Monday, November 2, 2020

शैवयोगिनी लल्लेश्वरी!

 



शैवयोगिनी लल्लेश्वरी!

काश्मीर अप्रतीम निसर्गदृष्ट्या भुतलावरील नंदनवन म्हणून जसे जगप्रसिद्ध आहे तसेच अनेक अभिनव तत्वज्ञानांचे, साहित्य निर्मितीचे आणि विचारांचेही नंदनवन राहिलेले आहे. काश्मीर अनेक शतके दक्षीण आशियाचे ज्ञानकेंद्र राहिलेले आहे. येथेच शैव तत्वज्ञानाने अभिनव गुप्ताच्या रुपाने कळस गाठला तर चीन, कोरीया, अफगाणिस्तान, चायनीज तुरकमेनीस्तान, तुर्कस्तान या विशाल भुप्रदेशात गेलेला बौद्ध धर्म ही काश्मीरचीच वैशिष्ट्यपुर्ण निर्मिती. शैव आणि बौद्ध तत्वज्ञानांचा संगम करुन बनवला गेलेला हा बौद्ध धर्म जगाने स्विकारला.

येथेच हजारो संस्कृत, पाली, प्राकृत ग्रंथांची तिबेटी-चिनीसहित अनेक भाषांत रुपांतरे झाली. ह्यु-एन-त्संग ते हिचेओ असे चिनी, कोरियन प्रवासी ज्ञानप्राप्तीसाठी काश्मिरला भेट देत राहिले. त्याच वेळेस काश्मीर खो-यात अडकुन न राहता काश्मीरी धर्मप्रचारकांनी विशिष्ट बौद्ध धर्म चीनमध्ये नेला. संघभूती, गौतमसंघ व कुमारजीव हे काश्मीरी बौद्ध प्रचारक चवथ्या शतकातच चीनमधे गेले. कुमारजीवाच्या प्रतिभेने चीनचा राजा एवढा प्रभावित झाला होता की त्याने कुमारजीवाचे चक्क अपहरण केले आणि चीनमध्येच ठेवत शंभराच्या वर बौद्ध ग्रंथांचा चिनी भाषेत अनुवाद करुन घेतला. कर्कोटक वंशाच्या प्रतापादित्याच्या काळात रत्नचिंता या काश्मीरी भिक्षुने चीनला भेट दिली होती. (सन ६९३) त्याने चीनमध्ये मठही स्थापन केला आणि सात संस्कृत ग्रंथांचे चिनी भाषेत अनुवाद केला. गुणाढ्याच्या पैशाची भाषेतील बृहत्कथेची संस्कृत रुपांतरे झाली तीही काश्मीरमध्येच. एका अर्थाने काश्मीर हे ज्ञान, साहित्य आणि धर्म-तत्वज्ञान निर्मितीचे अनेक शतके केंद्र राहिलेले आहे. उपखंडाच्या बुद्धीवादी, गुढवादी आणि सौंदर्यवादी मानसिकतेला काश्मीरने फार मोठा हातभार लावलेला आहे.

काश्मीरला ललितादित्य (आठवे शतक), दिद्दा राणी (दहावे शतक) आणि पंधराव्या शतकातील झैन-उल-अबिदिनसारख्या महान सम्राटांचीही परंपरा आहे. ललितादित्याने अर्धा भारत तर आपल्या नियंत्रणाखाली आनलाच पण अफगणिस्तान, तुर्कस्तान, बाल्टीस्तान, गिलगिट ते लडाख हे प्रांतही आपल्या नियंत्रणाखाली आणले. तत्कालीन रेशीम मार्गांवर त्यानेच नियंत्रण ठेवले व काश्मीरला एक अर्थसत्ताही बनवले. झैन-उल-अबिदिनचा काळ अत्यंत शांततामय व धर्मिक सलोख्याचा म्हणून ओळखला तर जातोच पण मधल्या काळातुन हतातुन सुटलेले लडाखही त्याने पुन्हा जिंकून घेतले व काश्मीरला जोडले.

काश्मीरची संतकवी परंपराही तशीच प्राचीन आहे. चवदाव्या शतकातील शिवयोगिनी लल्लेश्वरी (लल्लदेद) ते शेख नुरुद्दिन उर्फ नंद ऋषी या संत कवींनी काश्मीरची परंपरागत समन्वयवादी मानसिकता घडवण्यात फार मोलाचा वाटा उचलला आहे. किंबहुना काश्मीरच्याच समन्वयशाली परंपरेचा विराट उद्गार त्यांच्या काव्य-गीतांवर पडलेला आहे. आज काश्मीरमधील जी स्थिती आहे त्या स्थितीचे जे भारतीय समाजाचे आकलन वा त्यांच्यावर ज्या माहितेचा प्रभाव आहे त्यांचा आज कदाचित या माहितीवर विश्वास बसणार नाही. पण गतकाळात काश्मीरी आणि भारतीयही डोकावले तर एक बाब लक्षात येईल ती म्हणजे शांततेचे आणि समन्वयाचे तत्वज्ञान देण्याची व आचरणात आनण्याची क्षमता काश्मीरी आजही बाळगुन आहेत. पण त्यासाठी इतिहासही माहित असण्याची गरज आहे आणि तशाच समाज-सांस्कृतीक विचारांना घेत त्यांच्याजवळ गेले पाहिजे.

लल्लेश्वरीचा जन्म अंदाजे १३२० चा. तेंव्हा आपल्या महाराष्ट्रातील संतकवयित्री मुक्ताबाईनी समाधी घेऊन २३-२४ वर्ष झाली असतील लल्लेश्वरील हिंदु व मुस्लिम समुदायांत सारखाच सन्मान आजतागायत मिळत आला आहे. लल्लेश्वरीला मुस्लिम "लल्ल अरिफा" म्हणतात. लल्लेश्वरी शैव आणि सुफी तत्वज्ञानाचा सुरेख मिलाफ घडवून आणते असे मत अनेक विद्वान तिच्याबद्दल करीत असतात. अर्थात आता या ऐक्याला सुरुंग लावणारी मंडळी लल्लेश्वरी केवळ शैव तत्वज्ञ ते लल्लेश्वरी केवळ सुफी तत्वज्ञान मांडणारी अशी लल्लेश्वरीची सांप्रदायिक मांडणी करु लागले आहेत. असे होण्याचे मुख्य कारण लल्लेश्वरीच्या काव्याचा (ज्यांना ’वाक’ असे म्हटले जाते) काश्मीरींवर असलेला अमिट प्रभाव. संत कबीरांप्रमाणेच लल्लेश्वरीवर दोन्ही समाजांनी मालकी दाखवण्याचा हा केवीलवाना प्रयत्न आहे हे स्पष्ट आहे. लल्लेश्वरीला आपले वाक लिहितांना अथवा गातांना जाणीवपुर्वक शैव किंवा सुफी विचार घेतलेले दिसत नसून जे काही आलेले आहे ते सरळ तिच्या हृदयातून आले आहे. ते तिचे संस्कार, चिंतन आणि स्वत:च्या अंत:करणातून उत्स्फुर्तपणे उमटलेले उद्गार आहेत. कोणते वाक अथवा विधान कोणत्या तत्वपरंपरेला जवळचे आहे हे शोधत तिच्यावर आपल्या कोणत्याही तत्वधारेचे आरोपन करणे ही आपल्या देशातील अनेक विद्वानांची प्रवृत्ती असली तरी हा या महान संत-कवयित्रीवर अन्याय करणारा घटक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मुळात शैव विचारधाराच समतावादी असल्याने सुफींनीही शैवांकडून काही घेतले तर शैवांनी सुफींकडून गुढवाद स्विकारला असे फार तर म्हनता येईल, पण ही देवाण-घेवाण जाणीवपुर्वक समन्वयवादी म्हणून नव्हे तर मुळातच काश्मिरी जनमानस मुळातच या विचारांना साजेशा असल्याने असे समन्वयात्मक वातावरण आपसुक बनले असे म्हणता येईल.

लल्लदेद (माता लल्ल) जेंव्हा जन्माला आली तेंव्हा काश्मीर एका वेगळ्याच राजकीय आणि वैचारिक घुसळणीतुन जात होता. इस्लामी सत्ता स्थापन झाली असली तेथील इस्लामप्रवेश हा सर्वस्वी वेगळ्या कारणाने घडला. खरे तर तोही इतिहास आपल्याला माहित असला पाहिजे. थोडक्यात तो असा-
ल्हाचन गुलाबु रिंचेन हा मुळात लडाखी राजपुत्र. तो बौद्ध धर्मीय होता. रिंचेनने आपल्या काकाविरुद्ध बंड केले. पण ते फसल्याने त्याने काश्मीरमध्ये आश्रय घेतला. त्यावेळेस सुहदेव हा राजा काश्मीरमध्ये राज्य करत होता. राजा सुहदेवाने जसे रिंचेनला आपला मंत्री म्हणून नियुक्त केले तसेच स्वात खो-यातील शाह मीर यालाही मंत्रीपदावर बसवले. त्याच काळात झुल्चु या मंगोल आक्रमकाने काश्मीरवर धाड घातली. सुहदेवाला पळून तिबेटमध्ये आश्रय घ्यावा लागला. मोगल निघुन गेल्यावर आपल्या राजाला परत आणण्याऐवजी रामचंद्र या सुहदेवाच्या अमात्याने गादी बळकावली. त्याने रिंचेनला प्रशासक म्हणून नेमले. पुढे रामचंद्राची सत्ता बंड करुन रिंचेनने उधळली आणि स्वत:च गादीवर बसला.
काश्मीरची प्रजा बव्हंशी हिंदु होती. काश्मीरमध्ये बौद्ध धर्माने एक आगळी तात्विक उंची गाठली असली व लोकही त्या धर्माला सन्मान करीत असले तरी अभिनवगुप्तामुळे मुळची शैव विचारधारा प्रबळ होती. प्रजेचा जो धर्म तोच आपणही स्विकारला तर आपले राजकीय अस्तित्व प्रबळ होईल हे त्याने हेरले. हिंदू धर्मात प्रवेश घ्यायचा म्हणून त्याने देवास्वामी या शैव गुरुंची भेट घेतली. देवास्वामीने काश्मीरी पंडितांशी विचारविमर्श केला पण वैदिक धर्माच्या प्रभावाखाली आलेल्या बहुतेक पंडितांचे मत पडले की भिन्नवंशीय आणि भिन्नधर्मीय रिंचेनला हिंदु धर्मात प्रवेश देवू नये. रामास्वामीने रिंचेनला धर्मात घ्यायचे नाकारले. खुद्द राजाला धर्मांतराची परवानगी नाकारली म्हटल्यावर रिंचेन संतप्त झाला.

तेंव्हा मध्यपुर्वेतुन आलेल्या सुफी पंथानेही काश्मीरमध्ये बस्तान बसवायला सुरुवात केली होती. बुलबुलशहा हा थोर सुफी संत काश्मीरमध्ये प्रसिद्ध होता. रिंचेनने त्याची भेट घेतली आणि इस्लाममध्ये प्रवेश केला. धर्मांतरानंतर रिंचेनचे नांव सुलतान सद्रुद्दीन शाह असे ठेवण्यात आले. त्याच्या बरोबरच त्याच्या मेव्हण्यासह दहा हजार लोकांनी इस्लाम स्विकारला. एक बुद्ध मंदिराच्या जागेवरच त्याने "बुद मशिद" (बुद्ध मशिद) बांधली. अशा रितीने काश्मीरमध्ये इस्लाम आला व पहिली मशीदही उभारली गेली.

अर्थात सुफी परंपरा आणि भारतात अन्यत्र पसरलेल्या इस्लामी परंपरेत खूप अंतर आहे. सुफी परंपरा ही गुढवादी, आत्मवादी आणि इस्लामची अनेक मुलतत्वे नाकारणारी परंपरा आहे. हीच सुफी परंपरा अन्यत्रही, विशेषत: महाराष्ट्र आणि दक्षीणेत पसरली त्यामुळे समन्वयवादी प्रयत्न हिंदु व सुफी संतांनी एकत्रीतपणे करुन भारतीय संस्कृतीचा आत्मा हरवु दिला नाही. अर्थात रिंचेनची सत्ता केवळ तीन वर्ष टिकली. त्याच्याविरुद्धही बंड झाले आणि त्याला ठार मारण्यात आले. सन १३२० ते १३२३ एवढेच त्याची राजवट. लल्लेश्वरीचे जन्मवर्ष खरे असेल तर तिचा जन्म झाला तेंव्हा रिंचेन सत्तेत आला होता. (काहींच्या मते तिचे जन्मवर्ष सन १३३५ आहे.) काश्मीरची राजकीय अस्थिरता शिगेला पोहोचली होती. कट-कारस्थाने आणि बंडांना उत आला होता. पुर्वी शैव आणि बौद्ध या प्रबळ विचारधारांत आता सुफी इस्लामचाही समावेश झाला होता. पुढे नुरुद्दिन नुराणी, ज्याला हिंदू नंदऋषी असे आदराने म्हणतात, त्याने सुफी गुढवाद आणि शैव तत्वांचा मिलाफ करुन नवाच विचार मांडायला सुरुवात केली.

या सामाजिक व राजकीय वातावरणाचा लल्लेश्वरीवर बालपणापासुन परिणाम झाला असने सहज शक्य आहे. प्रत्येकावर असा प्रभाव पडत असला तरी त्या प्रभावाच्या कक्षा व दिशाही वेगवेगळ्या असतात. लल्लेश्वरी शैव वातावरणात वाढली तसेच सुफी प्रभावाचाही तिच्यावर परिणाम होत तिची स्वतंत्र दुष्टी विकसीत होत गेली असे म्हणता येईल. काश्मीरमध्ये मुळात वैदिक प्रभाव वाढण्याआधी स्त्रीस्वातंत्र्य पुरुषाइतकेच होते. काश्मीरला लोक मुळात सती-पार्वतीची भुमी मानतात कारण काश्मीरच्या जागेवर प्राचीन काळी सतीसार नावाचे सरोवर होते आणि तेच कोरडे झाल्यानंतर तेथे मानवी वस्ती होऊ लागली अशी श्रद्धा आहे.

श्रीनगरपासुन चार मैलावर असलेल्या पांडरेस्थान या पुरातन इतिहास असलेल्या गांवी लल्लेश्वरीचा जन्म झाला. सिद्ध श्रीकांत या स्थानिक विद्वानाच्या देखरेखीखाली तिचे शिक्षण झाले. लल्लेश्वरीची बौद्धिक आणि आध्यात्मिक झेप पाहुन श्रीकांतांनी लल्लेश्वरीला शैव परंपरेतील गुढवादाशी परिचित केले. लल्लेश्वरी त्या तत्वज्ञानाकडे आकर्षित झाली आणि असे म्हणतात की तिने लवकरच आपल्या गुरुलाही मागे टाकले एवढा तिच्या आध्यात्मिक उन्नतीचा वेग होता.

लोकस्मृतींनुसार वयात आल्यावर तिचा विवाह पद्मपुर येथील एका सधन परिवारातील युवकाशी झाले. तिचे सासरचे नाव पद्मावती. तिच्या पतीचा स्वभाव वेगळा होता. तिची सावत्र सासु खाष्ट तर सासरा मात्र कनवाळु. पती तिचे आध्यात्मिक प्ररुप ओळखु शकला नाही कारण तो व्यवहारी. दोघांतील दरी वाढतच गेली आणि त्याचा फायदा तिच्या सावत्र सासुने घेतला. ती लल्लेश्वरीला दिवसेंदिवस वाईट वागणुक देवु लागली. काश्मीरमधील दंतकथा सांगतात की तिला जेवण देतांना सासु एक दगड मध्ये ठेऊन वर भात लेपत असे त्यामुळे पाहणा-याला वाटावे की लल्लेश्वरीला भरपुर खायला मिळत आहे, पण प्रत्यक्षात काही शिते वगळता तिला काही खायला मीळत नसे त्यामुळे ती कृश होऊ लागली. जेवण झाल्यावर तो दगड आणि ताट स्वच्छ करुन तिला गुपचुप सासुच्या हवाली करावे लागे. पण तिने तक्रार केली नाही. सासरा मायाळु असल तरी त्यालाही या गोष्टींची खबर नव्हती.

जवळपास बारा वर्ष हा जाच सुरुच राहिला. एके दिवशी तिच्या सास-याने आपल्या घरी एक मेजवानी आयोजित केली. त्या दिवशी सकाळी तिचा सासरा एका झ-याजवळून जात असता तेथे पाणी भरायला आलेल्या स्त्रीयांचे बोलणे त्याच्या कानावर पडले. एक स्त्री लल्लदेदला म्हणत होती, "काय गं, तुझ्या सास-याने आज मेजवानी आयोजित केलीय तर आज तुला चांगले जेवण मिळेल!" त्यावर लल्लदेद उत्तरली, "ते मोठा बोकड कापोत की छोटा, सुनेला दगडाला लेपलेला भातच खावा लागणार!" काव्यात दिलेले हे उत्तर ऐकुन सास-याला धक्काच बसला. लल्लच्या या विधानाची खात्री करुन घेण्यासाठी त्याने ती जेवायला बसताच तिच्या हातातील ताट हिसकाऊन घेतले आणि त्याला तो दगड दिसला. त्याचे मन खिन्न झाले. त्याने वारंवार लल्लदेदची माफी मागितली. पण तिच्यावरील सासुचे अत्याचार जास्तच वाढले. यामुळे लल्लदेदचा संसारामधील रसच आटला. तिने ऐन तारुण्यात घराचा त्याग केला आणि एकांतवासाचे जीवन जगु लागली. ती गांवोगांवी सत्याच्या शोधात फिरे आणि प्रेम आणि दैवी शांतीची गीते गाई. हीच गीते आता "वाख" म्हणून ओळखली जातात.

आपल्या देशात इतिहास लेखनची परंपरा नाही हे सर्वांन माहित आहे. महनीय व्यक्तींचा जीवनप्रवास मिळतो तो दंतकथांतुन. लल्लदेदही याला अपवाद नाही. तिचे जन्मवर्षही निश्चित नाही. काश्मीरी राजांचा इतिहास विविध राजतरंगिण्यांमध्ये येतो पण तो केवळ राजकीय इतिहास असल्याने अगदी जोनराजाच्या राजतरंगिणीतुनही लल्लेश्वरी गायब आहे. सोळाव्या शतकातील एका मुस्लिम लेखकाच्या काश्मीरी संतांच्या इतिहासात तेवढा तिच प्रथम उल्लेख येतो. लल्लदेदनंतर चारशे वर्षांनी लिहिल्या गेलेल्या माहितीत अर्थातच अधिकृतता नाही. लोकस्मृतींत जेवढा आहे तेवढाच तिचा इतिहास. तिची कवनेही लोकांनीच मुखोद्गत पद्धतीने सातशे वर्ष जतन केली. फरक एवढाच की आपल्याकडे संत-महात्म्यांच्या बाबतील चमत्कारांचा समावेशही केला जातो तसे तिच्या बाबतीत एवढे घडले नाही. तिचे अध्यात्म हे ख-या अर्थाने आत्मिक होते. बाह्यांवडंबराचा स्पर्शही त्याला झाला नाही.

"कोणत्या दिशेने आले मी
आणि कोणत्या दिशेने जाणार
नाही माहित मला.
जेथे आहे मी उभी तीच श्रेष्ठ जागा
जर आत्म्याचे सच्चे मार्गदर्शन मला!
केवळ श्वासांवर नियंत्रण मिळवणे
म्हणजे "योग" थोडीच असतो?"
एका वाखमध्ये एक त्रिकालाबाधीत सत्य ती सांगुन जाते-

"एक वेळ मी आभाळात दाटलेले ढग
टाकीन विखरुन
उपसुन काढेल सागरातील सारे जल
आणि बरेही करेल असाध्य रोग
पण मुर्खांना नाही समजावु शकत मी!"

ती विवस्त्र संचार करीत असल्याने तिची कुचेष्टा करनारे, तिला दगड मारणारे काही कमी नव्हते. तरीही ती आत्मविश्वासाने म्हणते,
"करा माझी कुचेष्टा
किंवा द्या मला काहीही शिव्या
मी शरणागत आहे त्या दयाळु शिवाची
मला ना शिव्यांचे दु:ख होत ना दगडांचा त्रास
राखुंडीने घासल्याने जसा आरसा स्वच्छ होतो
तसेच माझे मन निरंतर स्वच्छ होत राहते
या त्रासाच्या राखुंडीने!"
"मी माझा श्वास
घशातच किंचाळी रोखावी तसा रोखला
आणि हृदयात प्रदीप्त झाला एक प्रकाश
दाखवत मला
माझे अस्तित्व काय आहे ते.
मी अंध:काराचे अलंघ्य कडे तो प्रकाश घेऊन
ओलांडले
जागोजागी पेरत त्या प्रकाशाची बीजं!"

एके ठिकाणी ती म्हणाली, "ललदेद, सत्य हवे तर बाहेर फिरणे बंद कर आणि आपल्या आत फिर...सत्य गवसेल तुला!"

लल्लदेदने बाह्य जगाशी नाळ तोडलेली होती. जुनी वस्त्रे गळाली तर तिने विवस्त्र राहणे पसंत केले. आजीवन ती तशीच राहिली. "मुक्तीची स्थिती आली की विवस्त्रपण अमर होते." असे तिचे एक वाख अत्यंत प्रसिद्ध आहे. खरे तर कश्मीरच्या व्यक्तित्वातच लल्लदेद आहे. ती वैश्विकतेचा धाडोळा घेत जीवनाचा अमोघ स्पर्श तिच्या काव्याला देते. तिचे वाख म्हणींसारखे आजही काश्मीरींच्या तोंडी आहेत. काश्मीरमधील १९८९ च्या पंडितांच्या दुर्दैवी हत्याकांडाच्या स्थितीमुळे लल्लदेद काश्मीरमध्ये अधिकच सामयिक बनली आहे कारण तिचे अध्यात्म वा तत्वज्ञान परंपरावादाला चिकटून राहणारे नाही. ते आजही दुभंगलेली मने जोडण्याचे कार्य करु शकते.

आजच्या समाज-राजकीय समजांना एखाद्या प्रांताच्या साहित्यिक/सामाजिक इतिहासावर लादल्याने तथ्यपुर्ण चित्र कधीही सामोरे येणार नसते. काश्मीरच्या इतिहासाबाबत तर हे भान अधिक असायला हवे, पण ते तसे नाही हे आपले दुर्दैव आहे. लल्लेश्वरी उर्फ लल्लदेद ही काश्मीरची गेली सातशे वर्ष काश्मीरच्या आध्यात्मिकतेचे प्रतीक बनलेली कवयित्री. तिचे जीवनही विलक्षण. कोणत्याही प्रतिभावंत साहित्यिकावर त्याच्या काळाच्या समाजधारणांचा व इतिहासाच्या छायांचा अपरिहार्य असा प्रभाव पडत असतो. लल्लेश्वरीही त्याला अपवाद असणे शक्य नाही. शैव, बुदधीस्ट आणि सुफी तत्वज्ञानांचा प्रभाव तिच्या काव्यात जाणवतो की तीचे आत्मिक जीवनाचेच हे स्वयंभू तत्वज्ञान होते आणि त्यात इतरेजन बाह्य प्रभाव शोधतात हा एक वेगळाच अभ्यासाचा विषय आहे. लल्लदेवीच्या तत्वज्ञानात केवळ सुफी अथवा केवळ शैव मुळ शोधण्याचे वा तसे ठसवण्याचे जे प्रयत्न होतात ते गैर आहेत ते याचसाठी.
शिवाय नंतरच्या काळातील कवी आपले विचार/भावना/समज जुन्या कवीच्या किंवा लेखकाच्या लोकप्रियतेचा उपयोग करण्यासाठी अथवा ते विचार त्याचेच असा भास निर्माण करण्यासाठी घुसवुन देत असतात. अशी आपल्याकडे व्यास, कात्यायन, कौटिल्य अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्ञानेश्वर, नामदेव ते तुकारामांसारख्या संतांनाही या अर्धप्रतिभेच्या घुसखोर लेखकांनी आपल्या अचना त्यांच्या नावावर खपवुन असेच छळले आहे. त्यामुळे मुळ लेखकाचीच प्रतिमा आपण अकारण धुमिल करत आहोत याचे भान या लेखकांच्या लक्षात आलेले नसते किंवा त्या कृतीमागे अन्य काही कुटील हेतू असतो. असे असल्याने गतकाळातील साहित्याची चिकित्सा अधिक काटेकोरपणे करावी लागणार आणि मुळचे नेमके काय आहे हे ठरवावे लागणार हे निश्चितच आहे. महाराष्ट्रात अनेक संतसाहित्यात प्रक्षिप्त अभंगांची घालघुसड झाली असल्याचे लक्षात आल्यावर चिकित्सक शुद्ध आवृत्या प्रसिद्ध करण्याची गरज भासली. इतिहासाचेही आकलन त्यामुळे बदलण्यास मदत झाली. लल्लेश्वरीही याला अपवाद राहिली नाही. अनेक विद्वानांनी लल्लेश्वरीचेच असे मुळ काव्य तत्कालीन भाषा, शैली, प्रतिमा इत्यदिवरुन निश्चित करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. शिवाय लल्लेश्वरीच्या असंख्य कविता १९७५ पर्यंत तरी काश्मीर खो-यातील लोकांनी मुखोद्गत पद्धतीने जतन केलेल्या होत्या. त्यात कालौघात शब्दबदल होणेही शक्य होते. त्यात घालघुसड होणेही शक्य होते. त्यामुळे विद्वानांना लल्लेश्वरीच्या मुळ रचना, तिची शैली आणि मुळ भाषा शोधत संपादन करणे आवश्यक बनले होते.

सर मार्क आरेल स्टीन यांना शारदा लिपीत लिहिलेल्या केवळ पंधरा कविता एका त्रुटीत हस्तलिखितात मिळाल्या होत्या. दुसरे एक हस्तलिखित सापडले त्यात लल्लेश्वरीच्या ४९ रचना होत्या. १९२० साली ग्रियर्सनने लल्लेश्वरीच्या त्याला लिखित स्वरुपात झालेल्या रचनांचा अनुवाद प्रसिद्ध केला. त्या छापील स्वरुपात उपलब्ध नव्हत्या. त्या जमा करने, मुखोद्गत ठेवतांना नकळत होणारे बदल टिपने हेही एक मोठे आव्हान होते. लल्लेश्वरीच्या नावावर असलेल्या २२८ कवनांपैकी केवळ १३८ कवने लल्लेश्वरीची आहेत असे जयलाल कौल यांनी ठरवले होते. त्यात अजुनही अन्य स्त्रोतांतुन उपलब्ध झालेल्या आणि अस्सल ठरवण्यात आलेल्या कवनांचा समावेश होऊन १९७५ मध्ये पहिल्यंदाच लल्लेश्वरी छापील माध्यमात अवतरली.
असे असले तरी तिला सुफी अथवा शैव गोटात ओढण्याचे प्रयत्न होतात. याचे कारण तिच्या काश्मीरी हृदयावर शतकानुशतके राज्य करण्याच्या अलौकीक शक्तीमुळे हे लक्षात घेतले पाहिजे. तसे पाहिले तर लल्लेश्वरी शिवभक्त होती. शिवयोगिनी होती. पण तिने निवडलेला अध्यात्माचा मार्ग हा स्वतंत्र ओता. तिची अभिव्यक्ती सुफीवादासारखी गुढ असली तरी तत्वज्ञान स्वतंत्र होते. काश्मीरी मनांना धर्म वेगळे असले तरी भावनिक व सांस्कृतीक दृष्ट्या बांधुन ठेवण्याचे तिने अनमोल कार्य केले. अर्थात आपण असे काही कार्य करत आहोत याचे भान त्या उन्मुक्त योगिनीला असेल असे नाही. ती सहृदय अध्यात्मिक अंत:करनाने आपली अभिव्यक्ती करत गेली. अजरामर झाली. आज काश्मीरला समजावुन घ्यायचे असेल आणि काश्मीरींनाही समजवायचे असेल तर लल्लेश्वरीने प्रदीप्त केलेला शुद्ध अंत:करणचा दीप आपल्या हाती असायला हवा!

-संजय सोनवणी
(चपराक दिवाळी २०२० अंकात प्रसिद्ध झालेला लेख)

No comments:

Post a Comment

  Jaina Origin of the Yoga Sanjay Sonawani Yoga is thought to be first elaborated in the Upanishads. They are considered to be the last ...