Friday, November 29, 2019

शिक्षणाकडे पहायचा दृष्टीकोन



शिक्षण हे प्रगल्भ, विवेकी, कल्पक, उद्यमी आणि भविष्यवेधी नागरिक घडवण्यासाठी असते. मानवाच्या जीवनातील शारिरिक कष्ट कमी करुन त्याचे जीवन अधिकाधिक सुखकर कसे बनेल यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करणारे व त्यातून संपत्तीनिर्मिती व अर्थार्जन करणारे नागरिक निर्माण व्हावेत हा शिक्षणाचा व्यावहारिक उद्देश्य झाला. तो महत्वाचा आहेच. प्रत्येक व्यक्ती ही अंतत: भांडवलदारच असते. श्रम, बौद्धिक क्षमता, कल्पकता, ज्ञाननिर्मितीच्या क्षमता हे त्याचे प्राधान्यक्रमाचे भांडवल असते. या अमूर्त भांडवलाला प्रत्यक्ष म्हणजेच मुर्त भांडवलाची आवश्यकता असते हे काही प्रमाणातच खरे असते. मुर्त भांडवलाच्या अभावात अथवा कमतरतेतही ते निर्माण करता येऊ शकते. पण अमूर्त भांडवलाच्या अभावात मूर्त भांडवल उभे राहत नाही. भांडवल त्यालाच म्हणायचे जे अधिकाधिक संपत्ती निर्माण करण्यासाठी पायाभूत ठरते. हे व्यावहारिक उद्देश्य झाले. पण त्याहीपलीकडॆ ज्यामुळे मानवी ज्ञानाच्या, विचारांच्या आणि जाणीवांच्या कक्षा रुंदावतील अशी निर्मिती करण्याची योग्यता असलेले नागरिकही निर्माण करणे हा शिक्षणाचा मुख्य हेतू झाला.

साधनस्त्रोत वा आर्थिक भांडवल व त्याची निर्मिती हे दुय्यम असते हे प्रथम आपण लक्षात घ्यायला हवे. प्रगल्भ नागरिकांच्या अभावात आर्थिक भांडवल अथवा साधनसंपत्ती कितीही असली तरी संपत्तीची निर्मिती होणार नाही. संपत्ती येथे पुन्हा मूर्त आणि अमूर्त या आधारावर मोजली पाहिजे. ते मोजण्याचे मापदंड अथवा त्याचे (व्यवहारात निरुपयोगी असले तरी) एक चलन असले पाहिजे. त्याखेरीज आपण कोठे आहोत याचे भान येणार नाही हे निश्चयाने समजावून घ्यावे लागणार आहे.

आज जग पुढे आहे अथवा विकसीत आहे असे आपण मानतो ते आपल्या व्यावहारिक ज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे. पण या व्यावहारिक ज्ञानाचा जरी विचार केला तर त्यामागे मुलभूत ज्ञानाने/विज्ञानाने पुरवलेल्या भरभक्कम पायाचा आधार आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. शिवाय त्या मुलभूत ज्ञानाला उपयोजित ज्ञानात बदलवणा-या आणि मानवी जीवन सुखकर करणा-या असंख्य व्यक्तींनी योगदान दिले आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. व्यापारी/उद्यमी/सेवक वर्गाने ते सर्वसामान्यांपर्यंत ते ज्ञान उपयुक्त स्वरुपात पोहोचवले त्याचेही योगदान विसरता येणार नाही.

या सर्वांनी मिळून आजची व्यवस्था बनवली आहे. राज्यव्यवस्था त्यात कधी प्रोत्साहनात्मक तर कधी अवरोधात्मक भूमिका बजावते. किंबहुना भांडवल निर्मिती होणार की नाही हे शासकीय धोरण ठरवते. शासन कोणती विचारधारा पाळते यावर ते अवलंबून असते. म्हणजे शासनही कधी भांडवलदार बनून जाते तर कधी भांडवल निर्मितीला खिळ घालते.

पण प्रत्येक व्यक्ती भांडवलदार आहे आणि त्याची निर्मिती हे त्याच्या भांडवलाची उपज आहे हा विचार आम्हाला सुचलेला नाही. शिक्षण हे व्यक्तीच्या भांडवलात भर घालणारे असले पाहिजे हे आम्ही समजावून घेतलेले नाही. मूर्त भांडवल हेच श्रेष्ठ भांडवल आहे हे आम्ही ओळखलेले नाही. भांडवलाची अधिकाधिक निर्मिती प्रत्येक भांडवलदार म्हणजे प्रत्येक व्यक्ती करू शकते याची जाणीव नसल्याने आमची शिक्षणाची रचना फसलेली आहे.

मानवाच्या मनाच्या जाणीवा, विचार, ज्ञानाच्या कक्षा आणि दिशा रुंदावणारे नवे ज्ञान निर्माण करणारे, मूळ भांडवलाचे श्रोत निर्माण करणारे, व्यवहारात त्यांच्या निर्मितीला तसे दुय्यम स्थान असणारे दिशादर्ही, नवदिशानिर्माते समाजाला आवश्यक असतात. आज आम्ही ही निर्मिती समाजावरच ऐच्छिकपणे सोडून दिली आहे. भारतात तत्वज्ञान हा विषय सर्व महाविद्यालयांत शिकवला जातो. पण आम्ही किती नवतत्वज्ञान सांगणारे अथवा जुन्याच तत्वज्ञानाचा नवीन दिशादर्शी विकास करणारे तत्वज्ञ निर्माण केले हे पाहिले तर निराशाच पदरी येईल. तीच बाब शास्त्राची. तीच साहित्याची आणि कलांची. उलट अनेक जुन्या कला मरत चालल्या आहेत. नवीन निर्माण करने दुरच!

मानवी मन सृजनात्मक होण्याची प्रक्रिया जेथे अडखळू लागते, थांबते तेथे समाजाचा मृत्यू जवळ आलेला असतो. समाज झोंबीप्रमाणे उथळ भावनोद्रेकांत व्यस्त होऊ लागतो. येथेच मुर्त - अमूर्त भांडवलाची निर्मिती खुंटते आणि तो समाज वेगाने दिवाळखोरीकडॆ वाटचाल करू लागतो.

प्रत्येक व्यक्तीत एक विशिष्ट भांडवल दडलेले असते. ते बाहेर काढणे व त्यालाच विकसनशील बनवत त्यातील उच्च दशा गाठायला सहाय्य करणे हा शिक्षणचा मुलभूत उद्देश हवा. ज्या देशात अशा भांडवलदारांची अधिकाधिक निर्मिती होते तोच देश अथवा समाज ऐहिक आणि मानसिक भांडवलाने ख-या अर्थाने समृद्ध आणि प्रगत होऊ शकतो. आज जगात असा एकही देश नाही. काही बरे तर काही वाईट म्हणता येईल. पण आपण बौद्धिक भांडवलाचे चलनच बनवले नसल्याने ही भावनाही केवळ भावनात्म आहे असे म्हणता येईल. याची अनेक उदाहरणे देता येतील.

श्रम हे भांडवल आहेच पण त्या भांडवलाचीही बौद्धिक भांडवलासारखीच दशा आहे. त्याचे मूल्य काय आणि ते कसे ठरवायचे याचे उत्तर उपयोगितेनुसार दिले जाते. किंबहुना उपयोगितेचा सिद्धांत पुन्हा एकदा तपासून पाहिला पाहिजे. त्याच वेळीस श्रमिकाला त्याच्या भांडवलाचे उन्नयन करण्यात कोणत्या सामाजिक/राजकीय/शैक्षणिक अडचणी आहेत यावर विचार झाला पाहिजे. उदाहणार्थ शेती-कामगारही श्रम-ज्ञान भांडवल वृद्धींगत करू शकतो. त्याला शाळेतच जायला पाहिजे याची आवश्यकता नाही. पण तशीही व्यवस्था आमच्या शिक्षणपद्धतीत आहे काय हा एक प्रश्नच आहे. शिक्षणाच्या आणि दृष्टीकोनाच्या अभावात कोणतेही कौशल्य आणि व्यक्तीच्या भांडवलात भर पडणार नाही, याची उत्पाकता आणि उत्पन्न वाढणार नाही. त्याचे उपजत भांडवल, कोणत्याही क्षेत्रातील असले तरी ते अनुत्पादक किंवा तोट्याचे ठरणार हे उघड आहे. म्हणजेच व्यक्तीचे उपजत भांडवल वाढवत नाही, किंबहुना त्याचा संकोच करत शेवटी मारून टाकते ती शिक्षणव्यवस्था कुचकामी आहे हे उघड आहे.

यावर आपण विविधांगांनी चर्चा करणार आहोत. आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.

No comments:

Post a Comment

ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...