Tuesday, August 22, 2017

समाजव्यवस्थेचे "पानिपत" दाखवणारी कादंबरी!




"...आणि पानिपत" ही कादंबरी कशी सुचली याची कथा फार मागे जाते. मी क्लिओपात्रा, ओडिसी सारख्या वेगळ्या संस्कृत्यांच्या पार्श्वभुमीवर कादंब-या लिहिल्या होत्या तसेच अखेरच सम्राट सारखी भारतीय इतिहासावरचीही कादंबरी लिहिली होती. मीच नव्हे तर सर्वच ऐतिहासिक कादंब-या या सरदार, राजे-महाराजे-महाराण्या यांना नायक/नायिका बनवत लिहिल्या गेलेल्या होत्या. आणि नेमके हेच मला आता खटकू लागले होते.. सामान्य माणसांचे जीवन, त्याची जगण्याची व संस्कृती घडवण्याची धडपड यांना कोठेच स्थान नव्हते. युद्धे झाली की सर्वात अधिक ससेहोलपट या सामान्यांचीच होणार. मग युद्ध हरो की जिंको. तरीही जनसामान्यांच्या आकांक्षाच शेवटी राजसत्तेवर अंमल गाजवत असतात. संस्कृती घडवतात ते निर्माणकर्ते लोक. म्हणजेच शेतकरी, लोहार, कुंभार, सुतार ते सेवा देणारे लोक. अर्थव्यवस्था उन्नत होणार की अवनत हेही यांच्याच हाती. सत्तेचे काम त्यांना पुरेसे स्वातंत्र्य देणे. जे देत नाहीत तेथे संस्कृती ठप्प होणार हे ओघाने आलेच! इतिहासात एवढ्या मोठ्या उलाढाली झाल्या, त्यात सामान्य माणसाचे स्थान साहित्यात काय हा प्रश्न विचारला तर उत्तर हताश करणारे येते. त्यांच्या दृष्टीकोनातून इतिहास कसा घडला हे दर्शवणे तर आजिबात नाहीच! इतिहासाचा खरा नायक असा दडपला गेला.

मी पानिपतची पार्श्वभुमी फार जाणीवपुर्वक निवडली. ही एक शोकांतिका आहे. केवळ राजकीय नव्हे तर सामाजिकही. इतिहासाचे अजब संक्रमण या इतिहासाने घडवले. हे युद्ध घडलेही मुळात संक्रमणावस्थेतील उत्तर व दक्षीणेतील राजकीय व त्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक गोंधळामुळे. हा गोंधळ एका सामान्य माणसाच्या दृष्टीकोणातून टिपण्याचा मी निर्णय घेतला. संपुर्ण समाजव्यवस्थेनेच ज्या समाजाची शोकांतिका घडवली त्या तळागाळातील महार समाजातील पात्रे नायक म्हणून मी निश्चित केली आणि या कादंबरीच्या लेखनाला सुरुवात केली. ऐतिहासिक घटनांची माहिती देणारी भरपूर पुस्तके उपलब्ध असली तरी सामाजिक इतिहासाची मात्र पुरेपूर वानवा असल्याने त्यासाठी तत्कालीन उत्तर व महाराष्ट्रातील सामाजिक संदर्भ मिळवणे हे महादुष्कर काम होते. २००७ पासून मी सुरुवात केली ती सामाजिक संदर्भ मिळवायची. दरम्यान "महार कोण होते?" हे संशोधनपर पुस्तक माझ्याकडून लिहून झाले. कारण या समाजाचा इतिहासही तोवर ठराविक दृष्टीकोनातून लिहिला गेल्याचे मला आढळत गेले. धर्मांतरित होऊन नंतर दिल्लीचा अल्पकालीन का होईना पातशहा बनलेल्या पुर्वाश्रमीचा परवारी (गुजरातेतील अस्पृष्य) असलेल्या खुश्रूखानाचा इतिहासही धुंडाळला व धर्मांतराची कारणेही समजावून घेतली. तत्कालीन समाजजीवन, समाजिक प्रश्न, संघर्ष आणि समेट, रयत आणि जमीनदारांतले संबंध, गांवगाडा हे सारे कसोशीने शोधावे लागले. हे सारे झाल्यावर लिहायला सुरुवात केली.

ही कादंबरी लिहित असतांना मी महार झालो होतो. त्या काळातील महाराच्या सुख-दु:खांना स्वत: जगत होतो. लिहित असतांना मी इतक्या वेळेला रडलो की हस्तलिखिताची पानेच्या पाने अश्रुंच्या थेंबांनी भरून गेली. हा माझ्यासाठी एकमेव वेदनादायक लेखन प्रवास होता. संभाजी महाराजांची वढुला हत्या झाली ते पानिपतचा दुर्दैवी अंत हा १६८९ ते १७६१ एवढा प्रदिर्घ प्रवास चार पिढ्यांच्या माध्यमातून मी मांडत होतो. इतिहास पार्श्वभुमीला ठेवत या कादंबरीतील घटना घडतात. यातील हे चारही नायक वेगवेगळ्या स्वभावांचे. भिमनाक ते भिमनाक असा तो प्रवास. जगण्याचा जीवघेणा संघर्ष आणि पार्श्वभुमीला पानिपतचे संहारक युद्ध.

कादंबरीचे कथानक सांगण्याचे येथे प्रयोजन नाही. ही मराठीतील ख-या अर्थाने पहिली (व आजवर शेवटची) सबाल्टर्न कादंबरी. एप्रिल २०१० मध्ये ही तब्बल ४७२ पानांची कादंबरी प्राजक्त प्रकाशनाने अत्यंत देखण्या स्वरुपात प्रकाशित केली. म्हणजे आता सात वर्ष होत आलीत. कादंबरी वाचून अनेकांनी वरुडे गांवाला भेट दिली व रायनाक महाराची अजून काही माहिती तेथे मिळते काय याचा शोधही घेतला. काहीच माहिती मिळत नाही म्हणून मला फोन करून विचारले. यातील पात्रे इतिहासात खरेच होऊन गेली असणार कारण ती तेवढी जीवंत वाटतात असे त्यांचे म्हणणे. प्रत्यक्षात यातील इतिहासातील सोडून सर्वच पात्रे काल्पनिक आहेत हे सांगुनही वाचकांना पटत नाही. माधुरी नाईक यांनी पुणे जिल्ह्याची माहिती देणा-या पुस्तकात वरुडे गांवाचा उल्लेख इतिहासात घडून गेलेल्या भिमनाक महाराचे गांव म्हणून करत चक्क या घराण्याची कादंबरीत आलेली माहिती चार पानांत छापली आहे!

हे सगळे झाले. पण ही आवृत्ती मात्र आजतागायत संपली नाही. माझी सर्वात अपयशी कादंबरी म्हणून मी या कादंबरीचा उल्लेख करेन. याला अनेक कारणे आहेत. महार आणि तोही ऐतिहासिक कादंबरीचा नायक असू शकतो ही कल्पना बहुदा आपल्याला सहन होत नाही हे माझ्या लक्षात आले. (असूरवेदचा नवबौद्ध नायक मात्र स्विकारला गेला हे समाजमानसिकतेचे वेगळेच चित्र दाखवते.) एक महार खुद्द घायाळ पडलेल्या भाऊसाहेब पेशव्याला पानिपतच्या रणातून बाहेर काढतो ही बाब पेशवेसमर्थकांनाही रुचण्याची शक्यता नाही. नवबौद्ध समाजाला शक्यतो आपल्या जुन्या इतिहासाची आठवण नको वाटते आणि अन्य समाजघटक कथनाच्या ओघात आलेल्या तत्कालीन समाजस्थितीचे (व आपल्या पुर्वजांच्या वर्तनाचे) चित्रण सहन करू शकत नाही. "कर्मठ मोरबा ब्राह्मण बदलूच शकत नाही, ब्राह्मण कधीच बदलत नाही!" हे मत तर एका विदुषी प्राध्यापिकेने या कादंबरीवरच्या एका चर्चासत्रात जाहीरपणे मांडले होते. म्हणजे केवळ आपल्या आजच्या सामाजिक भुमिका इतिहासावर (व त्यातही कादंबरीवर) लादत आपण कळत-नकळत साहित्याचा आणि इतिहासाचाही मुडदा पाडायला मागेपुढे पहात नाही. कादंबरी खपली नाही. अधिकाधिक वाचकांपर्यंत गेली नाही याची खंत एक लेखक म्हणून मला आहेच पण त्याहीपेक्षा मोठी खंत ही आहे कि आपण पानिपतकालात ज्या मानसिकतेत वावरत होतो ती मानसिकता अजून बदललेली नाही. आम्ही आधुनिक तर सोडाच, माणुसही झालो नाही हेच काय ते खरे. "...आणि पानिपत" लिहिण्याचा प्रवास वेदनादायक होता पण तो सृजनाच्या वेदनांनी तरी भरलेला होता. नंतरचा प्रवास अजुनही मानसिक तिढ्यात अडकून बसलेल्या समाजाबद्दल वाटणा-या वेदनांनी भरला आहे.

"माझी जात कंची?" हा प्रश्न महार कोण होते, असूरवेद आणि या कादंबरीमुळे तर एवढा उसळला कि जाहीर मंचावरही हे प्रश्न विचारले गेले. मसापमधे अशीच घटना घडली असता वि. भा. देशपांडेंनी या प्रश्नाला समर्पक उत्तर दिले खरे...पण लेखकाची जात, त्याच्या नायकाची जात, त्याच्या खलनायकाची जात, त्याच्या नायिकेची जात चर्चेचा विषय बनावी? .....छी! मला या मानसिकतेची घृणा आहे. माझा भिमनाक महार या गर्तेतून मानवी समाजाला कधीतरी बाहेर काढेल, त्याची सामाजिक सुरक्षेची कवचकुंडले तोडून टाकेल आणि मुक्त अवकाशात तो फक्त भिम राहील आणि बाकी सारी कसलेही लेबल नसलेली माणसं...बस...या दिवसाच्या प्रतिक्षेत मी आहे.

2 comments:

  1. I think it is only informative or for socioeco historical research purpose. Nowadays we r going towards decastification gradually. Which makes humanaterion values parallelly. but it is the best informattive/entertaining.

    ReplyDelete
  2. सर मी तुमची कादंबरी वाचली मलाही खूप खूप आवडली.
    वाचून झाल्यावर तुम्हाला फोनही लावण्याचा प्रयत्न केला पण फोन लागला नाही.
    ही कादंबरी लिहिल्याबद्दल खूप खूप आभार

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...