Sunday, November 4, 2018

काश्मीर : सर्वांगीण अनास्थेचा बळी


Image result for kashmir martanda



सातव्या शतकापासून ते जवळपास बाराव्या शतकापर्यंत संपुर्ण भारताचेच नव्हे तर तिबेटचेही धार्मिक, वैचारिक, साहित्यिक आणि अगदी राजकीयही नेतृत्व करणारा काश्मिर आज असा का आहे हा गंभीर प्रश्न असून त्याची मानसशास्त्रीय कारणे शोधत त्यावर उपाय काढले नाहीत तर अन्य सारे राजकीय व शस्त्रबळावर केले जाणारे प्रयत्न अयशस्वी ठरतील. काश्मिरी माणसाची आजची अवस्था ही संभ्रमांच्या जाळ्यात अडकलेल्या माशासारखी झाली आहे. तरुण अस्तित्वाच्या शोधात आहेत खरे पण त्यांना बुजुर्गांकडून दाखवले जाणारे मार्ग तो शोध चुकीच्या वळणावर आणुन ठेवतात व त्यातुन कोणत्या ना कोणत्या प्रकारचा असंतोषच बाहेर पडतो. शांतताप्रिय असलेल्या काश्मिरींचीही संभ्रमावस्था त्यांनाही कोणतीही नवोन्मेषाची वैचारिक चळवळ उभी करु देत नाही. शांततामय प्रागतीक जीवनासाठी आवश्यक विचारच जन्माला येत नसल्याने काश्मिरची समस्या अधिकच गहन झाली आहे. पाकिस्तान, काश्मिरमधले फुटीरतावादी किंवा स्वातंत्र्यवादी या सर्वांनी निर्माण केलेली हिंसाचाराची समस्या मुळात काश्मिरी सामाजिक मनातच शोधायला हवी हा विचारच आपण जर केला नाही तर या समस्येच्या मुळाशीही जाता येणार नाही.    

काश्मिरच्या इतिहासात सांस्कृतीक आणि राजकीय चढउतार खुप आलेत. असे असले तरी तत्वज्ञानाच्या व साहित्याच्या क्षेत्रात हा प्रदेश नवोन्मेषकारी प्रतिभांनी प्रदिर्घकाळ चैतन्याने सळसळत होता. कर्कोटक घराण्यातील सम्राट ललितादित्याने खो-याच्या बाहेर पडून तिबेट, इराण, तुर्कस्थान तर जिंकलेच पण सिंध, पंजाब, मध्यदेश (महाराष्ट्रापर्यंतचा भुभाग) एवढा विशाल प्रांत आपल्या अंमलाखाली आणला. शासनव्यवस्थेचे नवे तत्वज्ञान निर्माण केले. ललितादित्याच्या साम्राज्याच्या विशालतेची तुलना फक्त सम्राट अशोकाशी होऊ शकते. ग्रीको-रोमन स्थापत्यकारांपासुन गांधार व तिबेटमधील शिल्पकारांनाही आपल्या राज्यात उदार आश्रय दिला. त्यानेच मध्यदेशातुन (महाराष्ट्र तेंव्हा मध्यदेशातच मोडत होता) अत्रिगुप्त या विद्वानाला त्यानेच काश्मिरला आणले. हा अत्रिगुप्त म्हणजे संपुर्ण भारतावर धर्म-तत्वज्ञानाच्या क्षेत्रात अक्षरश: एकाधिकारशाही गाजवणा-या अभिनवगुप्ताचा पुर्वज. शैव तंत्र सिद्धांतांना त्याने अपरंपार शास्त्रीय रुप तर दिलेच पण व्याकरण ते नाट्य या विषयांवरही आपली छाप सोडली. अफगाणिस्तान व तिबेटमध्ये बौद्ध धर्म गेला तो काश्मिरमधुन आणि या बुद्धीझमवर शैव तंत्रांची अपरंपार छाया आहे. काश्मिरमधुनच शेकडो ग्रंथ तिबेटियन भाषेत अनुवादित केले गेले व तिकडे जात कश्मिरी बौद्धांनी तिबेटला बौद्धमय केले. भारतातील असंख्य विद्वान शैव सिद्धांत समजावुन घ्यायला काश्मिरमध्ये जात. थोडक्यात काश्मिर हा वैचारिकतेचे एक चैतन्यमय उर्जाकेंद्र म्हणून प्रदिर्घकाळ देशाला मार्गदर्शक राहिले.

मोगल शासनकाळापासुन हा प्रदेश पुन्हा एकदा देशापासुन वैचारिक व भावनिक दृष्ट्या तुटत गेला. मुळात हिमालयाच्या पर्वतराजीने वेढलेल्या या भागातील माणसाची मानसिकताही पहाडी भागांतील माणसांप्रमाणेच साधी-सरळ, निष्कपट पण तेवढीच लढाऊ व स्वातंत्र्यप्रिय. राजकीय उठावांचा इतिहास कश्मिरला नवा नाही. असे असले तरी येथील मुस्लिम सुफी तत्वज्ञानाकडेच्घ आकर्षित झालेले होते. उर्वरीत भारतातील लोकांनी काश्मिरशी नंतर फारसे संबंध वाढवायचा प्रयत्न केला नाही. राजकीय उद्दिष्ट्ये वगळता वैचारिक चळवळींशी त्यांना जोडून घेण्याचा प्रयत्न झाला नाही. मराठ्यांनी उत्तरेत पार पातशाहीवर नियंत्रण आणले पण त्यांचीही पावले काश्मिरकडे वळाली नाहीत. काश्मिरचे वैचारिक क्रांतीचे तेज मलूल होत गेले आणि आता ते पार विझले आहे की काय असे म्हणायची वेळ आली आहे. काश्मिरी माणुस हा फक्त उथळ आणि सवंग पण भडक राजकीय विचारव्युहांचा गुलाम झाल्याचे चित्र आहे आणि त्याला काश्मिरी लोकांची चूक जेवढी जबाबदार आहे त्यापेक्षा अधिक तथाकथित राष्ट्रभक्तांचे एकतर्फी विखारी प्रचारही जबाबदार आहेत. आज तेथे, मग ते पंडित असोत की मुस्लिम, त्यांचे इतिहास व संस्कृतीचे आकलन सापेक्ष व तथ्य नव्हे तर केवळ समजांवर आधारित आहे आणि त्यात प्रत्येकजण आपले समज हाच इतिहास मानतो. त्यामुळे इतिहासापासुन शिकण्यासारखे काश्मिरकडे प्रचंड काही असतांनाही आता गैरसमजाने भरलेला इतिहासच एक रोडा बनला आहे की काय अशी शंका येते.

काश्मिरची सर्वात मोठी व मुलभुत समस्या म्हनजे तेथील सातत्याने अस्थिर व आता गडगडत असलेली अर्थव्यवस्था. ललितादित्यासारख्या असंख्य काश्मिरी राजा/सम्राटांनी व्यापार व उत्पादनावर लक्ष केंद्रीत करत तेथील अर्थव्यवस्था सबळ ठेवली होती. नंतरच्या काळात ती क्रमशा: ढासळत सामान्य बनली. आता तर ती परावलंबी झाली आहे. केंद्राच्या मदतीखेरीज त्यांचा अर्थसंकल्प पुरा होऊ शकत नाही. पर्यटन हा तेथील सामान्यतया ७०% अर्थव्यवस्था सांभाळतो. गेल्या चार वर्षात पर्यटन खालावत जात आता जवळपास केवळ २०% वर आले आहे. हस्तकला उद्योग हा काश्मिरची शान, पण त्यात परंपरा जपत असतांनाच आधुनिकता आणण्याचे कसलेही प्रयत्न झाले नाहीत त्यामुळे ते बेरोजगार झाले आणि आता काश्मिरीच्या नांवाखाली पंजाबी यंत्रमागावर बनलेल्या शाली/गालिचे विकले जातात. या उद्योगातील लोक बव्हंशी भुमीहीन असल्याने त्यांच्या परवडीला पारावर राहिलेला नाही. फळबागा हे एक तेथील अर्थव्यवस्थेतील महत्वाचे साधन. पण साठवणुकीच्या अपु-या सोयी, प्रक्रिया उद्योगांचा अभाव आणि बाजारपेठेत अस्थिर परिस्थिर्तीने झपाट्याने गमावत चाललेले स्थान यामुळे तीही तेवढी किफायतशिर राहिली नाही. त्यामुळे काश्मिरमध्ये बेरोजगारीचा विस्फोट झाला आहे. बेरोजगारांना शाश्वत व भविष्याबाबत हमी देईल अशा रोजगाराचीच सोय नसेल वा तसे वातावरणही नसेल तर युवक काय करणार?  आणि अर्थस्थितीच सामाजिक स्थिती ठरवत असते हा जगभर कधीही आणि कोठेही लागु पडणारा सिद्धांत आहे याचे विस्मरण आमच्या व्यवस्थेला झालेले आहे.

म्हणुन आज काश्मिर वैचारिक चळवळींपासुन दूर हटला असेल तर त्याला जबाबदार आहे काश्मिरमध्ये असलेला प्रादेशिक अर्थतज्ञांचा पुरता अभाव. आपल्या प्रदेशातील नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने कसा उपयोग करता येईल व प्रगती साधता येईल यावर जे अर्थ-चिंतन व शासकीय धोरण हवे ते नाही. तेथे सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक चळवळीच ख-या अर्थाने अस्तित्वात नाहीत. त्या निर्माण व्हाव्यात म्हणून कोणी प्रयत्नही करत नाहीत.

पण एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती ही की आर्थिक कोंडी फुटल्याखेरीज काश्मिरबाबतच्या शांततेसाठीच्या अन्य कोणत्याही योजना यशस्वी होणार नाहीत. त्याच वेळीस काश्मिरशी जे पुरातन ज्ञान, विचार आणि सामाजिक बंध होते ते पुन्हा एकदा नव्याने जुळवल्याखेरीजही आपण "एकदेशीय" ही भावना निर्माण करु शकत नाही. भारतातुन एक "सरहद" संस्थेचे जिद्दी, धाडशी आणि भावनाशिल संस्थापक संजय नहार यांनी गेल्या २६-२७ वर्षांपासुन एकदेशियतेची आणि सहवेदनेची जी भावना काश्मिरी नागरिकांत निर्माण करण्याचे अलौकीक कार्य केले आहे ते वगळले तर पेटत्या आगीत तेल ओतत बसलेले विचारवंत आणि नेते याशिवाय देशात दुसरे कोणी दिसत नाही. का? असे बनावे किंवा अशा जोडु पाहण-या मनस्वी तरुणांच्या मागे उभे रहावे व आपापली वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिभा काश्मिरी भावंडांसाठी वापरावी असे सकारात्मक प्रयत्न का होत नाहीत? काश्मिरला पुन्हा एकदा त्यांच्याच ज्ञान-विज्ञान प्रतिभेचे उर्जाकेंद्र बनवण्यासाठी काय करता येईल याची जास्त चर्चा व चिंतन का होत नाही? राजकीय प्रश्नांमागे अनेकदा सांस्कृतीक, सामाजिक मनोवैज्ञानिक आणि आर्थिक प्रश्न कार्यरत असतात. जर ते सोडवण्यासाठीच आमची काही योजना नसेल तर सर्जिकल स्ट्राईक काय, तेथला लष्करी अंमल काय आणि काश्मिरसाठी वाढीव आर्थिक मदती काय...वाळुत पाणी ओतणे जेवढे निरर्थक तेवढेच हे असले लोकप्रिय-घोषणाबाज-दयाबुद्धीमय प्रयत्नही वांझ होऊन जातील.

सरकार सध्या जे करायचे ते करत राहील...पण प्रजाच जेंव्हा स्ववैचारिक प्रगल्भतेने जागृत होईल तेंव्हा आम्हाला नेमके काय हवे आणि सरकारने काय नेमके करायचे हे जनताच आग्रहाने सांगु शकेल. त्यातुनच परिवर्तनाचे व्यापक शक्यता निर्माण होईल. काश्मिर किमान सहाशे वर्ष भारताचे ज्ञानकेंद्र राहिले तसेच ते आधुनिक काळात पुन्हा एकदा सळसळत्या चैतन्यमय प्रगल्भ वैचारिकतेचे केंद्र कसे बनेल हे प्रयत्न करणे व त्यासाठी तेथील विचारकांना खडबडवुन जागे करणे मात्र आपल्या हातात आहे.

(आज दिव्य मराठीत प्रसिद्ध)


2 comments:

  1. २९ वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचा काहीच उल्लेख नाही. काश्मिरविषयी अनास्थेमागे अशा अपूर्ण विश्लेषणाचाही हातभार आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. परस्परविरोधी वाक्यांनी भरलेला लेख .

      Delete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...