Thursday, November 1, 2018

शिवाजी महाराजांची हेरव्यवस्था!


Image result for surat spy system of shivaji


छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत मुत्सद्दी होते. चारी बाजु शत्रुने वेढल्या असतांना त्यांनी आपल्या अलौकीक बुद्धीचातुर्याने व पराक्रमाने मावळ्यांच्या मदतीने जो संगर मांडला आणि स्वराज्य उभारुन अभिषिक्त छत्रपती बनले त्या कर्तुत्वाला जगात तोड नाही. त्यांच्या पराक्रमाच्या कथा आम्हाला मोहत असल्या तरी त्यामागे काय मुत्सद्दी आणि धोरणी कल्पक शास्ता लपला होता हे आपल्याला त्यांच्या हेरयंत्रनेवरुनच लक्षात येते. शत्रुपक्षाची खडानखडा माहिती ठेवणे, युद्धभुमीची आगावुच भौगोलिक माहिती घेणे, ज्या स्थानांवर हल्ला करायचा आहे किंवा लुट करायची आहे तेथीलही भौगोलिक आणि सामरिक माहिती घेंणे आणि त्यावरच आधारित आपले चढाईचे किंवा योग्य वेळेची वाट पाहत शर्त्रुला गाफील ठेवणे यात महाराज अत्यंत कुशल होते. त्यामुलेच जीवावरच्या संकटांतुनही ते पार पडू शकले. अफजलखान येतोय तो आपल्याला ठार मारण्यासाठीच ही आगावु कल्पना आल्यानेच त्यांनी आपली पुर्ण रणनीतीच बदलली आणि खानाला आपल्या गडावरच यायचे निमंत्रण दिले. रणभुमी ते ठरवत ते माहितीच्या आधारावर.

खरे म्हणजे माहितीचे महत्व उमगलेली मध्ययुगातील एकमेव व्यक्ती म्हणजे शिवाजी महाराज. तत्पुर्वी गौतमीपुत्र सातकर्णीने हेरांचाच वापर करत महाराष्ट्राची शक नृपती नहपानाच्या तावडीतुन महाराष्ट्राची मुक्तता केली होती. त्यानंतर तब्बल दीड हजार वर्षांनी त्या हेरनीतीचा अत्यंत कुशलतेने यशस्वी वापर केला तो असेल तर तो शिवाजी महाराजांनी.

हेरखाते प्रसिद्धीसाठी काम करत नाही. कोणी कशी माहिती काढली आणि महाराजांपर्यंत कशी पोहोचवली हे कोणी लिहुन ठेवण्याची त्यामुळे शक्यताही नाही. आणि तसे तुरळक उल्लेख सोडले तर आपल्याकडेही त्याबाबत लिहिले गेलेले नाही. आजही जगभरातील गुप्तहेरांच्या कारवाया प्रचंड गुप्ततेच्या पडद्याआड चालु असतात. आपल्याला मर्यादित साधनांच्या सहाय्याने स्वराज्य निर्मिती करायची असेल, देशी-विदेशी विरोधकांसमोर आव्हान निर्माण करायचे असेल तर आपल्याला प्रबळ हेरखाते असने अत्यावश्यक आहे हे शिवाजी महाराजांनी ओळखले. शत्रुच्या गोटातली अचुक असल्याखेरीज कोणाला, कधी आणि कसे गाठायचे, कधी शांत बसायचे याचे निर्णय घेणे तुलनेने सओपे गेले ते त्यांनी उभारलेल्या हेरखात्यामुळे. 

शिवाजी महाराजांच्या हेरखात्याच्या प्रमुखाचे नांव बहिर्जी नाईक होते एवढी माहिती सोडली तर खुद्द बहिर्जी कोण होते या माहितीत मतमतांतरे आहेत. काहींच्या मते शिवाजी महाराजांशी भेट होण्यापुर्वी ते एक दरोडेखोर होते व एका चकमकीत बहिर्जीने दाखवलेल्या चातुर्यामुळे महाराजांनी त्याला आपल्याकडे वळवले, तर काही म्हणतात की ते मुळचे बहुरुपी होते. नक्कल करणे व वेश बदलविण्यात पांरगत असलेल्या बहिर्जी नाईक यांची भेट झाली ते शिवाजी महाराज एका मोहिमेवर असतांना. शिमग्याच्या सोंगांच्या वेळी बहिर्जीने आपल्या कलांची कमाल दाखवली. त्यांचे कौशल्य पाहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याला गुप्तहेर खात्यात सामील केले. मग पुढे त्याच्या कामगिरीमुळे बहिर्जी सरदार पदापर्यंत जाऊन पोहोचला. ही महाराजांची गुणग्राहकता होती. बहिर्जीनेही आपल्या सर्व जबाबदा-या इमानदारीने पार पाडल्या. बहिर्जी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात कधी दाखल झाला हेही इतिहासाला माहित नाही. पण बहिर्जीशी भेट होण्यापुर्वीच, अगदी सुरुवातीच्या काळापासुन त्यांच्याकडे प्राथमिक का होईना हेरव्यवस्था होती असे म्हणायला वाव आहे. 

बहिर्जीचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात झाला असे मानले जाते. इतिहासाने त्यांच्या जन्मतारखेची तर सोडा मृत्युदिनाचीही नोंद ठेवलेली नाही. हेरांच्या आयुष्यातील हा एक अपरिहार्य भाग असला तरी महाराजांच्या उपलब्ध इतिहासावरुन त्यांच्या मोहिमांत हेरांची अतुलनीय मदत झाली असल्याचे खात्री पडते. बहिर्जीच्या हाताखाली सुमारे दोन-अडीच हजार हेर होते असे मानले जाते. काही हेर कायम स्वरुपी काम करीत तर काही मोहिमेच्या स्वरुपानुसार तात्पुरत्या स्वरुपात वापरले जात. कायम स्वरुपी हेर दिल्ली ते विजापुर, तंजावरपर्यंत पसरलेले होते. एवढेच नव्हे तर आपल्याच गोटातुन कोणी फितुरी करु नये म्हणुन त्यांच्यावरही लक्ष ठेवण्याची गरज असे. ही गरज बहिर्जीने कुशलतेने भागवली. त्यासाठी महिलांचाही वापर केला गेला. विरोधी सत्तांच्या दरबारात महाराजांनी ठेवलेले वकीलही तेथील हेरांकडुन आगावु माहिती घेत असल्याने त्यांच्यावरही नामुष्कीची वेळ त्यामुळेच आली नाही.  

या हेरांना अर्थात प्रशिक्षण गरजेचेच असणार. त्यासाठी बहिर्जीने नेमकी कोणती यंत्रणा उभी केली होती याबद्दलही इतिहास मुक आहे. संशय न येवु देता,  जीव धोक्यात घालून माहिती काढणे, सांकेतीक भाषेत ती पुढे पाठवणे आणि प्रसंगी शत्रुच्या गोटातही घातपात करने अशी कामे हेराला करावी लागत. त्यासाठी प्रशिक्षणाची गरज होतीच त्यामुळे तशी व्यवस्था असने स्वाभाविक म्हणावे लागेल. तात्पुरत्या हेरांत त्या त्या भागातील भटके मेंढपाळ, भिकारी, जोतिषी, नंदीवाले, वडार, रामोशी अशा समाजांतील लोकांचाही उपयोग करुन घेतलेला दिसतो.

हेरांकडून आधीच आलेल्या माहितीमुळे महाराजांना विजय मिळाला याची नोंद असलेला एक अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे. १६६० साली शाइस्तेखानाने शिवाजी महाराजांविरुद्ध मोहिम उघडली होती. त्याने पुण्यातच मुक्काम ठोकलेला होता. १६६१ मध्ये त्याने आपला मोर्चा कल्याणकडे वळवला. कर्तलबखानाच्या नेतृत्वाखाली जंगी फौज निघाली. खरे तर कर्तलबखान बोरघाटाच्या मार्गाने कोकणात उतरनार होता. पण त्याने ऐन वेळीस आपला बेत बदलला आणि उंबरखिंडीमार्गे जायचे ठरवले. बहिर्जीच्या हेरांनी ही माहिती तातडीने शिवाजी महाराजांपर्यंत पोहचवताच शिवाजी महाराजांनी अत्यंत वेगवान हालचाल केली. उंबरखिंडीत पुढुन आणि पिछाडीवरुन खानाला चेपले. सर्व मार्गांची नाकेबंदी केल्याने त्याला पळायलाही जागा उरली नाही. प्यायला पाणीही मिळणार नाही असा तगडा बंदोबस्त महाराजांनी केल्यामुळे त्याचे सैन्य हतबल झाले. कर्तलबखाना पुढेही जाता येईना आणि मागेही फिरता येईना. शेवटी त्याने हताश होऊन महाराजांसमोर शरणागती पत्करली. महाराजांने त्याच्याकडुन खण्डनी वसुल तर केलीच पण छावनीतील सर्व संपत्ती ताब्यात घेतली. कर्तलबखानाला कोकणात न उतरण्याची तंबी देवून नामुष्की झालेल्या कर्तलबखानाला परत फिरु दिले. रक्ताचा एक थेंब न सांडता महाराजांनी हा विजय मिळवला. महितीच्या आधारे शत्रुला चेपण्याची अभिनव रणनीती त्यांनी वापरली. 

अर्थात त्यांच्याजवळ वेळीच शत्रुने आपला मार्ग बदलला आहे ही माहिती मिळाली म्हणूनच असे घडू शकले. बहिर्जीचे हेर शत्रुच्या गोटातही बारगीर, शिलेदार किंवा अगदी कोणत्याही हरकाम्यासारख्या सामान्य पदावर काम मिळवत आणि डोळे व कान उघडे ठेवत कामाची माहिती बहिर्जीकडे पाठवत. ही माहिती ट्रांस्फर करण्यासाठी त्या काळात बहिर्जीने कोणत्या क्लुप्त्या वापरल्या असतील याची कल्पना केली तरी थक्क व्हायला होते. कर्तलबखान मार्ग बदलतो आहे हे त्यांना समजता तेवढ्याच वेगाने ती माहिती महाराजांपर्यंत पोचवली गेली. शिवाजी महाराज निष्णात रणधुरंधर असे की त्यांनीही मिळलेल्या माहितीच्या आधारावर आपली अभिनव रणनीती ठरवली. विजय आणि संपत्तीचे संपादन केले. स्वराज्यावरील धोका टाळला. या विजयाचे श्रेय इतिहासकार बहिर्जीच्या हेरांनाही देतात हे महत्वाचे आहे. 

कोणतीही मोहिम काढण्याआधी महाराज बहिर्जी नाइकाला तिची कल्पना देत. बहिर्जी लागलीच कामाला लागे. त्याचे हेर ज्याही भागात मोहिम निघणार असे तेथली सर्व माहिती गोळा करायच्या मागे लागत. शत्रुचे बळ, त्याची मर्मस्थळे, त्याच्या संभाव्य हालचाली इत्यादिंची माहिती घेत. त्या माहितीवर आधारीत महाराज आपले धोरण ठरवत, डावपेच आखत. त्यामुलेच महाराजांच्या बव्हंशी मोहिमा सफल झालेल्या आपल्याला दिसतात.

अगदी आग्रा भेटीच्या आधीच त्यांनी हेरांना कामाला लावले असणार. कारण महाराज आपल्या पुत्रासह प्रथमच एवढ्या दूर आणि बलाढ्य शत्रुच्या गोटात जाणार होते. जयसिंगाकडून त्यांनी सुरक्षेचे वचन घेतले असले तरी राजकारणात शब्द नेहमीच पाळले जात नाहीत याची महाराजांना जाणीव होती. त्यामुळे त्यांनी आपलीही पर्यायी व्यवस्था ठेवणे स्वाभाविक होते. तेथे जी नजरकैद झाली हा एक प्रकारे मोगलांच्या वचनभंगाचाच प्रकार होता. प्रसंग बाका होता. पण शिवाजी महाराजांचे विश्वासु सेवक जसे सुटकेसाठी कामाला आले तसेच त्यांनी आधीच आग-यात पेरुन ठेवलेले हेरही. खुद्द बहिर्जी नईकही कोनत्या ना कोणत्या वेशात तेथे हजर असणारच. कारण इतिहासात कोडे बनुन राहिलेली आग-यावरुन सुटका तेवढी सोपी नव्हती. बरे नुसती सुटका पुरेशी नव्हती तर शत्रुमुलुखातुन वाट काढत सुरक्षितपणे राजधानीला पोहोचायचे होते. आपण निसटलो हे कळताच बादशहा किती चवताळेल व आपल्या शोधासाठी आकाश पाताळ एक करेल याची त्यांना कल्पना होती. आजही शिवाजी महाराज पेटा-यांत बसुन निसटले की अन्य कोणती कल्पना वापरली याबाबत इतिहासकार वाद घालत असतात. खुद्द औरंगजेबालाही हा प्रकार कसा झाला याची कल्पना आली नाही. फौलादखान तर बादशहाला म्हणाला, जादूटोण्याच्या जोरावर शिवाजी पळून गेला! म्हणजेच ही योजनाच किती गुप्तता पाळत आखली गेली असेल याची आपण कल्पना करु शकतो. महाराजांचे अमर्याद कल्पनाशक्ती, साहस आणि आपल्या हेरखात्यावरील अढळ विश्वास या जोरावर महाराजांनी नुसती सुटका करुन घेतली नाही तर ते सुरक्षितपणे राजगडावर पोहोचले देखील!

सुरतेची लुट हेही महाराजांच्या जीवनातील एक रोमहर्षक पर्व. परमुलखात जावुन नुसती अंदाजाने धाड घातली असती तर महाराजांच्य हाती फारसे द्रव्य लागले नसते तसेच त्या ठिकाणी बंदोबस्त कसा आहे हे माहित नसता गेले असते तर कदाचित स्वपक्षाचेच हानी झाली असती. पण तसे झाले नाही. महाराजांनी हेरांकरवी आधीच सुरतेतील धनाढ्यांची यादी बनवून घेतली होती तसेच तेथील मोगल, इंग्रज आणि पोर्तुगीजांचे नेमके बळ किती याचीही वित्तंबातमी काढलेली होती. त्यामुलेच वेगवान धाड टाकत मोजक्या हवेल्यांना खणत्या लावत सुरत लुटली गेली. औरंगजेबाचे नाक कापले गेले. सुरतची मोहीम महाराजांच्या इतर मोहिमांपेक्षा वेगळी अशासाठी ठरते की महाराजांच्या तोपर्यंतच्या कारकिर्दीतील परमुलखात काढलेली ही पहिलीच मोहीम होती. आधीच्या सर्व प्रसंगात शत्रू स्वराज्यात आला होता. त्यामुळे मोहिमेची व्यवस्थित आखणी होणे आणि राजगडापासून सुमारे १५० कोस दूर असलेल्या सुरतेची संपूर्ण माहिती मिळणे अत्यावश्यक होते. सुरत हे मोगलांचे एक मोठे व्यापारी ठाणे होते त्यामुळे बाहेरून कुमक मिळण्याआधी मोहीम पूर्ण करणे आवश्यक होते. म्हणूनच या लुटीची योजना ३-४ महिने आधीपासून सुरू होती. या योजनेचा एक भाग म्हणून स्वत: बहिर्जी नाईक सुरतेत दाखल झाले असे दिसते. सुरतेची लूट चालू असताना जॉर्ज ओक्झेंडन हा इंग्रज वखारवाला आपली वखार वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांची विनवणी करावयास गेला. तेव्हा महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम आणि आपल्या वखारीसमोरच्या भिकार्‍यात त्याला साम्य आढळले. तो दस्तुरखुद्द बहिर्जी नाईक असावा असा संशय इंग्रजांचा होता. पण एवढेच. एरवी बहिर्जीला कधी शत्रुपक्षाने ओळखल्याचा निर्देश मिळत नाही. शिवाय सर्वत्र स्वत: बहिर्जी नाईक जात नसे तर तो आपल्या हस्तकांकरवी माहिती गोळा करण्यात दंग असे व उपयुक्त माहिती महाराजांपर्यंत पोचवत असे. 

पन्हाळ्यावरुनची सुटका असो की अफजलखानाला आपल्याच मैदानात आणण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी केले ते केवळ त्यांच्याजवळच हेरांकरवी आलेल्या अचुक माहितीमुळे. शत्रुची मर्मस्थाने माहित नाहीत तो राजा म्हणून यशस्वी होत नाही. शिवाजी महाराजांना तर स्वराज्याची निर्मिती करायची होती. आपण त्यांचे मुख्य शत्रु आदिलशहा ते औंरंगजेबाकडे नजर टाकली तर आपल्या लक्षात येते की त्यांचा भर मुख्यत्वे फितुरी करण्यावर होता. चोख हेरव्यवस्था राबवणे त्यांना कधी जमले नाही. अगदी इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीजांचीही हीच अवस्था होती. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या योजना आगावु समजण्याची शक्यता नव्हती. किंबहुना महाराजांना हे यश नेमके कशामुळे मिलते आहे हे त्यांना समजले नाही.

दिलेरखान प्रकरणी तर शिवाजी महाराजांनी मोठा धोका पत्करुन सर्वात मोठी महत्वाकांक्षी योजना आखली होती. दस्तुरखुद्द संभाजी महाराजांना त्यांनीच दिलेरखानाला मिलायला सांगुन बादशाहीत फुट पाडण्याचे व दिल्ली हस्तगत करण्याची ती योजना. संभाजी महाराज दिलेरखानाच्या गोटात असले तरी शिवाजी महाराजांची माणसे त्यांना भेटत असत याचे उल्लेख आपल्याच इतिहासात आहेत. ही माणसे कोण होती? इतिहासाने त्यांची नांवे दिली नसली तरी नेहमीच अनामिक असणारे ते हेरच असनार हे उघड होते. संभाजी महाराजांच्य बेताचा सुगावा लागल्यानंतर संभाजी महाराजांना अटक करुन आग्र्याला पाठवण्याचा त्याने हुकुम देताच संभाजी महाराज निसटले. जवळच मराठ्यांची तुकडी त्यांना सुरक्षित पन्हाळ्यापर्यंत घेऊन जायला हजर होती. बाप-लेकात खराच कलह असता तर असे घडले नसते. हेरखात्याची तत्परता, शिवनिष्ठा आपल्याला इतिहासात कोडे बनून राहिलेल्या या प्रकरणात दिसते. आजही अनेक इतिहासकार संभाजी महाराजांनीच पित्यावर रागावुन शत्रुशी हातमिलवणी केली असे म्हणत असतात. 

खरे तर आपल्या राजाला हव्या त्या वावड्या उठवुन देत कार्यभाग साधणे हेरखात्याचे कामच असते. आजही हेर हेही काम करत असतात. शिवाजी महाराज व शंभुराजांत सोयराबाईंमुळे बेबनाव झाला आहे आणि संभाजी शत्रुपक्षाला जावुन मिळेल अशा वावड्या उठवल्या गेल्या. अगदी त्यांच्या दरबारातील मंत्र्यांचाही या वावड्यांवर विश्वास बसला. शिवाजी महाराज व शंभुराजांना तेच हवे होते. शत्रुच्या डोळ्यात धुळ फेकली गेली. शंभुराजे सहजपणे दिलेरखानाच्या गोटात गेले. शंभुराजांना पातशाहीत "फितवा" माजवायचा आहे हा संशय आला तो दुर बसलेल्या औरंगजेबाला. पण त्याला रहस्य समजलेय ही माहिती मिळताच शंभुराजांना सुरक्षितपणे बाहेरही काढले गेले. राज्यवाटप वगैरे निव्वळ हूल होती. हा सारा घटनाक्रम सरळ दिसत असतांना शंभुराजांची अकारण बदनामी करण्यात इतिहासकारांनी धन्यता मानली. 

पण हे प्रकरण हेरखाते आणि स्वत: शिवाजी महाराज व शंभुराजांच्या एका अत्यंत धाडसी व महत्वाकांक्षी कुटयोजनेचा भाग असु शकेल याची साधी शंकाही आपल्य इतिहासकारांना आली नाही. खरे तर रायगड जागाच होता...नाटककारांनाच झोप आली होती असे या प्रकरणी म्हणावे लागते.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कितीक अंगांनी लिहायचे राहिलेले आहे. उदाहणार्थ त्यांचे अर्थशास्त्र. ते भविष्यात लिहिले जावे अशी अपेक्षा आहे. येथे लक्षात घ्यायची महत्वाची बाब अशी की हेरखात्याचा एवढा कुशलतेने वापर भारतातील कोणत्याही राजाला करुन घेता आला नाही. महाराजांची प्रतिभाशाली बुद्धीमत्ता याला कारण होतीच पण त्याहीपेक्षा महत्वाची होते ती रयतेबद्दलची सहृदय, कनवाळु भावना. त्यामुळे एका विराट कार्यात सर्वांनी जीवाभावाने, स्वार्थ न पाहता त्यांना साथ दिली. आपले प्राणही अर्पण केले.

बहिर्जीसुद्धा त्याला अपवाद राहिला नाही. त्यानेही आपला देह ठेवला तो स्वराज्यासाठी. असे म्हणतात की अत्यंत जखमी अवस्थीत बहिर्जी बाणुरगडावर आला. तेथेच त्यांनी देह ठेवला. त्यांची अखेरची कामगिरी काय होती हे इतिहासाला माहित नाही. पण त्यांची छोटी समाधी तेथे आहे. हेरगिरीच्या आयुष्यात त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी काय काय धोके पत्करले असतील, कशा कल्पकता वापरत माहिती काढली असेल, कशी जीवावरचे धोके पत्करत योग्य ठिकाणापर्यंत पोचवली असेल...कितींचा अमानुष छळही झाला असेल आणि कितीकांनी प्राणार्पण केले असेल याची आज इतिहासाला कसलीही माहिती नाही. पण स्वराज्य उभे राहिले. आणि स्वराज्याची प्रत्येक वीट चढत असतांना मावळ्यांप्रमानेच हेरांच्या अंगावरही मुठ मुठ मांस चढत असेल यात शंका नाही. महाराजांच्या अद्वितीय स्वप्नांना अनेक वीरांप्रमाणेच बहिर्जी नाईकांसारखे महाहेर मिळाले. स्वराज्याचे इंगितच ते आहे.

ते रयतेचे रयतेच्या मदतीने उभारलेले स्वराज्य होते अणि म्हणूनच आजही ते प्रेरणा देते.

-संजय सोनवणी

(Published in Pudhari Dipavali issue)

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...