Saturday, June 24, 2017

...मग जगबुडी येणारच!


Inline image 1

भविष्यात जग कसे असावे व कसे असू शकेल याची चर्चा करत असतांना जगाबाबतचीच इतर जी भाकिते वर्तवली जातात तीही आपण पाहिली पाहिजेत. स्टिफन हॉकिंग्ज या विश्वविख्यात शास्त्रज्ञाने येत्या शंभर वर्षात एकतर मानवजातीला परग्रहावर रहायला जावे लागेल किंवा मानवजातच नष्ट होईल असे भाकीत वर्तवले होते. त्यांच्या भाकितामुळे जगभर खळबळ उडणे स्वाभाविक होते. ज्या वेगाने मनुष्य पृथ्वीतलाचे वाटोळे करत निघाला आहे तो वेग पाहता मानवजात नष्ट होईल किंवा त्याला अन्यत्र कोठे परग्रहावर आश्रय शोधावा लागेल हे भय संवेदनशील विचारवंतांना व वैज्ञानिकांना वाटत असल्यास नवल नाही. पण या भयाकडे आपण गांभिर्याने पाहिले पाहिजे.

खरे तर कधी ना कधी मानवजात नष्ट होणार आहे ही कल्पना अगदी अनेक धर्मशास्त्रांतही प्राचीन काळापासून येत आलेली आहे. जलप्रलय ही सर्वात जुनी कल्पना. पृथ्वीतलावर पाप वाढले की जलप्रलय येतो व मनुष्य व अन्य प्राणीजात नष्ट होऊ लागते. पण प्रभुच्या कृपेने मनू किंवा नोहाची नौका काही भाग्यवंतांना वाचवते व जीवनाचे रहाटगाडगे पृथ्वीवर पुन्हा सुरू राहते अशी ती कल्पना आहे. "कयामत का दिन..." अमूक अमूक आहे अशा घोषणा अधून मधून होतच असतात. अलीकडे माया कॅलेंडरचा आधार घेत पृथ्वी निबिरु नामक एका ग्रहाला धडकणार असून त्यात प्रचंद सुनामी येत मानवजात नष्ट होईल असे भाकीत वर्तवण्यात आले होते. ही घटना २१ डिसेंबर २०१२ रोजी घडणार असेही ठामपणे सांगण्यात आले होते. याचा परिणाम म्हणे असा झाला की चीनमधील एका माणसाने आधुनिक नोहाची नौकाच बनवली. अर्थात असे काही न घडल्याने हा आधुनिक नोहा निराश होण्यापलीकडे काही झाले नाही. अशा अनेक भविष्यवाण्या झाल्या आहेत, लोक घाबरलेले आहेत आणि काही तर "आता मरणारच आहोत तर आहे ते विकून मौजमजा करून घ्या!" म्हणत सर्वस्वाला मुकले आहेत. आपल्याकडेही १९७९ मध्ये अमेरिकेची अवकाशातील स्कायलॅब कोसळण्याने सर्वच नष्ट होणार या बातमीने हाहा:कार उडवला होता हे अनेकांच्या स्मरणात असेल. अनेकांना असे भय पसरवण्यात कदाचित विकृत आनंद होत असेल. कडव्या धार्मिक लोकांचा यात सर्वात मोठा वाटा असला तरी जीवसृष्टीचे नष्ट होणे ही निव्वळ कवीकल्पना नाही. 

खरे म्हणजे ही नष्ट व्हायची परंपरा अव्याहत सुरुच आहे. गेल्या दोन शतकांत ११ प्राणीप्रजाती केवळ माणसाने नष्ट केल्या आहेत. नैसर्गिक कारणांनी नष्ट होणा-या जैव प्रजाती वेगळ्या.  गेल्या साडेसहा कोटी वर्षांच्या इतिहासात प्राकृतिक कारणांनी किमान पाच वेळा पृथ्वीवरील तत्कालीन जीवसृष्ट्या पुरेपूर नष्ट झाल्या आहेत. ही प्राकृतिक कारणे म्हणजे ज्वालामुखींचे उद्रेक, हिमयुगे अथवा छोट्या उपग्रहांची पृथ्वीशी झालेली टक्कर. दुसरी कारणे दिली जातात ती जैविक उत्क्रांतीच्या टप्प्य्यांवर आधीच्या प्रजाती नष्ट झाल्या हे. दुसरे कारण हे अधिक संयुक्तिक असले तरी आता मात्र असा सहावा टप्पा न येता मनुष्य स्वत:च्याच हव्यासापायी सहाव्या टप्प्याच्या उंबरठ्यावर उभा आहे असे नादिया ड्रेक या पर्यावरणतज्ञही म्हणतात. आज दिवसाला बारा जैव प्रजाती रोज नष्ट होत आहेत. त्या नैसर्गिक रित्या नष्ट होत असल्या तरी मानवजातीचा त्यात कसलाही हातभार नाही असे म्हणता येत नाही. किंबहुना मनुष्य असा बेजबाबदार प्राणी आहे की त्याला कसलीही जबाबदारी घ्यायची इच्छा नसते.

मनुष्याने औद्योगिक क्रांतीनंतर नैसर्गिक साधनस्त्रोतांचा बेसुमार उपसा करत निसर्गाचे संतुलन पुरते घालवलेले आहे. पुढे हा वेग वाढताच राहील. दुसरी बाब अशी की माणसाने कृत्रीम साधनांच्या बळावर आपले आयुष्यमान वाढवले असले तरी लोकसंख्येचे प्रमाण हे नैसर्गिक समतोलाशी विसंगत बनलेले आहे. पर्यावरणाबाबत सारेच जरी बोलत असले तरी प्रत्यक्षात प्रामाणिक प्रयत्नांची वानवा आहे हे आपण नुकत्याच झालेल्या पॅरिस कराराची कशी लगोलग वासलात लावायचे प्रयत्न सुरु झाले त्यावरून लक्षात येईल. एकंदरीत जीवसृष्टीला लायक असलेला हा एकमात्र पृथ्वी नामक ग्रह, पण त्यावरील अत्याचार "अमानवी" म्हणता येतील असेच निघृण आहेत. यामुळे सर्वच प्रजातींच्या एकंदरीतच जगण्याच्या पद्धती, जैविक संरचनेतील बदल आणि त्यातून उद्भवणारी संकटे यातून आपण स्वत:च्व्ह स्वत:साठी विस्फोटक "जैविक बॉम्ब" तयार करत नेत असून त्यात आपलाच नव्हे तर अन्य जीवसृष्टीचाही विनाश आहे हे आपल्या लक्षात येईल. अर्थात त्याची आम्हाला फारशी पर्वा आहे असे दिसत नाही.

नैसर्गिक कारणाने, उत्क्रांतीच्या टप्प्यांवर आपल्या पुर्वज मानव प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. निएंडरथल मानव नष्ट होऊन फार फार तर ४० हजार वर्ष झालीत. आजचा माणुस त्यानंतर उत्क्रांत झालेला आहे. सहा अब्ज वर्षांच्या पृथ्वीचा इतिहासात हे चाळीस हजार वर्ष म्हणजे अत्यंत किरकोळ आहेत. पण आजच्या आहे त्या होमो-सेपियन प्रजातीच्या माणसातून किंवा आहे हा मानव नष्ट होत नव्याच जैविक-संरचनेतुन पुढचा नवा मानव उत्क्रांत होईल अशी नैसर्गिक स्थितीच जर आम्ही ठेवली नाही तर मानव प्रजातीचा प्रवाह कोठेतरी थांबणार अथवा हे नक्कीच आहे. आणि या प्रदुषित पर्यावरनातून समजा नवा मानव उत्क्रांत झाला तरी तो बौद्धिक व शारिरीक दोषांनी पुरता ग्रासलेला नसेल असे कशावरून? समजा तो त्या प्रदुषित स्थितीला तोंड देण्यास समर्थ जरी बनला तरी त्याचे जैव विश्व मात्र अत्यंत आकुंचित झालेले असेल. अर्थात त्याची पर्वा या होमो-सेपियन्सला आहे असे मात्र फारसे दिसत नाही. 

स्टिफन हॉकिंग्ज यांनी वर्तवलेली भविष्यवाणी एका शास्त्रज्ञाची नसून मानवाच्या बेमुर्वतखोरपणातून आलेल्या उद्वेगाची ती अपरिहार्य परिणती आहे. समजा पृथ्वी नष्ट व्हायला शंभर वर्ष लागतील किंवा काही लाख वर्ष. प्रश्न तो नसून आपण जगातील जीवसृष्टीचा नैसर्गिक क्रमविकासच खुंटवतो आहोत आणि आपला शेवट आरोग्यदायी वातावरणात व्हावा असा प्रयत्न न करता आपल्याच हाताने आपली कबर खोदतो आहोत. याचा उद्वेग सुजाणांना वाटने स्वाभाविक आहे.

परग्रहावर रहायला जावे लागेल याचा मतितार्थ एवढाच की "परलोका"त जावे लागेल. कारण किमान आपल्या ग्रहमालिकेत जीवसृष्टी असलेला एकही ग्रह नाही. मंगळावर कृत्रीम वातावरण निर्माण करत काही थोके जगुही शकतील पण ते किती काळ परवडेल हा थोडक्यांचाही प्रश्न आहे. समजा दुस-या ता-यावर जीवसृष्टी सापडली आणि माणसाने तिकडे "ग्रहांतरित" व्हायचे ठरवले आणि सध्याचा अंतराळ प्रवासाचा वेग दुप्पट-तिप्पट जरी करण्यात यश आले तरी किमान दोन-तीन पिढ्या अंतराळयानांतच खपतील. हेही किती जणांना परवडेल हाहे प्रश्न आहेच. शिवाय तेथे आधीच अस्तित्वात असलेली जीवसृष्टी माणसांना का आणि कशी सामावुन घेणार? थोडक्यात परग्रहावर रहायला जावू हे म्हणने शेख-चिल्ली स्वप्न आहे. 

आपल्याला शाश्वत जीवनशैलीचाच अंगीकार करत आज बिघडत गेलेले पर्यावरण किमान आहे असेच राहील हे पाहिले पाहिजे. उंटावरची शेवटची काडी कधी पडेल हे ना धर्मवेत्ते सांगू शकतात ना शास्त्रज्ञ कारण अखिल जीवसृष्टीच परस्परांची अशा साखळीत गुंतलेली आहे की नेमकी कोणती कडी तुटली तर सर्वविनाशक चेन रिऍक्शन सुरू होत संपुर्णच कडेलोट होईल हे "जगबुडी"चे भाकीत करण्याएवढे सोपे नाही. विज्ञानाचा आधार हा विशिष्ट मर्यादेपर्यंतच असू शकतो कारण विज्ञानालाही आजच्या मानवी प्रजातीच्या बौद्धिक सर्वाधिक झेपेच्या मर्यादा आहेत हे विसरून चालणार नाही. देव-आणि धर्मालाही त्यापेक्षाही अधिक मर्यादा आहेत हे इतिहासानेच सिद्ध केलेले आहे. आपल्या मर्यादा न ओळखण्याची गंभीर चूक आपण करीत आहोत. अशा स्थितीत स्टिफन हॉकिंग्जसारख्यांनाही उद्वेग नाही येणार तर काय! 

शाश्वत जीवनशैली हीच भविष्यातील आदर्श जीवनपद्धत असू शकते. किंबहुना "एक जग : एक राष्ट्र" या संकल्पनेकडे जावे लागेल ते याच पद्धतीला आदर्शभूत मानत एका नव्या आदर्शाकडे जाण्यासाठी. अन्यथा जगबुडीच्या दिशेने आपण निघालेलोच आहोत. ही जगबुडी कोणी देव, अल्ला वा ईश्वरामुळे येणार नसून आम्हाच हव्यासखोरांमुळे येणार आहे.

(Published in Dainik Sanchar, Indradhanu supplement.)


No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...