Sunday, June 17, 2018

जनुकांचे सांस्कृतिक राजकारण!


वैदिक धर्म भारतात आक्रमणाद्वारे आला नाही तर शरणार्थींच्या माध्यमातून आला आणि धर्मप्रचाराने पसरला हे वास्तव समजावून घेणे वेदाभिमानी विद्वानांना मान्य करणे अवघड जाते. वैदिक संस्कृती येथीलच अणि सिंधू संस्कृतीचे निर्मातेही वैदिक आर्यच हे ठरवण्यासाठी जनुकीय विज्ञानाचा गैरवापर केला जात आहे हे या निमित्ताने लक्षात येते. डीएनएमधून फार तर त्या व्यक्तीची आनुवांशिकी व अन्य जैविक माहिती समजत असली तरी त्यातून भाषा, संस्कृती, धर्म इत्यादी अमूर्त बाबी समजत नाहीत.

राखीगढी येथे उत्खननात सापडलेल्या मानवी सांगाड्यांतील जनुकांचा अभ्यास करून त्यातून काय निष्कर्ष निघतात हे घोषित झाले आणि भारताचा इतिहास नव्याने लिहावा लागेल, असा दावाही केला गेला. सिंधू संस्कृतीचे लोक एेतद्देशीयच असून आजही त्यांचेच वंशज पंजाब-हरियाणा प्रांतात राहतात आणि आर्य आक्रमण सिद्धांत खोटा आहे या इतिहासकारांनी आधीच मान्य केलेल्या सिद्धांताची पुष्टी झाली असली तरी जे नवे दावे केले गेलेत ते मात्र टीकेचे कारण बनले आहेत.

पहिली बाब ही लक्षात घेतली पाहिजे की, राखीगढी येथे सापडलेल्या मानवी सांगाड्यांच्या डीएनए चाचण्यांचे निष्कर्ष प्रयोगशाळेतून येण्यापूर्वीच गेल्या वर्षी “हे निष्कर्ष राजकीयदृष्ट्या खळबळजनक असतील!’ असे डॉ. वसंत शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यावर ‘दिव्य मराठी’मध्ये मी गेल्याच वर्षी ऑगस्टमध्ये लेख लिहिला होता आणि त्यात डीएनए चाचण्यांतून परस्परविरोधी निष्कर्ष कसे काढले जातात आणि ते निष्कर्ष राजकीय हेतूंनी कसे प्रेरित असतात हे लिहिले होते. खरे तर निष्कर्ष हाती येण्याआधी डॉ. वसंत शिंदे यांनी असे विधान करणे हे राजकीयच होते. त्यावर अनेक विद्वानांनी टीकाही केली होती.

आता उशिरा का होईना डॉ. वसंत शिंदे यांनी प्रयोगशाळेतून आलेल्या डीएनए परीक्षणाच्या अहवालानुसार सांगितले आहे की थोडाफार इराणी अंश सोडला तर सिंधू संस्कृतीचे लोक एेतद्देशीयच होते. त्यामुळे आर्य व वैदिक संस्कृती किंवा वैदिक पर्व येथीलच असून आर्य आक्रमण सिद्धांत बाद ठरतो. अनेक संघवादी विद्वान “वैदिक आर्य येथलेच” ही जी मांडणी करत आले होते त्यांना समर्थन देण्यासाठी राजकीय कारणांसाठीच संशोधन वापरले जात आहे की काय, अशी शंका यावी अशी परिस्थिती पुरातत्त्व विभागानेच निर्माण करावी ही बाब चिंतेची आहे. याची काही कारणेही आहेत.

पहिली बाब म्हणजे ऋग्वेदाचा काळ. हा काळ कसल्याही स्थितीत इसपू दीड हजार वर्षांपलीकडॆ जात नाही आणि ज्या तीन सांगाड्यांतील डीएनए तपासले गेले ते आहेत इसपू तीन हजारमधील! जेव्हा वेद लिहायलाही सुरुवात झाली नव्हती तेव्हाची ही माणसे होती. शिवाय त्यांच्याबरोबर ज्या वस्तू पुरल्या गेल्या त्यातही किंवा संपूर्ण राखीगढीच्या आजवर झालेल्या उत्खननात वैदिक संस्कृतीचा भाग वाटेल अशी एकही वस्तू सापडली नसताना वेद काळ व वैदिक संस्कृतीशी सांगड घालण्याचा कालविपर्यासाचा प्रयत्न यातून होत आहे हे उघड आहे. टोनी जोसेफसह अनेक विद्वान या विचित्र निष्कर्षांवर टीका करू लागले आहेत ते यामुळेच.
अनेक वैदिक विद्वान सिंधू संस्कृतीचे संस्थापक वैदिक आर्यच होते हे दाखवण्यासाठी ऋग्वेदाचा काळ मागे खेचण्याचा आटापिटा करत असतात. पण त्याला पुरातत्वीय अथवा साहित्यिक पुरावे साथ देत नाहीत हे एक वास्तव आहे. खुद्द ऋग्वेद या नव्या संशोधनाला साथ देत नाही. सिंधू संस्कृतीतील एकाही वैशिष्ट्याचा उल्लेख त्यात नाही. त्यामुळे सिंधू संस्कृतीचे लोक एेतद्देशीय होते पण म्हणून ते वैदिक संस्कृतीचेही निर्माते होते हे मत अशास्त्रीय ठरते.

ऋग्वेद आणि अवेस्ता या समांतर काळात झालेल्या रचना असून खुद्द झरुथुस्ट्राचा उल्लेख किमान तीन वेळा ऋग्वेदात आलेला आहे. एवढेच नव्हे तर नोढस गौतम हा ऋग्वैदिक ऋषी अवेस्त्यात उल्लेखला गेला आहे. याशिवाय इतर अनेक समकालीन व्यक्ती एकमेकांच्या ग्रंथात अवतरतात. ऋग्वेदात उल्लेखल्या गेलेल्या ९०% नद्या या आताच्या अफगाणिस्तानातील असून पर्शू (पर्शियन), पार्थव (पार्थियन), तुर्वसा (तुर्क), पख्त (पख्तुन अथवा पठाण) इ. त्याच भूभागातील जमाती ऋग्वेदात असंख्य वेळा अवतरतात.
नद्यांचे म्हणाल तर सरस्वती (हरहवती), गोमल (गुमल), शरयू (हरोयू), रसा (रहा) आदी ऋग्वेदात व अवेस्त्यातही उल्लेखलेल्या नद्याही त्याच भागातील आहेत. अवेस्ता आणि ऋग्वेदाच्या भाषेतही कमालीचे साम्य तर आहेच, पण देवता-असुर यांच्या नावातही साम्य आहे. दोन्ही धर्मांचे कर्मकांड अग्नीभोवतीच फिरते. वैदिक संस्कृती येथलीच असा दावा करायचा असेल तर पारशी धर्माची संस्कृतीही येथलीच असे म्हणावे लागेल इतके साधर्म्य दोन्ही धर्मांच्या भूगोलात, भाषेत, सोम संस्कृतीत आणि धर्मकल्पनांत आहे. फरक एवढाच की ऋग्वेदात जे देव आहेत ते अवेस्त्याच्या दृष्टीने दुष्ट आहेत तर त्यांचे पूजनीय असुर (अहूर) ऋग्वेदाच्या दृष्टीने दुष्ट आहेत. या दोन धर्मातील संघर्ष देवासुर युद्धांच्या मिथक कथांतून वैदिक साहित्याने जपलेला आहे. हा धर्म भारतात शरणार्थी म्हणून इसपू एक हजारच्या आसपास आला तोच या दोन धर्मांतील संघर्षात हार झाल्याने. ही स्मृतीही शतपथ ब्राह्मणाने विदेघ माथवाच्या पुराकथेच्या स्वरूपात जपलेली आहे.

वैदिक धर्म भारतात आक्रमणाद्वारे आला नाही तर शरणार्थींच्या माध्यमातून आला आणि धर्मप्रचाराने पसरला हे वास्तव समजावून घेणे वेदाभिमानी विद्वानांना मान्य करणे अवघड जाते. वैदिक संस्कृती येथीलच अणि सिंधू संस्कृतीचे निर्मातेही वैदिक आर्यच हे ठरवण्यासाठी जनुकीय विज्ञानाचा गैरवापर केला जात आहे हे या निमित्ताने लक्षात येते. डीएनएमधून फार तर त्या व्यक्तीची आनुवांशिकी व अन्य जैविक माहिती समजत असली तरी त्यातून भाषा, संस्कृती, धर्म इत्यादी अमूर्त बाबी समजत नाहीत. मग डॉ. शिंदेंनी त्या जनुकांतून ते वैदिक आर्य आणि वैदिक संस्कृतीचे निदर्शन करतात, असे अशास्त्रीय विधान कसे केले हा एक प्रश्न आहे. दुसरी बाब म्हणजे असे विधान करायला कोणता तरी समांतर पुरावा असायला हवा. अगदी ऋग्वेदच गृहीत धरला तर तो लिंगपूजकांचा विरोधी आहे.
तो समाज यज्ञप्रधान असून मूर्ती अथवा प्रतिमापूजक नाही. त्यांना माहीत असलेली नगरे ही दगडांनी (अश्मनमयी) बांधलेली आहेत. सिंधू संस्कृतीतील, अगदी राखीगढीतील घरे मात्र विटांनी बांधलेली आहेत. किंबहुना वैदिक आर्यांना भाजक्या विटा ब्राह्मण काळापर्यंत माहीतच नव्हत्या हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वैदिक साहित्याचे परिशीलन करून म्हटले आहे. त्याउलट अफगाणिस्तानातील बॅक्ट्रिया-मार्जिआना पुरातत्त्वीय क्षेत्रात केल्या गेलेल्या उत्खननांत दगडांनी बांधलेली नगरे तर मिळालीच आहेत, पण सोम संस्कृतीचेही अवशेषही सापडलेले आहेत.थोडक्यात पुरातत्त्वीय अवशेषही वैदिक संस्कृती कोठे जन्माला आली याचे स्पष्ट निर्देशन करतात.

त्यामुळेच सिंधू संस्कृती इसपू तीन हजारपासून ते इसपू १८०० पर्यंत वैभवाच्या शिखरावर असताना त्या काळातील कसलेही वर्णन वैदिक साहित्यात येत नाही आणि याबद्दल निकोलस कझानाससारख्या पुरातत्त्वविदानेही बोट ठेवले आहे. वैदिक आर्य जर सिंधू संस्कृतीचे अल्प-स्वल्प घटक जरी असते तरी समकालीन घटनांचे आणि स्नानगृहे ते मुद्रा या सिंधू संस्कृतीच्या वैशिष्ट्यांचे, अगदी ओझरते का होईना, उल्लेख त्यात आले असते. प्रत्यक्षात ऋग्वेदच काय पण ब्राह्मण साहित्यही त्याबाबतीत मौन आहे. ऋग्वेदात घोडे व रथ यांचे विपुल उल्लेख असताना सिंधू संस्कृतीत घोड्याचे अवशेष अथवा त्याच्या प्रतिमाही मिळालेल्या नाहीत. पण जे जनुके सांगूच शकत नाहीत आणि ते मात्र सांगायचा प्रयत्न करून वैदिक आर्यांची सिंधू संस्कृतीतील नुसती उपस्थितीच सिद्ध करण्याचा प्रयत्न नव्हे तर त्यांनाच निर्माते ठरवायचा अट्टहास करणे हे विज्ञान नाही तर केवळ सांस्कृतिक वर्चस्वतावादी राजकारण आहे.

“या संशोधनाने भारताचा इतिहास नव्याने लिहावा लागेल!” हे डॉ. वसंत शिंदे यांचे विधान सरळ अर्थाने घेता येत नाही ते यामुळेच. इतिहासात संशोधने व्हावीत, नवी तथ्ये निकोप मनाने स्वीकारली जावीत हे खरेच आहे. पण सांस्कृतिक वर्चस्ववादासाठी व दुसऱ्यांची श्रेये हडपण्यासाठी छद्म-विज्ञानाचा वापर करून जर इतिहास लिहिला जाणार असेल तर तोही नाकारावा लागेल तो यामुळेच!


(Published in Divya Marathi)

1 comment:

  1. Khup bhari mahaiti....Sir aaple lekhan khup chaan ahe..lekhan kase karave yaavar ek blog lihaal ka plz..

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...