Friday, September 18, 2020

संघवादी सरकार अजूनही आर्यांच्याच शोधात!

 

संघवादी सरकार अजूनही आर्यांच्याच शोधात!

सांस्कृतिक व पर्यटन मंत्र्यांनी एक १६ सदस्यीय समिती स्थापन करून भारताचा गेल्या १२ हजार वर्षांचा सांस्कृतिक इतिहास नव्याने लिहिण्याचे व तो इतिहास अभ्यासक्रमात आणण्याचे सुतोवाच केले आहे. यातून सांस्कृतिक यादवीचा मोठा धोका निर्माण झालेला आहे.

आर्यवंश सिद्धांताने आधुनिक काळातही वेगवेगळ्या मार्गाने थैमान घातलेले आहे. “वंश” शब्द टाळून “आर्य-भाषिक” अशी नवी संज्ञा दिली गेली असली तरी मूल मतितार्थ कायम राहिला. भारतात आजवर संघवादी इतिहास संशोधक इतिहासाच्या पुनर्लेखनाच्या नावाखाली आर्य हे भारतातीलच असून ते येथूनच इराणमार्गे युरोपात गेले आणि सिंधू संस्कृती वैदिक आर्यांनीच निर्माण केली असे प्रतिपादित करीत राहिले. राखीगढ येथील उत्खनन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. वसंत शिंदे यांनी तर पुरात्वीय व डीएनएचे पुरावे वेगळेच सांगत असताना सिंधू संस्कृतीचे लोक वैदिक संस्कृत बोलत आणि त्यांची संस्कृती स्वतंत्र आणि एतद्देशीय वैदिकच होती अशा स्वरूपाची वक्तव्ये माध्यमांमधून केली. थोडक्यात वैदिक आर्य येथीलच आणि वेदरचना करणा-यांनीच सिंधू संस्कृतीची उभारणी केली असे ठसवायचा त्यांचा प्रयत्न होता हे उघड आहे.

ही चर्चा पुन्हा करायची वेळ आली आहे कारण मोदी सरकारने आधी २०१६ साली सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीत १२ सदस्यीय समिती नेमून भारताच्या गेल्या १२ हजार वर्षांच्या सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास करून डाव्यांच्या प्रभावाखाली असलेला सध्याचा इतिहास मुक्त करत त्याची नव्याने पुनर्मांडणी करण्याचा उद्देश जाहीर केला होता. पुरातत्वीय पुराव्यांचे पुनरावलोकन करणे, स्वतंत्र अर्थ लावणे, भारताच्या मूल रहिवाशांची आनुवांशिकी निश्चित करणे, वेदांचा काल नक्की करणे आणि आर्यांचा या मूलनिवासी मानवाशी असलेला संबंध ठरवणे असे मुख्य हेतू या समितीच्या स्थापनेमागे दिले गेले होते. पण के. एन. दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली  नेमलेल्या या समितीची प्रगती अत्यंत धीमी राहिली.

आता संसदेत सांस्कृतिक व पर्यटनमंत्री प्रल्हाद पटेल यांनी १४ सप्टेंबर रोजी या समितीच्या स्थापनेची पुनर्घोषणा केली. या समितीत १४ सदस्यांसहित सांस्कृतिक मंत्रालयाचे आणि पुरातत्व खात्याचे प्रतिनिधीही असतील. अध्यक्षपदी के. एन. दीक्षित हेच राहणार असून त्यात आर. एस. बिष्ट हे पुरातत्वविद सोडले तर बव्हंशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या संस्कृत विद्यापीठे, विवेकानंद इंटरनॅशनल फौंडेशन वगैरे संस्कृत, संस्कृती, भाषा यावर काम करणार्या संस्थांचे पदाधिकारी तर आहेतच पण चक्क “सन्मार्ग” वर्ल्ड ब्राह्मीन फेडरेशनचे अध्यक्षही आहेत. बिष्ट हे पुरात्वाविद असले तरी त्यांचे नुसते व्हिडीओ पाहिले वा पेपर्स वाचले तरी त्यांचा संघवादी दृष्टीकोन त्यातून झळकताना दिसतो.

या समितीत सारे ब्राह्मण आहेत. ते सारे उत्तर भारतातील आहेत. दक्षिणेच्या संस्कृतीसोबतच उत्तरेची संस्कृती वाढलेली आहे. असे असतांनाही एकाही दाक्षिणात्य विद्वानाचा या समितीत समावेश नाही. यामुळे कर्नाटकाच्या माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सरकारला फटकारले आहे. कारण स्वाभाविक आहे. मुळात द्रविड संस्कृती ही आर्यांनी पराजित केलेली आर्य-प्रभावी दुय्यम संस्कृती आहे असा ठाम ग्रह वैदिकवादी विद्वानांचा आहे. त्या समजाखाली अजूनही अनेक दक्षिणी विद्वान आहेत आणि ते सिंधू संस्कृतीतील मुद्रांवरील लिप्यंत द्राविडी भाषा शोधात असतात हे विशेष. तरीही जेवढे संशोधन आर्य व उत्तरेतील संस्कृतीचे झाले आहे त्या तुलनेने दक्षिणेतल्या संस्कृतीचे झालेले नाही. इतकेच काय, दक्षिणेतील उत्खनन कार्यांत आर्य प्रभावाला छेद देणारे पुरावे मिळू लागले की भाजपा सरकारने त्या उत्खननांत अडथळे आणल्याची अनेक उदाहरणे आहेत.

उदा. मदुराईपासून १२ किमी दूर असलेल्या संगम कालीन स्थळाच्या उत्खननात संघवादी विचारांना फाटा मिळतो आहे हे लक्षात येताच तेथील २७ पुरातत्व अधिका-यांच्या बदल्या केल्या गेल्या. २०१७ साली खासदार कनिमोळी यांनी संसदेत यावर प्रश्न उपस्थित करत द्रविड संस्कृतीचे अलगत्व उजेडात येऊ न देण्याच्या कारस्थानावर सडकून टीका केली होती. पण अर्थात त्याचा विशेष परिणाम झाला नाही. उत्तरेतील भाषा या आर्य मूळाच्या आहेत असाही एक समज दृढ आहे. भाषिक विभेद का याचे मात्र तटस्थ विश्लेषण झालेले नाही. भूगर्भशास्त्रीय भेदाचीही कारणे यामागे आहेत हे लक्षात घेतले गेलेले नाही. थोडक्यात आंतरशाखीय अभ्यासाची गरज आजही पूर्ण झालेली नाही तर सांस्कृतिक अस्मिता आणि श्रेष्ठतावाद संशोधनास मलीन करीत आहे हेच मुद्दाम लक्षात घेतले जात नाही. अशा स्थितीत या १२ हजार वर्षाच्या सांस्कृतिक पुनर्मांडणीमागे केवळ सांस्कृतिक राजकारण आहे हे सहज लक्षात येईल.

वैदिकांची समस्या काय?

या समितीच्या बव्हंशी सदस्यांचे मत आहे की वेदकाल पाश्चात्य सांगतात तेवढा अर्वाचीन नाही. आर्य बाहेरून आलेले नाहीत. ते येथलेच आणि वेद रचनाच नव्हे तर सिंधू संस्कृतीची निर्मितीही त्यांची. डाव्यांनी भारतीय इतिहासावर प्रचंड छाप टाकलेली असून त्या प्रभावात संस्कृतीचे आकलन केले जाते. त्यामुळे इतिहासाचे पुनरावलोकन केले पाहिजे. प्रल्हाद पटेल म्हणतात की हा नवा अभ्यास पुढे आल्यानंतर शिक्षणात त्याचा समावेश केला जाईल. म्हणजे विद्यार्थ्यांना आता विशिष्ट दृष्टिकोनातून भारताचा इतिहास शिकवत त्यांचे मत स्वातंत्र्य हिरावून घेण्याची ही चाल आहे हे उघड आहे.

पुरातत्वीय पुराव्यांचे मतितार्थ काढण्यात शास्त्रशुद्धता नसली तर कशालाही काहीही म्हणता येते. उदा. कालीबंगन येथे सापडलेल्या चुल्हानांचे अवशेष यज्ञकुंड म्हणून ठोकून देता येतात. सिनौली येथे सापडलेल्या बैलगाडीच्या अवशेषाला चक्क रथही म्हणता येते. पण ग्रांथिक पुराव्यांचे काय करणार? ऋग्वेदाचा किमान ८०% भाग हा प्राचीन इराणमध्ये लिहिला गेला याचे पुरावे ऋग्वेदातील भूगोलच देतो. अवेस्ता आणि ऋग्वेद हे समकालीन आहेत हे आता मायकेल वित्झेल आणि जगभरच्या संशोधकांनी सिद्ध केले आहे. ऋग्वेदाची भाषा ही अवेस्तन आणि भारतीय प्राकृतांनी बनलेली संकरीत भाषा आहे, ती मूळ भाषा नाही हे कधीच जे. ब्लोख, पिशेल, हरगोविंद सेठ सारख्या भाषातज्ज्ञांनी भाषाशास्त्रीय पुराव्यांनी सिद्ध केले आहे. शिवाय ऋग्वेदात पूज्य असलेली रथ-अश्वांची संस्कृतीही मध्य आशियातील. एवढेच नव्हे तर भारतीय उपखंडातच सापडणा-या पशु ते वनस्पतींची नावे त्यांनी येथील स्थानिक भाषेतून उसनवारी करून बनवली हेही असंख्य विद्वानांनी सिद्ध केले आहे.

बरे, अवेस्ता आणि ऋग्वेद काही डाव्यांनी लिहिलेला नाही. किंवा त्यांनी त्यावर मालकीही सांगितलेली नाही. उत्खननांचे प्रत्यक्ष काम करणारे बी. बी. लाल वगैरे मंडळी उजवीच होती. त्यांना जागतिक पातळीवर मान्य करून घेता येईल असे एकही सिद्धांतन मांडता आलेले नाही. एन. झा आणि एन. एस. राजाराम यांनी तर सिंधू संस्कृतीत घोडा होता हे सिद्ध करण्यासाठी कशी फोर्जरी केली हे उघड्यावर आल्यावर भारतीय विद्वत्तेची कशी इभ्रत निघाली हा इतिहास गेल्याच दशकातला. असे असतानाही आर्य येथलेच हे सिद्ध करण्यासाठी गेल्या १२ हजार वर्षांचा इतिहास नव्याने लिहिण्याची निकड का भासली हा खरा प्रश्न आहे.

भारताचा इतिहास खूप प्राचीन आहे. सोन नदीच्या खो-यात ८० हजार वर्षांपूर्वीपासून मानवाचे अस्तित्व होते हे सिद्ध झाले आहे. पुरा-अश्मयुगातील या मानवाच्या सलग अस्तित्वाचेही पुरावे आहेत. भीमबेटका येथे ४० हजार वर्ष ते अगदी १० हजार वर्ष पूर्वपर्यंतचे शिकारी मानवाने रेखाटलेल्या चित्रांतून तेव्हाची संस्कृती अभिव्यक्त करत होते. सर्व भारतीय उपखंड अनेक मानवी टोळ्यांनी गजबजलेला होता. नृत्य-संगीत ते जगण्यासाठी आवश्यक शोध लावून त्या वस्तूंची निर्मिती करण्याची कौशल्येही त्याने आत्मसात केलेली होती. अनेक धान्याचे प्रकार शोधात त्याची लागवड करण्याचे कौशल्यही तितकेच मागे जाते. पुरातत्वीय अवशेषांतून भारताची धर्मसंस्कृती ही सुफलता विधीवर आधारित शिव-शक्ती, वृक्ष, पितर, यक्ष, नद्या वगैरेची प्रतीक पूजा यावरच मुख्यता आधारित असून तिचा प्रवाह आजतागायत वाहत आला आहे. यातील एकही देवता ऋग्वेद अथवा वैदिक साहित्यात नाही. शिवाय जैन व बौद्ध धर्म ज्यातून निर्माण झाले ती त्याग, अहिंसा, अपरिग्रहाची, संन्यासाची, योगाची यती-व्रात्य संस्कृती ही वेदांहुनही पुरातन असली तरी या सर्वच इतिहासात नेमके त्यालाच स्थान असल्याचे दिसत नाही. मग आदिवासींच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीच्या अध्ययनाला त्यात स्थान असण्याची शक्यता नाही. जे काही असेल ते वैदिक संस्कृतीपेक्षा दुय्यम होते व त्यांची निर्मिती वेदांतूनच झाली असे दर्शवण्याचा प्रयत्न असेल हे उघड आहे. हे विधान ठामपणे करतो आहे कारण आजवरचे वैदिक विद्वानांचे संस्कृतीविषयकचे संशोधन वाचले तर अगदी हाच कित्ता संघवाद्यांनी गिरवला आहे हे लक्षात येईल. म्हणजेच ऐतद्देशियांच्या पुरातन संस्कृतीला तिलांजली देण्याचा हा उद्योग नाही असे कोण म्हणेल?

भारतीय उपखंडात येथील सुपीकतेमुळे अनेक भटक्या टोळ्या प्राचीन काळापासूनच येत राहिलेल्या आहेत. येथीलही लोक कोणत्या कोणत्या, विशेषत: व्यापाराच्या, निमित्ताने बाहेरही गेले याचेही पुरावे उपलब्ध आहेत. वैदिकांची संस्कृती ही भटक्या पशुपालकांची संस्कृती हे वैदिक वाद्ममयातच प्रकर्षाने दिसून येते. वैदिक आर्य असेच इ.स.पू १२०० च्या आसपास भारतात आले. अन्य टोळ्या येथे सामावून गेल्या पण वैदिक टोळ्या त्यांचा स्वतंत्र धर्म असल्याने येथे कधीच सामावून गेल्या नाहीत. उलट स्वधर्म स्वत:पुरता मर्यादित ठेवत स्थानिक धर्मांवरही मालकी सांगायचा प्रयत्न अनेक मार्गांनी आजही होतो आहे. संस्कृती शोधायची वैदिक आणि स्वत:ला मात्र हिंदू म्हणवून घ्यायचे ही वृत्ती सांस्कृतिक रचनेला विघातक ठरलेली आहे. खरे तर आपण कोठले, येथले का बाहेरचे, हा प्रश्न या वैदिकवाद्यांना आज पडायचे कसलेही कारण नाही. तसाही कोण कोठला आणि कोठून आला हे सांगण्याचे साधन आज उपलब्ध नाही. जनुकीय शास्त्रेही त्यात कमी पडतात. पण आज आहे ते जनुकशास्त्र मान्य केले तर उत्तर भारतातील उच्चवर्णियांत स्टेप मुळाची जनुके सर्वाधिक सापडतात हे जनुकीय विद्वानांनी संशोधनाअंती मांडलेल्या पुराव्यांचे हे तथाकथित आर्य काय करणार आहेत? की नवे जनुकीय शास्त्र निर्माण करणार की त्या पुराव्यांतून जे सामोरे आलेले निष्कर्ष आहेत त्यांचेही ऋग्वेदाप्रमाणे नव्याने अर्थ लावणार? आणि हा उपद्व्याप कशासाठी?

परंतु प्रश्न सांस्कृतिक वर्चस्ववादाचा आहे. संघ स्थापनेपासून सांस्कृतिक इतिहास हवा तसा गढूळ करत अवैदिकांना सांस्कृतिक वर्चस्वतेखाली ठेवायचा प्रयत्न आला आहे. आता तर सरकार त्यांच्याच मताचे आहे. मुळात १२ हजार वर्षांचीच का मर्यादा घातली? याचे कारण ऋग्वेद काल मागे नेणे, रामजन्म, महाभारतकाल हेही मागे ढकलणे आणि भारतीय संस्कृतीची मुळे वैदिक संस्कृतीनेच कशी घातली हे दाखवणे हा या समितीचा उद्देश्य आहे हे उघड आहे. कारण या समितीच्या अध्यक्षापासून ते सदस्यांपर्यंत जेही महानुभाव आहेत त्यांनी आपले उद्देश संशोधन सुरू होण्यापूर्वीच जाहीर करून टाकले आहेत. निखळ संशोधन आणि तटस्थ आकलन हा त्यांचा हेतू नाही. आणि हे सारे अभ्यासक्रमात घातले जाणार आहे हेही आताच घोषित करून टाकलेले आहे. म्हणजे अंतिम फलश्रुती काय हेही स्पष्ट आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाचा मोदीही डंका पिटत आहेत. या शैक्षणिक धोरणाचा उद्देशाच शिक्षण नव्हे तर एका विचारसरणीचे यंत्रमानव बनवणे हा आहे की काय असे वाटावे असे चित्र आहे. यातून भारताचा खरा सांस्कृतिक इतिहास समोर येण्याची शक्यता नाही. त्यात रस असता तर आज भारतातील असंख्य पुरातत्व स्थळे जमिनीखाली दाबून असून उत्खननाची वाट पाहात आहेत. पण सरकार त्यासाठी ना निधी देत ना मनुष्यबळ उभे करत. पण आर्यांचा काल्पनिक प्रश्न मात्र त्याच्या जणू काही जगण्या मरण्याचा प्रश्न बनला आहे की काय असे वाटते. कारण गेली दीडशे वर्ष या विषयाने वैदिकांची पाठ सोडलेली नाही. अगदी अलीकडेच मधुकर ढवळीकरांचे “आर्यांच्या शोधात” हे पुस्तकही शेवटी सिंधू संस्कृतीशीच आदळते.

ज्यांना संस्कृती असते ती त्यांना शोधावी लागत नाही. ती जगण्यात असते आणि वैदिक मंडळी ना कुशल वास्तुविशारद होती ना कृषीसंस्कृतीचे ते जनक होते. हे सिद्ध करण्यासाठी सारे वैदिक साहित्य पुरेसे आहे.

थोडक्यात येथील ज्या मानवी समुदायांनी आपली प्रतिभा पणाला लावत ऐहिक संस्कृतीच्या गाभा-यांना स्थापित केले त्यांच्यापासून त्यांचे श्रेय हिरावून घेण्याची लबाड मनोवृत्ती यामागे आहे. किंबहुना सरकारमध्ये आले तेच मुळी हाच उद्देश घेऊन असे वाटावे अशी स्थिती आहे. देशासमोरील इतर प्रश्नांना बगल देत आहे तीही संस्कृती उध्वस्त करत कोणत्या काळाचा खोटा अभिमान जपला जाणार आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

ही काही निखळ संशोधकीय पद्धती नाही. यातून फक्त खोटे आणि केवळ खोटेच जन्माला येईल आणि भावी पिढ्यांना बौद्धिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विकलांग करत देशात एक नवी सांस्कृतिक यादवी निर्माण करेल हा धोका समोर आहे. हे सरकार ठार बहिरे आहे. त्याच्या कानी लोकांचा आक्रोश पडत नाही तर हा काय पडणार?

सावध व्हायचेय ते या देशातील नागरिकांनी!

सांस्कृतिक विकृतीकरणाची नवी रुपे!

 

सांस्कृतिक विकृतीकरणाची नवी रुपे!





आम्ही म्हणू तीच संस्कृती, मग ती भुलथापांनी भरलेली पोतडी असली तरी चालेल. वैदिक संस्कृतीचा वर्चस्ववाद थोपत राहणे हाच खरा अजेंडा. नागरिकांना व्यर्थ भाकड चर्चांत अडकावून ठेवत, त्यांना आर्थिक दृष्ट्या हतबल करणारी धोरणे आखत वैदिक साम्राज्य निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा हेच संघ आणि भाजपचे वास्तव आहे.

झुंडीने हल्ले होतात. माणसं ठेचून मारली जातात. त्याच्या बातम्या होतात. माध्यमांत व सोशल मीडियावर चर्चा रंगतात. झुंडशाहीचा असा सांस्कृतिक दहशतवाद उघड डोळ्यावर येतो. पण अत्यंत शांतपणे, पण दीर्घकाळासाठी सांस्कृतिक समतोल ढासळायला लावेल, सांस्कृतिक दमन होत एक आपल्याला अपेक्षित असलेली संस्कृती पुनरुज्जीवित होईल अशा घटना, छुपे प्रचार, नेमणुका आणि अंमलबजावण्या याकडे सहसा आपले लक्ष जातही नाही. पण हा सांस्कृतिक दमनाचा दहशतवादी मार्ग राष्ट्रीय समाजाला एकारला बनवण्याच्या दिशेने वेगाने घेऊन जातो आणि अंतत: एकूणातीलच संस्कृतीची अपरंपार हानी होते हे आपल्या लक्षात येत नाही.

भाजप सरकार संघप्रणित तत्त्वज्ञानावर चालते हे काही लपून राहिलेले नाही. गोहत्याबंदी त्यातलेच एक पाऊल. खरे म्हणजे घटनेचाच आधार घेत हा कायदा बनवण्यात आला कारण दुभत्या जनावरांच्या (पवित्र म्हणून फक्त गायींचा नव्हे) रक्षणासाठी, संवर्धनासाठी सरकार कायदे करू शकते. भाजप सरकारने या तरतुदीचा आधार घेत गायींपुरता हा कायदा बनवला.

खरे तर घटनेत अशी तरतूद असायला नको होती. कोणी काय खायचे आणि काय नाही यावरही बंधने या तरतुदीमुळे येऊ शकतात याचा विचार घटनाकारांनी केलेला दिसत नाही. गोरक्षक नावाची हिंस्त्र जमात या कायद्यामुळे उदयाला आली. अनेक हत्या झाल्या. होत आहेत. पण मुळात या कायद्यामुळे समाजसंस्कृतीवर जो विपरित परिणाम होत आहे तो या झुंडल्ल्यांच्या हैदोसापेक्षा भयंकर आहे. कारण आपल्या खाण्या-पिण्याच्या आवडी जपण्याचेच स्वातंत्र्य या कायद्याने हिरावून घेतले. शिवाय शेतकऱ्यांचे अर्थचक्रच बिघडल्याने त्याला एक प्रकारे आर्थिक दहशतवादाचेही स्वरूप आले. परिणामी शेतीसंस्कृतीवर विपरित संकट आले.

आपल्या संपत्तीवरच्या अधिकारावर केवळ एका विशिष्ट धर्म-संस्कृतीच्या उन्मादी गर्व बाळगणाऱ्यांमुळे गदा येऊ शकते हा विपरित भयकारी संदेश जनमानसाच्या मानसिकतेत रुजला. एक प्रकारे स्वातंत्र्य हिरावले गेले पण ज्याविरुद्ध आवाज उठायला हवा होता, ज्याची अधिक चिकित्सा होत आव्हान उभे केले जायला हवे होते तसे झालेले दिसत नाही. झुंडल्ल्यांची चर्चा वरकरणी आहे. त्यातून काही साध्य होण्याची शक्यता नाही.

संघप्रणित सांस्कृतिक दहशतवादाचे असंख्य मार्ग आहेत. चुकीची अथवा भेसळ करून तीच माहिती सत्य आहे असा आव आणत तिचेच सातत्याने प्रसारण करत हा समाज एकाच संस्कृतीने जन्माला घातला आहे, भाषाही त्यांनीच निर्माण केल्या आहेत, किंवा या देशात गतकाळात जेही काही होते-नव्हते त्याची निर्मिती त्यांनीच केली आहे अशा प्रकारच्या विज्ञान किंवा पुराव्यांवर न टिकणाऱ्या गोष्टी सातत्याने पसरवल्या जात आहेत. सत्तेवर आल्यापासून तो वेग कमालीचा वाढलेला आहे.

वेदनिर्माते वैदिक आर्य भारतातलेच, एवढेच नव्हे तर भारतातून ते युरोपपर्यंत पसरले व भाषा-संस्कृतीचा प्रसार केला हा प्रवाद वैदिकवादी संघाने अनेक वर्ष पसरवण्याचा प्रयत्न केला. घग्गर नदीला सरस्वती सिद्ध करण्याचे प्रयत्नही झाले. भाजप सरकार सत्तेवर येताच या सरस्वती नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा महाप्रकल्प या सरकारने हाती घेतला. त्यानुसार हरियाणातील भाजप सरकारने “हरयाना सरस्वती हेरिटेज डेव्हलपमेंट बोर्ड’ स्थापन केले.

वरकरणी हे प्रकरण निरुपद्रवी वाटेल. एका नदीचे पुनरुज्जीवन होतेय ना? मग चांगलेच आहे की! तिला मग घग्गर म्हणा किंवा सरस्वती असा साळसूद प्रतिवाद केला जातो. पण या घटनेत केवढे सांस्कृतिक आक्रमण लपले आहे याची कल्पनाही जनसामान्यांना येत नाही.

मुळात घग्गर नदी ही ऋग्वेदात वर्णिलेली सरस्वती नाही. घग्गरला एकदाचे सरस्वती ठरवले की घग्गर नदीच्या काठावर सापडलेले सिंधू संस्कृतीचे अवशेष आपोआप वैदिकांचे होतात. तेच सिंधू संस्कृतीचे निर्माते ठरतात. किंबहुना घग्गरला वैदिक ठरवण्यामागे तोच डाव होता व आहे. आता त्याला “सरकार मान्यता’ मिळाल्याने सिंधू संस्कृतीच्या आकलनातच भेसळ करत वैदिक हेच भारतातील संस्कृतीचे जनक आणि निर्माते आहेत असा अप्रत्यक्ष दावा या प्रकरणातून केला गेला. या अवैज्ञानिक सिद्धांताला जेवढे आव्हान दिले जायला हवे होते ते दिले गेले नाही. “आपले महान पूर्वज’ एवढे शब्द कानी पडले तरी धन्य धन्य होणारे सामान्य हिंदू या वैदिक काव्याला कसे ओळखू शकतील?

हे येथेच थांबत नाही. सिनौली येथे अलीकडेच इ.स.पू. २०००च्या सुमारासच्या एका छकड्याचे अवशेष मिळाले. हे अवशेष बैलगाडीचे नसून वैदिक रथाचे आहेत, म्हणजेच वैदिकांचे आगमन उत्तर प्रदेशात इसवी सनपूर्व १२०० नाही तर त्याआधीच सात-आठशे वर्ष झाले होते असे सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला.

ऋग्वेदात मिळणारे रथाचे वर्णन आणि या छकड्याचे अवशेष यात कसलेही साम्य नाही हे उघड आहे. हा अप्रत्यक्ष रुपाने, सत्याशी इमान न ठेवता केले जाणारे सांस्कृतिक विकृतीकरण आहे. हा सांस्कृतिक दहशतवादाचा भाग असतो आणि तो सध्या मन:पूत वापरला जातो आहे.
मदुराईजवळ संगम काळातील एका पुरातत्वीय स्थळावर उत्खनन सुरू झाले होते. इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकाच्या पूर्वीच तमिळनाडूमध्ये नागरी संस्कृती सुस्थापित झाली होती याचे पुरावे बाहेर येऊ लागताच आणि तिचा संबंध वैदिक संस्कृतीशी जोडता येणे अशक्य आहे हे लक्षात येताच उत्खननात अडथळे आणायला सुरुवात झाली. उत्खनन चालू असतांनाच पुरातत्वीय खात्याने अर्थपुरवठा थांबवला आणि २७ अधिकाऱ्यांची अचानक कोणतेही कारण न देता बदली करण्यात आली. द्रमुकच्या तत्कालीन खासदार कनिमोळींनी राज्यसभेतच आवाज उठवला. “तमिळ संस्कृतीचे स्वतंत्र अस्तित्व या सरकारला मान्य नाही.’ असे त्या म्हणाल्या. अर्थात पुढे काहीच झाले नाही. म्हणजे, प्रत्येक गोष्टीचा संबंध वैदिक संस्कृतीशी जोडायचा प्रयत्न करायचा आणि ते नाहीच जमले तर तिकडे सरळ दुर्लक्ष करायचे किंवा विपरित अर्थ लावत बसायचा हे उद्योग वाढले आहेत. तमिळनाडूने भाजपला का नाकारले याचे हे कारण आहे.

तमिळ लोक संस्कृतीबद्दल जागरुक आहेत. पण अन्यत्र अशी स्थिती नसल्याने संघाचे आणि म्हणूनच पर्यायाने भाजपचे फावत गेले. पण येथे प्रश्न केवळ सत्तेचा नसून संस्कृतीच्या विकृतीकरणाचा आहे आणि त्यातून सामाजिक काय अनर्थ घडतो आहे याचे भान विचारवंत आणि अभ्यासकांना नसल्याने त्यांचे फावले आणि जनमानस बिघडत गेले हे कोणाला समजणार?

हे येथेच थांबत नाही. खरे तर शेकड्याने उदाहरणे आहेत. पण येथे आता एकच देतो. तमिळनाडूत एके काळी जैन संस्कृतीही प्रबळ होती. जैनांशी निगडित किमान पाचशे पुरातत्वीय स्थाने व शिलालेख तमिळनाडूत आहेत. पूर्ण दुर्लक्षाअभावी त्यांची अवस्था दयनीय आहे आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अवैदिक संस्कृतीच्या इतिहासाकडे लक्षच द्यायचे नाही आणि परत वर त्यांना हिंदूच म्हणत राहायचे हा बुद्धीभेदी दुटप्पीपणा हे संघाचे अजून एक वैशिष्ट्य.

शेवटी पुद्दूचेरी येथील फ्रेंच इन्स्टिट्यूट पुढे आली आणि नुकतेच ४६४ जैन पुरातत्वीय स्थानांचे फोटोग्राफिक डाक्युमेंटेशन केले. पण उत्खनन करत पुरातत्वीय अभ्यास मात्र सुरू करायला भारत सरकार पुढे आले नाही.

थोडक्यात आम्ही म्हणू तीच संस्कृती. मग ती भुलथापांनी भरलेली पोतडी असली तरी चालेल. वैदिक संस्कृतीचा वर्चस्ववाद थोपत राहणे हाच खरा अजेंडा. नागरिकांना व्यर्थ भाकड चर्चांत अडकावून ठेवत, त्यांना आर्थिक दृष्ट्या हतबल करणारी धोरणे आखत वैदिक साम्राज्य निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा हेच संघ आणि भाजपचे वास्तव आहे. वैदिक संस्कृतीचे वास्तव मग काहीही असो!

तशीही सत्याची चाड कोणाला आहे? जे विरोध करू पाहतील त्यांना भयग्रस्त करण्यासाठी झुंडल्ल्यांची फौज त्यांच्याकडे आहेच! यातून भारताचे बहुसांस्कृतिक सहिष्णू प्रारुप उध्वस्त होत एकारलेली, हिंसक…मग ती हिंसा शारीरीक असो की अवैचारिक, पुराणमतवादी आणि भ्रमांत राहणारी संस्कृती निर्माण होण्याकडे वेगवान वाटचाल सुरू आहे. यातून बाहेर पडण्यासाठी जेवढा मोठा वैचारिक फोर्स हवा तेवढा आज उपलब्ध नाही हे अधिकचे दुर्दैव आहे.

Saturday, September 5, 2020

हे असेच होते...!

 


रामाने जो अपमानास्पद प्रसंग विसरायचा लाख प्रयत्न केला तरी त्याला तो विसरू देतील ते गावकरी कसले? तो रस्त्यावर आला रे आला की येणारे जाणारे त्याच्या भोवती जमत आणि सहानुभूती व्यक्त करत. जखमा भळभळून वहायला लागत. सार्‍या जगाबद्दलची चीड उफाळून येई. विशेषत: लक्ष्मी नि दसरु यांच्याबद्दल तर खुनशी भावना उद्रेकत. हळूहळू त्याने गावात जाणेच बंद केले. आपल्या झोपड्यातच कोंडून घेऊ लागला किंवा पठारावर मान खाली घालून एखाद्या खडकावर बसू लागला.

भर लग्न मंडपातून त्याच्या काही क्षणात होणार असलेल्या बायकोला, लक्ष्मीला, त्या हरामखोर गावगुंड दसरूने पळवून नेलं होतं. हा काही साधा अपमान नव्हता. सर्वत्र छी थू झाली होती. त्याची म्हातारी आई तर पार कोलमडून पडली होती.

लक्ष्मीला दसरूने पळवून नेलं म्हणण्यापेक्षा लक्ष्मी स्वत:हूनच त्याच्याबरोबर पळाली असं म्हणणं योग्य राहील. दती फक्त संधीची वाट पहात होती. मंगलाष्टके सुरू झाली आणि दसरू आणि त्याचे पाच सहा आडदांड साथीदार लग्न मंडपात पाव्हण्यासारखे प्रवेशले होते. त्याला पाहताच लक्ष्मीच्या नातेवाईकांत चलबिचल झाली होती. अजुन काही उत्साहाने म्हटली जाणारी मंगलाष्टके बाकी होती. रामा सातव्या आसमानात तरंगत होता. काही क्षणात आता ती त्याची होणार होती. तेवढ्यात दरसरूने लक्ष्मीच्या बापाला नि त्याला अडवू पाहणार्‍या नातेवाईकांना बाजूला ढकललं आणि ओरडला, ‘लक्ष्मेऽऽ चल.’

जणू लक्ष्मी त्याच क्षणाची वाट पहात होती. तिनं मुंडावळ्या फेकल्या. हातात धरलेला हार फेकला आणि दसरुच्या दिशेने धाव घेतली. दसरू ला अडवायचयी कोणाची हिम्मत नव्हतीच. काही क्षणात सर्व पाव्हण्या-रावळ्याना स्तंभित ठेवत दसरू-लक्ष्मी नि दसरूचे साथीदार तेथून निघून गेले.

रामाला आधी काहे समजलेच नाही. तो बावळटासारखा जेथे लक्ष्मी उभी होती तिकडे आणि निघून गेली त्या दिशेकडे बधीरल्यागत पाहतच राहिला. मंगलाष्टके म्हणणारे बधीर. हातात अक्षता घेऊन उभे पाव्हणे स्तब्ध. हतबुद्ध रामा डोकं धरून खाली बसला. त्याच्या विधवा आईनं हंबरडा फोडला. ती लक्ष्मीच्या आई बापांना शिव्या घालू लागली. लक्ष्मीचे आई बापही रडत होते दसरूला शिव्या घालत होते. पण आता काय उपयोग? त्यांचयी पोरगी त्यांच्या नाकावर टिच्चून तिच्या याराबरोबर पळून गेली होती. नाचक्की त्यांचीही झाली होती.

हे काय झालं, कसं झालं. हे बधीर रामला कळायला वेळ लागला. आपण पुरते ठकलो गेलो हे आता त्याच्या लक्षात आलं. लक्ष्मीची भानगड लपवण्यासाठी घाई गर्दीत लक्ष्मीच्या आई बापानं तिचं, तसा फाटका नि गरीब राम्याशी, लग्न ठरवलं होतं. त्याला फसवलं होतं आणि आता तर भर मंडपात पंचक्रोशीतल्या गावकर्‍यांसमोर अपमानित केलं होतं.

त्याच्यातला आक्रोश सर्वांना हेलावून गेला खरा, पण रामाचाच तो मुर्खपणा नव्हता का? त्यानं आधी लक्ष्मीची धड चौकशी तरी करायची! दसरूच नि लक्ष्मीचं लफडं पार शेंबड्या पोरांनाही माहित होतं. मग याला कळायला नको? बेअक्कल कोठला?

या प्रसंगानंतर तो पार कोलमडला. गरीब असला म्हणून काय झालं? गावकर्‍यांसमोर, नातेवाईकांसमोर त्याची पार बेइज्जत झाली होती. कुठं तोंड दाखवायला जागा ठेवली नव्हती. अनेक दिवस तो घराबाहेर पडलाच नाही. आईनं तर बिछाना धरलेला. नंतर बाहेर पडू लागला तर गावकरी सहानुभूती दाखवायच्या आड चोच मारणार. त्याला रक्तबंबाळ करणार. रामाला वेडंच लागायचं बाकी राहिलं होतं. रात्रं तर भीषण स्वप्नांची असे तर दिवस भयप्रद श्‍वापदासारखा. काय करावं कसं जगावं हे काही केल्या त्याला उमगत नव्हतं. राहून राहून समोर त्या दुीष्टाची दसरूची आकृती समोर येईल आणि आपल्या कल्पनेतच तो त्वेषाने त्याचे तुकडे तुकडे करीत असे. लक्ष्ला तो भोगतो अलाहे ही कल्पना त्याला वेडेपिसे करी. त्या कुत्रीलाही ठार मारायला हवं. तेही पाशवी बलात्कार करून. बेशरम साली!

या प्रसंगाने दसरूची मात्र इज्जत वाढली होती. तरूण पोरांचा तर तो हिराचे बनला होता. लक्ष्मीबरोबर तो वाडीव्रच्या घरात राजरोसपणे रहात होता. लक्ष्मीही निर्लज्जपणे वाडीवर नि गावात वावरे. कोणालाही रामाशी घेणं नव्हतं. त्याच्या व्यथा वेदना हास्यास्पद ठरल्या होत्या. त्याच्या आक्रदनाशी कोणालाही काही एक घेणं नव्हतं. चूक त्याचीच हाते. त्याने मूळात लक्ष्मीशी लग्न ठरवायचं का?

रामा दिवसेंदिवस अशक्त होत चालला होता तर आई मरणाच्या दारात शेवटचे क्षण मोजीत होती.

***


महिना असाच निघून गेला. पावसाळा तोंडावर आलेला. घरात सामानही भरायला हवं होतं. पठारावर त्याचा चार एकराचा तुकडा हाते. त्याच्या उपजिविकेचं एकमात्र साधन. रामा पूर्वी फार कष्टाळू होता. कल्पक होता. जमीन त्याचा प्राण होती. साताठ वर्षापूर्वी त्याचा बाप कुळवणी करीत असता वीज पडून शेतातच मेला होता. तेव्हांपासुन रामाच आपल्या घराची जबाबदारी सांभाळत होतो. 

गावात जायलाच हवं होतं. किराणा घ्यायलाच हवा होता. पण पुन्हा लोक आपल्या जखमा उकरतील याची भितीही होती... पण काय करणार? 

माणसातलं पशुपन वेदनामयी टोचा मारतांना अजूनच विकृत होत जातं. त्याला ते पाहित होतं. पण जाणं भाग होतं.

तो दुकानात गेला. सामान घेतलं. पण व्हायचं तेच झालं. कोंडिबा हा वयस्कर माणूस. पण तो पचकलाच. ‘छ्या छ्या लै वंगाळ झालं. तुला फशीवलं की रं त्येनं?’

झालं. रामाचा दडलेला संताप उफाळून वर आला वयाचा विचार न करता त्यानं कोंडिबाची गचांडी पकडली आणि थोबाडीत दोन ठेवून दिल्या. शिव्यांचा पाऊस पडला. बघ्याची ही गर्दी जमली. पुरेसा तमाशा झाल्यावर जाणत्यानी रामाला बाजूला केला आणि घराकडं पाठवून दिलं. पण जातानाही कोंडिबाचा क्रुद्ध ऐकू आलाच. ‘या हिजड्याबरोबर कसली राहती ती बया?’

रामाला राग आला. पण दातओठ खाऊन अजून शिव्या हासडल्यावर राग अतीव दु:खात परिवर्तीत झाला. बांधावर बसून तो ढसाढसा रडला. आक्रोशत राहिला.

सारं जगच त्याचं शत्रू झालं होतं.

***


पाहता पाहता आभाळ भरून आलं. वारा पडला नि नि:शब्द शांतता पसरली. वृक्षराजी- शेतं परमेश्‍वराची यंदाची पहिली कृपा झेलण्यासाठी लीन झाली. मग एकाएकी घनगंभीर गडगडाट झाला. काळ्याभोर आभाळातून वर्षा कोसळू लागली. ओल्या मातीचा चिरपरिचित कासाविस करणारा गंध चौबाजूला दाटला. अवघं विश्‍व त्या मृदगंधात न्हावून निघालं. पर्जन्याचा उत्सव होत होता. साथ होती कडाडत्या वीजांची. पानथळत्या लीन वृक्षांची.

पण रामाला हे सारच क्रूर वाटत होतं. त्या घोंघावत्या पावसाच्या आवाजातनं जणू  अगणित सैतान खिदळत होते. प्रलय निकट आला होता. कोसळत्या पावसात डोंगरावर बसलेला निथळता रामा तळमळत होता. 

हे सारं कधी संपेल असं त्याला झालं होतं.

येवू देत प्रलय! हौ देत नाश या विश्वाचा.

नाहीतरी जगण्यासारखं आहेच काय या विश्वात?


***


पाऊस थोडा विसावला रामाने तशी प्रतिज्ञा केली. दसरूचा खून करण्याची. दातओठ खात तो खळाळत्या निर्जरांकडे आणि विरू लागलेल्या मेघांकडे पाहत तो भेसूर स्वरात ओरडला..."दस-या...तुला खतम करणार म्या!...दाखवतोच तुला कसला मर्द हाय म्या!" 

होय, तोच एकमेव मार्ग होता त्याचं पौरुष दाखवण्याच. तोच मार्ग होता त्याचा हरपवलेला आत्मसन्मान पुन्हा प्राप्त करण्याचा .लक्ष्मीला केस मोकळे सोडून आक्रदताना पहावयाचा आनंद घ्ययलाच हवा होता. त्या वेसवेला तीच सजा होती.. होय रामा दसरूचा खून करणार होता. तो तिरीमिरीत डोंगर उतरला आणि झोपडीत आल्या आल्या तयारीलाही लागला.

त्यानं विळा घेतला नि त्याला धार लावत बसला.

एखाद्या पिसाटासारखा!

***


दसरु गावगुंड होता हे तर खरंच. पण तो म्हणे सुपार्‍याही घ्यायचा. पंचक्रोशीत त्याची दहशत होती. आमदारही त्याला निवडणूकांच्या वेळी हाती धरत. कोणाला पळवायचं असो की ठोकायचं. दसरू कमी पडायचा नाही. त्याच्यावर कमी गुन्हे दाखल नव्हते. पण कधी अटकेत पडला नव्हता. उजळ माथ्यानं रुबाबात हिंडायचा. लोकांचे रामराम घ्यायचा. नडीला धावायचा. त्याला शिव्या शाप देणारे होते तसे त्याला देव मानणारेही होतेच. तोंड देखलं म्हणाल तर मग सारेच त्याच्यासमोर झुकत त्याच्यामुळे लक्ष्मीलाही आपोआपच मान मिळायचा. बाया बापड्या तिच्या मागे पुढे करत. हळदी कुंकवाला आवर्जुन बोलवत. दसरुने तिच्याशी काही तिच्याशी लग्न केलं नव्हतं... पण ती जणू महासवाष्णं होती.


***


रामानं आपल बोट कापून घेवून विळ्याला नीट धार लागल्याची खात्री करून घेतली. गोधडीत घुसून झोपायचा प्रयत्न करत सकाळ होण्याची प्रतीक्षा करु लागला. पाऊस पुन्हा सुरु झाला होता. सारखे डोक्यात विचार...दसरूला मारण्याचे. उलघालीत रात कशी गेली ते समजलं नाही. आई अर्धवट बेशुद्धीत शेवटचा श्वास घ्यायची वाट पाहत होती. सकाळ झाली तसा गडी लगबगीने उठला. जागरणाने दोके जरा दुखत होते. पण त्याला त्याची पर्वा नव्हती. पहिला गेला आपल्या विळ्याकडे...हातात घेऊन हवेतच सपासप वार केले. जणू तो दसरूचं मुंडकं छाटत होता...रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. 

पाऊस थांबला असला तरी ढगांची दाटी सूर्य किरणांना थोपवून होती. हवेत गारवट ओलावा होता. वेळ झाली होती. त्यानं विळा उपरण्यात लपवला आणि झपाझप दसरू राहत असलेल्या वीडीच्या दिशेने निघाला. गावांकडं येणारी ती शेतांच्या बांधा बांधातली एकमेव वाट होती. दसरू गावात त्या वाटेनंच येणार याची त्याला खात्रीच होती. कोठे दबा धरून बसायचं हे त्यानं ठरवलेलंच होतं.

वाटेत एक पांद होती. दडायला मस्त....

रामा त्या पांदीत झुडपाआड लपला एखाद्या आतूर शिकार्‍यासारखा. पानाआडून त्याला पायवाट दिसत होती. अवघ्या काही फुटांवरची. दसरू वाचणं आज शक्यच नव्हतं. फासावर चढावं लागलं तरी बेहत्तर. स्वत:च्या जीवाची त्याला आता पर्वा उरली नव्हती.

आणि त्याला वळणावरून रुबाबात, एखादा सम्राट जसा, चालत येणारा दसरू दिसला. त्याच्या डोळ्यात धुकं दाटलं. त्याने डोळे पुसले. ‘सावध रहा’ स्वत:ला बजावलं. धडधडत्या छातीला बजावलं. ‘चूप रहा. तो ऐकल ही धडधड तर पळून जाईल साला.’

दसरू आता काही फुटावर होता. रामानं धैर्य एकवटलं. विळा उगारला आणि हरामखोर अशी गर्जना करीत दसरूवर चालून गेला.

पण त्याचा विळा दसरूच्या छातीत घुसायच्या आधीच दसरून त्याच्या पोटावर लाथ हाणली. रामा विळा टाकून पोट आवरत गुडघ्यावर बसला... तशी दुसरी लाथ आदळली. नि रामा बांधावरनं घरगळत शेतातल्या चिखलात आडवा झाला.

‘आय घाल्या, पुन्यांदी असलं नाटक कर, मुडदा पाडीन तुझा. माझ्या वाटला जायचं नाय.’

एवढी धमकी देवून जणू काही झालंच नाही, अशा रुबाबात दसरू तेथून निघून गेला.

चिखलात बरबटलेल्या रामानं स्वत:ला नि दसरूला शिव्या शाप दिले. त्याला ठार मारण्याच्या पुन्हा धमक्या दिल्या. पण त्या ऐकायला दसरू तेथे होताच कुठे?

उठून उभं राहणंही शक्य नव्हतं. छाती पोटातून असह्य कळा येत होत्या. खूप वेळ वेदनांच्या कल्लोळात घालवल्यानंतर तो त्या दलदलीतून कसाबसा बाहेर पडला. उठून बसला चपला कोठेतरी भिरकावल्या गेल्या होत्या. विळ्याचा पत्ता नव्हता. तो रांगत बांधावर आला. काहीक्षण तेथे असह्यपणे बसला. नशीब हे कि पहायला आजुबाजुला काणी नव्हतं, नाहीतर गावात हास्यास्पद व्हायला लोकांना अजून संधी.

कपडे चिखलात बरबाटले होते. ओढ्यावर जावून धुवायला हवेत. तो स्वत:शीच म्हणाला, कसाबसा उठला नि झोकांड्या खात निघाला.

***


माळाईच्या डोहानिकट येताच त्याला बायकांच्या हसण्या खिदळण्याचा नि कपडे धुवायचा आवाज आला. तसा तो झाडाआड लपला. पाहिलं, बायका रोज कपडे धुवायला इथं येतात हे तो विसरलाच होता. बायकांमध्ये त्याला लक्ष्मीही दिसली. तसं त्याचं हृदय पिळवटलं. वाटलं धावत जावं तिचे पाय धरावेत अन पुन्हा आपल्या बरोबर यायची विनवणी करावी. बायका गावगप्पा हाकत धुणी धुण्यात मग्न होत्या. लक्ष्मी केवढी सुंदर होती. काय त्या गावगुंडाची हुल पडली तिच्यावर? ‘ए माझ्यावर दया कर. माह्याकडं ये. म्यामायंदाळ सुख देईन...साला हलकट दस-या काय लगीन करणर नाय तुह्याशी. वापरंल नि एक दिस देईल फेकून मग कळल तुला...’ आणि तो हा विचार करताना स्वत:वरही थुंकत होता. ‘थू लेका तुझ्या जिनगानीवर जिनं तुला अपमनाच्या खाईत भिरकावलं तिचीच ओढ?’

नि तो गाव टाळून चिखलाळलेल्या कपड्यानिशी घराकडं गेला. आकाश गडगडलं नि काही क्षणात सनातन शापासारखा पाऊस कोसळू लागला.

रामा चिंब भिजत स्वत:ला नकळत स्वच्छ करू लागला...पण मनात काहिली भडकली होती. असहाय्यतेने त्याला बेभान करून सोडले होते. आपल्याच वाट्याला हे का? काय पाप केलं होतं? 

प्रश्न होते...

नव्हती ती उत्तरे!

***


काही तरी करायलाच हवं होतं. सूड घ्यायलाच हवा होता. दसरूला संपवावं लागणारच होतं. आपण निर्बल आहोत. त्याला मारणं आपल्या बापाच्यानं शक्य नाही हे त्याला कळलं होतं.

पण काहीतरी मार्ग असलाच पाहिजे.

कोणता?

खूप दिवस डोकं शिणवल्यावर त्याला मार्ग दिसला. तोवर शेत भरभरून हिरवाळत आकाशाशी स्पर्धा करायला झेपावू लागली होती. फक्त त्याचं शेत सोडून. पण त्याला पर्वा कोठे होती? त्याचे जीवित ध्येयच बदलले होते. कोणती असुया उरली नव्हती की जगण्याचरी जीजिविषा. खेडं तर शत्रूच होतं पहिल्या पासून त्या हरामखोराना जर लक्ष्मी लफडेबाज आहे हे  माहित होतं. तर त्याला आधीच सांगितले का नाही?: का त्याला बळीचा बकरा बनवला का त्याला हास्यास्पद विदुषक करून टाकलं? सारेच मरायच्या लायकीचे होते. 

साले नराधम. मला फसवताना शरम नाही वाटली? गाडून टाकीन तुम्हा भडव्यांना एक दिवस.

आधी दसरू!

त्यानं प्रतिज्ञाचं केली होती तशी.

***


जिल्ह्यात एक कुप्रसिद्ध गुंडा होता, नाम्या निसुरे. सुपार्‍या घेवून शत्रूच्या वाटा काढण्यात वस्ताद. पोलिस सतत त्याच्या मागावर असत, पण त्याच्या हातांवर तो नेहीच तुर्‍या देई. 

का न त्याला गाठावं... नि दसरूची सुपारी द्यावी?

किती पैसे मागेल तो?

नि सर्वात महत्त्वाचं त्याला गाठायचं कुठं?

हळुहळु या कल्पनेनं त्याच्यावर अंमल बसवला. तो निर्लज्जाप्रमाणे पुन्हा गावांत जावू लागला. कधी कधी आजुबाजुच्या गाव वाड्यांवरही. लोकांच्या हसण्या टोमण्याची पर्वा त्याने सोडून दिली. त्याला फक्त नाम्याला कुठं गाठता येईल याची माहिती हवी होती. तो आडून चौकशी करीत होता. शेवटी त्याला यश मिळालंच. नाम्याला गाठण्याचा मार्ग मिळाला तसा तो घरी आला. आईचे सर्व दागिने त्यानं काखोटीला बांधले, आई तशीही मरणारंच होती. नि तो काही पुन्हा लग्न करणार नव्हता. ते दागिने कोणाच्याही कामाचे नव्हते. तो तडक तालुक्याला गेला. सोनाराच्या दुकानात ते मोडले. पंचावन्न हजार रूपये मिळाले. च्यायला. तो नाम्या हरखेल एवढी रक्कम बघून नि मारेन ठार हरामी पिल्ल्याला... दसरूला. साल्यानं माझी इज्जत घालवली. माझी वाट लावली.

तो मरत नाही तोवर मी गप्प बसणार नाही!

***


घनघोर पावसाळी राती रामा भिजत ओसाड वाट तुडवत ओढे नाले कसेबसे ओलांडत प्रसंगी भेलकांडत जखमी होत हृदयात सूडाची मशाल प्रज्वलित ठेवत आपल्या ध्येयस्थानाकडे निघाला.

टेकडीवर चढणं सोपं नव्हतं. पण तिथल्याच ओसाड पडक्या शिवमंदिरात नाम्याचं सध्या वास्तव्य होतं. जसा तो वरपर्यंत गेला त्याला माणसांचे दबके का होईना आवाज येवू लागले. व तो हर्षित झाला. नाम्या खरोखर तिथं हाते तर. आता तर मशालींचा उजेड पावसाच्या पडद्यामागरून दिसू लागला.

तो जसा मंदिराच्या सभामंडपात प्रवेशला तसे सारे आवाज बंद झाले. जणू काही आपदा आली होती. हा पोलिसंचा तर माणूस नाही? त्यांनी सावध पवित्रा घेतला...ही आपदा उडवावी लागली तरी चालेल...

पण रामाला वातावरणातील हिंसक तणावाची भिती वाटली नाही. तो नम्रपणे गुडघ्यावर बसला नि त्या नि:चेष्ट शांततेला तडा देणार्‍या भग्न आवाजात म्हणाला,

‘मी रामा, माझं तुमच्याकडं काम आहे.’

वातारण जरा सैल झालं. रोखलेल्या कृर नजरा जरा मवाळ झाल्या. 

‘‘काय काम आहे तुझं?’’ नाम्यानं विचारलं.

रामा अस्पष्ट अडखळत्या आवाजात त्याचं काम सांगू लागला. सारे कान देवून रामाला ऐकत होते. डोळे विस्फारत होते. रामाला त्यांच्या प्रतिक्रियेतून काय अर्थ घ्यावा. हेच कळत नव्हते. पण तरीही तो आशावादी होता.

‘‘तुझ्याकडे पैसे आहेत?’

‘होय.’

‘किती?’

या कामासाठी मी पन्नास हजार देवू शकतो. पण काम झलंच पायजे.’

‘ठेव ते इथं’ नाम्या म्हणाला.

आपलं काम नाम्यानं घेतलं याची खुशी दाटून आलेल्या रामानं प्लॅस्टिकच्या तुकड्यात गुंडाळलेली रक्कम पुढं ठेवली.

‘काम होणार माझं?’ त्यानं अनिवार आशेनं प्रश्‍न केला.

‘घ्या रे ते पैसे.’ नाम्यानं हुकूम देताच रामाच्या पुढनं तो गठ्ठा गायब झाला. रामा नाम्याकडे अपेक्षेने पाहत राहिला.

‘दसरूला मारायचं म्हणतोस?’ नाम्याचा गंभीर आवाज त्या पावसाच्या दडीवर मात करून उभारला.

‘होय! दसरूला. त्यानं माझी बायको भर लग्नमंडपात पळवली.’

यावर नाम्या खदखदून राक्षसी हसला.

‘मुर्खा तू चुकीच्या माणसाकडे आलास. दसरू कोणाय तुला माहिताय? गाढवा, मी त्याचाच माणसू आहे. मला येणार्‍या सर्व सुपार्‍या तोच पाठवतो. पोलिसापास्न मला तोच वाचवतो मी त्याला मारू म्हणतोस? या पन्नास हजारासाठी? थु:त‘ आणि तो पुन्हा गदगदन हसला. आभाळही गडगडलं नि नव्या जोरात कोसळू लागलं रामाही कोसळला. पार निपचित झाला. पार भुईसपाट झालला नि दुर्दैवाचे आकांती आघात झेलू लागला. एखाद्या अश्राप , सर्वस्व हरपलेल्या मानसागत.

‘तसे हे पैसे माझ्या कामाला येतील म्हणा! देवच पावला की रे जय शंभो’ नाम्या खुशीत म्हणाला. पिंडीकडे पाहून हात जोडले नि वळाला. आपल्या माणसाला  म्हणाला, ‘उचला याला आणि द्या फेकुन कुठेतरी.  मारून नका टाकू या भडव्याला. बघु देत याला आपल्या सायबाबरोबर लक्ष्मीबरोबर मौज मारताना!’

आजवर रामाला हे आठवत नाही की तो शुद्धीवर आला कधी आणि घरी परतला तरी कसा!

जेव्हा तो परतला तेव्हा सकाळ झाली होती. पाऊस थांबला ता. त्याची आई मेली होती नि आसपासची बाया माणसं तिच्या अंत्यसंस्काराच्या तयारीत होती.

माणसानं कोसळायचं तरी कितींदा?

***


आता रामाचं आयुष्य पुरतं चिरडलं गेलेलं होतं राग, लोभ, दु:ख वेदना या पार तो गेला होता. जगण्याची शुद्धच तो हरपून बसला होता. जवळपासच्या घरातल्या बाया बापड्या त्याच्यासाठी अन्न आणत तो ते लाथाडून देई. त्याला वेड लागलंय हा निष्कर्ष काढलायला अजून काय हवं होतं? सर्वच त्याच्याकडे यायचे हळूहळू थांबले. खिन्नबधीर स्थितीत त्याला हे बरेच वाटले. तो आईलाही विसरून गेला. स्वत:ला तर कधीच विसरला होता. ज्या गावात त्याच्या पिढ्यानपिढ्या गेल्या होत्या ते गावही त्याच्या नजरेतनं पार उतरलं होतं. त्याचं शेत त्याला साद घालत नव्हतं. जगण्याशी त्यानं पुरती नाळ तोडली होती. मेला नव्हता अजून इतकच. 

का झालं असं बरं आपल्याशी? कशाला त्या रंडीशी लगीन ठरवलं म्हातारीनं?  मी कसा आंधळा झालो होतो? कधे लोकांत जास्त मिसळलो नाही याचे सजा का ही? का नाही मला कोणी सावध केलं? सोयरे ..नातेवाईक....का नाही आले कामाला? फक्त बेइज्जती पहायला आले होते का ते? त्या नीचांना सारं माहित होतं...तरीही हिजडे गप बसले. होम केला माझ्या आयुष्याचा....का?

असं काय पाप केलं होतं मी?

तो रात्री बेरात्री बाजूच्या टेकडावर जावून बसे. उमलणार्‍या तारकांना प्रकाशाच्या काळडोहात विझतांना बघे. झगमगीत सूर्यप्रकाश त्याला भयभीत करे. तो प्राणपणाने पळत आपल्या झोपडीत येई नि आपलं कृश शरीर गोधडीत छपवून सनातन कालांधाराला शरण जाई.

असे खूप दिवस चालले.

पावसाळा संपला. ओढे स्वच्छ नितळ पाण्याने भरून वाहत नवे संगीत देवू लागले. आभाळ नितळ स्वच्छ... जणू नवजात बाळराजाचे निष्कपट डोळे जसे...नवरात्री आल्या. दसरा तर सर्वांचा महोत्सव. आकाश दुमदुमवणार्‍या ढोलाचे आवाज त्याच्या कानी पडत. रात्री मारूतीच्या देवळात मृदुंगाचे बोल नि भक्तीने भरलेल्या आर्त भजनांची रास त्याला अधिक उद्वेगित करे. सारे आनंदी होते. 

फक्त तोच एकटा पोरका होता. 

सारे त्याला विसरून गेले होते.

जणू तो कधी या गावचा नव्हताच.

***


दिवाळीही संपली. त्याच्या झोपड्यात पणतीही पेटली नाही. उजेडाशी त्याने पक्के हाडवैर घेतले होते. लोक पुढच्या हंगामासाठी उत्साहात सज्ज झालेले. रात्रीची गहन शांतता ढवळायचा रातकिड्यांनी चंग बांधलेला. तो त्याच्या सुडसंतप्त संवेदनांशी अद्यापही इमानी होता. पण काय करायचं? काहीतरी रस्ता असेलच. काय झालं आधीचे प्रयत्न फोल गेले असले तरी? अद्याप काहीतरी मार्ग असेलच ‘मी त्या दसर्‍याला सोडणार नाही". तो बांधा बांधाने चालत होता. पावलापावलाने जणू तो ती प्रगाढ शांतता तुडवीत आतील कोलाहलाला वाट देत होता.

रात्र गहिरी होत चाललेली. रात्र बेस. हा अंधार सखा. 

त्याच्या संगतीत किती बरं वाटतं.

तो दाट झाडीतून वाट काढत ओढ्यावर आला. ओढ्यातील पाण्यावर दोन्ही बाजूंनी वाढलेलरी दाट झाडीची नितळ काळी छाया होती. अनाहत ध्वनी हाता तो फक्त खळखळाटाचा. जणू विश्‍वाची सुरुवातही येथेच झाली होती नि अंतही येथेच होता.

तो खडकावर बसला. पाय पाण्यात सोडून. येथे तरी विसावा आहे?

काळ थेंबा-थेंबाने जणू त्या प्रवाहातून वाहत होता. तो विनम्र झाला. वेदना विसरल्यागत झाल्या. तो स्वत:तच दाटून आला. डोळ्यातून धार वाहिली. डोहात टपटपत विलीनही झाली. वंचनांनी तो कासाविस झाला. त्याला त्या वेदना शब्दात व्यक्त करता येत नव्हत्या. अडानीच कि तो. पण त्या वेदना त्याच्या इवल्या जीवनाला भरून उरल्या होत्या.

तो खिन्नपणे काळडोहाकडे पाहत आपले प्रेत त्यात तरंगते आहे आणि लक्ष्मी आपले पाय धरत आकांत करत माफी मागतेय हे दृष्य पाहत राहिला.

सारं खोटं...हे जगणंही...नि ते मरणही...

तो निष्प्राण झाला.

तरीही त्याचा उर धपापत राहिला.

हे काय आहे?

त्याला माहित नव्हते.


तेवढ्यात त्याच्या कानावर अगम्य पण तालबद्ध मानवी स्वर पडला. तो चकित झाला. कानोसा घेतला. तो आवाज भारल्यागत होता. तोही भारला. उठला नि ओढ्याच्या कडे कडेनं त्या ध्वनीच्या दिशेनं निघाला.

आपण माळाईच्या डोहाजवळ आलो आहोत याची त्याला जाणीव झाली. दुष्काळातही हा डोह गावाची तहान भागवीत असे. त्या डोहात एक मानवी आकृती छातीभर पाण्यात उभी होती नि हातांशी कांही धरून मंत्रोच्चार करीत होती.

अमावस्येच्या त्या गहन राती तो मंत्रोच्चार त्याला पिसे लागल्यागत वाटू लागला. तो स्तब्द प्रतिमावत उभा राहीला नि ऐकत राहीला. अमावस्येच्या काळरात्री हा मंत्रजागर करणारा कोण असेल? त्याच्या निगूढ मनाला प्रश्‍न पडला.

तो माणूस वळला मंत्रोच्चार थांबला हातातील शुभ्र कवटी नीट सांभाळत तो काठावर आला. कवटी खडकावर ठेवली. माळाईच्या अंधकार-गर्भस्वरूप तांदळ्याकडे पाडत त्याने हात उभारले नि भुतांना आवाहन केले. प्रेतात्म्यांना पुकारले.

तो तांत्रिक आहे हे कळायला फारशा अक्कलेची गरज नव्हती. त्या तांत्रिकाबद्दल तो इवलासा पोर होता, तेव्हापासून ऐकून होता. लोक त्याला घाबरत, पण म्हणे, करणी पिशाच्च बाधेसाठी गुपचूप त्याच्याकडेच धाव घेत. त्याच्याच म्हणे अचाट शक्ति होती. भूत प्रेत त्याच्या इशार्‍यावर नाचत. तो गावात क्वचित येई नि आला कि रस्ते ओस पडतं. तो डोंगरापारच्या टेकडावर राही. तेथे तो अविरत अघोरी साधना करीत असे. त्याचे भय होते. सर्वत्र अस्तित्व होते आणि तरीही तो जणूकाही नसल्यासारखाच होता.

जसा रामा असून नसल्यात जमा होता...

‘आपण एवढे मूर्ख कसे? आपल्याला हे आधीच का सुचले नाही?’ या प्रश्‍नावर तो स्वत:लाच शिव्या घालू लागला. तांत्रिक कवटी उचलून ओढा ओलांडून निघाला तसा भारल्यागत रामाही अंतर राखून त्याच्या मागून निघाला.

पण त्याला चाहूल लागलीच. पटकन वळून कवटी समोर धरून तो ओरडला.

‘हे भूत पिशाच्च वश में मेरे

मार न से हमको

महाबली हनुमान हमारे

वीश में हैसब जातो. ॐ र्‍हीं क्लीं श्रीं फट स्वाहा!’

गर्भगळीत झालेला रामा गुडघ्यावर वाकला

’मी... मी... रामा गावातलाच आहे. मला तुमची मदत पाहिजे’. समोर भूत नसून एक बापडा मानव आहे ही जाणीव होताच मांत्रिकाने आलख निरंजन असं जीवंत उत्साहात म्हटलं नि विचारलं,

काय समस्या तुझी बेटा?"

‘माझा दुश्मन रक्त ओकून मेला पाहिजे.’

‘ते तर माझं कामंच आहे. मर जाये तेरा दुश्मन. रक्त ओकून मरेल ता. छटपटाके मारेंगे हम. सून रहे हो भूत प्रेतो? आपकी प्यास बुझेंगी! बोल बेटा कौन है तेरा दुश्मन?’

‘दसरू!’

‘वो राक्षस? जरूर मरेगा! खूप सतावलंय त्यानं लोकांना..."

"माह्या औष्याचं तर वाटूळं केलं महाराज..."

"जानते है हम....हम सब जानते है....मरेगा वो. काली जादू मारेगी उसे...जय महाकाली...तोड दे दुष्मन की नली...पण बेटा खर्च?’

‘तुम्ही सांगा... पण तो मेला पाहिजे तो रक्त ओकून’

‘अवश्य बेटा अवश्य. माझ्या शक्तीला आव्हान देण्याची हिम्मत आणि शक्ती कोणातही नाही. या सृष्टीवर माझी सत्ता चालते. पण बेटा पैसा... मला खूप तयारी करावी लागेल. प्रेत पिशाच्चांना आवाहन करावे लागेल... बळी द्यावा लागेल. वीस हजार तरी लागतील.’

‘पण माझा शत्रू मरेल?’

’अवश्य बेटा... पुढच्या अमावस्येला तू माझ्या मठीत ये... तुझ्यासमक्ष मी मंत्रजागर करेन नि त्याला रक्त ओकून मरायला लावीन. पण मला तयारीसाठी उद्या...’

‘होय महाराज.... मी पैसे घेवून येईन.’

‘जा बालक घर अभी और सो जा! अब तेरी चिंता का भार हमपर! अलख निरंजन...’

असं म्हणून मांत्रिक गेला देखील.

रामा स्वत:वरच खूष होता. अपरंपार आशांच्या हिंदोळ्यावर हेलकावत तो घरी परतला, नि रात्रभर पैशाची जुळणी कशी करायची या विचारावर शिजत राहीला.

***


शेत गहाण ठेवल्या खेरीज गत्यंतर नव्हते. त्याने ते कार्य भल्या सकाळी गावपाटलाकडं जावून  उरकलेही. तसाच तो सरळ मांत्रिकाकडे निघाला. मनात दसरू रक्त ओकत कसा मरेल नि रंडकी लक्ष्मी कसा उर बडवत आक्रोश करेल एवढाच काय तो विचार त्याच्या मनात होता.


***


प्रदीर्घ तपस्येनंतर प्राप्त व्हावी तशी अमावस्येची रात्र आली. मोक्षाचा क्षण निकट आल्याच्या आनंदात उरभरल्या आतुरतेने रामा मांत्रिकाच्या कुटीकडे ओशट अंधार तुडवीत निघाला.त्याने शेत तुडवलं नि ओढा मागे टाकत गवताने व्यापलेले माळरान ओलांडले. मग त्याने पहिला डोंगर न थांबता न थकता, काठ्या कुट्यां वा ओरबडणाचा बाबुळ झाडांची पर्वा न करता पुन्हा एक विस्तिर्ण एक गायरान पायतळी तुडवलं... नि तो शेवटचा मुक्तिचा चढ चढायला सुरवात केली.

डोंगराच्या माळरानावर एकच प्रकाशमान जागा होती व ती म्हणजे मांत्रिकाची झोपडी. तेथे असंख्य दिवे वर्तुळात झगझगत निबीड अंधाराला भोकं पाडीत होते. त्या दिव्यांच्या वर्तुळामागे आसनमांडी घालून मांत्रिक बसला होता.

लपलपत्या, सशाच्या काळजानं रामा निकट गेला नि मांत्रिकाच्या मंत्र जागरानं स्वत:च पिसा झाला. वाटलं हीच त्याच्या अटळ संघर्षाची अखेर..!

‘तू आलास हे माहिताय मला. बच्चा. या वर्तुळात ये. मधोमध बस. मी सिद्ध आहे. तुझ्या दुश्मनाला रक्त ओकून ठार मारायला. देवता सिद्ध आहेत... भूत पिशाच्चे आपली रक्ताची तहान भागवायला सिद्ध आहेत... तू बस!’

रामाने ते प्रकाशमान वर्तुळ एखाद्या चल प्रेताप्रमाणे ओलांडलं. जसा आदेश मिळाला. तसा बसला नि वाट पाहू लागला. एखाद्या भारलेल्या बाव्हल्याप्रमाणे मांत्रिक सांगेन तसे करू लागला.

मांत्रिकाचे मंत्रोच्चार कानठळ्या बसतील एवढे वाढले. दिपज्योती सर्पाजिभभांप्रमाणे लवलवू लागल्या. तो मंत्र भारीत झाला होता. त्याच्या आकांक्षांची पुर्ती निकट आली होती. तो आतूर होता. त्याचे लक्ष मांत्रिकाकडे एकवटलेले होते. तो धीरगंभीर उद्रेकात मंत्रोच्चार करत होता. एकाएकी मांत्रिक उठला. दाही दिशाकडे पाहत उग्र पाहत मंत्रोच्चार करू लागला. एकाएकी छातीत बुक्के बसल्याप्रमाने तो वाकला..छाती आवळली...जोरात कोणत्यातरी अगम्य भाषेत अदृष्य प्रेतांना ओरडला...स्वत:भोवती झंझावातात सापडल्याप्रमाणे भिरभिरला...त्याने रक्ताची उलटी केली व जमिनीवर कोसळला.

तरीही त्याचे मंत्रोच्चार थांबले नाही. ते धुसर, वेदनामय झाले होते. एवढेच. कोणीतरी जणू मांत्रिकाच्या पोटावर ठोसे मारीत होतं. आणि प्राणांतिक वेदनांनी मांत्रिक कळवळत होता.

हे काय आक्रीत घडतंय हे बिचार्‍या रामाला कळतच नव्हतं.

एकाएकी पोटावर हात ठेवीत मांत्रिक उठला नि भडाभड रक्त ओकला नि रामाकडे बोट दाखवत दरडावत्या स्वरात ओरडला,

‘चालता हो... चालता हो मुर्खा... त्याचं रक्षण करणारं भूत जबरी आहं. मीच मरणार... तूही मरणार... चालता हो... नाहीतर येथेच मरशील...’

या सगळ्या दृश्यानं आधीच बधीर झालेला रामा नकळत उठला व शक्ति पणाला लांवून त्या दिपज्योती ओलांडत त्या ओसाड पठारावरून वेड्यासारखा धावत सुटला. तांत्रिकाचा भेसूर वदनामय आवाज अजूनही त्याचा पाठलाग करीत होता. 

त्याला पळायचे होते. या विश्‍वाच्यही पार... या अनवरत फसवणूकीच्या पार...!

तो कोसळला. ठेचकाळला. पण आता वदनेच्या एक हुंकारही त्याच्या ओठांतून बाहेर पडला नाही. त्याने आजुबाजूचे गवत व झुडपे आधारासाठी पकडली व सनातन निर्विकार आभाळाकडे पाहिले. पण एक अश्रूही त्याच्या डोळ्यातून ठिबकला नाही. निसर्गाचे जीवनदायी रात्रंसंगीत त्याच्या ठेचाळलेल्या आत्म्याला स्पर्शले नाही.

होता तेथेच, त्याच जमिनीत विलीन होवून जावो याच अंतिम इच्छेच्या उद्वेगित झोपाळ्यावर तारका प्रकाशात तो असा झोपून गेला की पुन्हा त्याला कोणी जागे करूच शकू नये...!


* * *


Wednesday, September 2, 2020

तुम्ही का जगता आहात?

तुम्ही का जगता आहात?
मी का जगतो आहे?
खरे म्हणजे मरण येत नाही
आणि मारले जात नाही
म्हणून जगतो आहोत.

अवसानघातक्यासारखा तो क्षण
व्यवस्था आणत असते कोणावरही
व्यवस्थेच्या पुजा-यांवरही
आणि व्यवस्थेच्या विरोधकांवरही
विरोध आणि स्विकृती
ओरडून सांगायची
ती तो अवसानघातकी क्षण येईपर्यंतच...

व्यवस्थेच्या मालकांनाही हा क्षण
चुकत नाही बरे!

जगणे आणि मरणे येवढेच सत्य
ते जगते व्यवस्थेच्या चिरंतन
सरणावर
तरीही व्यवस्थेचा मालक व्हायची
आस किती अनावर?

“पउमचरिय”: रामकथेवरील आद्य महाकाव्य

          भारतीयांवरील रामकथेची मोहिनी अचाट आहे. रामकथेचे मूळ नेमक्या कोणत्या स्त्रोतात आहे हे शोधण्याचाही प्रयत्न झाला आहे. परंपरेने वाल्...