Saturday, October 14, 2017

संपत्ती-प्रकारांनुसार म्युचुअल फंड!

मागील लेखात आपण गुंतवणूक रचनेनुसार होणारे म्युच्युअल फंडांचे प्रकार पाहिले. सर्व प्रकारच्या गुंतवणुकदारांना सामावून घेण्यासाठी, गुंतवणुकीची उद्दिष्टेही पार पाडता येऊ शकतील यासाठी अजुनही अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यात गुंतवणूक रचना (Structure) प्रकार जसा आहे तसाच "संपत्ती प्रकार" (Asset Class) हाही प्रकार आहे. आपली गुंतवणूक कोणत्या प्रकारच्या माध्यमांतून फंड कंपनी गुंतवणार आहे याची आगाऊ कल्पना गुंतवणुकदारास यामुळे येते व निर्णय घेणे व योग्य तो म्युच्युअल फंड आपल्या गुंतवणुकीसाठी निवडणे सुलभ जाते. यात आपले गुंतवणूक सल्लागारही मार्गदर्शन करू शकतात. पण तुम्हालाही मुलभूत माहिती असेल तर निर्णयप्रक्रिया सोपी होत तुम्हाला योग्य पर्यायाचीही निवड करता येते.

संपत्ती प्रकारात साधारणपणे चार प्रकार पडतात. प्रत्येक गुंतवणूकदाराची मानसिकता आणि गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि गुंतवणुकीसाठीचा संभाव्य कालावधीही वेगवेगळे असतात. त्यानुसार इक्विटी फंड, डेब्ट फंड, आणि बॅलन्स्ड किंवा हायब्रीड फंड असे म्युच्युअल फंडाचे तीन प्रकार उपलब्ध असतात. त्यांची माहिती आपल्याला असणे आवश्यक व उद्बोधक आहे, म्हणजे म्युच्युअल फंडांच्या विश्वाची आपणास चांगली ओळख व्हायला मदत होईल.

१. इक्विटी फंड : 

नांवाप्रमाणेच या फंड प्रकारात म्युचुअल फंड कंपनी गुंतवणुकदारांचे पैसे भांडवल बाजारात गुंतवत असते. भांडवल बाजारातही कोणत्या प्रकारच्या कंपन्यांच्या शेयर्समध्ये गुंतवणूक केली जाईल याचीही माहिती म्युचुअल फंड कंपन्या आपल्या योजनेत देत असतात. म्हणजे पायाभूत क्षेत्रात काम करणा-या कंपन्या, औषधी निर्माण कंपन्या, ग्राहकोपयोगी साधने बनवणा-या कंपन्या, बँकींग क्षेत्र, सर्वसाधारण क्षेत्र कि अन्य कोणत्या क्षेत्रांत फंड कंपनी गुंतवणूक करणार आहे याची
आगाऊ माहिती गुंतवणूकदाराला मिळते. अर्थात शेयर बाजारातील गुंतवणूक ही अधिक जोखिमीची मानली जाते, पण यात अधिक लाभाचीही तेवढीच शक्यता असते. त्यामुळे या प्रकाराची निवड करतांना त्या त्या क्षेत्राची भुतकालीन कामगिरी आणि त्या त्या क्षेत्रातील पुढील संभाव्य वाढीच्या शक्यता यांचा अंदाज घेत संभाव्य जोखिमींचा/लाभांचा आधीच विचार केलेला उत्तम असते. 


२. डेब्ट फंड (Debt Fund)- 

डेब्ट म्हणजे कर्ज हे तर आपल्याला माहितच आहे. सरकारपासून ते व्यावसायिक कंपन्या बाजारातून कर्जरोखे, विविध प्रकारचे बॉण्ड्स तसेच स्थिर उत्पन्न (व्याज/परतावा) देणा-या मार्गाने भांडवल उभारत असतात. इतर गुंतवणुकींच्या मानाने या सुरक्षित गुंतवणुकी मानल्या जातात. शिवाय या गुंतवणुकींवर मिळणारे उत्पन्न हे स्थिर असते. बाजारातील चढउताराचा कसलाही परिणाम या परताव्यावर होत नाही. त्यामुळे जोखिम व जोखमीबरोबरच होऊ शकणारे संभाव्य अतिरिक्त लाभ या दोन्ही बाबींपासून गुंतवणूकदार दूर राहतो. ज्यांना तुलनेने सुरक्षिततेबरोबरच स्थिर उत्पन्नाची अपेक्षा आहे अशा गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय उपलब्ध आहे.

३. बॅलन्स्ड किंवा हायब्रीड फंड-

नांवाप्रमाणेच या प्रकारात वर वर्णन केलेल्या दोन्ही संपत्ती प्रकारांचे मिश्रण केलेले असते. म्हणजेच शेयर व कर्ज या दोन्ही प्रकारांत विशिष्ट प्रमाणात गुंतवणूक करण्याचे काम फंड कंपनी करते. धोका व परतावा यात समतोल साधत दोन्ही प्रकारांतील गुंतवणुकीचे प्रमाण टक्केवारीत ठरवण्यात आलेले असते. हे प्रमाण काय असेल हे या प्रकारच्या गुंतवणूक साधनाची माहिती देतांना म्युच्युअल फंड कंपनी देत असते. 

म्हणजे प्रत्येक साधनात फंड कंपनी कर्ज प्रकारात किती व शेयर प्रकारात किती टक्के गुंतवणूक करणार याची माहिती देत असते. ती पाहून गुंतवणूकदार आपल्याला योग्य वाटेल ते साधन (Instrument) निवडू शकतो. या साधनामुळे जोखिम कमी करत गुंतवणुकदाराचा लाभ कसा वाढेल हे पाहिले जात असते.

काही गुंतवणूक साधने गुंतवणुकीची अत्यंत निवडक प्रकारांना (स्पेशल कॅटेगरी) डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेली असतात. ती कशी हेही आपण पुढील लेखात पाहू. पण येथे लक्षात घेण्याचा मुद्दा हा की सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या पद्धतीचे गुंतवणूक मार्ग म्युच्युअल फंड देत असतो. सामुहिक गुंतवणुकीमुळे गुंतवणुकीसाठी मोठा फंड एकत्र येतो. छोट्यातील छोट्या गुंतवणुकदारालाही मोठ्या गुंतवणुकीत सहभाग घेण्याची संधी प्राप्त होते. गुंतवणुकीच्या पारंपारिक मार्गांपेक्षा यात अधिक व्यापकता आलेली आहे ती यामुळेच. हे सारे प्रकार समजावून घेत, फंडाच्या योजनाही काळजीपुर्वक समजावुन घेत आपण कोणत्या प्रकारात गुंतवणूक करायची याचा निर्णय घेणे कधीही योग्य असते. गुंतवणूकदार सल्लागाराचा सल्ला जेवढ्या महत्वाचा आहे तेवढेच तुमचे ज्ञानही महत्वाचे आहे. 
अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या
https://www.reliancemutual.com/campaigns/RMFContest/index.html

(वैधानिक सूचना: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करतांना योजनेशी संबंधीत कागदपत्रे काळजीपुर्वक पहावीत व मगच गुंतवणुकीचा स्वजबाबदारीवर निर्णय घ्यावा.)

1 comment:

  1. I really appreciate your professional approach. These are pieces of very useful information that will be of great use for me in future.

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...