झेलण्याची ही उर्मी त्यांच्यात कोठून आली? जे लोक पहिल्यांदाच इच्छित किना-याला लागले तेंव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नसेल. नाही? सफलतेचा, धेयप्राप्तीचा आनंद आपण कशात तोलणार? 

अपरिचित अज्ञात लोकांकडे पाहून त्यांना काय वाटले असेल? त्यांच्याशी कसा संवाद साधला असेल? आपण शत्रू नसून मित्र आहोत हे कसे पटवले असेल? त्या किना-यावर्च्या लोकांना अपरिचित, समुद्रात तरंगणा-या "वाहनातून" काही लोक येत आहेत हे पाहुन तो जादुटोणा वाटला असेल कि साक्षात देवच आले आहेत असे वाटले असेल? कदाचित त्यांना ते लोक दुष्ट आहेत असेही वाटले असेल. मग काय घडले असेल? सुरुवातीला अक्षरश: यातील काहीही घडलेले असू शकेल. अनेक लोक किना-यावरील रानटी जमातींनी मारुनही टाकले असतील. 

पण या अद्भूत साहसाची परिणती झाली ती विदेशी व्यापारात. सांस्कृतिक व शोधांच्याही देवान-घेवाणीत. भारताची आर्थिक प्रगती जी सिंधू काळात झालेली दिसते ती या अनाम पण महान शास्त्रज्ञांमुळे. अपार साहस करुन समुद्रापारच्या अज्ञात विश्वाकडे जीवावरचा धोका पत्करुन निघालेल्या पहिल्या खलाशामुळे. समुद्रात माल डुबुन आपले नुकसान होण्याची शक्यता आहे हे माहित असतांनाही आपला माल त्यात लादून अज्ञात लोकांशी व्यवसाय करण्याची आंतरिक प्रेरणा असलेल्या व्यापा-यामुळे. 

आज जग फार पुढे आले आहे. आज पार आण्विकशक्तीवर चालणा-या महाकाय युद्धनौका आहेत. पाणबुड्या आहेत. भविष्यात पाण्यातुनच हायड्रोजन वेगळा करुन त्यावर चालणा-या बोटी येतील. कदाचित आज आपल्या कल्पनेतही नसलेले नवीन तंत्रज्ञान येईल. माणुस कल्पक आहे. साहसी आहे. त्याच्यात अनावर नैसर्गिक कुतुहल आहे. त्याला प्रश्न पडतात म्हणून तो उत्तरे शोधायचा प्रयत्न करतो. आद्य नौका बनली ती याच आदिम प्रेरणेतून. ज्ञानपिपासेतून. अज्ञाताचा शोध लावण्याच्या प्रवृत्तीतुन. जीवावरचे साहस करण्याच्या वेड्या उर्मीतून. जग हे अशाच लोकांनी घडवलेले आहे. पण यात आज आम्ही कोठे बसतो? आज आम्हाला सारेच तंत्रज्ञान बाहेरुन आयात करावे लागते. आम्ही या ज्ञानात नंतर काही विशेष भर घातली नाही. तशी आम्हाला गरज वाटली नाही. आम्ही धर्माला, धर्ममार्तंडांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानतो. पण ऐकणारे आपणच होतो आणि आपण महामुर्ख होतो म्हणून सोयिस्कररित्या समुद्रप्रवास पाप आहे असे स्विकारले हे कधी कबूल करणार? आमच्याच नवे काही शोधण्यातील उर्मी मेलेल्या होत्या म्हणून आम्ही मागे पडलो हे कोण कबूल करणार? 

सिंधू संस्कृती आमची. पहिली भारतीय नौका बनवून दिक्कालाच्या शोधात निघालेले आम्हीच. कुशल नगररचनेचे तंत्र शोधणारे आम्हीच. आम्ही इतिहास वाचतो ते कशासाठी? ती ज्ञानप्रेरणा, कुतुहलाचे व प्रश्नांचे महत्व समजावून घेण्यासाठी? आम्ही आज जेथे आहोत त्यातुन पुढे जाण्यासाठी इतिहास वाचतो? नाही. आम्ही वाचतो...नव्हे घोकंपट्टी करत राहतो...कशासाठी तर परिक्षेत पास होण्यासाठी. मेरिटमध्ये येण्यासाठी. एकदाची परिक्षा संपली कि पुन्हा सारे विसरून जाण्यासाठी. म्हणजे आम्ही काही शिकण्यासाठी शिकत नाही तर तथाकथित मेरिट लिस्टमद्ध्ये वर यायच्या दुष्टीतून शिकतो. नोकरीसाठी शिकतो. याला कसले मेरिट म्हणायचे? हे मेरिट नसून फक्त स्मरणशक्तीत प्राबल्य आहे एवढे दाखवण्यापुरते हे मेरिट. त्याचा जीवनातील उपयोग शून्य आहे. 

आम्ही प्रश्न विचारणारी पिढी घदवत नाही. आम्ही दिक्कालाचे स्वप्न पाहणारी पिढी घडवत नाही. आम्ही बेरोजगार नोकरदारांची पिढी घडवतो. पालक प्रश्न विचारणा-या मुलांची बोलती बंद करतात. शाळेत शिक्षक अभ्यासक्रमाओपलीकडच्या प्रश्नांवर अघोषित बंदी घालतात. ते इतिहास शिकवतात ते सनावळ्या पाठ करुन घेण्यासाठी व कोणत्या राजाने, सरदाराने काय केले आणि काय परिक्षेत येईल हे सांगण्यासाठी. पण ते घटनांच्या मतितार्थाकडे लक्ष देत नाहीत. मुळ गाभा समजावून सांगण्याचे त्यांची कुवत नाही. मुलात इतिहास का शिकायचा असतो हेच ते सांगत नाहीत. आम्हाला सिंधू संस्कृतीवर चार मार्काचे प्रश्न येणार आहेत ना..मग तेवढेच बघा! तेवढेच लक्षात ठेवा.

मग आम्ही आमच्या पुर्वजांचे अपार कुतुहल, जिज्ञासा, शोधक वृत्ती, साहस व त्याची फलनि:ष्पत्ती कशी सांगणार? नव्या पिढीतुनही तसेच कुतुहलांनी व शोधक वृत्तीने थबथबलेले नागरिक कसे तयार करणार? आज जेही सागरी ज्ञान आहे (किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रातील) ते आत्मसात करत त्यात नवी भर घालू शकणा-या ज्ञानवंतांची कशी निर्मिती करणार? शोधकाला क्षितीज तोकडे पडेल एवढे काही करायचे आजही बाकी आहे. पण त्या दिशा विद्यार्थ्याला कोण दाखवनार?

मार्क म्हणजे मेरिट या अडानी भावनेतून पालक व शिक्षकही कधी बाहेर पडनार?

उलट आम्ही विद्यर्थ्यांचे कुतुहल मारतो. त्यांच्या प्रश्नांना वेडगळ समजतो. पण अशाच वेडगळ लोकांनी क्रांत्या घडवल्यात. ज्या कळात समुद्र म्हणजे नेमका काय, त्यापार काय आहे हे माहितही नसता नौका बनवेल, त्यात बसुन वादळवारे झेलत अज्ञाताचा प्रवास करेल व नवभुमी शोधून तेथील अज्ञात लोकांशी, भाषाही माहित नसतांना, त्यांच्याशी संपर्क तर साधेलच पण व्यापारही करेल अशी कल्पना करणारा किती वेडपट म्हणायचा? नुसता वेडपटपणा नव्हे तर ठार मुर्खपणा. पण अशाच वेडपट लोकांनी आजच्या ज्ञानविज्ञानाचे व सुखकर जीवन घडवले आहे. आम्हाला अशा वेडपट लोकांची जास्त गरज आहे हे पालकांनी व शिक्षकांनी समजावून घ्यायला पाहिजे.

रोजगार हे शिक्षणाचे उपफल आहे. पण रोजगार हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट नाही. ज्ञानवंत घडवण्यासाठी, मानवजातीचे भवितव्य घडवण्यासाठी स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे नागरिक घडवणे हा शिक्षणाचा महत्वाचा आणि प्रमुख उद्धेश्य आहे. आम्ही आमच्या उद्दिष्टापासुन कोसो दूर आहोत. आम्हाला सिंधू कालात मनाने जायला पाहिजे ते या प्रेरणा समजावून घेण्यासाठी. ज्ञानाची आसक्ति काय असते हे समजून घेण्यासाठी. इतिहास त्यासाठे शिकायचा असतो हे शिक्षकांनी आधी समजावून घेतले पाहिजे व त्यासाठी पालकांनीही सजग राहिले पाहिजे. अन्यथा पाल्यांचे भवितव्य अंध:कारमयच राहनार यात शंका बाळगू नये!

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...