Saturday, October 28, 2017

वास्तवाचे विविध पैलू




वास्तवाचे विविध पैलू
अभिप्राय >> नमिता दामले

संजय सोनवणी यांचा ‘आदमची गोष्ट’ हा कथासंग्रह भूत, भविष्य, वर्तमान या तिन्ही काळांत संचार करतो. कथांचे विषयही वैविध्यपूर्ण आहेत. अल्पशब्दांत उत्कृष्ट परिणाम साधणाऱ्या कथा या प्रभावी माध्यमाचा सोनावणी यांनी तंत्रशुद्ध वापर केला आहे. कथेच्या शेवटी धक्का देऊन वाचकाला विचार प्रवृत्त करण्याचा लेखकाचा हेतू जवळ जवळ साऱ्याच कथांमधून सफल झाला आहे.

बहुरूप्याच्या गोष्टीतले गूढ शेवटपर्यंत खिळवून ठेवते. एका भविष्याचा इतिहास मधला ‘ग्लोबल वॉर्मिंगचा’ प्रश्न, कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट याच्या वृत्तींमधला धार्मिक श्रद्धांमधला भिन्नपणा सटीकपणे दाखवला आहे. बहुरूप्याच्या कथेतील वृत्तींमधील परिवर्तन, त्याचे दारिद्रय़, त्याची म्हातारी यांचे वर्णन अचूक आहे. शेठाणी, बाजारपेठ, हमालाचा काम मिळवण्यासाठीचा संघर्ष सारे वास्तव आहे. ‘शेवटी सावल्याच त्या’मधील नायकाचे मन कळत नाही. ‘जीएं’च्या ‘भेट’ कथेमधून छळणारी अश्वत्थाम्याची भळभळणारी जखम ‘अश्वत्थामा मला भेटला’ मधून आठवल्याशिवाय राहत नाही.

‘आदमची गोष्ट’ सुन्न करते. पर्यावरणाची समस्या या कथेतून अत्यंत कलात्मक पद्धतीने मांडली आहे. उत्खनन कथेतील नायकाचे मनोव्यापार मानवाच्या सहज वृत्तीशी मेळ खाणारे आहेत. रामाच्या अपमानातून त्याच्या मनाचा ताबा घेणारी दसरूच्या सूडाची भावना आणि त्याचा परिणाम भयानक आहे आणि पुन्हा त्याला ‘कोणीच जागे करू शकणार नाही’ हे सत्य दुष्ट आहे.

‘सरप्राइज’ कथेतील मानवी मनाचे भरजरी पदर आणि माणसाच्या आयुष्याचे विविध रंग आणि वळणे यांचे चित्रण सुरेख आहे. ‘आदमची गोष्ट’ या संग्रहातील कथा कधी मानवी मनाचा तळ गाठतात तर कधी त्याच्या उपभोगी वृत्तीचा आणि महत्त्वाकांक्षेचा उच्चबिंदू दर्शवतात. परंतु माणसाच्या सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीचा समतोल मात्र अभावानेच आढळतो. एक वाचनीय कथासंग्रह असे आवर्जून सांगण्याइतक्या या कथा नक्कीच सकस आहेत.

आदमची गोष्ट
लेखक – संजय सोनवणी
प्रकाशक – चपराक प्रकाशन, पुणे-२
पृष्ठ – १५२ मूल्य – रु. १५०/-
http://www.saamana.com/book-aadamachi-gosht/

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...