Wednesday, February 11, 2026
खंगलेले वैचारिक विश्व!
अलीकडेच समाजमाध्यमांवर कोणी केलेल्या तत्वज्ञानाच्या मांडणीवरून व त्यावर घेतल्या गेलेल्या एका आक्षेपावरून धमासान वाद झाला. या वादाला प्रत्यक्ष तत्वज्ञानापेक्षा व्यक्तीगत संदर्भच अधिक कारणीभूत ठरले. जागतिकीकरणानंतर समाजात सर्व क्षेत्रात आलेल्या वैचारिक उथळतेचेच ते एक प्रकारे दर्शन होते. खरे तर जागतिकीकरणाच्या काळात झपाटयाने बदलत चाललेली सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय संस्कृती विचारवंतांच्या कितपत आकलनात आली आहे व या स्थितीने निर्माण केलेल्या अगणित प्रश्नांना व संभ्रमांना उत्तरे शोधत कालानुरूप नव्या तत्वद्न्यानाची मांडणी करण्यात त्यांना कितपत यश आले आहे हा खरा प्रश्न आहे व त्यावर सामाजिक चर्चा घडणे आवश्यक आहे. पण तसे होतांना क्वचित दिसते हाही जागतिकीकरणाने निर्माण केलेला एक गंभीर प्रश्न आहे.
जागतिकीकरणामुळे जगण्याच्या अनेक गोष्टी बहुतेक समाजघटकांसाठी अगदी सोप्या बनल्या. काही घटक पुरेपूर दुर्लक्षित ठेवले गेले. तरीही या वरवरच्या सोपेपणाचे उदात्तीकरण करणारे अनेक लेखक जगभर उगवले. ते लोकप्रियही झाले. त्यांची उद्धरणे फेकण्यात काही लोक वस्ताद होऊ लागले. कोणत्याही प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत चिंतन करत त्यावर काळसापेक्ष उत्तरे शोधण्याची आणि ती मांडण्याची सामाजिक सवय मोडली. या जगणे सोपे बनवण्याच्या नादात आपण जगण्याचे प्रश्न जटील करत नेत आहोत याचे भान आपण गमावले. साहित्यिक-विचारवंत-मालिका आणि बव्हंशी चित्रपटांनी या प्रवृत्तीला खतपाणीच घातले. नैतिकतेच्या व्याख्याही बदलल्या. एवढेच नव्हे तर एक मोठे "जगणे" मानवी विचारविश्वाच्या पटलावरून पुरते अदृष्य झाले. शेतकरी, पालांवरची कुटुंबे ते आदिवासी या तत्वचर्चेतून व कलाविश्वातून तडीपार केले गेले. म्हणजे राजकीय-सामाजिक घटकांत ती चर्चा राहिलीच नाही असे नाही पण त्यांच्या विचारांचा आधारही आता जवळपास कालबाह्य होत चाललेले तत्वज्ञान राहिले. त्यातही कोणी स्वत:च्या प्रज्ञेने भर तरी घातली असे दिसून येत नाही. सामान्य माणसांना आपल्या जगण्याचे प्रतिबिंब पहायला न मिळता उलट एक स्वप्नवत वाटणारा चमचमीत पण स्वप्नील जीवनप्रवाह त्यांच्यावरही आदळत राहिला. स्वाभाविकच आपल्या प्रत्यक्ष जीवनाचे , संघर्षाचे आणि दाखवल्या जाणार्या स्वप्नांचे करायचे काय हा प्रश्न सूप्त पातळीवर पण उद्रेकी अवस्थेत वावरत राहिला. जगण्यापासुन मनाने तुटणे म्हणजे काय असते याचे हे विदारक चित्र निर्माण होऊ लागले. जगण्याच्या व्याख्याच बदलू लागल्या.
जागतिक विचारवंत/तत्वज्ञही जागतिकीकरणाच्या काळातील आपली निरीक्षणे याप्रमाणेच नोंदवत राहिलेले आहेत. माणूस असंवेदनशील झाला आहे, राजकीय/सांस्कृतिक/धार्मिक/आर्थिक विचार नेत्यांपासून ते सामान्य माणसांपर्यंत उथळ पातळीवर येऊन ठेपले आहेत, नाती, ओळखी व मुल्ये घसरत अस्थायी बनू लागली आहेत, एकाकीपणा ही वैश्विक घटना बनू लागलेली आहे, आधुनिक तंत्रज्ञानाने नैसर्गिक विचारक्षमतेचा वेगाने ऱ्हास होतो आहे ही निरीक्षणे व त्याच्या कारणांचा शोध घेण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. पण कारणे शोधणे, निरीक्षणे नोंदवणे यापेक्षा महत्वाचे होते ते आधुनिक मानवाला त्याच्यासमोरील वेगाने उद्भवत जाणाऱ्या समस्यांना उत्तरे देऊ शकेल असे समाजाभिमुख नव-तत्वज्ञान मांडणे. पण आजचा भर भांडवलशाही आणि तिच्या लाभार्थ्यांना उपयुक्त ठरेल असेच उपयुक्ततावादी तत्वज्ञान प्रसृत होते आहे. मुलभूत तत्वज्ञान गायब झालेले आहे.
गतकाळातील तत्वज्ञान्यांचे सिद्धांत, त्याचे सामाजिक व नैतिक परिणाम यावर भरपूर चर्चाही विद्यापीठीय पातळीवर तर कधी सामाजिक पातळीवरही होत असते. पण यात सुटलेला भाग हा की प्रत्येक तत्वज्ञ आपापल्या काळाचे अपत्य असतो, त्याच्या तत्वज्ञानावर अपरिहार्यपणे त्याच्या काळातील नैतिक समस्यांचा प्रभाव असतो, पण कोणाचेही सिद्धांत सार्वकालिक असू शकत नाहीत इकडे मात्र दुर्लक्ष होते. प्रत्येक व्यक्ती (त्यात राजकारणी, समाजकारणी व तत्वज्ञही आले) आपापल्या स्थळ-काळ सापेक्ष स्थितीत घडत असते, व्यक्त होत असते वा कृती करत असते. यात काही महान म्हणून गौरवले जातात तर काही दुर्लक्षित राहतात. पण महानांचे चिंतन अथवा वर्तन सदासर्वकाळ आजही आचरण करावे असे मार्गदर्शकच असते असेही नाही. मुळात चिरस्थायी काहीही नाही, हे न समजता आजच्या प्रश्नांची उत्तरे गतकाळात होऊन गेलेल्या महनीयांनी त्या त्या काळात दिलेल्या उत्तरांमध्ये शोधू पाहण्यात गफलत होत असते आणि ही चूक भारतीय नेहमीच करतात हे आपल्या सहज लक्षात येईल. अनेकदा यात आत्मवंचना असते. जुन्याचा केवळ सोयीसाठी अथवा स्वत:ला भावले म्हणून गवगवा करत राहणेही आजच्या स्थितीत उपयुक्त ठरतेच असेही नाही.
सामान्य माणसे आपल्या वर्तमानकाळाच्या समस्यांशी हाती असलेल्या संसाधनांच्या सहाय्याने झुंजत असतात, पण वर्तमानातले प्रश्न अगदी अनपेक्षित, पूर्वी कोणीही अनुभवले नाही असे असले तर त्याचे भांबावून जाणे किंवा नवीन स्थितीचा लाभ घेण्याचे अविरत प्रयत्न करत “स्व” भान हरवून जाणे आणि परिस्थितीशरण होत आहे त्या काळचौकटीत समाधान शोधत नवीन जीवन स्वप्ने पाहणे आणि त्यांच्या पुर्तीतच स्वत:च्या जीवनाची सार्थकता शोधणे अपरिहार्य होत जाते. यात माणसाचे माणूसपण हरवून जाते आणि आजकाल तसेच होते आहे.
समाजमाध्यमांवर सहज नजर टाकली तरी लक्षात येईल की समाज बव्हंशी उथळ वैचारिक कोलाहलात आपली वैचारिक प्रक्रियाच हरवून बसला आहे. क्वचित काही विचारी बाबी मांडल्या गेल्या तरी त्याची सैद्धांतिक रचना करायला कोणाकडे वेळ अथवा संयम आहे असे दिसत नाही. लेखकही तात्कालिक प्रसिद्धीतच खुश असतात. आधुनिक काळातल्या प्रश्नांशी विवस्त्रपणे भिडणे आणि त्या प्रश्नांनी भेडसावलेल्यांचे चित्रण करत नवीन मार्गही असू शकतात याचे दिग्दर्शन करण्यात ते मागे राहतात. त्यामुळेच मराठीत आज वैश्विक कादंबरी किंवा कविता जन्माला येत नाही. भेडसावणाऱ्या नव्या प्रश्नांचे चित्रण, त्यातील लाभ-तोटे मानवी अंगाने चितारत मानवी जीवनाला नवे तात्विक आधार देण्याचा प्रयत्न होत नाही.
अकादमिक पातळीवर जागतिक तत्वज्ञानाचा अभ्यास करणे, सामान्य वाचकांपुढे सोप्या भाषेत ठेवणे ही स्पुहनीय बाब आहे हे मान्य केले तरी “तुमचे तत्वज्ञान काय?” हा प्रश्न अनुत्तरीत राहत असेल तर एकुणातील समाजासाठी ते शोभणारे नाही. जुन्या काळातील तत्वज्ञ किंवा संतांचे म्हणणे आज फारसे लागू पडत नाही. मराठी समाज “ठेविले अनंते तैसेची राहावे...” या उक्तीच्या विरुद्ध गेल्याला आता अनेक शतके झाली. जुन्याची साथ सोडायची नाही, पण तसे वर्तनही करायचे नाही आणि नवतत्वज्ञानाचे सृजनही करायचे नाही अशा विपरीत स्थितीत आपण आलेलो आहोत. जागतिकीकरणाचे लाभ तर घ्यायचे आहे पण जागतिक न होता गतकाळातील संकुचित अस्मितांना चिकटून बसायचे आहे. यात आपला मानसिक आणि सामाजिक दुभंग आता केवळ समाजमाध्यमातील पोकळ वादांतून दिसत नाही तर प्रत्यक्ष हिंसक वक्तव्ये आणि कृत्यांतुनही दिसू लागला आहे. उथळपणाचा सार्वत्रिक भयावह उद्रेक झाला आहे आणि हे काही जागतिकीकरनाचे उद्दिष्ट नव्हते पण आम्हीच ते बनू दिलेले आहे.
आज राजकीय पक्षही आपल्याला नैतिक सिद्धांतांना बासनात बांधून ठेवतांना दिसतात. खरे तर कोणाची तत्वधारा काय आहे हेच आता कोणाला माहित नाही. कारण कोणाकडेही तत्वधाराच उरलेली नाही. विज्ञानयुग असताना, त्याचे फायदे उचलत असताना एक फार मोठा वर्ग वंचित राहतो आहे आणि मानसिक समस्यांचे आगर बनतो आहे याचे भान नाही. जागतिकीकरणातील माणूस जागतिक न होता अधिकाधिक व्यक्तीनिष्ठ आणि संकुचित होत चालला आहे ही एक शोकांतिका आहे. यावर नवसिद्धांत निर्माण करत समाजाला तात्विक आधार देणे हे खरे तर तत्वज्ञानाचे अभ्यासक, विचारवंत आणि साहित्यीकांसमोरचे आव्हान आहे.
-संजय सोनवणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
खंगलेले वैचारिक विश्व!
अलीकडेच समाजमाध्यमांवर कोणी केलेल्या तत्वज्ञानाच्या मांडणीवरून व त्यावर घेतल्या गेलेल्या एका आक्षेपावरून धमासान वाद झाला. या वादाला प्रत्...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
वडार समाज हा तसा देशभर पसरला असला तरी तो आंध्र प्रदेश,तमिळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. प्रत्येक प्रदेशातील भ...
No comments:
Post a Comment