काश्मिरी तरुण गिटार हाती घेतात तेव्हा!
काश्मिर म्हटलं, की दहशतवाद, फुटीरतावाद आणि हिंसाचार एवढंच चित्र उभं राहतं. जणू काही काश्मिरमधला प्रत्येक तरुण हातात दगड किंवा बंदुकी घेऊन उभा आहे, असा विखारी प्रचार केला जातो. यात विद्वेषी संघटनांनी बऱ्यापैकी यश मिळवलंय. पण काश्मिरची ही काही खरी ओळख नाही. त्यासाठीच काश्मिरी तरुणांनी आपली मूळ ओळख भारतभूमिला सांगण्यासाठी हाती गिटार घेतलीय.
काश्मिर प्रश्न हा मुख्यत: सामाजिक आणि राजकीय स्वरुपाचा आहे. पण त्याला धर्माचाच रंग देण्याचा प्रयत्न होतो. अशावेळी आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, ती म्हणजे काश्मिरमधे जसं हिंसा माजवू पाहणारे गट आहेत तसंच त्यांच्याहीपेक्षा शांततामय सृजनात्मक शक्तींवर विश्वास असलेला वर्ग फार मोठा आहे. पहिल्या शक्तींवर विश्वास असणारे लोक बऱ्याचदा सृजनात्मक शक्तींचा प्रभाव आपल्यापासून लपवून ठेवतात.
हे काही फुटीरतावादाचं चिन्ह नाही
किंबहुना मीडियानेही या बाजुकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचं दुर्दैवी चित्र आहे. काश्मिरी माणूस आणि मुख्य भुमीतील नागरिक यांच्यात तुटकपणा आलाय. याचं मुख्य कारण हे दोघांतल्या थांबलेल्या संवादात आहे.
काश्मिरच्या खोऱ्यात सामाजिक उलथापालथ सुरु आहेच. पण तिची खोली आणि व्याप्ती तटस्थ समाजशास्त्रीय दृष्टीने अभ्यासली जात नाही. काश्मिरींची मानसिक कुंठा नेमकी का होते, हे समजावून घेण्याचे प्रयत्न ना राजकीय नेते करत ना मीडिया. किंबहुना काश्मिरच्या नागरिकांना समस्यांमधेच आणि आपापल्या विचारधारांतच अडकावून ठेवत आपली कायमस्वरुपीची तजवीज करुन घेण्यातच बहुतेकांनी धन्यता मानलीय.
काश्मीरमधे कुठला प्रश्न असेल तर तो या अशा स्वार्थी मंडळीचा आहे. एकीकडे हे सुरु असतानाच शाह फैजलसारखे केंद्रीय सनदी सेवेत देशात पहिला आलेले तरुणही सुखासीन अधिकाराच्या नोकरीवर लाथ मारतात आणि नवा काश्मिर घडवण्याची उमेद ठेवून समाजकारणात येतात. काश्मिरींना भारतापासुन फुटूनच निघायचंय, असा प्रचार होत असतानाच पोलिस किंवा सैन्य भरती असते तेव्हा तिथलेच तरुण भरती केंद्रावर मोठ्या संख्येने रांगा लावत असतात. हे काही फुटीरतावादाचं चिन्ह नाही.
काश्मिरबद्दल समजांपेक्षा गैरसमजच जास्त
माझा काश्मिरशी संबंध आला तो १९९६ मधे. सरहदचे संस्थापक माझे मित्र संजय नहार यांच्यामुळे. या संस्थेच्या स्थापनेच्या संकल्पना दिनापासून मी या संस्थेसोबत भावनिकदृष्ट्या जोडला गेलोय. गेल्या २३ वर्षात काश्मिरमधल्या बदलांचा मी एक साक्षीदार आहे. अलीकडेच मी संजय नहारांच्या सहकार्याने काश्मिरला जाऊन आलो आणि तुटलेली नाळ पुन्हा जोडली.
फार काही न लिहिता एवढेच सांगेल की काश्मिरबद्दल समजांपेक्षा गैरसमजच जास्त आहेत. आणि हे गैरसमज दूर व्हावेत, अशी फारशी इच्छा आसपास दिसून येत नाही.
पण या लेखाचं निमित्त अत्यंत वेगळं आहे. आणि ते काश्मिरबाहेर राहणाऱ्या नागरिकांनी समजावून घेणं गरजेचं आहे. तुम्ही आजकाल काश्मिरमधे जाणं टाळता. एका काल्पनिक भयाने तुमच्या मनावर ताबा मिळवलाय, हेही ठीक आहे. आणि तिथे गेलात तरी तुम्ही तिथल्या स्वर्गीय सौंदर्याचा आस्वाद घेत असताना आजुबाजुला वावरणाऱ्या काश्मिरी माणसाकडे उपयुक्ततावादापलीकडे बघूही शकत नाही. समजा हेही ठीक आहे. पण काश्मिरी तरुणांनी आपले हृद्गत तुम्हाला ऐकवायचाच चंग बांधलाय. त्यासाठी तुम्ही काश्मिरला जाण्याचीही गरज नाही. हे तरुण आता आपल्यातच आलेत.
हातात गिटार असलेले माथेफिरू!
आणि विशेष म्हणजे, हे तरुण अवश्य माथेफिरु आहेत. पण बंदुकी हाती घेऊन बाहेर पडलेले माथेफिरु नाहीत. त्यांच्या हातात गिटार आहे. वाद्ये आहेत. काश्मिरच्या नजाकतीने भरलेल्या स्वर्गीय निसर्गासारखाच नितळ, अगदी हृदयातून आलेला स्वर आहे. आणि सोबत काश्मिरचा आत्मा उघड करणारी अजरामर गीतं आहेत!
आणि ऐका. या सर्व तरुणतरुणींच्या घरातल्या कुणाचा ना कुणाचा दहशतवादाने जीव घेतलाय. पण तरीही त्यांच्यात नवसृजनाची अजरामर उमेद आहे. त्यामुळेच असले माथेफिरु जगात वंदनीयच होतात.
काश्मिर हा पर्वतराजीने घेरलेला प्रदेश. तिथल्या माणसात तो पहाडी जोश आणि त्याच वेळीस सर्जनाबद्दलची आर्तता अगदीच नैसर्गिक. पर्वतावरुन नि:शंक वाहणाऱ्या झऱ्यांसारखी. काश्मिर आणि सुफी हे एक अलौकीक ऐतिहासिक नातं. काश्मिरमधे इस्लाम आला तो सुफी संतांकडून. पसरला तो स्वेच्छेने. सुफी संगीताने काश्मिरमधे एक पहाडी वळण घेतलं. अगदी स्वयंभू म्हणावं असं. हा तिथल्या नि:ष्पाप भयभीत करत मोहवणाऱ्या निसर्गाचा प्रताप.
आपला वारसा सांगणारं गाश बँड
तिथलं लोकसंगीतही असंच बहारदार. साधंसरळ थेट भिडनारं. तर तिथल्या तरुणतरुणींनी ठरवलं हे संगीत खोऱ्याबाहेर न्यायचं. पण यासाठी कोण पुढाकार घेणार? काश्मिरशी आत्मिक नाळ जुळवलेले संजय नहार पुढे आले. त्या युवकांना सपोर्ट केला. त्यातून साकारला ‘गाश’ हा संगीत संच. गायक, वादक आणि गीत, संगीतही काश्मिरी. काश्मिरचा आत्माच प्रकाशमान होतो आहे हे संगीतातून सांगणारा बँड!
गांधीजींच्या स्मृतीदिनी, ३० जानेवारीला पुण्यात गणेश कलाक्रीडा मंचावर या संचाने आपला पहिला कार्यक्रम सादर केला. आणि तोही ‘वैष्णव जन तो तेणे कहियो’ हे गांधीजींचं प्रिय भजन अत्यंत उत्कटतेने म्हणून. मला वाटतं, गांधीजींना वाहिली गेलेली ही सर्वश्रेष्ठ श्रद्धांजली होती. या तरुण-तरुणींनी नंतर जो संपूर्ण काश्मिरी संगीतावर कार्यक्रम सादर केला गेला तो अप्रतिमच. साधा, सरळ आणि थेट हृदयाला भिडणारा. आधुनिक काश्मिरी तरुणाईचं हृद्गत संगीतातून सांगणारा.
मनाचा ताबा घेणारं म्युझिक
या कार्यक्रमात चमक-दमक नाही. कुठली उरबडवी भावना नाही. मंचावर अतिरेकी गर्दी नाही. कसलाही ‘शो’ नाही. अनेक प्रोग्रॅममधे हे सारं असतं, पण आत्माच नसतो. या कार्यक्रमात सुफी आणि तिथले गीत, संगीतकार काश्मिरच्या वादींवरून अलगद तरंगत येत तुमच्या मनाचा ताबा घेतात. काश्मिरी संगीताच्या आत्म्याशी हा कार्यक्रम जोडतो हे त्याचं अद्वितीय वैशिष्ट्य. फक्त सहा-सात जणं. तरुणाईचा जोश आणि दाटलेल्या भावना तुमच्या मनाचा ताबा मिळवतात.
या म्युझिक शोचे डायरेक्टर आहेत मझहर सिद्दीकी. शमिमा अख्तर मुख्य गायिका तर सहगायक आहेत मुख्तार अहमद दर आणि बशीर खान. रुकाया मकबूल अँकरिंग तर करतेच गातेही उत्तम. मन्झुर बशीर ड्रमर आहेत. जोगिंदर सिंग, खोजा सय्यद, आणि अकिब आणि जाहिद भट हे या संचातले साथी.
आता जबाबदारी आपली
या शोसाठी सरहदने सरहद म्युझिक ही स्वतंत्र संस्था निर्माण केलीय. शैलेश वाडेकर, गोपाळ कांबळे आणि मनिषा वाडेकर हे संजय नहारांच्या प्रयत्नांना मुर्त रुप देण्यासाठी झटतात.
हजारोंच्या उपस्थितीत या उपक्रमाचं लोकार्पण झालं. आता या कार्यक्रमाला गोव्यातुनही बोलावणं आलंय. लवकरच देशाच्या कानाकोपऱ्यात हे संगीत गुंजतांना आपल्याला दिसेल. अर्थात यासाठी सर्वांचं सहकार्यही लागेलच.
तरुणाईने हातात गिटार घेतलीय. सद्भावना आणि संगीताला मानवतेचा खरा उद्गार समजलाय. हा शो त्या दिशेने टाकलेलं अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. हिंसेने पिडल्या गेलेल्यांच्या मनातली सुडाची भावना मरु शकते, संत्रस्त वातावरणातही मानवतेचे संगीत गात भविष्य उभारायची सर्जनात्मक उमेद असू शकते, हेच तर हे असे असंख्य तरुण सिद्ध करताहेत. आजच्या दिशांध मानवजातीला हे असेच तरुण मार्ग दाखवू शकतात.
आपण सगळ्यांनी त्यांना साथ द्यायला पाहिजे. या मानवतेच्या ‘गाश’मधे चिंब भिजलं पाहिजे. त्यातून थोडं आपल्या माणूस तरी होता येईल!
No comments:
Post a Comment