Thursday, October 12, 2017

गुंतवणुकदाराच्या गरजेप्रमाणे म्युच्युअल फंडाचे प्रकार!


म्युच्युअल फंडातील गुंतवणूक समजावून घेतांना मुळात त्याचे प्रकार किती आहेत हे समजावून घेणेही उद्बोधक ठरेल. म्युच्युअल फंडात एक व्यापकता आहे. विविध प्रकारच्या गुंतवणुकदारांच्या गरजा त्यात समजावून घेतलेल्या आहेत. जोखीम नको ते जोखीम चालेल पण परतावाही जास्त मिळाला पाहिजे असे वाटणा-या सर्व गुंतवणूकदारांना यात वाव आहे. आपण येथे काही प्रकार समजावून घेण्याचा प्रयत्न करुयात, म्हणजे गुंतवणूक करतांना आपले उद्देश काय आहेत त्यानुसार गुंतवणुकीचा पर्याय निवडणे सोपे जाईल.

म्युच्युअल फंडाचे मुख्य प्रकार आहेत तीन. हे तीन प्रकार गुंतवणूक रचना (Structure), संपत्ती प्रकार (Asset class) आणि गुंतवणुक हेतू  (Investment objectives) यावर आधारित आहेत. आपल्या गुंतवणूक गरजा काय आहेत आणि धेये काय आहेत हे समजावून आपण कोणता प्रकार आणि त्या प्रकारांतील कोणता उपप्रकार आपल्याला उपयुक्त आहे याचा विचार करणे आवश्यक असते.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक रचनेवर आधारित जो प्रकार आहे तो आधी आपण नीट समजावून घेउयात. यात फंडाची रचना प्रामुख्याने तीन भागांवर आधारित असते. उदाहणार्थ ओपन एंडेड (खुली गुंतवणूक) योजना असते त्यात कधीही तुम्ही प्रवेश करू शकता आणे आवश्यकता असेल तेंव्हा केंव्हाही आपली गुंतवणूक तुम्ही काढून घेऊ शकता. गुंतवणूक आणि तरलता याचा मेळ यात घातला गेलेला असतो. शिवाय यात किती रक्कम आपण गुंतवू शकता यावर बंधन नसते. आपला फंड व्यवस्थापक आपण केलेल्या गुंतवणुकीची कोणत्या क्षेत्रांत तात्काळ करावी याचा निर्णय घेत असतो. या प्रकारात फंड व्यवस्थापकाला आपले कौशल्य हरघडी पणाला लावावे लागते. ज्यांना आपल्या गुंतवणुकीचे पैसे केंव्हाही, म्हणजे गुंतवणूक केल्यानंतर काही तासात अथवा दिवसांतही लागू शकते त्यांच्यासाठी ओपन एंडेड फंड हा आदर्श फंड असतो. यात तरलताही सांभाळली जाते व जेवढा काळ गुंतवणूक आहे त्या काळात होणा लाभही फंड व्यवस्थापकाची फी वजा जाता आपल्याला मिळतो.

याउलट क्लोज एंडेड म्युच्युअल फंडाचे आहे. या प्रकारात म्युच्युअल फंड कंपनीने नव्या फंडाची घोषणा केल्यानंतर ठरावीक काळातच गुंतवणूक करता येते. ही घोषणा करतांना गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात केली जाणार आहे याची कल्पना गुंतवणुकदारांना दिलेली असते. येथे गुंतवणूकी शक्यतो दिर्घकालीन भवितव्य लक्षात घेत केली जात असल्याने युनिटधारकाला, म्हणजेच गुंतवणूकदार व्यक्तीस विशिष्ट कालमर्यादेपर्यंत आपली गुंतवणूक काढून घेता येत नाही. पण या मर्यादेलाही एक मार्ग म्युच्युअल कंपन्यांनी दिला असून अनेक कंपन्या आपल्या त्या विशिष्ट फंडाची नोंदणी शेयर बाजारात करतात. म्हणजे अचानक गरज पडली तर क्लोज एंडेड फंडाचे युनिटस आपण शेयर बाजारात विकू शकता. त्या दिवशी व त्या वेळी जे युनिटचे शेयरबाजारातील मूल्य असेल ते युनिटधारकाला मिळते व आपली गुंतवणूक मोकळी करता येते. म्हणजे फरक एकच आहे की युनिटची खरेदी मुदतपुर्व काळात स्वत: म्युच्युअल फंड कंपनी करत नसून ती तुम्हाला खुल्या शेयर बाजारात विकावी लागते. तुम्हाला युनिट विकायचे नसले तरी येथेही रोज तुम्हाला आपल्या गुंतवणूकीचे आजचे मूल्य (NAV) काय झाले आहे हे पहायला मिळते. त्यानुसारही आपण निर्णय घेऊ शकता.

पण या प्रकारात पुर्वनियोजित योजनेप्रमाणे म्युचुअल फंड कंपन्या गुंतवणूक करत असल्याने व ही गुंतवणूक दिर्घकाळ असल्याने यात लाभ अधिक आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही. शिवाय आपण गुंतवणूक करता तो फंड जर शेयर बाजारात नोंदलेला असेल तर समजा अचानक गरज पडली तर तरलताही सांभाळली जात असते. त्यामुळे याबाबतचीही माहिती आपण आधीच घेतलेली बरी. आणि समजा आपल्याला आपली गुंतवणूक मधेच कधीही लागणार नाही, ते बाजुला पडलेले किंवा अन्यत्र गुंतवलेले पैसे असतील तर मग फंडाची नोंदणी शेयर बाजारात नसली तरी काही फरक पडत नाही. मुदत संपल्यावर आपण आपली गुंतवणूक म्युच्युअल फंड कंपनीकडून परत घेऊ शकता अथवा वाटल्यास आपण ती तशीच पुढेही ठेवू शकता. अर्थात मुदत संपल्यानंतर केंव्हा आपली गुंतवणूक लाभ पदरात पाडून घेत करायची यावर कसलेही बंधन नसते. 

यात काही फंड हे "इंटर्वल फंड" म्हणुनही ओळखले जातात. यात म्युच्युअल फंड कंपन्या मुदतपुर्व काळात अधून मधून गुंतवणूकदारांकडून युनिट परत विकत घेण्याची ऑफर देत असतात.   गुंतवणुकदाराला गुंतवणुकीतून बाहेर पडण्याची ही संधी असते. जर मिळणारा नफा योग्य वाटत असेल आणि पैशांची गरज असेल तर या योजनेचा लाभ होतो. अर्थात जर शेयरबाजारात युनिट्स नोंदलेले असतील वा नोंदले जाणार असतील तर आपण आपले गुंतवणुकीचे ध्येय नेमके काय आहे व फंडाची गुंतवणूक योजना नेमकी काय आहे हे समजावून घेत आपली गुंतवणूक करू शकता. आकस्मिक अडचणीत रोकड हाती घेत बाहेरही पडू शकता.

यावरुन आपल्याला गुंतवणुकीचे सुलभ पर्याय लक्षात आले असतील. आपण संपत्ती प्रकार (Asset class) यानुसार कोणत्या कोणत्या योजना असू शकतात व त्याचे नेमके लाभ काय याची चर्चा पुढील लेखात करुयात.
अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या


(वैधानिक सूचना: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करतांना योजनेशी संबंधीत कागदपत्रे काळजीपुर्वक पहावीत मगच गुंतवणुकीचा स्वजबाबदारीवर निर्णय घ्यावा.)

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...