Monday, May 8, 2017

भांडवलदरांची मोठी बाजारपेठ!

१९७९ सालची गोष्ट. नासाने अवकाशात सोडलेली स्कायलॅब पृथ्वीवर कोसळणार होती. गांवाकडे अफवांचा बाजार जोरात होता. ती नेमकी कोठे पडणार हेही पाहित नव्हतं. गांवाकडे ही स्कायलॅब पडून सारे मरणार ही अफवा एवढी जोरदार होती कि अनेकांनी आहे नाही ते विकुन जीवाची मुंबई करण्याचा चंग बांधला. आवडीचे सारे खाऊन घ्यायचे ठरवले. थोडक्यात भयलाटच उसळली होती. वृत्तपत्रांशिवाय काही कळण्याचे साधन नव्हते. गांवात एकच पेपर येई. त्यात रोज बातम्या आणि अन्य अफवा असतच. सारे जगणे त्या मरणाच्या भयाभोवती फिरत होते. अखेर नासाच्या शास्त्रज्ञांनी स्कायलॅब दूर समुद्रात पाडली आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
कयामत येणार, जजमेंटचा दिवस जवळ आला आहे अशा अफवा भिंतींवर रंगवलेल्या तुम्हीही पुर्वी पाहिल्या असतील. शंभर वर्षात पृथ्वीवरून स्थलांतर करावे लागेल असे आता शास्त्रज्ञही सांगू लागलेत. आधार काय तर तो काही नाही. पण भयनिर्मितीचे धंदे नेहमीच जोमात असतात. असंख्य उत्पादने आपण या कोणत्या ना कोणत्या कृत्रीम भयापोटीच विकत घेत असतो हे आपल्या लक्षातही येत नाही. पन्नाशी ओलांडलेले आयुर्वेदाचे नुस्खे अभ्यासत बसतात...वापरतातही नि त्यांची उपयोगिता सांगत बसतात. आम्हीच तुमचे तारणहार, विरोधी पक्षाहाती सत्ता दिली तर तुमचे वाटोळे पक्के असे राजकीय पक्षही बजावण्यात वस्ताद असतात! भयभीत माणुस ही भांडवलदारांची सर्वात मोठी बाजारपेठ असते. धर्मांनी याचा सर्वात जास्त वापर केलाय! सर्वात मोठे भय तर मृत्युचे. त्याचा व्यापार इस्पितळेही कसा करतात हा अनुभव सर्वांना आहेच!
भयभीत माणसाला काहीही बरे करू शकत नाही. बव्हंशी आजार याच मानसिकतेतून उद्भवतात हे आपल्या लक्षातही येवू नये एवढी आपली व्यवस्था चतूर असते. भयापासून दूर राहणे, अकारण चिंता करत दिवस वाया न घालवणे हे अधिक श्रेय:स्कर नाही काय?

5 comments:

  1. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध जयंतीच्या सर्वांना खुप-खुप सदिच्छा !!!

    समता कार्यकारी मंडळ, बनवडी कॉलनी, ता. कराड, जि. सातारा, महाराष्ट्र.
    श्रावस्ती बुद्ध विहार, बनवडी कॉलनी, ता. कराड, जि. सातारा, महाराष्ट्र.

    ReplyDelete
  2. भ्रमात राहु नका!

    गौतम बुद्ध काही शिष्यांना उपदेश करत होते. "आपण जे समजतो तेच सत्य आहे, असे कधीही समजू नका. कदाचित सत्य काही तरी वेगळेच असू शकते. सतत डोळे उघडे ठेवा. जाणीवा जागृत ठेवा.' असा उपदेश बुद्धांनी केला. त्यावर काही शिष्यांना अधिक विस्ताराने सांगण्याचा आग्रह केला. त्यानंतर बुद्ध एक गोष्ट सांगू लागले.

    एका गावात एक गरीब व्यक्ती राहत होता. गावाबाहेरील एका वसाहतीत त्याची छोटीशी झोपडी होती. त्याला एक मुलगा होता. गंभीर आजारामुळे काही वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचा मृत्यु झाला होता. त्यामुळे पत्नीनंतर त्यानेच आपल्या मुलाचे योग्य संगोपन केले होते. गावातील एका घरात तो व्यक्ती रात्रभर पहाऱ्याचे काम करत असे. मुलावर त्याचे प्रचंड प्रेम होते. मुलगा आता शाळेत जाऊ लागला होता. मुलगा सुरक्षित राहावा यासाठी तो दररोज मुलाला लवकर झोपवून बाहेरून कुलूप लावून कामावर जात असे. दुर्दैवाने एका रात्री तो राहात असलेल्या वसाहतीवर दरोडा पडला. दरोडेखोरांना त्याच्या मुलाला बाहेर काढले. झोपडीतील सर्व सामान लुटले. ज्या घरात माणसे नव्हते अशा शेजारच्या काही घरातील सामान लुटले. हा सारा प्रकार अगदी गुपचूप झाल्याने आजूबाजूच्यांना काहीच समजले नाही. मात्र दरोडेखोरांनी जाताना सर्व झोपडपट्यांना आग लावली आणि त्या व्यक्तीच्या मुलाला घेऊन ते फरार झाले.

    दुसऱ्या दिवशी काम संपवून तो व्यक्ती घराकडे आला. त्यावेळी समोरचे दृश्‍य पाहून त्याला प्रचंड दु:ख झाले. झोपडी जळाली. आपला मुलगाही त्यात जळून गेला, असे त्याला वाटले. त्याने प्रचंड शोक केला. काही दिवसांनी दु:खातून सावरत त्याने पुन्हा पूर्ववत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांत त्याने पुन्हा झोपडी उभी केली. त्या आधी एका डब्यामध्ये झोपडीतील थोडी राख एकत्र केली. आपला मुलगा नव्हे तर किमान त्याची राख तरी आपल्यासोबत कायम राहील, असे समजून तो राखेचा डबा कायम स्वत:जवळ बाळगू लागला. अशातच काही वर्षे गेली. एके दिवशी काम संपवून सकाळी-सकाळी तो राखेचा डबा घेऊन झोपडीत आला. झोपडीचे दार त्याने आतून बंद केले होते. त्याचवेळी दरोडेखोरांच्या तावडीतून सुटून त्याचा मुलगा त्याच्या दाराशी आला. बाहेरून जोरजोरात दार वाजवू लागला. "मी तुमचा मुलगा', असा आवाज देऊ लागला. मात्र आपला मुलगा तर केव्हाच मृत झाला आहे, असा समज करून बसलेल्या त्या व्यक्तीने स्वत:च्या मुलाकडेच दुर्लक्ष केले. शेजारच्या झोपडीतील मुले आपली गंमत करत असतील, असे समजून त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. खूप वेळ दार वाजवूनही दार न उघडल्याने मुलगा हताश होऊन पुन्हा दूर निघून गेला.

    बुद्धांची गोष्ट संपली होती. मात्र शिष्यांची विचारप्रक्रिया सुरू झाली होती. बुद्ध सांगू लागले, "पाहा, "आपला मुलगा मेला' हा समज त्या व्यक्तीच्या मनावर एवढा खोल रूजला होता, की कदाचित सत्य काहीतरी वेगळेच असेल आणि आपला मुलगा जिवंत असेल एवढा विचार करण्याचेही त्याला भान नव्हते. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही जे समजता तेच सत्य असते अशा भ्रमात राहु नका.'

    ReplyDelete
  3. बुद्धविचार आणि विश्‍वशांती

    तथागत बुद्ध हे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातही सर्वांत श्रेष्ठ व्यक्‍ती आहेत. इंग्लंडच्या जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड विद्यापीठाने मागील 10 हजार वर्षांमधील अशा ‘टॉप 100’ जगातील विश्‍वमानवांची यादी तयार केली, ज्यांनी आपली बुद्धिमत्ता आणि मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केलीत, त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जागतिक इतिहासातील सर्वाधिक प्रभावशाली मानव म्हणून बुद्धांचे नाव अग्रस्थानी आहे. इतिहासातील सर्वाधिक महान व्यक्‍तिमत्त्व म्हणजे तथागत बुद्ध होय.
    आज सर्वच खंडांत भगवान बुद्धांचे अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (49टक्के) लोकसंख्या ही बौद्धधर्मीय आहे. भारतातील कोट्यवधी हिंदूधर्मीयांनी तसेच जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचे अनुयायित्व पत्करले आहे. या सर्व बुद्ध अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही 2.3 अब्जांवर आहे. म्हणजेच तथागत बुद्ध जगात सर्वाधिक अनुयायी (2.3 अब्ज) असलेले सर्वाधिक प्रभावशाली धर्म संस्थापक, तत्त्वज्ञ आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचे धम्मविचार हे सार्‍या जगाला विश्‍वशांतीचा संदेश देणारे आहे. बुद्ध धम्म म्हणजे काय, हे जाणून घेण्यासाठी आपणास भगवान बुद्धांनी अंगीकारलेला जीवनव्यवहार आणि त्यांनी मांडलेले धम्मतत्त्वज्ञान या दोन्ही बाजू नीट समजून घ्याव्या लागतात. प्रज्ञा, शील आणि करुणेचा संदेश घेऊन भगवान बुद्ध अवतरले. जगाच्या पाठीवर अनेक बौद्ध देश आहेत. ही संख्या चाळीसच्या आसपास आहे. बुद्धाचा विचार प्रमाण माणून विज्ञान आणि तंत्रज्ञानात जगावर राज्य करता येते हे काही देशांनी दाखवून दिले आहेच.
    cont......

    ReplyDelete
  4. आजच्या ग्लोबल दुनियेत वावरताना आजच्या पुरोगामी तरुणांनी भगवान बुद्धांचा अष्टांगमार्ग, बुद्धांचा अनात्मवाद आणि त्यांचा अखेरचा संदेश या तीन गोष्टींकडे अत्यंत सम्यकपणे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. आज आपण अशा एका जमान्यात उभे आहोत की, जिथे प्रज्ञा, शील आणि करुणेचा लवलेशही दिसत नाही. आपण अशा एका स्पर्धेच्या युगात उभे आहोत की, जिथे माणसांच्या घामाचे आणि रक्‍ताचेही मोल होत नाही. आपण अशा एका सामाजिक आणि राजकीय वास्तवाला सामोरे जात आहोत की, जिथे माणूसपण हरले आणि पैसा जिंकला आहे. 1991 नंतर तर भारतीय समाज अनेक अंगांनी बदलला आहे.
    जागतिकीकरणात जात संपेल असे अनेकांना वाटत होते; पण वास्तवात तसे झाले नाही. उलट जात अधिक प्रखर होत चालली आहे. एकीकडे जात नष्ट करा, माणूस जे कर्म करतो त्यावर त्याची श्रेष्ठता अवलंबून आहे, असे बुद्ध सांगत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी भारतीय संविधानाच्या रूपाने एक कृतिशील कार्यक्रम दिला; पण दुसरीकडे जात मात्र संपली नाही. आज जागतिकीकरणाचा पुरस्कर्ता वर्ग नवसाम्राज्यशाहीचे गोडवे गात-गात असे सांगत आला आहे की, जागतिकीकरण एकदा स्थिर झाले की, पृथ्वीवरच्या प्रत्येक मनुष्यप्राण्याला अन्‍न, वस्त्र आणि निवारा या गरजा सहजपणे पूर्ण करता येतील. सर्वांना शिक्षणाचा आणि नोकरीचा अधिकार प्राप्‍त होईल, सर्वांना स्वच्छ हवा, स्वच्छ प्रकाश मिळेल, दारिद्य्रनिर्मूलन होईल, जात नष्ट होईल, समानतेचे वारे वाहतील, वस्तू माणसांपर्यंत जातील आणि प्रत्येकाला स्वत:च्या मनाप्रमाणे स्वत:चा विकास घडविण्याचे स्वातंत्र्य असेल. नवसाम्राज्यवादाने ही आश्‍वासने जगभर पसरविली; पण वास्तवात तसे झाले आहे का?
    आपल्या आजूबाजूच्या सामाजिक व राजकीय घडामोडींचा उदय आणि त्यांचा अस्त याकडे पाहण्याची वैज्ञाननिक द‍ृष्टी बौद्धदार्शनिकातले ‘असंग’ आपल्याला देतात. आधुनिक विचारांवर स्वार झालेल्या या नव्या पिढीने बुद्धांच्या सम्यकद‍ृष्टीने भावतालच्या जगाकडे, त्यातील घडामोडींकडे आणि प्रश्‍नांकडे पहायला पाहिजे. बौद्धदार्शनिक असंग, बुद्धांचा अनात्मवाद, त्यांचा कर्मसिद्धांत आणि अखेरचा संदेश हे समजून घेतले तर आजूबाजूचे भौतिक जग नीट कळू लागते. ‘असंग’ आपणास सांगतात की या जगातील सर्व वस्तू या हेतूंच्या आणि आवश्यकतांच्या संयोगातून तयार होत असतात, त्यांना त्यांचे स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व नसते. जेव्हा हा संयोग विसर्जित होतो तेव्हा त्याचा परिणाम म्हणून त्या वस्तूचा विनाश ठरलेला असतो.
    बौद्ध धम्म म्हणजे परिवर्तनशीलता आहे. हा धम्म स्थितिशील नसून नित्यनूतन आहे, गतिशील आहे. हा धम्म माणसाला स्वातंत्र्य देतो आणि समतेने वागवितो. म्हणूनच बौद्ध धम्म म्हणजे माणसाच्या सर्जनशीलतेला जन्म देणारी, ताजगी भरलेली रोजची नवी पहाट आहे. ही पहाट अधिक सुंदर आणि सार्थ करायची असेल तर आपल्याला अधिक व्यापक असे कृतिकार्यक्रम हाती घ्यावे लागतील.
    बुद्धविचार म्हणजे माणसाचा आतला उजेडच आहे. त्याला सतत प्रकाशमान ठेवणे म्हणजेच ‘अत्त दीप भव’ आहे. आपले जीवन प्रकाशमान होण्यासाठी बुद्धांनी सांगितलेले अष्टांगमार्ग आपण पुन्हा-पुन्हा आठवायला हवेत. योग्य ज्ञान, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, योग्य कृती, योग्य उपजीविका, योग्य प्रयत्न, योग्य जागरूकता आणि सम्यक समाधी म्हणजे योग्य एकाग्रता, भगवान बुद्धांनी सांगितलेले हे अष्टांगमार्ग जीवनमार्ग आहेत. पण आज आपण अशा एका वळणावर उभे आहोत की जो रस्ता प्रचंड संपत्तीच्या निर्मितीचा, अमाप उपभोगाचा, परस्परांच्या स्पर्धेचा आणि विनाशाच्या, वैराच्या दिशेने जाणारा आहे. एक बुद्धाचा मार्ग ज्या रस्त्याने गेले तर माणूस बनता येईल आणि दुसरा प्रचंड स्पर्धेचा मार्ग, ज्या रस्त्याने गेले तर गुलाम बनता येईल. तेव्हा आपल्यासमोरचे आजचे मोठे आव्हान म्हणजे जागतिक भांडवली व्यवस्थेत गुलाम म्हणून वावरताना सम्यक माणूस कसे व्हायचे? सम्यक माणूस बनायचे असेल तर युद्धाची नव्हे तर बुद्धाचीच वाणी ‘जीवनमंत्र’ बनवावी लागेल.
    शिक्षण काय असते, हे भारतीय समाजाला बुद्धाने सांगितले. पर्यावरणशास्त्र, निसर्ग आणि पाण्याचे महत्त्व याविषयी मूलभूत विचार बुद्ध वाङ्मयात पहायला मिळतो. स्थापत्यशास्त्र, शिल्पकला आणि लेणी या ऐतिहासिक देणग्या आपल्याला बुद्धांनीच दिल्या. शेती आणि शेतीच्या अवजारांचा शोध, विशेषत: नांगराचा शोध हा बुद्धकाळातलाच आहे. म्हणूनच या देशात वॉटर मॅनेजमेंट आणि अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंटचे पहिले उद‍्गाते बुद्ध आहेत, याकडे आधुनिक शिक्षण घेणार्‍या तरुणांनी दुर्लक्ष करून कसे चालेल? बुद्ध हे जसे शिक्षण आणि संस्काराचे प्रणेते आहेत तसेच ते समग्र सांस्कृतिक आणि राजनैतिक घडामोडींचे भाष्यकार तत्त्ववेत्तेही आहेत. म्हणून आजच्या पिढीने अंत:करणापासून बुद्धविचार समजून घ्यायला हवेत.

    ......................................................

    ReplyDelete
  5. एकूणच काय बुध्द महत्व बुध्द नामघोष, वरील प्रतिक्रियेत दिसत आहे. मान्य आहे. बुध्दाने जे सांगितले ते सत्य आहे अनुभवाधिष्ठित विचारप्रणालीचा प्रचार प्रसार आवश्यक आहे. पण संबधीत लेखक त्या अनुभवाने परिपूर्ण आहे का, वाचन करतांना तर उताविळपणा घाईने चौकट बध्द ठोकळेबाजपणा जाणवतो. त्यापेक्षा बुध्द समजून घेतांना ओशो किंवा इतर जागतिक दर्जाच्या व्यक्तींच्या मुलभूत चिंतन साहित्यानुभवाचाही अभ्यास हवा. विचार मांडायची पध्दत कुठेतरी थोपवलेली आढळते. सहजता, शालिनता उच्च दर्जाचे सामंजस्य, प्रज्ञा विवेक तसा मांडणीत पाहिजे. नवीन वाचकांना किंवा साधकांना कुणाच्या विरोधात लिहिल्याचा भास होता कामा नये.
    सगळयांनीच भावनांचे नियमन करणे किंवा एकाच पध्दतीने चौकटीत अडवून त्याच चष्म्याने मानवी मनाचे, जीवनाचे विकासगतीचे पृथ:क्करण करणे निसर्गसुलभही नाही निसर्गनिवडीच्या सिध्दांताच्याही विरुध्द आहे. आ णि बुध्द तर हेच अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगतात. त्यामुळे ब्रँडींग करुन फार तर चौकट निर्माण होते. तिचे अंध फालोअर्स निर्माण होतात.
    मला नाईलाजाने किंवा उपरोधाने म्हणावे लागेल कि आपण स्वीकारलेलया मार्गाचे केवळ प्रचारक न बनता प्रत्यक्षात तसे वागून दाखवा मिळवा ती हिंमत टीका सहन करण्याची मिळवा ती ताकद कुशल एकाग्रतेची , सामजस्याची समायोजनाची सातत्याने स्वताच्या अनुभवाचा वापर करुन विवेकाने वागण्याची . तेव्हाच आपोआपच आपण सगळेच त्या अनुभवजन्य ज्ञानाच्या निसर्गानुकूल मानव होण्याचे स्वप्न साकार करु शकू.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...