Saturday, February 16, 2019

पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षच ठार मारला तेंव्हा...!


Inline image 1


मला रहस्य, थरार, गूढ याचे अननुभूत आकर्षण आहे. सभोवतालच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांचे मनात संम्मिश्रण होत कल्पनाशक्तीच्या बळावर त्यांना कथात्मक धुमारे फुटणे माझ्या बाबतीत अनेकदा झाले आहे. थरारकथा हा प्रकार भारतीय साहित्यात मी सर्वप्रथम कसा आणला हे मी  "डेथ ऑफ प्राईममिनिस्टर" या कादंबरीच्या जन्मकथेत सांगितलेच आहे. "शिल्पी" नांवाची एक हेरजीवनावरची थरार कादंबरीही तोवर येवून गेली होती. पण आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारतीय हेरखाते कसे काम करते आणि आपला सारा भुतकाळ आणि मुळचे व्यक्तिमत्व विसरून नवा काल्पनिक पण विश्वासार्ह नव्या भुतकाळात घुसत, नवे व्यक्तिमत्व आत्मसात करत हेरगिरी करत असतांना काय समस्या येत असतील हा प्रश्न मला नेहमी पडे.

पाश्चात्य जगात लेखकांना सुदैवाने भरपूर संदर्भ साधने उपलब्ध असल्याने त्यांच्या थरार कादंब-यात ब-यापैकी वास्तवता असे. पण त्यांचे विश्वच वेगळे. मानसिकता वेगळी. भारतीय मानसिकतेत पाश्चात्य हेरजीवन बसत नव्हते. भारतीय हेर कसा वागेल आणि संकटे आली तर ती कोणत्या प्रकारची असतील आणि त्यातून कसा मार्ग काढला जाईल हे पाहणे व नक्की करणे महत्वाचे होते. त्यात १९८८ साली झिया उल हक या पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षाचा एका विमान अपघातात मृत्यू झाला. या मृत्युने माझ्या कल्पनाशक्तीला उधान आले. "अंतिम युद्ध" या कादंबरीची कल्पना माझ्या मनात रोवली गेली.

सामाजिक कादंबरीपेक्षा थरार कादंब-या रहस्यकथा लिहिणे अत्यंत अवघड असते. कारण त्यात वास्तविकता आणण्यासाठी अनेक बाबींची माहिती असने अत्यंत आवश्यक असते. ज्या राष्ट्रात हेर जातो तेथील समाजजीवनापासून ते मुलकी व लष्करी व्यवस्थेचीही माहिती असणे गरजेचे होते. ते काही इंटरनेटचे जग नव्हते. संदर्भ मिळवणे अत्यंत दुरापास्त बाब होती. तरीही मी नेटाने पाकिस्तानबाबत मिळेल ती माहिती जमा करत राहिलो.

माझा नायक मराठी माणुस असणार हे तर निश्चितच होते. भोसले नायक ठरला. त्याला भारतीय हेरसंस्था रॉ आर्मीतून उचलत कसे टेनिंग देत "दिलावर खान" बनवणार आणि लाहोरला कसे पाठवणार हे निश्चित झाले. एवढेच नव्हे तर तो तेथे जाऊन काय करणार, उच्चपदस्थांशी कसा संबंध बनवत माहिती काढणार...आणि हे सर्व चालू असतांना तो कशा प्रकारे अनपेक्षित संकटात सापडत रॉ करवीच गद्दार ठरवला जाणार हे क्रमाने ठरत गेले. त्यासाठी मिळेल ती वास्तव माहितीही जमा केली.

कादंबरीची सुरुवातच एकीकडे रॉ त्याला ठार मारायला तपलेल्वी आहे, दुसरेकडे पाकी हेर त्याचा माग काढत आहेत आणि आपल्या स्त्री सहका-यांसहित भोसले कसा जीव वाचवायची लढाई लढत आपल्यावरील गद्दारीचा आरोप ध्वून काढायची शिकस्त करत आहे हे नाट्य घडवत असतांनाच अनपेक्षित शेवट केला. पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष लष्करी विमानतळावरून जात असता अक्षरश: आत्मघातकी हल्ला करीत भोसले पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षाचे विमान उडवून देतो असे मी दाखवले. झिया उल हक असा माझ्या कामी आला.

कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशक कोण हे मला आता आठवत नाही. पण नंतर या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या पुष्प प्रकाशनातर्फे आल्या. या कादंबरीवर वाचकांच्या उड्याच पडल्या होत्या. त्या पिढीचे अनेक वाचकांच्या स्मरणात ही कादंबरी आजही आहे. पंण याचे कारण ही कादंबरी पाकिस्तानात घडते आणि पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षाला एक मराठी हेर आत्मघातकी हल्ला करुन ठार करतो हे होते. पाकिस्तान असा नाही तर तसा, अगदी क्रिकेटच्या मैदानावरही हरवला की आम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटतात तर मग ही कादंबरी यशस्वी होणे क्रमप्राप्तच होते. तशी ती झालीही. पण नंतरही आजतागायत पाकिस्तानची पार्श्वभुमी घेत कोणा नव्या दमाच्या लेखकाने कादंबरी लिहिल्याचे मला तरी आढळलेले नाही.

खरे तर अशा हेरकथा राष्ट्रीय मन बनवायला मोठा हातभार लावत असतात. अमेरिका, इंग्लंड इत्यादि पाश्चात्य राष्ट्रवाद खरे तर अशा कादंब-या व चित्रपटांनीच घडवला असे म्हटले तरी वावगे होणार नाही. पण सर्वत्रच मागे पडायची सवय असलेल्या आपल्या नागरिकांडून व लेखकांकडून आपण काय अपेक्षा करू शकतो?

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...