Tuesday, May 9, 2017

जय अज्ञानवाद!

भारतात वेगवेगळ्या तत्वज्ञानांची रेलचेल आहे. त्याने भारतियांचे काय हित केले ते प्रश्न अलाहिदा. आम्हाला हेही प्रश्न पडत नाहीत. बहुदा हे समजुनच भारतात एकमेवाद्वितीय असा तत्वज्ञानाचा पंथ अस्तित्वात आला होता आणि त्याचे नांव होते "अज्ञानवाद". म्हणजे ज्ञान तुच्छ असून अज्ञानातच मोक्ष व मूक्ती आहे असे मानणारा हा पंथ होता. हा पंथ अल्पावधीत एवढा लोकप्रिय झाला कि त्याचे पुढे ६७ उपपंथ पडले. जैन साहित्यात या पंथाची माहिती मिळते. काय होते या पंथाचे तत्वज्ञान?

१. दोन भिन्न व्यक्तींचे ज्ञान भिन्न असू शकते. या दोन व्यक्तींमधील जानाच्या चर्चा, कोणाचे बरोबर याबाबतचे वाद यामुळे ज्ञानाबद्दलच शंका निर्माण होतात. मने कलुषित होतात ते वेगळेच!

२. कलुषित मनाच्या माणसांना जास्त काळ संसार बंधात रहावे लागते. मग ज्ञानामुळे मोक्ष कसा मिळणार?

३. ज्ञानच नसले तर अभिमान आणि द्वेष निर्माण होत नाहे व मोक्ष पटकन मिळतो.

४. ज्ञानामुळे इच्छा उत्पन्न होतात. इच्छा निर्माण झाल्या कि ओघाने कर्म आलेच! मनाच्या प्रेरणांमुळे निर्माण होणा-या कर्माचे परिणाम हे तीव्र असतात. ते लोकांना लाभकारकच असतील असे नाही. आणुइ लाभ म्हणजे काय हे कोणी ठरवायचे?

५. मनाच्या प्रेरणेवाचून केवळ शरीराने घडणा-या नैसर्गिक आपसूक होणा-या कर्मांचे परिणाम फार वाइट अथवा दु:खदायक नसतात. प्रेरणेने होणारी कर्मे मात्र दु:खदायकच होण्याची शक्यता असते.

६. मुमुक्षूने अज्ञानात राहणे कधीही चांगले. मोक्षासाठी ज्ञान आवश्यक आहे असे जे म्हणतात त्यांना तरी खरे ज्ञान म्हणजे नेमके काय हे कोठे माहित असते? प्रत्येक तत्वज्ञानी पुरुषाचे ज्ञान निराळे असते. अमुकचेच खरे कि खोटे हे ठरवण्यातच वेळ वाया जाईल.  

७. महावीर अथवा संबुद्ध म्हणतात की "मला दिव्य ज्ञान झाले आहे." पण याला प्रमाण काय? ते खरे मानायचे निकष कोणते? आणि ते कोणी ठरवायचे? थोडक्यात ज्ञानाच्या संबंधात कोणत्याही विधानावर प्रमानावाचून विश्वास ठेवता येत नाही. मग ह उपद्व्याप करण्यात, प्रमाणे गोळा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा अज्ञानात राहणे काय वाईट?

तर हा झाला अज्ञानवाद. फारसा माहित नसलेला पण भारतियांनी पुरेपूर आपल्या हाडीमांसी रुजवलेला. हा अज्ञानवाद मांडायलाही ज्ञानाची गरज होती हेही मान्य करावे लागेल. पण आम्ही त्याही ज्ञानाशिवायच अज्ञानवादाची कास धरली ती धरलीच! कोणतीही खातरजमा न करुन घेता आम्ही ज्यांना महान शास्त्रज्ञ, धर्मनेते, धर्मग्रंथ अथवा आमचे नेते ते कथित विद्वान जे म्हणतात तेच जणू अंतिम सत्य या आविर्भावात जगत असतो. पण ते सत्य असेल कि नाही असले फालतू प्रश्न आम्हाला प्रश्न पडत नाहीत. पडले तर ते फक्त पाय खेचण्यापुरते. कारण प्रश्न पडणे हे आम्ही त्रासाचे मानतो. प्रश्न पडत नाहीत तर मग उत्तरे शोधायची उठाठेव कोण करणार? प्रश्न पडत नाहीत म्हणून भारतियांना प्रमाणांचीही आवश्यकता पडत नाही. कारण प्रमाणे कोणी दिलीच तरी ती तपासून पहायचे कष्ट कोण करणार? कशाला? कोणी सांगितली नसती उठाठेव? दृष्टीआड ते सृष्टीआड हा आपला मुलमंत्र आहे की काय? 

अज्ञानाची आस ही अशी आहे. अज्ञानातील जगण्यात आम्ही संतुष्ट आहोत. म्हणजे अज्ञानवाद्यांच्या मतानुसार आम्ही मोक्षप्राप्तीला खरे लायक आहोत. 

जय अज्ञानवाद!

3 comments:

  1. महावीर अथवा संबुद्ध म्हणतात की "मला दिव्य ज्ञान झाले आहे." पण याला प्रमाण काय? ते खरे मानायचे निकष कोणते? आणि ते कोणी ठरवायचे? थोडक्यात ज्ञानाच्या संबंधात कोणत्याही विधानावर प्रमानावाचून विश्वास ठेवता येत नाही. ...........>

    अहो सोनवणी,

    'मला दिव्य ज्ञान प्राप्त झाले आहे' असे बुद्धाने कोठेही म्हटलेले नाही!

    याचे उत्तर बुद्धाने कालामसुत्तात देऊन ठेवले आहे. ते काळजीपूर्वक वाचा......

    कालाम लोकांनी त्यांना उपदेश देण्याची विनंती केली. ते बुद्धांना म्हणाले, "भगवान, आमच्याकडे अनेक पंथाचे साधू, मुनी, ब्राह्मण, श्रमण येतात. प्रत्येकजण आपापल्या पंथाची थोरवी गातो व दुसऱ्यांना कमी लेखतो. आम्ही त्यांची मनोभावे सेवा करतो, पण यांच्यातील कोण खरे बोलतो आणि कोण खोटे बोलतो याचे आम्हाला मार्गदर्शन करा." बुद्ध म्हणाले, "कालामांनो, कोणी सांगतोय म्हणून ग्राह्य धरू नका, कोणी परंपरेचा हवाला देतोय म्हणून खरे मानू नका, कोणी म्हणतं प्रमाणग्रंथात आहे म्हणून खरे मानू नका, तर प्रत्येक विचार स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीवर घासून बघा कि हे विचार मला नीतिमत्ता शिकवते का, या विचारांमुळे कोणाची हिंसा होत नाही ना, या विचारांमुळे माझ्यात कोणाबद्दल कटुता तर निर्माण होत नाही ना, हे विचार कालसापेक्ष आहेत का, या विचारांमुळे सर्वांचे कल्याण होणार आहे का आणि जर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे होकारती असतील तर ते विचार योग्य समजावे." पुढे ते म्हणतात कि लोभ, द्वेष आणि मोह माणसाचे खरे शत्रू आहेत आणि त्यांना जितक्या लवकर नष्ट करता येतील, तेवढे माणसाचे आयुष्य सुखी व कल्याणकारक असेल.

    -प्रताप वीर.

    ReplyDelete
  2. आज प्रकर्षाने या "कालामसुत्त"ची आठवण होत आहे. आजचे जग इतके स्वयंकेंद्रित झाले आहे कि आम्हाला आमच्या छोट्या विश्व बाहेरचं जग माहीतच नाही किंबहुना आम्हाला ते जाणूनही घ्यायचे नाही. "Me, My and Myself " या चक्रात आम्ही अडकलो आहे. त्यामुळे आमच्यात प्रचंड अनिश्चितता पसरली आहे, आम्ही अतिशय संवेदनशील झालो आहोत मात्र चुकीच्या गोष्टींसाठी! आमच्यातील लोभ, मोह आणि द्वेष हे फणा काढून उभे आहेत. बौद्ध ग्रंथात या त्रयींना सुंदर रूपके दिली आहेत. लोभ म्हणजे कोंबडा, मोह म्हणजे डुक्कर आणि द्वेष म्हणजे साप. या सर्व प्राण्यांच्या सवयी पाहिल्यात कि त्यांना या त्रिदोषांचे रूपक का म्हटले आहे हे लक्षात येईल. कोंबडा नेहमी जमीन उकरून त्याला हवे ते टिपत असतो - स्वार्थी किंवा लोभी मनुष्य त्याला हवे असलेले फक्त घेत असतो. डुक्कराला नेहमी आपण गटारात किंवा घाणीत फिरताना पाहतो. त्याला त्या घाणीचे किंवा चवीचे काहीही वाटत नसते. तो फक्त आणि फक्त त्याचे खाण्याचे पाहत असतो. एखाद्याला पैशाचा किंवा सोन्याचा किंवा जमिनीचाच प्रचंड मोह असतो आणि अशी व्यक्ती फक्त खाण्याचेच काम करत असते. काही व्यक्तींना इतरांचा द्वेष करण्यात धन्यता वाटत असते. अशांना कुठलेही कारण चालते. जसा एखादा साप. आपण कितीही त्याला न मारण्याचे ठरवो मात्र त्याला आपली चाहूल लागली कि लगेच तो फणा काढून तैयार.

    आज आम्ही ऐकीव माहितीवर लगेचच विश्वास ठेवतो. आमच्यात अविश्वास लगेच मुरतो कारण आम्ही आमची सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवली आहे. आम्हाला आमच्या स्वत्वाचा इतका अहंकार झाला आहे कि आमच्यापेक्षा कोणी सरस आहे हे आम्ही काबुल करू शकत नाही आणि मग आम्ही त्याचे पाय खेचायला लागतो किंवा चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नांना यश दिसले कि आम्हाला असुरी आनंद मिळतो. मात्र या सर्व व्यायामात आम्ही विसरतो कि हे सर्व करण्यात आम्ही आमच्यात प्रचंड कटुता निर्माण करतो ज्याचा त्रास आम्हालाच होणार असतो. 'मी सुखी तर इत्तर सुखी' हि युक्ती न वापरता 'इत्तर सुखी तर मी सुखी' यासाठी जर आपण प्रयत्न केले तर खऱ्या अर्थाने आम्ही मनुष्य म्हणून जगू शकू.

    "कालामसुत्त"ची गरज आज सर्वांनाच आहे...

    -प्रताप वीर.

    ReplyDelete
  3. बुद्धांनी स्वतःचे विचारही चिकित्सेच्या कक्षेत आणले......

    बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी इतकया नि:संदिग्ध शब्दांत ज्ञानाच्या क्षेत्रातील स्वानुभवाचे महत्व सांगितले होते. आधुनिक विज्ञानात सत्याचा शोध घेताना नेमक्या याच भूमिकेचा अंगीकार केला जातो. कितीही आदरणीय व्यक्तीने किंवा कितीही पूजनीय ग्रंथाने सांगितलेली एखादी गोष्ट आपल्यासमोर आली, तरी आपण आदरापोटी वा पूज्यतेच्या भावनेपोटी स्वीकारता काम नये, हा दृष्टीकोण मानवी बुद्धीला खऱ्या अर्थाने मुक्त करणारा, मानवी प्रतिभेला सर्वांगांनी फुलविणारा आहे, यात शंका नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे, धर्मग्रंथांचा निर्देश करताना वापरण्यात आलेला पिटक हा शब्द होय. इतर संप्रदायांच्या वेद वगैरे धर्मग्रंथांवर विसंबून राहू नका, एवढेच सूचित न करता, स्वतः आपण सांगितलेल्या धम्मविचारांवरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, हे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. कोणाही महान व्यक्तीवर आंधळेपणाने श्रद्धा ठेवू नका, हे सांगतानाही केवळ दुसऱ्या कोणा गुरुकडे बोट दाखवून आणि त्याचे विचार चिकित्सेच्या कक्षेत आणून ते थांबलेले नाहीत. श्रमण गुरुवरही केवळ गुरु म्हणून श्रद्धा ठेवू नका, हे त्यांचे विधानही फार फार अर्थपूर्ण आहे. स्वतःचे व्यक्तिमत्त्व देखील चिकित्सेच्या पलीकडे नाही, हे त्यांनी कोणताही संशय राहणार नाही इतक्या परखड शब्दांत सांगून ठेवले आहे.

    सतीश पवार

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...