Friday, September 15, 2017

अपघातग्रस्त डावे-उजवे!


Image result for leftist rightist centrist


भारतात सध्या डावे विरुद्ध उजवे असा एक विचित्र संघर्ष उडालेला पहायला मिळतो. भाजप हा उजव्या विचारसरणीचा पक्ष आहे आणि काँग्रेस, कम्युनिस्ट हे डावे ते अतिडावे विचारसरणीचे पक्ष आहे अशी ही डाव्या-उजव्यातील सर्वसाधारण विभागणी आहे. ही विभाजणी सरधोपट असली तरी "भारतीय घटनाही डावीकडे झुकली आहे" असे स्वत:ला डावे समजणारे म्हणतात तेंव्हा मात्र या डाव्या-उजव्या विचारसरण्या म्हणजे नेमके काय हे समजावून घेणे गरजेचे आहे. साधारणतया या संज्ञा राजकीय व आर्थिक विचारधारांबाबत वापरल्या जातात. पाश्चात्य देशात वंशवाद तर भारतात धर्मवादही डावे-उजवे ठरवतांना कळीचे मुद्दे असतात. किंबहुना परंपरावाद की आधुनिकता वाद की दोहोंना साथीस घेऊन प्रागतिकतावाद अंगिकारायचा हा एक पुरातन संघर्ष आहे. भारतात तो चार्वाक विरुद्ध वैदिक विचारधारेच्या रुपात सर्वात आधी पाहिला गेला. अर्थात त्याला उजवी -डावी हे संदर्भ नव्हते. पण आपण भारतीय परिप्रेक्षात पाहिले तर लक्षात येईल की डावी-उजवी मांडणी करतांना एक विचित्र गोंधळ दिसून येतो. मुळात ही मांडणीच भोंगळ आहे असेही काही विद्वानांचे मत असून कोणत्याही विचारधारा एकारलेल्या असतात असे मानणे चुकीचे कसे आहे हे सोदाहरणही दाखवून देतात. म्हणजेच तत्वधारांत सरमिसळ असते. आर्थिक धोरणात डावा असनारा धार्मिक बाबतेत उजवा असू शकतो. नितिशकुमार जेंव्हा भाजपचा पाठिंबा घेतात तेंव्हा डाव्याने उजव्याचा पाठिंबा घेतला आहे असे चित्र दिसते. मग आता डावेपणाला व उजवेपणाला नेमके कोणत्या व्याख्येत बसवायचे हा प्रश्न निर्माण न झाल्यास नवल नाही. काही यावर म्हणतील की हे डावेही नाहीत आणि उजवेही नाहीत...असतील तर संधीसाधू! आणि त्यालाही चुकीचे म्हणता येणार नाही. किंबहुना डावे व उजवे अशी विभागणी वादापुरतीच असते व तिचे संदर्भ बदलताच दावे कधी उजवे होतील आणि उजवे कधी डावे होतील हे सांगता येणार नाही. म्हणजेच डावे-उजवे-मध्यम ही विभागणी काटेकोरपणे होऊ शकणार नाही असेही आपल्याला म्हणता येईल. 

मुळात ही डावी-उजवी संकल्पना कोठून आली हे पाहिले तर वाचकांचे मनोरंजन होईल. फ्रेंच राज्यक्रांतीने (१७८९-१७९९) स्वातंत्र्य-समता-बंधुता या महनीय तत्वांची जशी देणगी दिली तशीच या उजवे-डावे या संज्ञाही दिल्या, पण अत्यंत योगायोगाने. म्हणजे झाले असे की उमराव सभेत जे सदस्य डावीकडे बसत ते शक्यतो राजेशाहीला विरोध करणारे, क्रांतीचे समर्थन करणारे आणि लोकशाहीचे समर्थक होते तर उजवीकडे बसणारे राजेशाही, चर्च, सरंजामदारशाही आदि पारंपारिक संस्थांचे व व्यवस्थेचे समर्थक होते.  डावे-उजवे ही अशी विभाजणी या बसण्याच्या जागांवरून झाली. पुढे हे डावे-उजवेपण आपापल्या व्याख्या अथवा समजुतींमध्ये व्यापक होत गेले. आज जगभर ही संज्ञा वेगवेगळ्या परिप्रेक्षात व वेगवेगळ्या अर्थछटांनी वापरली जात आहे हेही आपल्या लक्षात येईल. 

साधारणपणे समाजाचे वर्ग पाडणा-या व्यवस्थेला विरोध करत सामाजिक व आर्थिक समानता आणू पाहणारे म्हणजे डावे अशी नंतर हळू हळू डावेपणाची व्याख्या बनत गेली. समाजातील शोषित- वंचितांना इतरांपेक्षा अधिक स्थान देत त्यांचे दारिद्र्य अथवा सामाजिक वंचितता नष्ट करणे हे डाव्यांचे ध्येय मानले जाते. डाव्यांत समाजवादी, साम्यवादी (व त्यांचे उपप्रकार) आले. अर्थात ही अर्थ-राजकीय आधारावरची मांडणी आहे हे उघड आहे. उजवी विचारधारा मात्र समाजातील विषमता अपरिहार्य आहे किंवा ती असणेच योग्य आहे असे मानते.  उजवे हे साधारणपणे परंपरावादी असतात. विषमता ही नैसर्गिक असून ती बाजारातील स्पर्धेत टिकाव न धरता आल्याने निर्माण होते असे ते मानतात. यात अजुनही दोन उपप्रकार पडतात आणि ते म्हणजे मध्यापासून डावीकडे झुकलेले आणि मध्यापासून उजवीकडे झुकलेले. काँग्रेस पक्ष हा मध्यापासून डावीकडे झुकलेला तर भाजप हा त्याविरुद्ध मध्यापासून उजवीकडे झुकलेला पक्ष आहे असेही काही तज्ञांचे निरिक्षण आहे. मध्य-विचार म्हणजे डाव्या-उजव्या विचारसरण्यांतील चांगले ते घेत कोणत्याही बाजुकडे न झुकणे. सामाजिक समता आणि त्याच वेळेस समाजातील उतरंड या परस्परविरोधी तत्वांत मेळ घालण्याचा हा प्रयत्न मानला जातो, पण ही अत्यंत दुर्बल धारा मानली जाते आणि डाव्या-उजव्यातील तुलनेसाठी  वापरली जाते.

तर हे असे डावे-उजवे आणि मध्यमार्गी आहेत. या राजकीय विचारधारा आहेत व या विचारधारांची राजकीय उद्दिष्टे आणि सत्तेत येण्याचे तत्वत: निर्धारित मार्गही तसे वेगळे आहेत. किंबहुना प्रत्येक देशात तेथील विद्यमान राजकीय आणि सामाजिक संरचना वेगळ्या असल्याने स्वत:ला डावे अथवा उजवे समजणा-या वा तसे लेबल दिल्या गेलेल्या पक्षांना आपापल्या विचारधारांत स्थितीशी जुळवून घेण्यासाठी काही बदल करावे लागतातच. कधी कधी हे बदल एवढे व्यापक असतात की डाव्यांना डावे म्हणने व उजव्यांना उजवे म्हणणे अशक्य होऊन जाते. निवडणुकाच मान्य नसलेल्या साम्यवाद्यांना निवडणुका लढवाव्या लागतात. राष्ट्रवादच मान्य नसलेल्या साम्यवाद्यांना तडजोड म्हणून का होईना त्या त्या देशाची विद्यमान घटना मान्य करावी लागते. उजव्यांचेही असेच होते. शोषित-वंचितांबाबत त्यांनाही काही निर्णय घ्यावेच लागतात वा भूमिका जाहीर करावी लागते. सामाजिक व आर्थिक विषमतेबाबतही भुमिका घ्यावी लागते. सर्वच ठिकाणी उजवी उत्तरे चालतातच असे नाही. डाव्यांचेही तसेच होते. त्यामुळे डावे-उजवे यात अनेकदा गल्लत होऊ शकते.

साम्यवादी हे अर्थातच भांडवलशाहीच्या विरोधात असतात. सर्व नागरिक एका स्तरावर आणून विषमता त्यांना दूर करायची असते. श्रमिक हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. साधन-संपत्तीवर सार्वजनिक (सरकारी) मालकीहक्क अणि वर्गविरहित समाजरचना ही त्यांची लाडकी संकल्पना आहे. धर्माला या व्यवस्थेत कसलेही स्थान नाही. अर्थातच कोणीही भांडवलदार असणे त्यांना मान्य नाही. पण विसंगती अशी आहे की सरकार हे एकमेव मक्तेदारी स्वरुपाचे भांडवलदार असणे व त्यानेच सर्व नियंत्रित करणे मात्र त्यांना चालते. ही विसंगती साम्यवादी कधीच मान्य करत नाहीत. क्रांतीतुनच साम्यवादाचे स्वप्न साकार होईल असे त्यांना वाटते. साधारणतया अशी विचारसरणी डावी मानली तर याविरुद्धची विचारसरणी, म्हणजे ज्यात भांडवलदार आहेत, वर्गीय/स्तरीय/वर्णीय समाजव्यवस्था आहे, आर्थिक विषमता आहे व धर्माचे स्थान अबाधित आहे अशी व्यवस्था म्हणजे उजवी हे ओघाने आलेच. अमेरिकेतील कन्झर्वेटिव (म्हणजे उजवे) असे मानतात की सरकारची भुमिका संस्कृती आणि नैतिकतेच्या व्याख्या करणे, राष्ट्राचे संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय नीति ठरवण्यापुरती मर्यादित असावे तर लिबरल्स (म्हणजे तिकडिल डावे) मानतात की सरकारने केवळ विकास करुन थांबू नये तर राष्ट्रात बंधुता आणि सामाजिक व्यवहारांत आत्मियतेचा परिपोष कसा होईल हे पहावे. व्यक्तीगत नीतिमुल्ये ठरवणे वगैरे बाबी नागरिकांवरच सोपवून त्यांची भौतिक प्रगती आणि वर्तन सामाजिक हिताविरुद्ध नसेल याची मात्र काळजी घ्यावी.  येथे आपल्याला अत्यंत थोडक्यात अमेरिकेतील डावे-उजवे म्हणजे काय हे लक्षात येईल. अमेरिकेतील डावे उजवे ठरवतांना वंशवाद व अतिरेकी राष्ट्रवाद मान्य की अमान्य ही बाबही विचारात घेतली जाते. शिवाय अति-उजव्या म्हणता येतील अशा अराज्यवादी विचारधाराही आहेतच.

पण यातही गंमत अशी आहे की समजा एखाद्या कन्झर्वेटिव, म्हणजे उजव्या व्यक्तीने, सरकारने शासकाच्या अनेक भुमिका पार पाडाव्यात अशी अपेक्षा केली आणि तो मग कितीही नीतिवादी व भांडवलशाही वादी राहिला तरी तो फक्त उजवा राहील पण कन्झर्वेटिव्ह नसेल! लिबरलही काही बाबतीत भुमिका बदलल्या तर तो डावा राहील पण लिबरल नसेल. म्हणजे डाव्या-उजव्याची व्याख्या अमेरिकन परिप्रेक्षात वेगळी होते हे आपल्या लक्षात येईल. डोनाल्ड ट्रंप हे उजव्या विचारसरणीचे आहेत असे मानले जाते. पण त्यांची काही धोरणे पुरेपूर डावीकडे झुकणारी आहेत याबद्दल त्यांच्यावर टीकाही केली जाते आहे. 

भारतात काँग्रेस व काही काळ त्यांच्या सहकारी पक्षांनी मिळून दिर्घकाळ राज्य केले. काँग्रेस पक्ष हा मध्यापासून डावीकडे झुकलेला आहे असे साधारणपणे मानले जाते. पं. नेहरू समाजवादी होते. मिश्र अर्थव्यवस्थेचेही जनक होते. म्हणजे एकाच वेळीस काही उद्योग सरकारी मालकीचे असतील व बाकी अन्य सारे खाजगी मालकीचे पण सरकारी नियंत्रणात असतील अशी ती रचना. एका परीने त्यांनी उजवा व डावा विचार एकत्रीतपणे भारतीय समाज व अर्थरचनेत आणला असे म्हणता येईल. सरंजामदार तसेच मोठ्या जमीनदारांच्या जमीनींवर नियंत्रण आणून कुळांना कसायला देणे हे डावे तत्व. यातून आर्थिक व सामाजिक समानता येईल अशी पं. नेहरूंची संकल्पना होती. एकंदरीत पं. नेहरुंचे धोरण पाहिले तर ते उजव्यापेक्षा डावीकडेच झुकलेले आहे असे म्हणता आले तरी त्यांनी भांडवलदारीचा नायनाट केला नाही. किंबहुना त्यांनी लायसेंसेसच्या मार्गाने का होईना पण भांडवलशाही मर्यादित लोकांपुरती का होईना पण प्रबळ होईल हे पाहिले. किंवा तो समाजवादी धोरणाचा मुख्य हेतू नसला तरी प्रत्यक्षातील फलित तेच होते. नोकरशहांची संख्या व अधिकार वाढल्याने व्यवस्थेतील त्रुटींचा लाभ घेणारा एक नवा अनुत्पादक भांडवलदार वर्ग बाबुशाहीच्या रुपाने जन्माला आला हे वेगळेच. थोडक्यात मध्यापासून डावीकडे झुकलेला विचार असे काही या धोरणांना म्हणता येणार नाही. किंबहुना अभिप्रेत नसलेली नव-विषमता व नवी वर्गव्यवस्था या धोरणांतून जन्माला आली ती आजही चालुच आहे. 

भारतीय घटना डावीकडे झुकलेली आहे असा युक्तिवाद अलीकडे केला गेला. किंबहुना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही कथित डावी तत्वे आहेत आणि घटनेने ही तत्वे सर्वोपरी मानल्यामुळे आणि घटनेतील अनेक प्रावधाने ही शोषित-वंचितांच्या सबलीकरणाच्या बाजुने असल्याने घटना मध्यापासून डावीकडे झुकली आहे असा नि:ष्कर्श डाव्यांनी काढला तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पण याच न्यायाने मग घटनेत उजवीही तत्वे असल्याने किंवा त्या तत्वांचा आधार घेत (संदिग्धतेने वेगळे अर्थही निघू शकत असल्याने) कथित उजवे वर्तन घटनामान्य समर्थनीयही करता येत असल्याने घटना उजवीकडेही झुकली आहे असे म्हणता येईल. घटना नव-विषमता उत्पन्न करण्यास मदत होईल किंवा "समता" या तत्वाचे उल्लंघनही करू देईल अशा काही तरतुदी घटनेत आहेतच. गोहत्याबंदीचे कायदे घटनेला साक्षीला ठेउनच बनले आणि त्याची कशी भयप्रद अंमलबजावणी सुरु आहे हे आपण पहातच आहोत. घटना ब-यापैकी स्वतंत्रतावादीही (लिबेरल) आहे आणि त्या अर्थानेही ती उजवी आहे असाही दावा केला जातो. हे दावे काहीही म्हणत असले तरी शेवटी विवेकानेच घटनात्मक मुल्यांचा वापर व्हायला हवा असे विवेकवादी म्हणतात. पण तात्विक दृष्ट्या पाहिले तर विवेकाची व्याख्या कोण करते त्यावर "विवेक" ठरत असल्याने विवेकाचीही वासलात लागू शकते हे आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीतही पाहू शकतो. आणीबाणीही समर्थनीय वाटू शकते आणि गोरक्षकांचा धुमाकुळही आणि नक्षलवाद्यांच्या निघृण हत्याही. यात विवेकाचे स्थान ते काय राहिले?

पण घटनेनेच नंतर "समाजवाद" अधिकृत रित्या स्विकारल्याने व सर्व पक्षांना, मग ते डावे असोत की उजवे, त्यांना समाजवादाशी बंधिलकी ठेवणे अनिवार्य असल्याने भारतातील सर्वच पक्ष "शपथपुर्वक" डावेच आहेत असेही मग म्हणता येईल! मग उजव्यांचे स्थान अघटनात्मक आहे असे म्हणता येईल काय? कारण घटनात्मक तरतुदींनुसार सर्व राजकीय पक्षांनी डावेच असले पाहिजे हे अभिप्रेत आहे. स्वर्ण भारत पक्षालाही समाजवाद मान्यच नसला तरी ही शपथ घ्यावी लागली, अन्यथा नोंदणीच होणे असंभाव्य! स्वर्ण भारत पक्षाने ही शपथ अंडर प्रोटेस्ट घेतली हे खरे. पण येथे महत्वाचा मुद्दा हा की कोणतीही विचारधारा बाळगण्याचे स्वातंत्र्य घटनाच एकीकडे देत असतांना विशिष्टच विचारसरणीला बांधील रहायची घटनात्मक सक्ती असेल तर ती उजवी आहे असे म्हणता येणार नाही काय? 

म्हणजे घटनेला एकीकडे सोयीने डावीही ठरवता येईल, उजवीही ठरवता येईल व मध्यमार्गीही ठरवता येईल. तिच्या डावेपणातच उजवेपण असल्याने डाव्या-उजव्या म्हणवणा-या तत्वधारांतील त्या आधारावरील संघर्ष पोकळ आहे हे येथे लक्षात घ्यायचे आहे. 

आपण एक प्रकारच्या तात्विक गोंधळात आहोत असे वाटावे अशी स्थिती आहे. कदाचित हा माझाही गोंधळ असू शकेल. पण गरीब, शोषित, वंचितांचे उत्थान व्हावे असे वाटनारे दावेच असतात आणि याला विरोध करणारे उजवेच असतात अशी आर्थिक आधारावरही डाव्या-उजव्याची मांडणी करणे कितपत न्याय्य होईल? एखाद्या धर्मवाद्याला शोषित-वंचितांचे भान नसेल असे म्हणता येईल काय? मग बसवेश्वर व संतपरंपरेला डावे ठरवणार की उजवे? की तेथे त्यांचा धर्मवाद सोयिस्करपणे विसरायचा? डावेपणाला तर परंपरावाद अमान्य आहे असे समजले जाते. मग यावर प्रत्युत्तर असे असू शकते की परंपरेतील जे चांगले आहे ते आम्ही स्विकारू. तर मग ते तेवढ्यापुरते मध्यमार्गी बनतील पण अर्थविचारधारा मात्र कडवी डावी राहिल आणि "कडवेपणा" आला की ते त्याक्षणी उजवे बनून जातात त्याचे काय करायचे? समाजवादात शोषणमुक्त समाज हे स्वप्न असले तरी त्यासाठी भांडवलदारांचे कररुपाने शोषण करत त्यांचे धन अन्य शोषितांना (किंवा भ्रष्ट प्रशासनाला) वाटायचे अथवा त्याचे उद्योगाचे सरकारीकरण करून टाकायचे हा प्रकार भांडवलदारांच्या शोषणात मोडत नाही काय? शोषण कोणाचेही असो, ते उजवेपणाचेच लक्षण नाही काय? की डाव्यांचे शोषण समर्थनीय ठरते? 

गांधीजी स्वतंत्रतावादी होते. गोरगरीबांबाबतचा त्यांचा कनवाळूपणा अतुलनीय असला तरी ते किमान समाजवादी नव्हते. किंबहुना समाजवादाचे विरोधक होते. त्यांचा अर्थसिद्धांत सर्वस्वी स्वतंत्र असा होता. समाजवादामुळे भारतात काय अनिष्ट होईल याचे भाकीत त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोनेक महिन्यातच केले होते. तरीही समाजवादी स्वत:ला केवळ गांधीवादी म्हणवून थांबत नाहीत तर गांधीजींना "डावे" ठरवतात. हा सोयिस्करपणा कसा येतो? बाबासाहेब आंबेडकरांवर एकीकडे फ्री मार्केटचे समर्थक म्हणून त्यांच्या अर्थविचारांवर चर्चासत्रे होतात तर दुसरीकडे आंबेडकरवाद डावा आहे अशीही मांडणी हिरीरीने करणारे लोक आहेतच.  मुद्दा हा आहे कि शोषित-वंचितांची काळजी करायचा ठेका कोणी डावे म्हणवणा-यांना दिला आहे काय? त्यांची डावेपणाची नेमकी व्याख्या तरी काय आहे? 

काँग्रेस मध्यापासून डावीकडे झुकलेला पक्ष आहे असे मानले जाते. खरे तर स्थापनेपासुनच विविध विचारधारांचा समावेश असलेला पक्ष अशीच त्याची रचना होती. नंतर थोडाबहूत फरक पडला असला तरी शासनकाळात काँग्रेसने नेहरूंच्या काळापासून राजकीय नवसंरंजामदार व नवभांडवलदार वर्गाचा जो उदय घडवला वा तो घडवायला हातभार लावला त्याला उजवेपणाचे लक्षण मानता येणार नाही काय? बाबुशाहीने शोषणाची नवी दारे उघडून दिली हे डावेपणाचे लक्षण की उजवेपणाचे? शोषण धर्म करो की राजकीय/आर्थिक व्यवस्था, असते ते शोषणच आणि तेथे डावे-उजवे असे ढोबळ विभाजन करता येत नाही. मानवी मूल्यांचीच जेथे गळचेपी होते तेथे उजवे-डावे करता येत नाही. प्रश्न व्यक्तींच्या हितसंबंधांचा, त्याच्या व्यक्तिगत आर्थिक प्रेरणांचा न्याय्य विकास होत त्याला अधिकाधिक स्वातंत्र्य मिळने महत्वाचे ठरते. पण प्रत्यक्षात डाव्या व उजव्या मानल्या जाणा-या दोन्ही व्यवस्था कमी-अधिक प्रमाणात स्वातंत्र्याचीच गळचेपी करण्याच्या प्रयत्नांत असतात हे वास्तव आपण पाहिले आहे.

भारतीय जनता पक्ष सरळ सरळ धर्मवादी आहे हे तर उघडच आहे. धर्म, पुरातन परंपरा याचे अतोनात आकर्षण भाजपला आहे. वैदिक वर्णव्यवस्था ही आदर्श समाजव्यवस्था आहे असे गोळवलकर ते पं. दिनदयाळ उपाध्यायांनी वारंवार मांडले आहे. त्यासंबंधी अधून मधून चर्चेची पिल्लेही सोडून दिली जातात. गोरक्षण, गोहत्या, गोमांसभक्षण याबाबतचे सध्याचे धुमाकूळ पाहता हा धर्मवाद किती विकृत स्तरावर गेला आहे हेही पाहता येते. साम्यवादी व संघात एक साम्य म्हणजे दोघांनाही ’तत्वत:’ घटना मान्य नाही. लोकशाहीची मुल्येही तत्वधारा म्हणून मान्य नाहीत. थोडक्यांची वा एकाची अधिकारशाही असणारी सत्ता दोहोंना पाहिजे आहे. सध्याचे मोदी सरकार त्या एकाधिकारशाहीचे अप्रकट रुप आहे असे सहज म्हणता येईल. साम्यवाद हा एक देव न मानणारा एक धर्मच असल्याने (पोथीनिष्ठा व कोणत्याही प्रकारचे कर्मकांड हे कोणत्याही धर्माचे अव्यवच्छेदक लक्षण आहे.) त्यांचा कडवेपणा व संघाचा कडवेपणा एकाच तराजुत सहज बसू शकतात. साम्यवाद क्रांतीचीच भाषा बोलतो तर सशस्त्र लढ्यांबद्दल संघाला अनावर आकर्षण आहे. त्यामुळे भगतसिंगांसारखे साम्यवादी नास्तिकही त्यांना प्रिय आहेत. क्लासलेस (वर्गविरहित) समाज हे स्वप्न आणि क्लाससहितचा (वर्णाश्रम बंधनांनी यूक्त) समाज हे स्वप्न हा फरक सोडला तर साम्यवादी आणि संघ/भाजपा हे दोघे डावेही म्हणता येतील आणि उजवेही. मग डाव्या-उजव्या मांडणीला काय अर्थ रहातो?

जगात एकच एक अशी अर्थविचारधारा नाही. साम्यवाद व भांडवलवाद अशी मुख्य विभागणी असली तरी साम्यवाद मार्क्सबरहुकूम जगात कोठेही अस्तित्वात आला नाही. भांडवलशाहीवादातही अनेक विचारधारा आहेत. एकीकडे आयन रँडने प्रतिपादित केलेला स्वप्नाळू अतिरेकवादी भांडवलशाहीवाद आहे तर दुसरीकडे सर्वच नागरिकांना भांडवलदार बनण्याचे स्वातंत्र्य देत सरकारने फक्त व्यापक संध्या निर्माण करायचे कार्य करीत मक्तेदारीयुक्त अथवा भ्रष्ट भांडवलशाहीवर अंकुश आणावा असे मानणा-या स्वतंत्रतावादी भांडवलवादही आहे. शोषित-वंचितांची काळजी व जबाबदारी शासनाने घ्यावी व त्यांची उन्नती करावी असे मानणारे समाजवादी आहेत तर या समाजवादामुळे समाज पंगू व परावलंबी होतो, त्यामुळे शासनाने प्रत्येक नागरिकाचे स्वतंत्रतावादी मुल्ये जपत ऐहिक उत्थानाचे मार्ग खुले करावेत असे मानणारे स्वतंत्रतावादी आहेत. त्यातही पुन्हा उपगट आहेतच. आर्थिक धोरणे उजवी व सामाजिक धोरणे मात्र डावी किंवा मध्यममार्गी अशीही कडबोळी आहेत. त्यामुळे डावे-उजवे अशी ढोबळ विभाजणी करता येत नाही. त्यासाठी नवीन मापदंड असले पाहिजेत. 

घटनेला डाव्या-उजव्या विचारसरणीत बांधता येत नाही. असलीच तर ती इहवादी आहे. आणि इहवादी असल्याने तिच्यात काळानुसार बदलण्याची क्षमता आहे. मग तिच्यात समाजवादाचे एकारलेले बंधनकारक तत्व सामाविष्ट करत तिच्या इहवादी तत्वाला सुरुंग लावणे कसे संयुक्तिक ठरेल? समाजातील शोषित वंचितांचे भान आणि तळमळ असणारे फक्त डावेच असू शकतात हा नियम कोणत्या नियमाने सिद्ध होतो? डावे धर्मवादी नसतात असा सोयिस्कर अर्थ कसा काढला जाऊ शकतो? शोषण तसे डावेही करतात आणि उजवेही. शोषणाची पद्धत वेगळी असू शकते एवढेच. विषमतेचा अर्क दोन्ही बाजुंनी भरलेला आहे. या दोहोंत समतोल साधून चांगले ते घेत सक्षम विचारधारा असू शकते व तसे प्रयत्न होत असतात हे खरे. पण विचारधारा आणि प्रत्यक्षातील त्या विचारधारेचे प्रसंगोपात्त व्यक्त होणारे स्वरूप यावरुनही अनेकदा गोंधळ निर्माण होत असतो. मध्यापासून डावीकडे झुकलेला वा मध्यापासून उजवीकडे झुकलेला ही मांडणीही भोंगळ होऊन जाते ती यामुळेच. 

भारतात धर्मवाद व अर्थवाद यातील विचारभेदाचा अर्थविचारभेदापेक्षा धर्मविचारभेदाचा जास्त प्रभाव डावे-उजवे ही व्याख्या करतांना पडतो. हिंदुत्ववादी म्हणवणारे वैदिकवादी एकांगी धर्मवादामुळे उजवे असतील तर तसे असणारे मुस्लिमही उजवेच आहेत हे ओघाने आलेच. आता या दोन धर्मधारांतील संघर्षाला दोन उजव्यांमधील संघर्ष म्हणता येईल. या वैदिकवाद्यांकडे स्वत:चे असे अर्थतत्वज्ञान नाही आणि मुस्लिमांकडेही नाही. भाजपने/संघाने "गांधीवादी समाजवाद" नांवाची एक भोंगळ संकल्पना मतानुययासाठी एके काळी राबवली होती. साम्यवादाकडे भारतीय जातीसंस्थात्मक उतरंडीला वर्गलढ्यात कसे बदलवायचे याचे धड तत्वज्ञान नसल्याने त्यांनाही अनेकदा आंबेडकरवादाला शरण जावे लागते. पण बाबासाहेबांनी धर्माचे अस्तित्व नाकारलेले नाही. किंबहुना नवयानाचे ते प्रवर्तक आहेत. ईश्वर न मानणारा धर्म जर असू शकतो तर साम्यवादही ईश्वर न मानणारा एक स्वतंत्र नवीन निर्माण झालेला धर्म आहे. पण बौद्ध धर्म दैवी चमत्कारांवर विश्वास ठेवतो, नवयानही ठेवतो हे आपण "बुद्ध आणि त्याचा धर्म" वाचले तरी सहज लक्षात येते. बाबासाहेब साम्यवादी कसे ठरू शकतात?  तरीही डावे-उजवे एवढा घोळ घालतात आणि डावे-उजवे या संकल्पनांतील फोलपणा दाखवून देतात हे एक नवलच आहे. किंबहुना ’सोयिस्करतावाद’ हाच त्यांच्या तत्वधारेचा मुलगाभा बनत जात डावा-उजवा हे सोयिस्करपणे ठरवत धर्मवादी म्हणजे उजवे व बाकी सारे मध्यापासून दावे किंवा पुर्ण डावे अशी राजकीय विभागणी करतात. पण ते हे विसरतात की कोणत्याही विचारधाराचे श्रेष्ठ कनिष्ठत्व शेवटी ते किती मानवीय आहे, मानवी मुल्यांचे, त्याच्या स्वातंत्र्याचे, हक्कांचे रक्षण करणारे आहे यावरुनच ठरेल. आणि तथाकथित डावे व उजवे या आघाडीवर संपुर्ण अपेशी ठरलेले आहेत. किंबहुना डाव्यांनी केलेल्या हत्या पाहिल्य तर दोन विश्वयुद्धात मारल्या गेलेल्या लोकांपेक्षा ती संख्या जास्त आहे. उदाहणार्थ स्ट्यलिनने युक्रेनमध्ये कृत्रीम दुष्काळ पाडून जवळपास दोन कोटी लोक अन्नान्न करून मारले. क्रांतीत लक्षावधी लोक तर मारलेच पण हिटलरने केलेल्या ज्युंच्या वांशिक हत्याकांडापेक्षा अधिक ज्यू मारले गेले. माओत्से तुंग तर आपण ३ कोटी लोक क्रांतीत ठार मारले असे अभिमानाने सांगत असे. म्हणजे मानवी मुल्यांची साम्यवाद्यांच्या लेखी काय किंमत आहे हे सहज समजून येते. 

डावी-उजवी-मध्यम विचारसरणी असे तात्विक विभाजन फसवे आहे. जगाचे वाटप अशा तीन विचारसरण्यांत होऊ शकत नाही. अनेक विचारसरण्यांचे सहास्तित्व मान्य करायची तयारी सर्वांना ठेवावी लागते. अमूक विचारधारा संपवून टाका अशी अतिरेकी वल्गना कोणी करत असेल तर तो मानवी मूल्य नाकारत असतो. विचारधारांमध्ये विचारकलह अपरिहार्य आहे. विरोधक एकाच कोणत्यातरी सोयिस्कर धारेखाली एकत्रीत व्हावेत ही अपेक्षाही न्यायसंगत नाही. न्याय्य हे आहे की संपुर्ण मानवजातीला स्वातंत्र्य असणारी व सर्वकश कल्याणाची प्रेरणा असणारी आणि सर्व व्यक्तींना सबल होण्याची संधी देणारी व्यवस्था आणने.  मानवाचा अभ्य़ुदय यातच आहे. 

काही लोक असा तर्क देतात की व्यक्तीला त्याचे हित समजत नाही, म्हणून कल्याणकारी व्यवस्था हवी. येथे शासनाचे नियंत्रणकारी अधिकार जास्त अपेक्षित असतात हे ओघाने आलेच. पण या तर्कात सर्वात मोठा दोष हा आहे की थोडक्या लोकांना अधिकांचे हित समजते हाच मुळात मोठा गैरसमज आहे, व्यक्तीच्या बुद्धीवर व स्वतंत्र प्रेरणांवर घेतला गेलेला हा मोठा संशय आहे. मानवी प्रेरणांचा अंत जेंव्हा होतो तेंव्हा डाव्या-उजव्या म्हणवणा-या रक्तपिपासू, मानवघातकी झुंडी निर्माण होतात. यात प्रमाण सौम्य ते उग्र काहीही असू शकते पण एकुणातील परिणाम तोच. यामुळे विवेकाचे व मानवी स्वातंत्र्याचे तेथे मुडदे पाडले जाणे स्वाभाविकच आहे.  

उजवे-डावे अशी सरधोपट विभाजनी करून आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोटात बसवून घेणे कसे आत्मवंचना करणारे, स्वत:ची फसवणूक करवून घेणारे असते हे या विवेचनावरून लक्षात येईल.  अपघाताने बसण्याच्या जागा डावी उजवीकडे झाल्या म्हणून उदयाला आलेली अपघाती संकल्पना मुळात अपघातग्रस्त आहे याचे भान आपल्याला असायला हवे!

("साहित्य चपराक" मासिकाच्या सप्टेंबर अंकात प्रसिद्ध)

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...