Thursday, July 2, 2020

हरी नरकेंना नृशंस पद्धतीने ट्रोल!

चुका होऊ शकतात. अनेकदा व्यक्तीला तत्कालीन भावनात्मक प्रभावात जे कृत्य योग्य वाटते ते कृत्य अन्य दृष्टीकोणानुसार अयोग्यही असु शकते. नैतिक समस्या त्यातुनच निर्माण होतात आणि त्याचा निर्वाह कसा लावायचा याबद्दल अगदी नीतीविदही गहन चर्चा करत आले आहेत. अगदी राम-कृष्ण, पांडवांची अनेक कृत्येही नैतीक चर्चेच्या परिप्रेक्षात आलेली आहेत तशीच चार्वाक-बुद्धाचीही. कारण पुन्हा नैतीकता आणि सत्य म्हणजे नेमके काय याची व्याख्या जशी नाही तशीच "योग्य-अयोग्य" म्हणजे काय आणि योग्यायोग्यतेचा परिप्रेक्ष म्हणजे काय याचीही व्याख्या नाही.
उदा. मी आज प्रा. हरी नरके यांच्यावर लिहिलेल्या लेखातील अंशावर माझे मित्र घनश्याम पाटील यांची प्रतिक्रिया मला त्याक्षणीच्या आणि लेख उद्घृत करण्याच्या परिप्रेक्षात अयोग्य वाटल्याने मी सहसा न करणारे कृत्य केले व ती प्रतिक्रिया डिलिट केली. मी एका अर्थाने श्री. पाटील यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे अयोग्य कृत्य केले. म्हणजे मर्यादित परिप्रेक्षात मला योग्य वाटलेले कृत्य मी केले पण त्या योग्यतेतच अयोग्यताही होती. त्या अर्थाने मी अनैतीक कृत्य केले असे सहज म्हणता येईल.
तसेच प्रा. नरकेंनी शाहु महाराजांवरेल लेखात दारुबाबत विधाने केली. त्यांचा बौद्धांनी (आणि जमले तर सर्वांनीच. पण दारुबाबतचे आंबेडकरंनी दिलेली विशेष शप्पथ त्यांनी घेतलेली असल्याने) दारुपासून दूर रहावे हा शुद्ध हेतु होता हे उघड आहे. आक्षेप कशाला तर "घरकाम करुन घर चालवणा-याया बौद्ध महिलांचे पती दारु पितात व महिलांना मारहाण करतात. हे थांबले पाहिजे." अशा आशयाच्या विधानाला. ९९% बौद्ध दारु पितात असे त्यांनी म्हटलेले नाही. देशात किती बौद्ध स्त्रीया इतरांचे घरकाम करुन चरितार्थ चालवतात याची आकडेवारी कोणकडेही असेल असे मला वाटत नाही. पण समजा १% (आता या १%वरही वाद घालायचा असेल तर सहज घालता येईल) जरी बौद्ध झोपडपट्टीत राहत असतील आणि बहुतेकांच्या स्त्रीयांना घरकाम करुन चरितार्थ चालवावा लागत असेल आणि बव्हंशी महिलांचे पतीराज त्यांच्या जीवावर दारुमग्न असतील तर मुळात कोणत्याही बौद्धावर झोपडपट्टीत राहण्याचे गरज पडणार नाही व महिलांना दुस-यांची धुनी-भांडी करावी लागणार नाहीत अशी स्थिती आणता येत नसेल तर या सामाजिक अपयशाला जबाबदार कोण? सुस्थितीतील बौद्धांची काही जबाबदारी आहे की नाही? नसेल तर ठीक आहे.
पण केवळ टक्क्यांचा घोळ घालून हरी नरकेंना नृशंस पद्धतीने ट्रोल करायचा अधिकार या महानुभावांना कोणी दिला? ९९% नसतील तर ९०, ८०, ७५, किंवा अगदी फक्त १ टक्काच दारुबाज संसाराची धुळधान करत असतील तरी हरी नरकेंचे म्हणणे विचार करण्याच्या लायकीचे नाही की काय? त्यावर विचार करण्याऐवजी नरकेंवरच हल्ला चढवला की अपली बाजु सुरक्श्ढित होते असे यांना वाटतेच कसे?
अलीकडेच एका विचारवंताने (मी त्याला बौद्ध हा शब्द अशासाठी वापरत नाही कारण खरा बौद्ध असा असुच शकत नाही.) आंबेडकर सांगायला आम्हाला इतर कोणाची गरजच काय? अशा स्वरुपाची पोस्ट लिहिली. गंमत म्हणजे हेच विचारवंत माझ्यासोबर बियर पिऊन नाचलेले आहेत. असे अनेक आहेत. दारु पिणे आणि दारुडा असणे या फरक असतोच. मी पितो. पितो म्हणून मलाही दारुडा ठरवता येईल. पण दारुच्या आहारी जाऊन संसाराची धुळधान करणा-यांबाबत (बौद्धांबाबत बौद्धांना) काही वाटत नसून फ्क्त हरी नरके बौद्ध नाहीत, मग त्यांना बौद्धांबाबत सांगायचा अधिकार काय या गुर्मीतून ही सारी ट्रोलबाजी झालेली आहे. या चुका नैतीक अध:पतनातून झाल्या आहेत आणि त्यांचा निर्वाह लावला गेला पाहिजे. बाबासाहेब सांगायला केवळ आंबेडकरी समाजच समर्थ असेल आणि इतर स्वार्थप्रेरीत आहेत, आम्हीच कोणाला मोठे केले वगैरे कोणाचा समज असेल तर हे असले समज समाजविघातक तर आहेतच पण बुद्ध आणि बाबासाहेब विघातकही आहेत.
प्रा. नरकेंनी दिलगिरी व्यक्त करायला नको पहिजे होती या माझ्या काही विचारी मित्रांच्या मताशी मी सहमत आहे. पण त्याच वेळीस क्रुर लांडग्यांप्रमाणे ट्रोल तुमच्व्ही मानसिकता उध्वस्त करण्याचा चंग बांधत असतील तर भविष्यात हरी नरकेच काय पण कोणीही अन्य विचारवंत गौतम बुद्ध, बाबासाहेब किंवा बुद्धिस्ट समाजावर काहीही लिहायला धजावनार नाहीत. आणि असे वैचारिज्क मंथन थांबवण्याचा मार्ग बुद्धाचाच नसल्याने या ट्रोलबाज काही बुद्धीस्टांना बौद्ध कसे म्हणायचे हाही प्रश्न निर्माण होईल. प्रा. नरकेंची हतबलतेतून आलेली दिलगिरी हा महाराष्ट्रातील जाणतेपणाचा पराभव आहे. बुद्धाचाही पराभव आहे.

आता शेवटचे. प्रा, हरी नरकेंचे विरोधक आता म्हणत आहेत की खरा मुद्दा हा डा. आंबेडकर साम्यवादाचे, विरोधक होते आणि त्यांनी चीनचा धोका सांगीतला होता हा होता. डा. आंबेडकर साम्यवादाचे विरोधक होते हे नरकेंचे म्हणणे खोटे आहे.
बाबासाहेबांना साम्यवादी त्यांच्या काही निवडक विधानांच्या आधारे साम्यवादी गोटात ओढायचा प्रयत्न करतात तसेच जागतीक पातळीवर मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक गट बाबासाहेबांच्याच "The Problem of Rupee" या ग्रंथाचाच आधार घेत आजही चर्चा घडवत असतात. अलीकडेच लुदविग वोन मायसिस संस्थेत "Ambedkar- The Forgotten Free Market Economist” हा प्रबंध एका चर्चासत्रात सादर केला गेला होता. म्हणजे बाबासाहेब मुक्त बाजारपेठेचे म्हणजेच भांडवलशहीचे समर्थक होते असाही अर्थ काढायचाच असेल तर काढता येतो.
साम्यवादाला धर्म मान्य नाही. पण त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्विकारला. त्या अर्थाने बाबासाहेब धर्मवादी होते असेही म्हणता येऊ शकते. धर्मवादी मनुष्य साम्यवादी कसा असू शकेल?
कोणाचीही निवडक विधाने काढून कोणालाही कोणाचे विरोधक अथवा समर्थक ठरवता येईल. समजा मी स्वतंत्रतावादी असलो तरीही मलाही साम्यवादातील शेतकरी-कामगार कल्याण, उत्थान (त्यांची किंवा कोणाचीही हुकुमशाही नव्हे) ही तत्वे मान्य आहेत म्हणून मी साम्यवादी होत नाही. वंचितांचे कल्याण हा सरकारचा प्रधान हेतू असला पाहिजे असे मला वाटते म्हणून मी समाजवादीही होत नाही.
तेंव्हा नरकेंचे विधान सरसकट खोटे आहे असे म्हणतांनाही तारतम्याची गरज आहे. सर्वच वाद (साम्यवाद, समाजवाद, स्वतंत्रतावाद इं०) सर्वस्वी त्याज्ज्य नाहीत तसेच सर्वस्वी स्विकारणीयही नाहीत.
पण हे वेगळे झाले. बुद्ध आणि मार्क्स यात शेवटी बाबासाहेबांनी बुद्धच स्विकारला हे वास्तव एवढेच सांगते की त्यांनी मार्क्स नाकारला.

1 comment:

  1. हरी नरके बौध्द आहेत पण ते माळी जातीतून बौध्द झालेले असल्यानो अश्या तमाम फरकूत्या बौद्ध होऊन जुन्या जातीचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना ते सहन होत नाही.

    ReplyDelete

शेरशहा सुरी: एक कुशल प्रशासक

  शेरशहा सुरीने हुमायूनचा पराभव केला आणि त्याला भारताबाहेर हाकलले. दिल्लीत आता कोणी शासक उरला नसल्याने शेरशहाने स्वत:ला दिल्लीचा सम्राट घोषि...