Sunday, September 10, 2017

उद्रेकाच्या उंबरठ्यावर काश्मीर!


उद्रेकाच्या उंबरठ्यावर काश्मीर!


३५ (अ) या कलमाला आव्हान देण्याचे प्रयत्न पूर्वी झाले नव्हते असे नाही. पूर्वी किमान तीन वेळा या कलमाला आव्हान दिले गेले, पण सर्वोच्च न्यायालयाने या याचिका केंद्र सरकारच्या प्रतिज्ञा पत्रकावरून फेटाळून लावल्या होत्या. या वेळेस मात्र केंद्र सरकारतर्फे गेल्याच महिन्यात ही याचिका फेटाळण्याबाबत निवेदन न देता ‘हा विषय संवेदनशील असल्याने त्यावर व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे,’ असे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.

जम्मू आणि काश्मीरच्या नागरिकांना विशेषाधिकार देणाऱ्या घटनेतील कलम ३५ (अ) ला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर भाजप सरकारने जे उत्तर दाखल केले आहे, त्यामुळे काश्मीरमधील आधीच स्फोटक असलेल्या स्थितीने आता कळस गाठला आहे. इतका की सर्व विरोधक व सत्ताधारी पक्षांचे नेतेही कधी नव्हे ते एकत्र आले आहेत. फुटीरतावाद्यांच्या हातात आयतेच कोलीत मिळाल्याने ते या संधीचा फायदा घेण्यासाठी लोकांमधील अस्वस्थतेला भडकावत आहेत. तसाही काश्मीर पाकपुरस्कृत तसेच स्वतंत्रतावादी काश्मिरींच्या दहशतवादामुळे गेला अनेक काळ धुमसतच आहे. जुलै २०१६मध्ये हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वानीच्या हत्येमुळे काश्मीरमधील हिंसाचार आटोक्यात येण्याऐवजी उफाळून आला. सामान्य नागरिक, अगदी विद्यार्थीही लष्करावर दगडफेक करायला लागले. काश्मिरी मुस्लिम असला तरी पार पोलिस उच्चाधिकाऱ्याला ठेचून मारेपर्यंत लोक हिंसक बनले. अमरनाथ यात्रेने टिकवून ठेवलेले सौहार्द यंदा एका बसवर झालेल्या हल्ल्यामुळे समूळ हादरले गेले. या दहशतवादाला व नागरिकांच्या उफाळत्या उद्रेकाला कसे नियंत्रणात आणावे या गहन प्रश्नात आधीच लष्कर व राजकीय व्यवस्था अडकली होती. त्यात भाजप सरकारने या ३५(अ) ला आव्हान देणाऱ्या याचिकेसंदर्भात जी भूमिका घेतली आहे, त्यामुळे निर्माण होऊ घातलेल्या नव्याच अतिविस्फोटक परिस्थितीशी संघर्ष करायला सर्व व्यवस्थेला सज्ज व्हावे लागणार आहे.

कलम ३५ (अ) हे घटनेत १९५४ मध्ये राष्ट्रपतींच्या अध्यादेशाने समाविष्ट केले गेले. सामीलनाम्यातील तरतुदींनुसार काश्मीरची स्वायत्तता कायम ठेवणाऱ्या कलम ३७०ला अनुसरुन या कलमाचा समावेश केला गेला. या कलमानुसार आपल्या राज्याचे निवासी नागरिक कोण हे ठरवायचे आणि या निवासी नागरिकांचे विशेषाधिकार काय असतील हे ठरवण्याचे अधिकार काश्मीरच्या राज्यघटनेला दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या नोकऱ्यांत बिगर काश्मिरींना प्रवेश देण्यास बंदी आहे. तसेच कोणीही बिगर-काश्मिरी भारतीय नागरिक काश्मीरमध्ये जमीनजुमला घेऊ शकत नाही. थोडक्यात, काश्मिरी नागरिकांना काश्मीरमध्येच अल्पसंख्याक बनवता येऊ नये यासाठी या कलमाचा समावेश केला गेला होता. या कलमानुसारच काश्मिरी युवतींनी बिगर-काश्मिरीशी लग्न केल्यास तिलाही काश्मीरमध्ये स्थावर मालमत्ता घेता येत नाही अथवा तिला वारसाहक्कही मिळत नाही. चारू वली खान या काश्मिरी वकील महिलेने या शेवटच्या तरतुदीलाच आव्हान देण्यासाठी ही याचिका दाखल केलेली आहे. यापूर्वीच २०१४ मध्ये एका स्वयंसेवी संस्थेनेही हे कलम घटनादुरुस्तीबाबतच्या कलम ३६८चा भंग करत घटनेत केवळ राष्ट्रपतींच्या आदेशाने घुसवण्यात आले आहे म्हणून ते अवैध ठरवत रद्द करण्यासाठीची याचिका दाखल केलेली आहे. शिवाय पाकिस्तानमधून निर्वासित म्हणून आलेल्या नागरिकांनीही हे कलम रद्द करून आम्हाला नागरिकत्वाचा अधिकार द्यावा यासाठी आंदोलन छेडलेले आहे.

या कलमाला आव्हान देण्याचे प्रयत्न पूर्वी झाले नव्हते असे नाही. पूर्वी किमान तीन वेळा या कलमाला आव्हान दिले गेले, पण सर्वोच्च न्यायालयाने या याचिका केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रकावरून फेटाळून लावल्या होत्या. या वेळेस मात्र केंद्र सरकारतर्फे गेल्याच महिन्यात अॅडव्होकेट जनरल के. वेणुगोपाल यांनी ही याचिका फेटाळण्याबाबत निवेदन न देता “हा विषय संवेदनशील असल्याने त्यावर व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे,’ असे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण त्रिसदस्यीय खंडपीठाकडे सोपवून सहा आठवड्यांत यावर सुनावणी घेण्यास सांगितले आणि येथेच नव्या संघर्षाची ठिणगी पेटली.

भाजप सरकार व रा.स्व.संघ आधीपासूनच कलम ३७० च्या विरोधात असल्याने या कलमाचाच भाग मानण्यात आलेले ३५(अ) हे कलम सरकारच्या भूमिकेमुळेच धोक्यात आले असल्याचे काश्मिरींचे मत बनले असून केवळ काश्मीर खोरेच नव्हे तर या अस्वस्थतेची झळ आता जम्मू व लडाखपर्यंत पोहोचली आहे. सत्ताधारी पीडीपी व विरोधकही यामुळे एकवटले असून फुटीरतावाद्यांत नवेच बळ संचारले आहे. मेहबूबा मुफ्ती तर म्हणाल्या की, भाजपने याबाबतीत आपला विश्वासघात केला असून या कलमाला धक्का जरी लागला तर काश्मीरमध्ये कोणीही तिरंगा हाती घेणार नाही ! माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले की, या कलमाला धक्का लागला तर काश्मीरचा आत्माच हिरावल्यासारखे होईल. हे भाजप आणि संघाचे कारस्थान असल्याचाही आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारने या कलमाबाबतच्या याचिकेला ठोस उत्तर न दिल्यानेच ही स्थिती उद््भवली असून हा प्रश्न लडाख, जम्मूसह सर्व काश्मिरींच्या अस्तित्वाचा बनला आहे, असेही या बैठकीत एकंदरीत मत व्यक्त झाले. हे सारे पक्ष एकत्र येत या कलमाला धक्का लावणाऱ्या प्रयत्नांविरोधात जागरण करण्यासाठी संपूर्ण राज्यात मोहीम काढणार असून त्याचा परिणाम आधीच धुमसत असलेल्या काश्मीरमध्ये काय होईल याची आपण कल्पना करू शकतो.

नागरिकांना हा काश्मिरींची काश्मिरियत संपवण्याचा डाव वाटतो आहे. माझ्या काश्मीरमधील काही मित्रांनी, “भारताला काश्मीर नकोसा झाला आहे. म्हणून आमचे अस्तित्वच संपवण्याचे प्रयत्न होत आहेत! ’ अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिली. भाजपने गेल्या महिन्यापासून याबाबत आपली नेमकी भूमिका काय हे जाहीरच केले नसल्याने ३५(अ)ची घटनात्मक वैधता तपासून सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ दिवाळीनंतर या याचिकेवरील निर्णय देईल किंवा कदाचित हा विषय अजून लांबणीवर टाकत पुढील निवडणुकांसाठी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी या याचिकांचा उपयोग केला जाईल. 

खरे म्हणजे या कलमाशी खेळण्याची ही वेळ नव्हती. ज्या परिस्थितीतून काश्मीर जात आहे त्या परिस्थितीत काश्मिरींना उर्वरित भारतीयांबाबत ममत्व वाढेल, नागरिकांचे बेरोजगारी व शिक्षणाचे प्रश्न सुटतील व लष्करी पकडीतून काश्मिरींना मुक्त श्वास घेता येईल या दिशेने प्रयत्न होण्याऐवजी जे कलम १९५४ पासून घटनेत आहे त्या कलमाला आताच टार्गेट करून काश्मिरींमध्ये अस्वस्थता व अविश्वास वाढवत फुटीरतावाद्यांच्या हाती आयते कोलीत देण्याची आवश्यकता नव्हती. याचे नेमके परिणाम भाजप सरकारला समजत नसतील असे नाही. काश्मीर सरकारमधील त्यांचीच भागीदार असलेल्या मेहबूबांनी भाजपवर विश्वासघाताचा आरोप करत या प्रश्नावर विरोधकांना जाऊन मिळावे आणि तरीही भाजपने मौन पाळावे ही घटनाच त्यांची दिशा काय असेल हे दाखवत आहे.

३५(अ) कलम सर्वस्वी योग्य आहे असे नाही. स्त्रियांच्या अधिकारांबाबत ते विषमतेचेच तत्त्व पाळते हे उघड आहे. पण म्हणून अन्य बाबी नाकारता येणार नाहीत. याचे कारण म्हणजे लडाखसह जम्मू-काश्मीरचा विशाल प्रदेश व तुलनेने अल्प असलेल्या लोकसंख्येमुळे हे कलम रद्द झाल्यास अन्य नागरिकांच्या तिकडील विस्थापनाचा वेग वाढू शकेल. भाजपने काश्मीरमध्ये निवृत्त सैनिकांच्या वसाहती उभ्या करायची कल्पना मांडून काश्मिरींना हादरा दिला होताच. अमरनाथ बोर्डाला वन खात्याची १०० एकर जमीन देण्यावरूनच काश्मीरमध्ये मे २००८ पासून राज्यभर अभूतपूर्व संख्येने मोर्चे व हिंसक आंदोलने उसळली होती. दोन महिन्यांच्या उद्रेकानंतर शेवटी सरकारला आपल्या निर्णयावरून माघार घ्यावी लागली होती. अन्य प्रश्नांप्रमाणेच काश्मीर प्रश्न हाताळण्याची भाजप सरकारची पद्धत अंगलट येण्याचीच शक्यता आहे. 

भाजपला कलम ३७० नको आहे हे उघड आहे. त्यामुळे केंद्राची सर्वोच्च न्यायालयातील भूमिका त्याशी सुसंगतच म्हणावी लागेल. पण ही भूमिका आत्मघातकी व काश्मीरघातकी आहे हे समजायला हवे. केंद्र सरकारने वेळीच सावध होत कलम ३५ (अ) किंवा ३७०ला हात घालण्याचे विस्फोटक प्रयत्न करून, प्रश्न सोडवता येत नसेल तर ते बिघडवण्याचे तरी किमान प्रयत्न करू नयेत, अशी अपेक्षा आहे. काश्मीर हा राजकारणाचा विषय नसून राष्ट्रीय ऐक्याचा विषय आहे व तो अत्यंत संवेदनशीलतेने सोडवायला हवा. एकीकडे सर्व काश्मिरी नेत्यांशी संवादाची भाषा वापरायची आणि दुसरीकडे आपल्याच अजेंड्याला रेटत राहायचे हा दुटप्पीपणा राष्ट्रविघातक आहे. केंद्राने आता तरी सर्वोच्च न्यायालयात कलम ३५(अ)चा सक्षम बचाव करण्याची जबाबदारी घ्यायला हवी. “... तर काश्मीरमध्ये तिरंगा कोणी हाती धरणार नाही...’ हे सत्तेतील भाजपच्याच भागीदार असलेल्या पीडीपीच्या मेहबूबांचे विधान खूप गांभीर्याने घ्यायला हवे!

7 comments:

 1. संजय सर ,
  वैदिकांना आरक्षण मिळणार अशी बातमी वाचली आणि घाम फुटला
  हे कसे काय होत आहे ,

  इतके उघड उघड हे कसे घडत आहे ?आणि कोणीच त्या विरुद्ध लिहीत नाही , बोलत नाही ?
  तुम्ही लवकरात लवकर सर्व शिव धर्मियांना एकत्र आणून याचा निषेध केला पाहिजे
  पुन्हा एकदा वैदिक कोण ते सरकारला खडसावून सांगितले पाहिजे आणि मोहंजोदारो पासून टाकलेला शिव धर्मच कसा मूळ आहे ते सांगून त्यांनाही आरक्षण मागितले पाहिजे क. शिव धर्मात पितृ पंधरवडा असतो का ?
  काय ? वैदिकांनी तो शैवांकडून उचलला आहे ?
  असुदे असुदे .
  घाट बसले की तुम्ही मातृक सत्ता मान्य असलेल्यांची यावर चारचा घडवून आणलीच पाहिजे !
  संजय सर , लिहा ना काहीतरी
  आणि त्या खोले बाईंचा निषेधही राहिलाच की !

  ReplyDelete
 2. योग्य विश्लेषण

  ReplyDelete
 3. संजय सर ,
  बरे झाले आपण हा विषय मांडला ते !विषयाला तोंड फोडल्याबद्दल आपले आभार .
  अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्ही काश्मीर सोडून इतर भारतीय जनतेची मते आणि मने तपासून पाहिली नाहीत ही खेदाची बाब आहे आपण वेळ काढून शशी थरूर आणि इतरांची भाषणे जरूर ऐकावीत . कॉन्रेसने जी चूक केली टी सुधारण्याची आपली जबाबदारी आहे आणि त्याचे उत्तर म्हणजे ३७० कलाम रद्द होणे हे आहे . आज काश्मिरातील अनेक जणांना त्याचे फायदे काळात नाहीयेत , पण कालांतराने त्यांना काय बरोबर ते समजेल .
  आपल्या देशाच्या शहरांच्या नागरी भागात जसे सुचवले जाते की डोंगरमाथ्यावरील झोपडपट्टी टाळण्यासाठी जसे सुचवले जाते की डोंगरमाथ्यावर सरकारी योजनेने उत्तम प्रकारचे वनीकरण कधीही होणार नाही , त्या ऐवजी उत्तम प्रकारचे १०-१५ गुंठ्याचे प्लॉटेड लेआऊट करून तिथे उत्तम प्रकारची वनराई विकसित करून बैठे बंगले केले तर शहरातून डोंगरमाथ्यावर पसरणारी कीड कायमची थांबेल .
  अगदी तस्सेच , जर काश्मीरला भारतात संपूर्ण विलीन व्हायचे असेल तर , त्यांनी टॅन मन धनाने भारतीय होणे आवश्यक आहे . निम्मे काश्मीर आपल्या हातून गेले आहे , आणि निम्मे अशीच ढिसूळ धोरणे राबवली तर नक्कीच आपल्या हातून जाईल मराठी गुजराथी कानडी तामिळ बंगाली सर्वानी जर तिथे गर्दी केली तर तिथे रोजगार वाढेल हे नक्की
  आज तिथल्या जगप्रसिद्ध सरोवरांची काय अवस्था आहे ?त्याबाबत काश्मिरींचे काय म्हणणे आहे काश्मिरींनी काश्मिरींसाठी चालवलेले सरकारच आजवर तिथे सत्ता राबवते आहे शेख अब्दुल्ला असोत नाहीतर मुफ्ती असो , परिणाम काय झाला ? केंद्राला दोष देणे हा एकमेव कार्यक्रम असलेल्याना काश्मीरचे स्वतंत्र अस्तित्व हवेच असणार !
  चीन भारत दरम्यान ज्या तडफेने मोदींनी भारताची शान राखली तसे काँग्रेसच्या जमान्यात घडले असते का? भारत हा सुपर पॉवर म्हणून उभा राहातो आहे !इथेतर गवताचे पाटेही उगवत नाही अशा जमीनीचे काय अप्रूप अशी बडबड करणारे नेहरूंचे नेतृत्व लाभून आपल्या देशाचा खूप अपमान झाला आहे .
  आधी हैद्राबाद आणि नंतर गोवा दमण दीव भारतात सामील करून १९६० नंतर भारतीयांकडून अखंड भारताची खेळी खेळली जात आहे हे ओळखून चीनने भारतावर आक्रमण केले - पण यावेळेस तसाच खोडसाळपणा करणे चीनला भारी पडत आहे .पडले आहे !!!
  काश्मिरींना जर शांतता पाळता येत नसेल तर इतर प्रांतांनी, मुंबईत जशी गर्दी करून ती भरभराटीला आणली , तशी काश्मिरात सर्वाना मुक्त प्रवेश देऊन काश्मीर सुबत्तेकडे न्यावे .
  कोकणात आळशी लोक राहातात म्हणूनच कोकणाचा विकास होत नाही , तसेच काश्मीर बाबत म्हटले गेले तर काही गैर नाही !
  संजय सर , ३७० कलाम रद्द होणे ही काळाची गरज आहे !!!
  आणि यावर अधिकाधिक लोकांनी (पितृ पंधरवडा बाजूला ठेवून ) चर्चेत भाग घेणे महत्वाचे आहे !
  संजय सर , आपण ही चारचा घडवून आणली म्हणून आपले अभिनंदन !

  ReplyDelete
 4. सर, तुमचे '...थोडक्यात, काश्मिरी नागरिकांना काश्मीरमध्येच अल्पसंख्याक बनवता येऊ नये' हे मत मोठे मननीय आहे. हे काश्मिरी नागरिक ही काय वस्तू आहे? भारतीय नागरिक ही गोष्ट मला माहित आहे, पण काश्मिरी नागरिक ही नाही. महाराष्ट्रात मराठी अल्पसंख्य झाले तर ते स्वागतार्ह आहे. (त्याविरुद्ध बोलणाऱ्या मनसे आणि शिवसेनेला सातत्याने टार्गेट केले जाते, हे तुम्हालाही माहीत आहेच.)पण काश्मीरमध्ये काश्मिरी अल्पसंख्य होता कामा नयेत याचे तार्किक स्पष्टीकरण तुम्ही देऊ शकाल का?
  सर, स्पष्ट बोलानायाची वेळ आली आहे की नाही मला माहीत नाही. पण तुमच्या लिखाणावर प्रतिक्रिया देताना गुळमुळीतपणा मला आवडणार नाही. ज्यांना भारतीय नागरिक म्हणून रहाण्याची इच्छा नाही त्यांची आम्हाला गरज नाही. तसे नाही याची मला १०८% खात्री आहे - पण वादापुरते असे असे समजा की काश्मीरमधल्या कुणालाही इतर भारतीयांशी समकक्ष भारतीय म्हणून रहाण्यात रस नाही. तर सर्व काश्मिरी हटवलेला मोकळा भूप्रदेश म्हणून काश्मीर आम्हाला चालेल. विशेषाधिकार जर कुणी जीवन-मरणाचा प्रश्न केला असेल तर त्याचे मरण निश्चित असायला आमची काहीच हरकत नाही.

  ReplyDelete
 5. सर, विषय आणि विषयाची मांडणी आवडली.

  ReplyDelete
 6. विश्लेषण मांडणीनुसार उत्तम. पण मुददे न पटण्याजोगे. किंवा कलम 370 च्या विशेष दर्जाने स्वायत्ततेने अलगाववादींना स्वतंत्रच झाले पाहिजे ही मागणी करण्यास अधिक बळ मिळाले आहे. काश्मीर मधील बेरोजगारी, तरुणांची रिकामी डोकी भडकावण्यास भारताच्या लष्कराच्या चुकाही कारणीभूत आहेत. श्रीलंकेतही शांतीसेनेबाबत अशाच तक्रारींनी डोके वर काढले होते.
  आता गरज आहे 370 कलमाबाबत विचार करणयची भारताच्या इतर राज्यातील लोकांना उद्योग धंदे सुरु करण्याची संधी देऊन तेथील बेरोजगारी हटवता येईल व इतर लोक असल्यामुळै अलगाववादींवर कायम दबाव राहील.

  ReplyDelete