Tuesday, April 14, 2020

कोरोनोत्तर जगासाठी बुद्ध-महावीर-गांधी तत्वनीति



 सारे जग याक्षणी कोरोना विषाणूच्या महामारीच्या संकटात सापडलेले असतांना, माणसा-माणसांत व राष्ट्रा-राष्ट्रांत एकीकडे संशयाचे वातावरण वाढत असतांना दुसरीकडे प्राणभयाने जागतीक समाज-मानसिकता विस्कळीत होऊ लागली आहे. भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचा थांग कोणाला लागेनासा झालेला आहे. काही राष्ट्रीय नेतृत्वेही संभ्रमित झालेली आहेत, परिस्थितीसमोर हार मानु लागली आहेत. सा-या जगाचे चक्र ठप्प झाल्यासारखे झाले आहे. जवळपास सारे जग आपापल्या घरात बंदिस्त झाले आहे. मानसिक समस्यांची शिकार होऊ लागले आहे. कोरोनाचे संकट लवकरच हटावे यासाठी जगभरचे शास्त्रज्ञ आपली प्रतिभा पणाला लावत आहे. हे संकट पुर्णपणे दूर व्हायला नेमका किती काळ लागनार आहे आणि त्याच वेळेस कोरोनानंतरचे जग कसे असेल या प्रश्नानेही जगभरच्या विचारवंतांना भेडसावले आहे.

कोणत्याही वैश्विक संकटाचा अटळ परिणाम म्हणजे आहे त्या व्यवस्थेची तोडमोड होणे. नवीन प्रमेये पुढे येणे व नवी संस्कृती जन्माला येणे. विनाशक अशा द्वितीय महायुद्धानंतर जगाची भुराजकीय संरचना तर बदललीच पण मुल्यव्यवस्थेचीही फेररचना झाली. अस्तित्ववादासारखी नवी तत्वज्ञाने जशी पुढे  आली तशीच अतिरेकी भांडवलशाहीचा किंवा स्वतंत्रतावादाचा पुरस्कार करणारी तत्वज्ञानेही पुढे आली. विनाशातुही मानवाने नवी संस्कृती उभारली. आताही करोनाचे संकट हटेल तेंव्हा जागतीक भुराजकीय, अर्थव्यवस्था आणि मुल्यव्यवस्थांत काही फेरबदल होती. प्रश्न एवढाच आहे की कोरोनोत्तर फेरबदल कोणती दिशा घेतील? केवळ भौतीक पगतीकडेच मानव जाईल की शाश्वत अर्थव्यवस्था आणि मानवतावादी मुल्यव्यवस्थेला प्राधान्य देईल? प्रश्न गंभीर आहेत व आम्हाला त्यावर आत्ताच विचार करण्याची गरज आहे.

खरे तर भारतात इसपू सहाव्या शतकात होऊन गेलेल्या वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध या महान तत्ववेत्ते व धर्मसंस्थापकांनी एक मार्ग देऊन ठेवला आहे. गेल्यच शतकात त्यांच्याच तत्वज्ञानाला आधुनिक परिप्रेक्ष देत महात्मा गांधींनी भारतच नव्हे तर जगाला दीपस्तंभ व्हावे असे कार्य केले आहे. जगाने येथून पुढे त्यांचा आदर्श ठेवत त्यांनी दिलेल्या तत्वज्ञानाला आजच्या परिप्रेक्षात पुनर्मांडणी करत जगाची संरचना अधिकाधिक मानवधिष्ठित करण्याचा आटोकाट रयत्न करण्याची गरज आहे.

बुद्ध महावीरांनी सांगितलेली सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य., सम्यक मार्ग, पंचशीलादि हे सिद्धांत सर्वपरिचित आहेतच. पण संयम हा त्यांनी सांगितलेला सर्वात महत्वाचा सद्गुण होय. कोणत्याही बिकट स्थितीवर मात करायची असेल तर संयम गुण हा अंगी बाणवावा लागतो असे महावीर सांगत असत. संयम प्रत्येक व्यक्तीला आहे त्या स्थितीकडे पहायची व्यापक दृष्टी देतो. सहनशक्ती हे संयमाचेच उपफल आहे. या संकटातुन मानवजात तरेल ती केवळ संयमानेच. महावीरांच्या अपरिग्रहाच्या तत्वाने आपल्याक्डे जे अतिरिक्त आहे ते समाजाला दिले तर आज आपल्या देशातील किमान चाळीस टक्के जनता जी भुकेचा सामना करत आहे तिला जगवु शकेल. कोरोनामुळे सारे एकजुटीने या संकटाचा सामना करतील अशी आशा होती पण दुर्दैवाने धार्मिक तेढ माजवण्याचे व भविष्यातील हिंसाचाराची पायाभरणी करण्याचे काम झाले आहे. मानवी भविष्य हे हिंसाचाराच्या स्तरावर जाता कामा नये. आणि ही भिती जागतीक आहे. राष्ट्रा-राष्ट्रातील मतभेद नंतर उग्र स्वरुपात वर डोके काढण्याची भिती आंतरराष्ट्रीय विचारवंत आताच व्यक्त करु लागले आहेत. अहिंसेचे तत्व जर जगाने अंगीकारले नाही तर आपण या संकटातून काहीच शिकलो नाही असे म्हणावे लागेल. जग पुन्हा रक्तपाताचा छायेत येण्याचा धोका आपल्याला टाळायचा असेल तर आताच आपली तत्वनीती बुद्ध-महावीर केंद्रित करावी लागेल.

यात अधिक उपयोगाला येऊ शकतो तो जैनांचा अनेकांतवाद. हा वाद प्रत्येक प्रश्नाकडे अनेक दृष्टीने खुल्या मनाने पाहतो व उत्तमात उत्तम समाधान शोधतो. कोणत्याही जागतीक प्रश्नाचे उत्तर एक-दोन पर्यायांत असू शकत नाही. अनेक पर्याय धुंडाळले पाहिजेत. परंपरागत पर्याय आजतागायत तात्पुरते यशस्वी ठरले असले तरी ते अंतता: मानवजातीला विनाशकच ठरलेले आहेत हे आपण विसरता कामा नये. जगाला अहिंसेची जशी गरज आहे तशीच संयमाचीही आहे. सयमानेच आपण कोरोनाशी लढू शकतो आणि संयमानेच कोरोनोत्तर जगाची मानवताचादी मुल्याधारित रचनाही करु शकतो. अस्तेय, अपर्ग्रहाच्या महावीरांच्या तत्वांवर आपण शाश्वत अर्थव्यवस्थाही उभारु शकतो जी निसर्गाजवळ जानारी असेल. आज कोरोना किंवा आधी ज्याही विषाणुंच उदय झाला आहे व लोकांचेच प्राण गेलेले आहेत ते मानवाने पर्यावरणाचा समतोल समूळ घालवल्यामुळे निसर्गात होत असलेल्या विषाणु-उत्क्रांतीमुळे. "खेडयाकडे चला" ही गांधीजींची हाक वृथा नव्हती. तिचा अर्थ नीट समजाऊन घेत आम्ही शहरांचे व प्रगतीचेही विकेंद्रीकरण करायला हवे हा धडा आम्हाला मिळाला आहे. आम्ही त्यातून काही शिकणार आहोत काय हा खरा प्रश्न आहे.

भारताला विश्वगुरु व्हायचे आहे. स्वप्न अगदी आदर्श आहे पण त्यासाठी वैश्विक मानवतावादी तत्वज्ञानाचा विकास केला जायला हवा अन्यथा ते एक पोकळ स्वप्न होऊन आईल. बुद्ध-महावीर आणि गांधीजींनी अखिल मानवजातीसाठी त्या तत्वज्ञानाची पायाभरनी केली आहे. त्यात भर घालत आम्ही त्या आदर्शांच्या दिशेने मानवजातीला जायला प्रेरित करु शकलो तर कोरोनोत्तर जग हे नवसंस्कृतीने झळाळनारे, अधिक विचारी, प्रगल्भ व निसर्गाच्या कुशीत जगणारे आनंदमयी जग बनेल अशी आशा करायला वाव आहे.

-संजय सोनवणी



No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...