Thursday, October 4, 2018

मोदी...प्रांतवाद आणि महाराष्ट्र

मला मराठी अस्मिता आवडतात कि नाही हा प्रश्न नसून त्या जाग्या झाल्यात हे वास्तव कसे नाकारता येईल? गेली दोन वर्ष लोकसभेच्या निवणुकीआधीपासुन सरदार पटेलांचे नांव घेणारे (तसे निमित्त नसतांनाही आणि सरदारांना हिंदुत्ववादी का नेहमीच मानतात हे माहित असुनही) लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होत प्रचार सुरू झाल्यानंतर मात्र पटेलांचे क्वचित नांव घेतात आणि गांधीजप सुरू करतात यात तुम्हाला काही अंतराय दिसत नाही? कोणाचेही नांव कोणीही घेऊ शकतो अथवा घेण्याचे टाळु शकतो हे खरे पण ही क्रममिमांसा केली तर काय दिसते?
मोदी गांधीजींचे नांव घेतात याची पोटदुखी खरी कोणाला आहे हे आम्हाला माहित आहे. आताच २ आक्टोबरला आम्ही पाहिलेय आणि सायबर क्राईमकडे तक्रारीही केल्यात. आम्हाला पोटदुखी नसून दैवत/व्यक्तित्वांच्या अपहरणांचा प्रवास आजही अव्याहत सुरु आहे हे पाहून खंत वाटते. प्रांतवाद जर भंपक आहे तर चीनचा प्रमुख दिल्लीला न थांबता अहमदाबादेत काय करत होता? मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे, एवढी जवळ आहे तेथे त्याला का नेले नाही? हा पंतप्रधानांचा प्रांतवाद नाही काय? प्रांतवाद हा देशाच्या नांवाखाली मारुन टाका म्हनून मरत नसतो. तो जगातील यच्चयावत सर्व प्रांतांत जीवंत आहे. प्रांत मोठे झाले तरच देश मोठा होतो. पण प्रांता-प्रांतात भेदभाव करणारे देशाचेच पंतप्रधान असतील तर मग दाद कोणाकडे मागायची? म्यडीसनला गुजराथी बांधव किती होते आणि उर्वरीत राज्यांतील किती होते याचा जरा विचार करा.
अजुन पंतप्रधानांनी बाबासाहेबांचे नांव घेतलेले नाही. फुले तर खूप दुरचे. आम्ही आभार मानतो त्यांचे नांव घेत त्यांचेही अपहरण करण्याचा प्रयत्न अजुन तरी सुरु झालेला नाही म्हणून. महाराष्ट्राची दुर्दशा सांगायची तर सांगा...पण मग तुम्ही काय दिवे लावणार आहात ते तरी बोलाल कि नाही? आकडॆवा-या हेच सांगतात महाराष्ट्र कसाही असो आज देशातले एक नंबरचे राज्य आहे. तुम्हाला येथल्या राजकीय नेत्यांना येथील समस्यांसाठी दोष द्यायचा अधिकार आहे, पण तुम्ही येथील परिश्रमाने राज्य आघडीवर नेणा-या जनतेचा घोर अपमान कसा करु शकता?
काही कोणाचे नांव घेण्याची गरज नाही. गांधी-पटेल किंवा अन्य कोणीही...पण ती नांवे घेत तुम्ही गेल्या चार-पाच महिन्यात भाषणबाज्यांव्यतिरिक्त काय दिवे लावले, जनहिताचे (आधीच्या नालायक सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी वगळता) कोणते निर्णय घेतले...जे जनहिताचे निर्णय नव्हते त्यातील किती रद्द केले हे सांगा ना! पटेल किंवा गांधीजी कधीही भाषणबाज्यांसाठी प्रसिद्ध नव्हते हा इतिहास तुम्हाला कोणी सांगितलेला दिसत नाही!
वाईट वाटेल पण कोणाचे पोट डबारले म्हणजे गर्भ राहिला असे समजून देशाचे गाडे चालत नाही. पंतप्रधान हा चीफ एक्झिक्युटिव्ह असतो व त्याने योग्य दिशा ठरवत, कामांचे वाटप करत त्या अधिका-यांना/मंत्र्यांना अधिकारही देत त्यांच्या अंमलबजावणीकडे लक्ष ठेवायचे असते. गेल्या महिन्यांत असे काहीही दिसलेले नाही. कदचित मला आंधळा ठरवताही येईल...ठरवण्याचा अधिकार आहे.
आमचे पंतप्रधान काम कधी करतात? त्यांचे बोलण्याचे तासच खूप आहेत. बोलण्याने देश प्रगत झाला असता तर प्रवचनकांपासून ते सामाजिक वक्ते कोट्यावधी तास बोलतच आलेले आहेत. त्याने देश प्रगत होत नसतो. निर्णयशक्ती व त्यांची अंमलबजावनी करणारे देश बदलवतात कारण त्यांच्याकडे घटनादत्त अधिकार असतात. ते कधी राबवले जानार? साधी रिझर्व ब्यंक व्याजदर कमी करत नाहीहे. कारण काय? कोंग्रेस नालायक होती हे मान्यच...तुमचे काय? ५०० कोटींचे चीनी फटाके उडवू नका असले बाष्कळ सल्ले पंतप्रधान अमेरिकी वारीच्या आधी देतात. याला कोनती डिप्लोमासी म्हनतात? हीच बाब त्यांना इतरांच्या तोंडून सांगता येत नाही काय? कि स्वत:च सारे बोलायचे? अर्थ नीट समजावून घ्या. पंतप्रधानाने काय बोलावे व काय बोलु नये, इतरांमार्फत काय वदवावे याचे भान इंदिराजींना होते. या पंतप्रधानांना कधी येणार? राज्याच्या निवडणूकांना तुम्हाला तुमचाच फोटो लागतो...राज्यात तुमचे नेते नाहीत काय? हे देशप्रेम आहे कि स्वप्रेम?
माझे पोट दुखायचे कारण नाही. मी कोणत्याही पक्षाचा उमेदवार वा समर्थक नाही. पण कोंग्रेस परवडली (जसे लोक कोंग्रेसचे राज्य आल्यावर इंग्रजच बरे होते असे म्हणत तद्वतच) असे लोक नंतर (किंबहुना आताच) म्हणू लागले तर तो दोष तुमच्या कर्तुत्वहीण वाचाळपनाचा नाही काय?
आणि पुन्हा एकदा शेवटचे सांगतो...मी मराठी माणुस आहे. माझे मराठी असणे मला प्रिय आहे. माझ्या मराठी माणसांच्या (लाख चुका असतील पण) या देशाला स्वातंत्र्य म्हनजे काय असते हे शिकवणा-यांचा हा प्रांत आहे. आम्ही गांधीजी/पटेल गुजरातेत जन्माला आले होते म्हनून त्यांच्याकडे गुजराथी म्हणून पाहिले नाही. अवघ्या देशानेही पाहिले नाही. पण आताचा गुजरातच्या मुख्यमंत्र्यापासून ते पंतप्रधानांचा जप मात्र प्रांतिकच आहे, महाराष्ट्रच नव्हे तर उर्वरीत सर्व राज्यांना हीनगंड देणारा असेल तर प्रतिक्रिया उमटणारच.
असो.

(माझे बंधू आदित्य बापट यांच्या प्रतिक्रियेवरील ही सविस्तर प्रतिक्रिया Dated October 5, 2014.)

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...