व्यापारी महामार्गांवर नियंत्रण मिळवण्यासाठी झालेल्या युद्धांचा इतिहास किमान आठव्या शतकापर्यंत मागे जातो. मध्य आशियातून चीनला जाणाऱ्या रेशीम मार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी अरब, भारतीय, तिबेटी आणि खुद्द चिनी सत्ता सतत संघर्षात व्यग्र असत. काश्मीरच्या कर्कोटक घराण्याच्या दुर्लभवर्धन ते ललितादित्याने दीर्घकाळ या मार्गावर नियंत्रण ठेवले होते. अरबांनी जेव्हा बल्ख (उत्तर अफगाणिस्तान आणि रशियाचा काही भाग) काबीज केला तेव्हा ललितादित्याने पश्चिमोत्तर भारतातील अरबांना हुसकावून लावत काबूलमार्गे बल्खवर (तेव्हाचा तोखारीस्तान) स्वारी करून तोखारीस्तानलाही अरबांपासून मुक्त केले होते आणि विस्तारवादी तिबेटलाही गिलगिट, बाल्टिस्तान आणि लडाख भागांतून हटवत सर्व व्यापारी मार्ग मुक्त केले होते. हा इतिहास सांगायचा तो अशासाठी की, तत्कालीन आंतरराष्ट्रीय युद्धे, आक्रमणे झाली ती धर्मप्रचार हा मुख्य उद्देश ठेवून नाही, तर व्यापारी मार्गांवर व बंदरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी. त्या वेळी चीन भारताचा मित्र होता, तर तिबेटी आणि अरब सामायिक शत्रू. तत्कालीन स्थितीत अंतर्गत समस्यांमुळे चीन दुर्बळ झालेला होता.
ललितादित्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अरब आणि तिबेटींना वारंवार पराजित केले व मध्य आशियातून जाणाऱ्या मार्गांवर नियंत्रण मिळवले. आज स्थिती वेगळी आहे. तिबेट चीनचा उपनिवेश बनलेला आहे, तर मध्य आशियातील इस्लामी सत्ता तुलनेने फार दुर्बळ झालेल्या आहेत. चीनने आज त्याच पुरातन रेशीम मार्गाचे पुनरुज्जीवन करण्याचा घाट घातलेला आहे. पाकिस्तानला जोडणारा महामार्ग भारताचा भाग असलेल्या, पण आता पाकिस्तानने बेकायदा ताब्यात घेतलेल्या गिलगिट/बाल्टीस्तानमधून जातो. भारताने आजवर निष्फळ निषेध करण्यापलीकडे फारसे काही केलेले नाही. फार फार तर या महामार्ग निर्मितीच्या कामात सहभागी असलेल्या २८ देशांच्या परिषदेवर बहिष्कार घातला आहे. यंदाही याच बहिष्काराची पुनरावृत्ती झाली आहे. पण यामुळे या मार्गांचे काम थांबणार नाही हे उघड आहे.
व्यापारी मार्गांवर ज्याचे नियंत्रण त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर नियंत्रण' ही पुरातन म्हण आजही सत्यात येताना दिसते आहे. आठव्या शतकात काश्मीरच्या ललित्यादित्यासारखे धोरणी आणि मजबूत शासक भारतात होते. कनौजच्या यशोवर्मनची त्याला साथ होती. त्यांनी तत्कालीन विस्तारवादी सत्तांना रोखण्यात यश मिळवले. आज मात्र दुर्दैवाने तशी स्थिती राहिलेली नाही. चीनचा विस्तारवाद आपण बहिष्कार घालून थांबणार नाही याचेही भान आम्हाला उरलेले नाही. डोकलाममध्ये भारताला कशी नामुष्की स्वीकारावी लागली हे आताचे छप्पन इंची म्हणवणारे सरकार सांगायला तयार नसले तरी वास्तव सर्वांना माहीत आहे. चीन पुरस्कृत व्यापारी महामार्ग भविष्यात भारताची आर्थिक कोंडी करण्यासाठी वापरण्यात येऊ शकतात. आम्हाला पर्यायी आणि सक्षम प्रतियोजनेची आवश्यकता आहे ती यामुळेच!
(Published in Divya Marathi)
No comments:
Post a Comment