Monday, April 13, 2020

करोनाने भारताला दिलेली संधी

करोनाच्या याच काळात पुरेपुर सावधानी बाळगत भारताने उत्पादन आणि सेवा क्षेत्र सुरु केले तर भारत जागतीक मरगळलेल्या आणि हताश जगात आपले आर्थिक नेतृत्व सक्षमतेने पुढे आणु शकतो. लवकरच जगभरात असंख्य उत्पादनांचा तुटवडा होणार आहे आणि पुरवठ्याच्या काही बाजू याच काळात सांभाळण्याची व जागतीक बाजारपेठेत आघाडी घेण्याची एक संधी भारताकडे चालून आली आहे. करोनोत्तर जगात या आघाडीचा फायदा तर मिळेलच पण जागतीक गुंतवणुकदार चीनऐवजी भारत हेच आपले उत्पादन केंद्र असावे यासाठी पुढे येतील.
पण त्यासाठी काही तातडीचे प्रलंबित धोरणात्मक बदलही करावे लागतील. अजुनही भारत गुंतवणूकसुलभता असलेला देश नाही. कालबाह्य समाजवादी कायदे, बाबुशाही आणि लालफीत, विविध परवाने देतांना होणारे भ्रष्टाचार यामुळे गुंतवणुकदार भारत हे लक्ष्य ठेवण्यात काचकुच करत होते. हे चित्र बदलायचे असेल, देशांतर्गत उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर उभारी द्यायची असेल तर उदारीकरणाच्या कक्षा वाढवाव्या लागतील. यामुळे अर्थव्यवस्था लवकरच उभारी घेऊन झपाट्याने वाटचाल तर करेलच पण बेरोजगारीच्या गेली सहा वर्ष भेडसावणा-या समस्येलाही दूर करता येईल.
शेती, पशुपालन या उद्योगांना उदारीकरनापासून वंचित ठेवण्यात आले आहे ते आता थांबवावे लागेल. शेतमालाच्या बाजारपेठा खुल्या कराव्या लागतील. या क्षेत्रातील कालबाह्य कायदेही रद्दबातल करावे लागतील. शेती आणि पशुपालन उद्योगात मोठी झेप घेण्याची क्षमता आहे. ती एक्स्प्लोइट करावी लागेल. त्यासाठी सर्वस्वी नवे धोरण याच काळात आखावे लागेल.
करोना हे संकट आहे हे खरे आहे पण उद्यमी, साहसी, कल्पक लोकांसाठी आणि देशांसाठी करोना ही एक प्रचंड मोठी संधीसुद्धा आहे. आपण भारतीय या संधीचा लाभ घेतो की तिची माती करतो हे या नेतूत्वाने तर ठरवायचे आहेच पण आम्हा सामान्य नागरिकांनीही ठरवायचे आहे. चिंता करत बसल्याने संकट हटत नाही. पुरेपुर काळजी घेऊन आमच्या उत्पादन क्षमता आम्ही कशा पणाला लावतो यावर आमचे राष्ट्रीय चारित्र्य ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...