Thursday, June 22, 2017

"गो-ब्राह्मण प्रतिपालक", "अफजलखान"....वगैरे...


Image result for shivaji maharaj hd wallpaper for facebook cover



महाराष्ट्रात सध्या जुनाच वाद पुन्हा चर्चेला आलेला आहे. या वादाचे तीन पदर आहेत. यांचा आपण साकल्याने विचार करण्याचा प्रयत्न करु.

१. शिवाजी महाराज व ब्राह्मण संबंध
२. शिवाजी महाराज व मुस्लिम संबंध
३. शिवाजी महाराज व रयत आणि रयतेबाहेरील असणा-या हिंदू-मुस्लिमांशी संबंध.

या पहिल्या, म्हणजे शिवाजी महाराज व ब्राह्मण संबंधाबाबत प्रचंड विवाद आहे. शिवाजी महाराज "गो-ब्राह्मण प्रतिपालक" होते की नव्हते हा तो वाद आहे. महाराज तसे होते हे दाखवण्यासाठी काही त्यांचीच पत्रे तसेच संभाजीमहाराजांची दानपत्रे व बुधभुषणममधील उतारे दिले जातात. त्यामुळे हे संबोधन शिवाजी महाराजांना, त्यांनी ते स्वत:हून घेतले नसले तरी त्यांना ते किमान मान्य होते, असे म्हणायला हरकत नाही. पण त्यातून सिद्ध काय होते? तर काहीच नाही. यावरुन शिवाजी महाराजांची राजनीति ठरवणे अशक्यप्राय आहे.

मुळात वेद आणि ब्राह्मण माहात्म्य अकराव्या शतकोत्तरापासुनच भारतियांच्या मनावर एवढे ठसवले गेले होते की त्याचा प्रभाव तेराव्या शतकापासुनच्या संतांवरही होता. तुकोबांचे काही अभंगही वेदमहत्ता मान्य करतांना दिसले तरी नवल वाटायचे कारण नाही. तेराव्या शतकातील विसोबा खेचरांना आपल्या षट्स्थळ या ग्रंथात आगमांपेक्षा वेद हे दुय्यम आहेत असे स्पष्टपणे म्हटले असले तरी आवश्यकता नसतांना त्यांना वेदांना दुय्यम स्थानी का होईना ठेवावे लागले. खरे तर वेद-वर्णाश्रम विरोधी जी बलाढ्य हिंदू तत्वपरंपरा होती ती त्या काळात आहोटीला लागलेली होती. वैदिकांनी त्यासठी पुराणांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून वेद व ब्राह्मण माहात्म्य सर्वसामान्यांच्या गळी उतरवले हे एक वास्तव आहे. समजा छत्रपतींना किंवा कोणालाही "गोब्राह्मणप्रतिपालक" ही पदवी वापरावी लागली असेल तर ती त्या काळातील संपुर्ण समाजजीवनाची शोकांतिका होती. त्याबद्दल कोणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील व मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असेल तर ते दुर्दैवी आहे. कोणत्याही एका समाजघटकाबाबत आपण पक्षपाती आहोत असे दाखवावे लागणे, मग ते धार्मिक का कारण होईना, दुर्दैवी होते याची खंत आम्हाला का नाही? ही धर्माचार्यांनी लादलेली बाब नसेलच वा तशी मन:स्थिती बनवली नसेलच असे कसे म्हणता येईल?

संभाजी महाराजांनी बुधभुषणमच्या सुरुवातीलाच म्हटले आहे की, "...त्या शिवाजी राजांचा – भोवतीच्या साऱ्या राजेलोकांना शिरोभूषण वाटणारा, काव्य, साहित्य, पुराण, संगीत, धनुर्विद्या यांचे ज्ञान घेतलेला मी पुत्र – शंभूराजे या नावाने प्रसिद्ध आहे. पुराण ग्रंथांचे विवेचन करून, त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून मी शंभू हा बुधभूषणम् नावाचा सद्ग्रंथ रचीत आहे."

या विधानावरुनच मुळात संभाजी महाराजांनी हा ग्रंथ लिहिलाच असेल तर तो पुराणांवर आधारित आहे हे स्पष्ट होते. यात वेदांचा कसलाही उल्लेख नाही ही बाबही येथे उल्लेखनीय आहे. खरे तर शिवकालाआधी "गो-ब्राह्मण प्रतिपालक" ही पदवीच मुळात कोठे आढळत नाही. राजा हा "भूपाल" असतो ही मान्यता मात्र सर्व वैदिक व अवैदिक ग्रंथ देतात. पुराणांतही ही संज्ञा कोठे आलेली नाही. म्हणजेच ही त्या काळाच्या परिस्थितीत शोधली गेलेली पदवी होती असे आपल्याला दिसते. पण ब्राह्मण हा श्रेष्ठ होय ही पौराणिक कल्पना आहे आणि पुराणांचा तत्त्कालीन समाजावर प्रभाव होता हे शंभुराजांनीच बुधभुषणमध्ये दाखवून दिले आहे.

पण वास्तव राजकारणात शिवाजी महाराजांची भुमिका विपरित परिस्थितीत स्वराज्य उभे करू पाहणा-या कोणत्याही अलौकीक राजपुरुषाची होती तशीच होती. ती म्हणजे स्वराज्य निर्मितीसाठी जेही उपयुक्त आहेत त्यांचा त्यांच्या स्थानाचा वापर करून घेणे, आणि शिवाजी महाराजांनी तो केला आहे. जे मुस्लिम त्यांना साथ द्यायला तयार होते त्यांची साथही त्यांनी घेतलेली आहे. अफजलखानाबद्दल त्यांना ममत्व असण्याची शक्यताच नाही कारण तो शत्रूच्या गोटातील होता आणि युद्धसन्मूख झालेला होता. शिवाजी महाराजांवर त्याने स्वारी केली तेंव्हा वाटेत येतांना त्याने मंदिरे फोडली, याचा अर्थ अन्यत्र तो स्वा-या करत होता तेंव्हा मंदिरे फोडतच नव्हता असे नाही. तो शिवाजी महाराजांवर चालून आला होता, म्हणजे शत्रूच होता आणि त्याला मारणे हे प्रथम कर्तव्यच होते. त्याने मंदिरे न फोडता चाल केली असती तर महाराजांनी त्याला खुशाल स्वराज्य गिळू दिले असते काय? अफजलखान काय किंवा त्याचा ब्राह्मण वकील काय, हे शत्रुच्या गोटातील होते त्यामुळे त्यांची हत्या करणे अपरिहार्य होते आणि ते शिवाजी महाराजांनी केले. "गो-ब्राह्मण प्रतिपालक" म्हणवणा-या शिवाजी महाराजांनीच ब्राह्मणाचे हत्याही केलेली आहे आणि प्रसंगी खडसावलेही आहे. उपाधीकडे तारतम्याने पहावे लागते ते त्यामुळेच. शिवाजी महाराज व मुस्लिम यांच्यातील संबंधही अशाच प्रकारचे आहेत.

शिवाजी महाराजांना इस्लामियांबद्दल मनातून खरेच प्रेम असेल काय? दोन्ही पक्ष यात भरपूर गोंधळ घालतात. शिवाजी महाराजांना कोणत्या धर्माचे राज्य आणायचे होते असे समजणे हाच मुर्खपणा आहे. ते हिंदू होते म्हणून स्वराज्य, मग दिल्लीच्या पातशाहीला धुडकावून राज्य स्थापणारे मुस्लिम शासक त्यांचे स्वराज्य बनवत नव्हते काय? त्यांची धर्मप्रेरणा महत्वाची होती की सत्ताप्रेरणा? मुस्लिमांबद्दल परधर्मीयाबाबत वाटेल तेवढी साशंकता, काही प्रमाणातील राग हा त्यांच्याही मनात असणे स्वाभाविक आहे, पण शिवाजे महाराजांचा संघर्ष इस्लाम विरुद्ध हिंदू होता असे म्हणणेही आततायी आहे. समजा तत्कालीन सत्ता कोणत्याही धर्माच्या असत्या, अगदी हिंदुही असत्या, तरी शिवाजी महाराजांसारख्य स्वतंत्र बाण्याचा मानसाने स्वराज्य बनवलेच असते. अशा स्थितीत त्यांच्या शत्रुंबद्दल काय म्हणता आले असते?

सत्ता स्थापना ही महत्वाची ठरते तेंव्हा धर्म उत्प्रेरक होऊ शकतो पण तो काही मुख्य प्रेरणास्त्रोत असू शकत नाही. शत्रुच्या गोटांत, परधर्मीय असले तरी, त्यातील त्यातल्या त्यात मृदू गोटांशी प्रसंगी सख्यही करावे लागते आणि तेही शिवाजी महाराजांनी केलेले आहे. त्यांना मित्रही सर्वांत मिळाले आणि शत्रूही सर्वांत मिलाले. त्यामुळे शिवाजी महाराजांची राजनीति आणि धर्मधोरण त्याच परिप्रेक्षात पहावे लागते. बाबा याकुत यांनाही त्यांनी गुरू मानणे हा त्यातीलच एक भाग झाला. त्यांच्यात आजच्या व्याख्येतील साम्यवादी, सेक्युलर, समाजवादी किंवा लोकशाहीवादी शोधणे म्हणजे "आपल्याला हवा तसा शिवाजी ख-याखु-या शिवाजीमहाराजांवर लादणे." असे करणे इतिहासासाठी उपयुक्त नाही.

त्यांना वास्तव जीवनातील खरेखुरे "गो-ब्राह्मण प्रतिपालक" मानत राजकारण करणारे मुर्ख आहेत कारण तसे वास्तव नाही. ब्राह्मण मंत्री केले कारण त्या काळात त्यांच्याच नव्हे तर मुस्लिम सत्तांचे काही मंत्री व वकीलही ब्राह्मणच असत कारण त्यांना स्थानिक व्यवस्थांची माहिती असे व ते अनेक भाषाही शिकले होते. तो काही त्यांचा दोष नव्हे. उलट प्राप्त स्थितीत नवे शिकून घेत जगण्यासाठी त्याचा उपयोग करून घेण्यात काहे वावगे मानायचे कारण नाही. येथील असंख्य अवैदिक सरदारांनीही तेच केले. कारण मुस्लिम सत्तांची अपरिहार्यता तोवर पुर्णपणे ठसलेली होती. जशी वेदमहत्ता लोकांच्या मनावर पुरती बिंबलेली होती. किंबहुना मध्ययुगीन भारतीय मानसिकता हे वेगळे कडबोळे आहे. या स्थितीत शिवाजी महाराज स्वराज्य बनवू इच्छित होते. अशा स्थितीत मित्र मिळणे दुरापास्त होते. तशात त्यांना जर मिळतील ते ब्राह्मण काय आणि मुस्लिम काय, यांना सोबत घेत संघर्ष करायचा असेल तर त्यांना मुळात धर्माला प्राधान्य देणे शक्य नव्हते, व ते त्यांनी दिलेलेही नाही.

ते धार्मिक होतेच. तुळजाभवानीचे भक्त होते. अवैदिक शाक्त/शैव परंपरेचे अभिमानीही होते. सार्वभौमता घोषित करायची तर राज्याभिषेक हा पुराणांनी दाखवलेला मार्ग त्यांच्यासमोर होता. तो करण्यात काय अडथळे आले याचे विवेचन करण्यात मला रस नाही. पण या वैदिक राज्याभिषेकामुळे त्यांना आपल्याच पत्न्यांशी पुन्हा विवाह करावा लागला, म्हणजे हिंदू पद्धतीचे आधीचे विवाह वैदिक धर्मियांनी अमान्य केले होते असाच त्याचा अर्थ होतो. अर्थात शिवाजी महाराजांनी नंतर शाक्त पद्धतीनेही राज्याभिषेक करुन हिंदू परंपरेला पुन्हा स्विकारले. वैदिक राज्याभिषेक महत्वाचा वाटला याचे कारण वैदिकांनी निर्माण केलेले वेदगारुड जनमानसावर ठसलेले होते हे आहे. लोकमान्यतेसाठी ते गरजेचे वाटले असले तर नवल नाही.

वेदोक्ताचा अधिकार फक्त वैदिकाला असतो. शिवाजी महाराजांनाच तेवढी ही परवानगी मिळालेली होती हे वैदिक धर्माचे प्रकांड पंडित लो. टिळकांनाही माहित होते. वेदोक्त प्रकरणात ते म्हणाले होते की, "या काळात ब्राह्मण व शुद्र असे दोनच वर्ण राहिले असून शिवाजी महाराजही शूद्रच होते. तथापि त्यांच्या कार्यावर मोहित होऊन तत्कालीन महाराष्ट्रातील कर्त्या पुरुषांनी ( म्हणजे वैदिक धर्मीय ब्राह्मणांनी) खास सवलत म्हणून त्यांना क्षत्रियत्व बहाल करून गागाभट्टाच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला ; पण त्या वेळी भोसले घराण्याची सर्व धर्मकृत्ये पुराणोक्तच करावीत अशी परंपरा वैदिक ब्राह्मणांनी घालून दिली होती. हीच परंपरा पाळली गेली पाहिजे. छत्रपती घराण्याशिवाय अन्य मराठे क्षत्रिय नाहीत. सबब त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही . . . ." (संदर्भ : "राजर्षी शाहू छत्रपती" ; डॉ जयसिंगराव पवार , पृष्ठ ३५, "लोकमान्य टिळक यांचे चरित्र" , न. चिं. केळकर)

त्यामुळे "गो-ब्राह्मण प्रतिपालक" या संज्ञेकडे तारतम्याने पाहिले पाहिजे. "ब्राह्मणालाही दंड देता यावा म्हणून राज्याभिषेक करुन घेतला" हे विधानही असेच भंपक आहे. खरे तर कलीयुगातच काय कोणत्याही युगात क्षत्रीय हा मुळात वर्णच नव्हता, त्यामुळे क्षत्रीयत्वाचेही स्तोम असेच आहे. अर्थात याबाबत मी पुर्वीच बरेच लिहिले असल्याने येथे एवढेच पुरे.

शिवाजी महाराज हे राजनीतिकुशल लढवैय्ये होते. त्यांना कोणत्याही धर्मप्रेरणेने ग्रासलेले नव्हते. धर्माचा उपयोग गौण उत्प्रेरकाप्रमाणे झाला असला तरी ती त्यांची इच्छा होती. दादोजी कोंडदेव किंवा रामदासांचे त्यांच्या प्रेरणांमध्ये कसलेही स्थान नव्हते, असुच शकत नव्हते. दादोजी आदिलशहाचे कोंडाणा व पुरंदरचे सुभेदार होते. एक सुभेदार व त्याच्या कार्यक्षेत्रातील एक जहागीरदार यांच्यात असतील तेवढेच संबंध त्यांच्यात होते. रामदासांचा शिवरायांशी संबंध आला तोच मुळात राज्याभिषेकानंतर. त्यामुळे त्यांना गोवत इतिहासाचे विद्रुपीकरण करणारेही तेवढेच दोषी आहेत.

शिवाजी महाराज त्यांच्या काळाचे अपत्य होते. वेद, ब्राह्मण माहात्म्य वगैरेंचा त्यांच्यावर प्रभाव असनेही स्वाभाविक होते. पण प्रत्यक्ष वेळा आल्या तेंव्हा त्यांनी त्या पगड्यालाही दूर सारले आहे. कारण धर्मप्रेरणेने त्यांनी स्वराज्य स्थापना केलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या जीवनाला वारंवार कोणत्या ना कोणत्या धर्माचे संदर्भ जोडत त्यांच्याबद्दल वारंवार हिरीरीने चर्चा करणे गैर आहे. जन्माने हिंदू असल्याचे जे त्या काळाच्या चौकटीतले नैसर्गिक संदर्भ त्यांच्या जीवनाला आहेत ते आहेतच. पण "गो-ब्राह्मण प्रतिपालक", "अफजलखान", "हिंदू स्वराज्य" वगैरे भाकड गोष्टींना केंद्रीभूत धरत जी चर्चा केली जाते त्यात  शिवाजी महाराजांचे आपण अवमुल्यन करतो आहोत याचे भान ठेवले पाहिजे!


8 comments:

  1. संजय सर ,
    तुमच्यावर नक्कीच नैतिक जबाबदारी आहे की प्रकाश आंबेडकर यांचे भाषण आपण लोकांसाठी प्रसृत करावें ! सध्याचे राजकारण बघताना,शरद पवार जितक्या हिरीरीने अनेक मते मांडतात , त्याप्रमाणे त्यांनी या विषयावर लिहावे ,बोलावे !
    अफझलखान हा मुसलमान होता म्हणून नाही तर तो स्वतंत्र मराठी अस्मितेच्या आड येत होता ----
    शिवाजी हा गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हता --- अशी विधाने ते अचानक का करू लागले आहेत ---- ते किती लपून छापून खेळी खेळत होते ते स्पष्ट होते
    मराठा मोर्चाचे , आरक्षण , शेतकरी संप ,आणि आता ब्राह्मण वर्गावर असा हा आघात -
    कशासाठी ?
    आजच्या तारखेला बेरजेचे राजकारण न करता असे हे उद्योग काय साधणार आहेत ?
    २.५ % वर्गाला ठेचण्यासाठी इतके परिश्रम करावे लागतात ? वयाच्या ७५ व्या वर्षी काय ही फलश्रुती राजकीय जीवनाची ?-
    शरद पवारांनी नक्षलवाद आणि बागाईत शेतकरी यांना एकत्र आणून वैदिक ब्राह्मण वर्गाची जिरवली पाहिजे !
    पण , संजय सर तुम्ही नक्षलवादी लोकांना देशद्रोही म्हणालात , तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही म्हणा ना !म्हणजे राष्ट्रवादी लोकांना बरे पडेल .
    संजय सर ! योगाचे काय केले आपण ? चीनच्या भिंतीवरसुद्धा योगा डे साजरा झाला म्हणे !
    नक्षलवाडीसुद्धा नाके धरून प्राणायाम करू लागतील - ???

    ReplyDelete
  2. संजय सर ,श्रीमान योगीला आदरणीय नरहर कुरुंदकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे , त्या तोडीचे आपले हे लिखाण झाले आहे !
    अभिनंदन !
    महम्मद बिन कासीम ,घोरी ,तुघलख , ऐबक , खिलजी आणि सरतेशेवटी बाबर हे भारतात का येत राहिले ?
    सुबत्ता ! हेच उत्तर आहे. जगण्यासाठी जे लागते ते विपुल प्रमाणात होते आणि ढिसाळ समाज बांधणी, जागा व जगू द्या हेच तत्वज्ञान !
    त्यामुळे ब्राह्मणांची धर्मसत्ता न दुखावता मुस्लिमांनी राजसत्ता हातात घेतली , राजपूत मंडलिक झाले ,आणि ब्राह्मणांचे शेंडी उडवत स्वतःची टिमकी वाजवायचे स्वातंत्र्य अबाधित राहिले . राजपूत एकीकडे सत्तेशी एकनिष्ठ आणि धार्मिकतेच्या सर्वश्रेष्ठ !
    राजपूत क्षत्रिय आणि ब्राह्मणवर्ग यांनी युती करून जसे काही फारसे लाजिरवाणे घडलेच नाही अशा पद्धतीने धर्मसत्ता आणि राजसत्ता उपभोगली . अकबराच्या राजनीतीचे हेच यश आहे .
    औरंगजेब झाला नसता तर शिवाजीचे राजकारण यशस्वी झाले असते का ?
    औरंगजेबाने सत्ता घालवली . हे सत्य आहे .
    आपण शिवाजी बद्दल अतिशय सुरेख लिहिले आहे !
    अभिनंदन ! आज आप्पा बाप्पा असते तर त्यांनी तोंड भरून तुमचे कौतुक केले असते ! असो !

    ReplyDelete
  3. छान! संतुलित लिखाण !!
    दूसरे असे की हा विषय इतिहास चा आहे राजकारणाचा नव्हे तेंव्हा शरद पवार हे वयाने अनुभवाने जेष्ठ असले तरि त्यांचे विधानाला महत्व न देता या विषयावर शेजवलकर आदि इतिहास तज्ञानचे संदर्भ घेणे योग्य होईल ! आपण तसे लेखन करीत आहात पण यावर प्रतिक्रिया स्वरूप येणाऱ्या comments मात्र वारंवार शरद पवार यांचा उल्लेख करतात आणि विषयांतर करतात असे दिसून येते !

    ReplyDelete
  4. Barechda itihasache dakhle detana Shejwalkar, Rajwade, Sardesai hyannche saksha kadhli jaate. Mag mala prashna padto ki kuthlya Brahman itihaskarani varchaswawadi itihaas lihila? Kivha Brahmanwadi lihila.. Ek Purandare sodle tar itkyat kuthlya Brahman ithihaskarala target kele disat nahi. Ase ka?

    ReplyDelete
  5. सर छान लेख. पणाएक गोष्ट लक्षात येण्याजोगीीम्हणजे शासक कुणीही असो अगदी इंग्रजीग्रोजी सत्तेनंतरही वैदिकांनी सत्ताधार्याचं लांगूलचालन करून स्वजातीय सुबत्ता आणि सुरक्षा कायम टिकवली आहे आणि बहुजनांवर सत्ताधारी शासकाला बाहुलं बनवून आपली पोळीै भाजूनघेतलीी आहे.ताजंं उदाहरण भक्तांचे लाडके पंतप्रधान.

    ReplyDelete
    Replies
    1. Tumhala lekh kalala nahi. Nahitar Vaidik sattadharyanche langulchalan etyadi taare todle naste. Me sope karun sangto
      1. Jo bahujan vaidikancha bahula zala ase tumhi mhanta, to kahi evdha bavlat nahit
      2. Lekhakani var mhanlyapramane Tukaram Maharaj suddha Vaidikanchi prabhavatun purnapane sutle nahit... Toch prakaar tumchya 'Bahujan sattadharyanchya' babtit zala asawa.
      3. Saglech Bahujan Sattadhari kahi etar bahujanchya kaivaar gheun aale nahit. Barechjan swatahachya tumbdya bharaychya maage aahet. Tyamule tyanni 'vaidikanna' jawal kele tar tyat naval nahi.

      Delete
  6. सर्व प्रतिक्रिया अप्रतिम आहेत ,
    संजय सर एकाच सांगावेसे वाटते की आपण एक जादू करा . ब्लॉगवर मराठी देवनागरी स्क्रिप्ट कसे लिहावे त्याची साद्यन्त माहिती सर्व वाचकांना द्या. आपल्या ब्लॉगला अप्रतिम प्रतिसाद मिळतो आहे , लोक रोमन लिपी वापरून मराठी लिहीत आहेत ते समजून घ्यायला त्रास होतो आणि रसभंग होतो .
    अजून उत्स्फूर्त लिखाण होण्यासाठी मला सांगावेसे वाटते ,
    आपल्या ई मेल वरून आपण कंपोझ मध्ये जाऊन आणि स्क्रिप्ट सिलेक्शन मधून मराठी असे ऑप्शन निवडून आपल्या मायबोलीत आपल्या प्रतिक्रिया लिहून नंतर त्या कॉपी पेस्ट करू शकता , हे सर आपण सर्वाना समजावून सांगितले तर मला खात्री आहे की हजारो लोक आपली प्रतिक्रिया नोंदवतील
    आजचा वाचक नुसता गप्प न बसता लिहू इच्छितो हे फार महत्वाचे आहे . आपल्या ब्लॉगवर पूर्वी होणारी संभाजी ब्रिगेड आणि इतर कंपनीची शिवीगाळ संपली हाही मुद्दा महत्वाचा आहे - त्याचे श्रेय आपल्यालाच जाते , हा ब्लॉग अजून बरेच विषय हाताळू शकतो. जिएसटी हा विषय आणि त्याचे परिणाम / फायदे हे समजावून देणे आपले कर्तव्य आहे .
    गोहत्याबंदी राबवणाऱ्या प्रांतात रात्री बारा नंतर कशा म्हशींच्या कत्तली होतात तेपण आपण अवश्य लिहा .
    महाराष्ट्रा आणि इतर प्रगत प्रांत हे किती कर्जाच्या बोजाखाली दाबले आहेत त्याची आकडेवारी द्या , महाराष्ट्रात किती शेतकरी आयकर भारतात , आणि धनवान शेतकरी वर्गाची एकूण शेतकरी लोकसंख्येत टक्केवारी किती ते लिहा .
    एकीकडे वारीला जाणारा शेतकरी आहे का शेतमजूर असा प्रश्न पडतो , आणि एकेकाळी उसाची तोडणी आणि शेतीकाम यावेळी असून बसलेल्या शेतमजूर वर्गाला शरद पवार म्हणाले होते " वेळ पडली तर आम्ही इतर शेजारी प्रांतातून शेतमजूर आणू " त्याची आठवण होते - हे सर्व आपणास आठवत असेल हा इतिहास आहे . एकेकाळी कॉम्रेड डांगे फ़र्नांडीझ आणि मधू लिमये यांनी कामगार चळवळीत आपला अधिकार गाजवला . अंततः गिरण्यांचा संपल्या !दत्ता सामंत आला गेला , तसेच आता शेतकरी मजुरांचे प्रश्न कोणीच बोलत नाहीत . असे का होते ?अल्पभूधारक शेतकरी हाच शेतमजुरीही करत आपले पोट भरतो आहे का ?
    बँकांनी जरी १०० % कर्जमाफी केली तरी शेतकरी सावकारी कर्जे घेणार नाही
    याची हमी कोण देईल ?
    अनेक सहकारी बँका दिवाळखोर झाल्या आहेत. सहकारी चळवळीतून धनदांडग्या शेतकऱ्यांनी आपले हित साधले आहे नोटबंदीमुळे सहकारी बँकांची कोंडी झाली आहे. शरद पवार आणि फडणवीस यांची गुप्त भेट काय सांगते ?
    संजय सर आपण लिहा ! आपण लिहा !आम्ही वाट पहातोय !

    ReplyDelete
  7. इतिहासाला इतिहासाच्या दृष्टीने पाहावे म्हणजे इतिहासा सर्व घटना ह्या इतिहासाच्या अनुषंगाने घडत असतात .हे आपल्याला स्वीकारणे जड़ जात नाही.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...