Tuesday, December 3, 2019

सामाजिक न्यूनगंड आणि शिक्षण


मनोवैज्ञानिक कारणांमुळे काही मुलांमध्ये जे अनेक मानसिक आजार उद्भवू शकतात त्यात न्य़ुनगंडही असतो. मानसोपचारांनी त्यावर मातही करता येऊ शकते. पण सामाजिक न्य़ुनगंडावर आपल्याला अद्याप प्रभावी उपाययोजना सापडलेली नाही. हा न्य़ुनगंड सार्वत्रिक रोगासारखा पसरलेला असून भारतातील जवळपास ८०% समाज या रोगाने ग्रस्त आहेत. शाळेत येणारे विद्यार्थीही साहजिकपणेच या रोगाचे शिकार होतात. आत्मविश्वासाचा अभाव, आकलनातील गोंधळ, कमजोर अभिव्यक्ती, दबलेपणाची-दुर्लक्षितपणाची भावना इत्यादी त्याचे दृष्य़ परिणाम असतात. यातून जेही काही शिक्षण घेतले जाते अथवा असेच विद्यार्थी जेंव्हा स्वत:च शिक्षक-प्राध्यापकाच्या वा अन्य राजकीय वा प्रशासनीय भूमिकेत जातात तेंव्हा हीच न्युनगंडात्मक भावना त्यांचा पाठलाग करत राहते. त्यात सर्जनात्मकता, विकासात्मकता व परिपूर्ण अभिव्यक्ती राहत नाही. यातुनच संपुर्ण समाजाची म्हणून एकुणातल्या अभिव्यक्तीचा दर्जा कोसळलेला असतो. पण आपण आपल्या शिक्षणव्यवस्थेच्या तत्वज्ञानात हा विचार केल्याचेही दिसून येणार नाही, तेंव्हा उपाययोजना करणे तर दूरच!

हा सामाजिक न्यूनगंड निर्माण करणारी आपल्याकडे अनेक साधने आहेत. ही साधने कधी नकळत तर कधी अत्यंत पद्धतशीरपणे वापरली जात असतात. भाषा, जात, धर्म आणि वर्चस्वतावादी प्रवृत्ती यामागील काही कारणे झाली. भाषेने निर्माण केलेला न्युनगंड आपण आधी चर्चेला घेऊ. खेड्यातील किंवा खालच्या जातीतील मानल्या गेलेल्या बव्हंशी वर्गावर हा न्युनगंड बव्हंशी प्रभाव टाकतांना आपल्याला दिसते. "ण ला ण म्हणणारा मुख्यमंत्री मिळाला..." अशा उपहासात्मक वर्चस्वतावादी विधानांमुळे नकळत या न्युनगंडाच्या संवर्धनात कशी भर टाकली जाते हे आपण अगदी वर्तमानातही पाहू शकतो. बोलीभाषा विरुद्ध प्रमाणभाषा या कृत्रीम संघर्षात बालवयापासून मुलांना गोवले जाते व भाषिक न्युनगंड निर्माण व्हायला सुरुवात होते. पण शिक्षणशआस्त्रानुसार विद्यार्थ्याचे आकलन आणि त्याची नैसर्गिक अभिव्यक्ती प्रमाण मानायला हवी असता तसे होत नाही.

उदा. खानदेशातील एका शाळेत नवशिक्षक पाठ घेत असतांना पृथ्वी स्वत:भोवती फिरते हा सिद्धांत समजावून सांगतांना "पिरथी ठायके न ठायके फिरस" असे त्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेत म्हणाला. पर्यवेक्षकाने त्याला झाड झाड झाडले. खरे तर तो जे म्हणाला ते विद्यार्थ्यांना अधिक सहजतेने समजलेले होते. ती त्यांची भाषा होती. पण प्रमाणभाषेच्या न्युनगंडात्मक अभिनिवेशात गेलेल्या पर्यवेक्षकाला ते समजणे शक्य नव्हते कारण शिक्षणशास्त्राने त्याला हे शिकवलेले नव्हते. यामुळेच ग्रामीण विद्यार्थी शिकतात व अधिक शिकायला महानगरांत येतात तेंव्हाच त्यांच्यावर आपली भाषा अशी, कोण काय म्हणेल, त्यांच्याशी कसे बोलायचे अशा निरुपयोगी विवंचनांत गढलेला असतो. क्लासरुममध्ये प्रश्न विचारायला अथव उत्तरे द्यायलाही संकोच केला जातो. नवी कल्पना सुचली तरी ती व्यक्त करायची भिती वाटू लागते. सर्जकता बळी जायला अशी सुरुवात होते. त्यांचा भाषिक आत्मविश्वासच गमावला जातो...मग अभिव्यक्तीचाही बळी जाणार हे ओघाने आले.

जात, आर्थिक स्थिती हे न्युनगंडौत्पत्तीचे अवाढव्य कारखाने आहेत. "आपण हलके आहोत, आपल्याला काय कळते" आणि आपली आर्थिक स्थिती अशी, आपण कशी काय स्पर्धा करणार?" या न्युनगंडात्मक भावना जाती आणि आर्थिक स्थिती उत्पन्न करतात. आर्थिक स्थिती ही आपल्याकडे बव्हंशी जातीसंस्थेशी निगडित असल्याने दोहो बाबींचा एकत्रित परिपाक म्हणजे व्यवस्था तर अधिकच कठोर बनत जाते आणि न्युनगंडातून सुटका होत नाही हे वेगळेच. म्हणजे, विद्यार्थी आपल्या गाववाल्यांचे, जातीचे आणि आर्थिक स्थितीचे गट बनवू लागतात. ही गटबाजी प्रचलित व्यवस्थेवर मात करण्यास सर्वस्वी असमर्थ असते. ते केवळ भावनीक संरक्षणात्मक कवच असते. मानसिक, बौद्धिक प्रगतीत ते सहाय्यभूत ठरत नाही. ही या वयात लागलेली सवय पुढेही सुरु राहते. आपण प्रशासकीय कर्मचारी ते अधिकारी यांचा विचार केला तरी आपापली स्वजातीय टोळी व दबावात्मक फळी निर्माण केल्या जात असल्याचे आपल्याला दुसीन येईल. अगदी विद्यापीठीय पातळीवर या जातीय फळ्या कशा बनतात हे त्या क्षेत्रातील लोकच सांगू शकतील. पण अशा फळ्या बनतात त्यांच्याच जे लोक त्या स्तरापर्यंत बहुसंख्येने पोहोचलेले असतात. अत्यल्प किंवा शून्य स्थान असलेले आपल्याच न्युनगंडाच्या कोशात अडकून राहतात. झुंड ज्यांची बनते ते न्युनगंडातील वर्चस्वतावाद या तत्वावर काम करत राहतात. पण यातून ज्ञान किंवा उत्कृष्ठ प्रशासकीय/औद्योगिक/व्यावसायिक कामगि-या पुढे येण्याऐवजी पुन्हा नवे जातीय संघ निर्माण होत एकमेकांवर कुरघोडी करण्यातच मग्न राहतात. आपल्या व्यवस्थेचे अपयश यातच आहे.

आणि ही सुरुवात आपल्या शिक्षणव्यवस्थेपासून बळावायला लागते. आधीच समाजव्यवस्थेतील मान्य-राबवल्या जाणा-या, प्रचारित केल्या जाणा-या सामाजिक तत्वज्ञान, विधी-निषेध, पायरीची जाणीव याची सुरुवात मुलाला कळायला लागते तेंव्हापासुनच सुरु झालेली असते. शिक्षण हे या जाणीवांवरील उतारा असायला हवा. पण प्रत्यक्षात तसे चित्र नाही. बौद्धिक व आर्थिक बरोबरी करायला जेही तरुण सज्ज होतात त्यांना तुमचे हे काम नाही हे बजावणारे घटक आयतेच तयार असतात. उदा. जेंव्हा माझी शून्य महाभारत ही तत्वज्ञानात्मक कादंबरी प्रकाशित झाली होती तेंव्हा एक ज्ञान-साहित्याचा ठेका आपल्याकडे आहे असे समजणा-या वर्गातील एक व्यक्ती मला भेटायला आली होती. "...आता तुमच्यातही असे लेखन करणारे येऊ लागलेत..." असे ती व्यक्ती मला म्हणाली. म्हणजेच आमच्यात (श्रेष्ठांत) आणि तुमच्यांत (म्हणजे कनिष्ठांत) फरक आहे आणि बरोबरी केली जात आहे याची ही केवळ खंत नव्हती तर काहीही झाले तरी तुम्ही न्य़ुनच आहात हे नकळतपणे का होईना बजावणे त्या व्यक्तीला महत्वाचे वाटले. मला खात्री आहे की असा असंख्यांचा अनुभव असेल. या अशा सवयीमुळे अनेक विषय, वैज्ञानिक, व्यावसायिक कल्पना जरी एखाद्याला सुचल्या तरी त्या प्रसवल्याच जात नाहीत. गर्भातच हत्या होते.

अभिजन-बहुजन ही मांडणीच मुळात मोठ्या वर्गात न्य़ुनगंड निर्माण करणारी आहे हे दुर्दैवाने आपल्या विचारवंतांच्या लक्षात आलेले नाही. कारण त्यांचे शिक्षणच झालेले नाही. शिक्षणाने हीच मांडणी शास्त्रशुद्ध करायला हवी होती पण तसेही झालेले नाही. राज्यघटना जर समतेच्या मूल्याचा उद्घोष करते तर मुळात ही विषमतामुलक सामाजिक मांडणी करणे घटनेशी द्रोह आहे हे घटनेचा रोज उद्घोष करत असलेल्यांनाही समजत नाही कारण ज्या शिक्षणव्यवस्थेतून ते आलेत ती व्यवस्थाच अवैज्ञानिक आणि असामाजिक आहे. अशा व्यवस्थेतून न्युनगंडाने ओथंबलेले भविष्यातील नागरिक-नेते पैदा होणार हे उघड आहे.

कोणत्त्याही समाजाच्या प्रगतीतील मुख्य अडसर असतो तो म्हणजे कोणताही गंड. जो समाज वर्चस्वतावाद आणि न्युनगंड या दोहो गंडांपासून मूक्त असतो तोच समाज प्रागतिक होऊ शकतो. कला-कौशल्य, विज्ञान ते सर्व क्षेत्रांत पुढे सरसावू शकतो. पण हे गंड काढण्याचे काम प्राथमिक शालेय काळापासून निरंतरपणे झाले पाहिजे. खरे तर यावर धडे असले पाहिजेत. प्रतेक जातीच्या संतांचे अथवा महापुरुषांचे धडे अभ्यासक्रमात टाकल्यामुळे जातीय गंड दूर होणार नाहीत याचे भान आमच्या शिक्षणव्यवस्थेला यायला पाहिजे.



No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...