Wednesday, November 4, 2020

जैन आणि सेक्युलॅरिझम

जैन धर्माची स्थापना भगवान महावीरांनी केली अशी साधारणतया मान्यता असली तरी ते खरे नाही. तेविसावे तीर्थंकर पार्श्वानाथांची ऐतिहासिकता सिद्ध झाली असून त्यांचा काळ इसवी सनापूर्वीच आठवे शतक मानला जातो. यजुर्वेदातले उल्लेख सत्य आहेत असे मानले तर आद्य तीर्थंकर भगवान ऋषभनाथ हेही ऐतिहासिक पुरुष होते असे मानावे लागते आणि डा. सर्वपल्ली राधाकृष्णनसारख्या सारख्या विद्वानांनी ते मान्यही केले आहे. यजुर्वेदात ऋषभनाथ, अजितनाथ आणि अरिष्टनेमी या इतिहासातील तीर्थांकारांची नावे आलेली असून जैन धर्म वेदपूर्व प्राचीन समन परंपरेतून निर्माण झाला. भागवत पुराणानेही ऋषभनाथ जैन धर्माचे संस्थापक असल्याचे नोंदवलेले आहे.

सिंधू संस्कृतीने वैभवाचे टोक गाठल्यानंतर जी सुखोपभोगाची परंपरा निर्माण झाली त्याची प्रतिक्रिया विरक्ती आणि अपरीग्रहाच्या रूपाने उमटणे स्वाभाविक होते. समाज जेंव्हा संपत्ती निर्माण आणि उपभोग यांना महत्व देवू लागतो तेंव्हा समाजात विषमताही निर्माण होणे स्वाभाविक असते. त्यामुळे समाजात शोषक आणि शोषित अशी वाटणी होणेही अपरिहार्य बनून जाते. समाजात अनेक दोष शिरू लागतात आणि ही अवस्था सिंधुकालातील वैभवशाली स्थितीमुळे निर्माण झाली. तत्कालीन समाजातील विद्वानांनी व विचारकांनी याची प्रतिक्रिया म्हणून जे तत्वज्ञान निर्माण केले त्याला “समन” तत्वज्ञान म्हणतात. समन हा प्राकृत शब्द असून जरी “श्रमण” असे त्याचे कृत्रीम संस्कृतकरण केले जात असले तरी ते चुकीचे असून समन याचा अर्थ “समान” असाच प्राकृत शब्दकोशाने दिला आहे आणि तोच बरोबर व त्या संस्कृतीचे महत्व अधोरेखित करणारा आहे.

या आरंभीच्या विचारकांनी गृहस्थी जीवनाचा त्याग करून,स्थायी जीवन सोडून वन-अरण्यात मुक्त संचार करायला सुरुवात केली आणि संपत्तीसंग्रहातून निर्माण होणा-या  दु:ख्खाचा निषेध केला. एवढेच नव्हे तर सत्य, अहिंसा आणि सर्व जीवामात्रांकडे समान दृष्टीने पाहण्याचा फिरून उपदेश करायला सुरुवात केली. काहींनी तर वस्त्रांचाही त्याग केला. अर्थात या विचारपरंपरेत अनेक पुरुष व महिला सामील झाले असले तरी त्यांच्या तत्वज्ञानात वेगवेगळेपणा होता. कारण ऐहिक जीवन कसे असावे याबाबत एकमत असले तरी जीवनाचे अंतिम ध्येय आणि ते प्राप्त करण्याच्या मार्गाबद्दल विभिन्न विचार होते. प्रत्येक विचारकाला आपापले अनुयायीही होते. जीवनाविषयकचे कुट प्रश्न सोडवतांना असे वेगवेगळे मार्ग निर्माण होणे स्वाभाविक होते. त्यात कालौघात असंख्य पंथही निर्माण झाले आणि अनेक विस्मृतीतही गेले. उदा. महावीरांच्या काळातच समन परंपरेतील किमान २४-२५ पंथ होते याच्या नोंदी आपल्याला जैन आणि बौद्ध साधनांतून मिळतात. व्रात्य, आजीवक हेही त्यातीलच गट. आज ते पंथ अस्तित्वात नाहीत. आचरण मार्ग आणि अंतिम ध्येयाबाबतचे तत्वज्ञान ज्यांचे उदात्त आणि सर्वसमावेषक होते ते समन पंथ टिकून राहिले. भारतात टिकून राहिलेला आणि सलग इतिहास असलेला “जैन” हा समन परंपरेतील एकमेव धर्म आहे असे आपल्याला दिसून येते. बौद्ध धर्मही समन परंपरेतिलाच पण गेल्या सहस्त्रकात उतरती कळा लागत तो शेवटी भारतातून नामशेष झाला होता. असे असले तरी अन्य देशांत मात्र तो प्रचंड वाढला.

कोणत्याही धर्मात “सर्वधर्म-समभाव” नामक महनीय तत्व आहे की नाही हे त्या धर्माचा इतिहास, तत्वद्न्यान आणि कर्मकांडात्मक जीवनावरून ठरते. तसे पाहिले तर जगातील बव्हंशी धर्म हे एकारलेले असतात, परधर्मीयांबाबत अत्यंत असहिष्णू असतात असे म्हटले जाते. तसा प्रचार तरी केला जातो. या दृष्टीने आपण जैन धर्म आणि सेक्युलॅरिझम याचा विचार केला पाहिजे.

या धर्माचा इतिहास आपण पाहिला तर या धर्माने इतर धर्मांना जसे आपले मौलीक तत्वज्ञान दिले तसेच इतर धर्मांपासून अनेक गोष्टींचा स्वीकारही केला. संघर्षापेक्षा समन्वयाची भूमिका ठेवण्याकडे जैन साधू-साध्वीन्चा कटाक्ष असल्याचे जैन आगमे ते पुराणांतून दिसून येते.

पहिली बाब म्हणजे अन्य धर्मातील देवतास्वीकार. जैन धर्माने बौद्धाम्प्रमाने नंतर भारतात आलेल्या आणि आक्रमकतेने प्रचार करणा-या वैदिक धर्माशी संघर्षाची भूमिका घेतली नाही. वैदिकांची इंद्र-वरुण इत्यादी देवता दुय्यम स्वरूपात क होईना स्वीकारल्या व तीर्थकरांच्या जीवनकथांतही त्यांना स्थान दिले. वैदिक धर्मीयांच्या यज्ञांना त्यांनी मात्र टाळले आणि ते स्वाभाविक होते. सिंधू कालापासून चालत आलेला स्थानिक पुरातन लोकधर्म (ज्याला आपण आज हिंदू धर्म म्हणतो) हा लिंग पुजकांचा, प्रतिमापुजकान्चा धर्म होता. या लोकसंस्कृतीत यक्षांना मोठे स्थान होते. जैन धर्माने प्रत्येक तीर्थकराला  संरक्षक यक्ष-यक्षीणीची एक जोडी असतेच. ऋषभनाथांचे दुसरे पर्यायी नाव आदिनाथ असून त्यातून शिवाशीही तादात्म्य साधले गेले आहे. एवढेच नव्हे तर २४ पैकी किमान सतरा तीर्थकरांच्या नावात “नाथ” हे संबोधन आलेले आहे. ही संघर्षाची नसून समन्वयाची प्रक्रिया होती हे सहज दिसून येते. आपले तत्वज्ञान आणि कर्मकांड स्वतंत्र ठेउनही एकार्थाने हा अन्य धर्मांबद्दल दर्शवलेला आदरभाव आहे असेही आपल्याला दिसते. यामुळे जैनांचा अन्य धर्मियांशी जैनांच्या बाजूने सहसा संघर्ष झालेला दिसत नाही. वैदिक धर्माने अन्य धर्माना एकतर आपल्या पंखाखाली घेतले वा संपवले, पण जैन धर्माबाबत तसे अनेक प्रयत्न करूनही त्यांना ते जमले नाही. याचे कारण म्हणजे समन्वयवादी भूमिकेमुळे जनसामान्यातही या धर्माने स्थान मिळवले होते असेच आपल्याला इतिहासावरून दिसते.

सर्व-धर्म समभावाचे मुलभुइत तत्वज्ञान आपल्याला जैनांच्या “अनेकांतवादात” सापडते. किंबहुना हे तत्वज्ञान जैन तत्वद्न्यानाचा मुलभूत आधार आहे. अनेकांत वाद म्हणतो की सत्य समजायचे अनेक मार्ग आहेत. एकाच गोष्टीकडे भिन्न दृष्टीकोनातून पाहिले की सत्य आणि वास्तविकता वेगवेगळ्या पद्धतीने सामोरे येतात. एकाच दृष्टीकोनातून पाहिले तर पूर्ण सत्य सामोरे येऊ शकत नाही. प्रत्येक वस्तू अनंत गुणधर्मांचे प्रकटीकरण असून त्यात तेवढेच विरोधी तत्वांची युग्मे सहअस्तित्वात असतात. प्रत्येक व्यक्तीचे आकलन वेगळे असल्याने त्याला दिसणा-या विशेषता हा त्याच्या दृष्टीकोनाचा परिपाक असतो. हे तत्वज्ञान ईश्वरी आद्न्यांच्या आधारावर आदेशात्मक नसून वस्तू अथवा प्रश्नांकडे पाहण्याची एक व्यापक दृष्टी देते. अनेक धर्मांची सत्याकडे पाहण्याची वेगवेगळी दृष्टी असते अथवा असू शकते ही मुलभूत मान्यताच असल्याने यात संघर्षाला स्थानच नाही. कोणता धर्म कोणाला अंतिम प्रेषित अथवा ईश्वर अथवा दैवत मानतो कि तो नास्तिक आहे हाही मुद्दा नसून तो व्यक्तीने अथवा एखाद्या समुदायाने त्याच्या दृष्टीने सत्याकडे पाहिले आहे म्हटल्यावर पूजनीय कोण? अंतिम सत्य काय? मोक्ष कशाने मिळेल? मानवाचे अंतिम कल्याण कशात आहे? यासारख्या प्रश्नांकडे पाहण्याच्या इतर धर्म म्हणजे पद्धती आहेत ही मान्यता मुळातच तत्वज्ञानात असल्याने जैनांचा इतरांशी तसाही संघर्ष होण्याचे कारण नव्हते.

बरे, हे झाले तत्वद्न्यानाचे.  मुलभूत धर्म तत्वज्ञान त्या धर्माच्या लोकांनाही बारकाईने माहित असते असे नाही. किंबहुना नसतेच. पण कर्मकांडात्मक मंत्र मात्र रोजच्या म्हणण्यात असतात. त्यांना पावित्र्यही असल्याची श्रद्धा असल्याने त्यातील मुलार्थ तरी मंताजाप करणा-या धार्मिकांस माहित असतो. जैनांचा मूलमंत्र आहे णमोकार मंत्र. हा आहे जैन धर्मातला सर्वात महत्वाचा मंत्र. या मंत्राला मूलमंत्र, महामंत्र, पंचनमस्कार मंत्र किंवा पंचपरमेष्ठी मंत्र असेही म्हटले जाते. खरे म्हणजे जैन तत्वज्ञानाचे मुलभूत सार या मंत्रात आले असल्याने अभ्यासकांच्या दृष्टीनेही हा मंत्र महत्वाचा आहे.

 
या मंत्राची विशेषत: ही आहे की यात कोणाही अमूर्त देवी-देवतेला वंदन केलेले नाही कारण विश्व निर्माता, मानवी जीवनाचा नियंता असलेला, प्रार्थना करुन संतुष्ट होणारा देव किंवा ईश्वर ही संकल्पना जैन धर्मात नाही. जैनांच्या दृष्टीने प्रत्येक जीव किंवा आत्मा हाच देव आहे पण कर्मामुळे आपल्या उच्च कोटीवरुन तो खाली घसरलेला आहे. त्यावर मात करत तो उच्च कोटी प्राप्त करु शकतो व आपल्या मुळच्या इश्वरी रुपाला पोहोचू शकतो. एकमात्र देव तर नव्हेच एकमात्र अरिहंत ही संकल्पनाही जैन धर्मात नाही. हा धर्म समष्टीमधील देवपणाला पाहतो. त्यामुळेच या मंत्रात अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधु-साध्वींना वंदन केलेले आहे. कोणत्या अमूर्त दैवत संकल्पनेला नाही. किंबहुना मानवी जगापारच्या महाशक्तीशाली अद्भूत आणि कर्ता-करविता अशा ईश्वराची संकल्पना जैनदर्शन मान्य करत नही तर उलट मनुष्यमत्रात किंवा सर्व जीवांत जैन नुसता देव पाहत नाहीत तर तेच देवकोटीला पोहोचू शकणारे देव आहेत  असे मानतात.

 अरिहंत म्हणजे ज्याने आपल्या काम-क्रोध-लोभ-मत्सर आदि विकारांचा पराजय केला आहे, त्यांच्यावर विजय मिळवला आहे तो अरिहंत. सिद्ध म्हणजे मूक्त जीवात्मा. भारतात एके काळी सिद्ध संस्कृती वेगवेगळ्या धर्मांत व पंथांत पसरलेली होती आणि "सिद्ध" या शब्दाचे पारिभाषिक अर्थ प्रत्येक संप्रदायाने आपापल्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने लावले आहेत. जैन धर्मात अभूत सिद्धी मिळवतो तो सिद्ध असा अर्थ नसून निर्वाणप्रसंगी जो सर्व पाशांतून मूक्त आणि स्वतंत्र झालेला असतो तो सिद्ध असा अर्थ आहे. (आचारांग सुत्त १.१९७) मूक्त जीवात्मा म्हणजे सिद्ध असे येथे थोडक्यात म्हणता येईल. किंबहुना अरिहंतानंतरची उच्च कोटी म्हणजे सिद्ध अशी ही संकल्पना आहे.

 
आचार्य म्हणजे आध्यात्मिक मार्गदर्शक. ज्याची यात्रा केवलज्ञानाच्या दिशेने सुरु आहे आणि जो मनुष्यमात्राला दिशा देतो, नवे ज्ञान प्राप्त करून समाजाला देतो तो आचार्य तर उपाध्याय म्हणजे शिक्षक किंवा सामान्यातिसामान्यांनाही कोणत्या दिशेने आणि कसे जायचे हे शिकवणारी व्यक्ती. साधू म्हणजे अशी व्यक्ती की ती स्त्री असेल अथवा पुरुष, सर्वांग परित्याग केलेला आहे, तपस्या हाच ज्याचा एकमात्र उद्देश आहे आणि केवलज्ञान मिळवण्याचा अविरत प्रयत्न सुरु आहे ती.

 
या मंत्रातील विशेषत: अशी की ती यच्चयावत जगातील सर्व अरिहंत, सर्व साधू, सर्व उपाध्याय, सर्व सिद्ध आणि सर्व आचार्यांना एकत्रीतपणे नमस्कार केला आहे. कोणत्याही एका विशिष्ट व्यक्तीला यात स्थान नाही. यात कोणताही विशिष्ट धर्मही अभिप्रेत नाही. एका अर्थाने ही सर्व धर्मीयांची प्रार्थना आहे. ही समष्टीची मुलभूत संकल्पना आहे. सर्व मानवजातीत या पाचही परमेष्ठींपैकी एक होण्याची योग्यता आहे आणि जे झालेत त्या सर्वांना कोणताही धार्मिक अभिनिवेष न आणता नमन करण्याची उदारता आहे. शिवाय या पाचही पदांना विशिष्ट अर्थ आहे आणि आध्यात्मिकच नव्हे तर व्यावहारिक पातळीवरही ही संकल्पना लागू पडते. या सर्वांना नुसता नमस्कार करणे हे अनुस्युत नसून प्रत्येक व्यक्तीने यातील पाय-या ओलांडत “केवली” बनावे असे अभिप्रेत आहे. थोडक्यात कोणत्याही कर्ता-करवित्या ईश्वरी संकल्पनेच्या आहारी न जाता मनुष्यालाच देव होण्याची संधी आहे कारण तोच देव आहे असा व्यापक मानवविचार मांडणा-या जैन धर्माचा हा मंत्र आहे आणि साररुपात ते तत्वज्ञान मांडनारा हा मंत्र आहे. या मंत्राचा पहिला शिलालेखीय पुरावा इसवी सन पूर्व १६२ मधील जैन सम्राट खारवेलाच्या उदयगिरी टेकड्यांमधील हाथीगुंफा शिलालेखात मिळतो. हा मंत्र त्याहीपेक्षा पुरातन आहे हे उघड आहे.

ज्या काळात भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक संघर्षांची रेलचेल उडाली होती, विविध धर्म आणि पंथ तत्वज्ञान व इष्ट देवतांवरून वैचारिक वादंगे माजवत होते त्या काळात हा मंत्र, खरे तर प्रार्थना, जन्माला यावी हे विशेष म्हणावे लागेल. कोणताही धार्मिक अभिनिवेश न आणता, अगदी तीर्थांकारांचेही नाव न घेता एखादा धर्ममंत्र असू शकतो आणि तोच ख-या अर्थाने सर्वधर्म समभावाचे प्रतीक बनू शकतो.

जगातील सर्व धर्मांत सुसूत्रता यावी, वैरभाव कमी व्हावा यासाठी १८९३ मध्ये शिकागो येथे भरवण्यात आलेली पहिली विश्व धर्म संसद ही एकोणिसाव्या शतकातील सर्वात मोठ्या जागतीक धर्म-संस्कृतीच्या चळवळीची सुरुवात होती. परस्पर धर्मांबद्दलचे अज्ञान, समज-गैरसमज, अहंकार, अन्यधर्मियांबद्दलचा तुच्छतावाद किमान सौम्य व्हावा आणि अखिल मानवजातीत बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी कोणती तत्वे उपयुक्त ठरतील यावर चर्चा करण्यासाठी जगभरातून प्रत्येक धर्मातील विद्वानांना तेथे पाचारण करण्यात आले होते. असे असले तरी या संसदेतील काही वक्त्यांनी औचित्यभंग करत विशेषत: हिंदू धर्मावर टीका करण्यात धन्यता मानली. स्वामी विवेकानंदांचे भाषण आधीच होऊन गेले होते. जैन धर्माचे प्रतिनिधी म्हणून तेथे जैन धर्म व तत्वज्ञानाचे प्रकांड विद्वान बॅरिस्टर वीरचंद गांधी उपस्थित होते. २५ सप्टेंबर १८९३ रोजी त्यांचे जैन धर्मावर भाषण होते. पण त्यांनी जैन धर्मावर बोलायला सुरुवात करण्याआधी प्रथम हिंदू धर्मावर केल्या गेलेल्या टीकेचा विद्वत्तापुर्वक समाचार घेतला. धर्म-संसदेच्या इतिवृत्तात लिहिले आहे की त्यांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या पडत होत्या आणि टीकाकार खजिल होऊन गेले होते. अन्य धर्मांबद्दलचा तुच्छताभाव कमी व्हावा हे धर्मसंसदेचे ध्येय असतांनाही आपलीच धर्मतत्वे विसरत काही विद्वानांनी औचित्यभंग केला पण बॅरिस्टर वीरचंद गांधी या तरुण विद्वानाने धर्मसंसदेला आपल्या मुळ ध्येयाकडे परत खेचून आणण्याचे अपार मानवतावादी बुद्धीकौशल्य दाखवलेअसे गौरवोद्गार धर्मसंसदेचे आयोजक असलेले रेव्हरंड जॉन बॅरोज यांनी काढले. इतकेच नव्हे तर त्यांनी गांधींचे जैन धर्मावरील भाषण प्रस्तावनेसहित प्रसिद्ध केले. या भाषणाने प्रभावित झाल्याने धर्मसंसदेच्या समारोप समारंभात वीरचंद गांधींना पुन्हा भाषण देण्यासाठी पाचारण केले गेले. हे उत्स्फुर्त भाषण एवढे गाजले की नंतर अमेरिकेत त्यांना शेकडो भाषणे द्यावी लागली.

वीरचंद गांधी यांनी एका अर्थाने सर्वधर्म समभावाचा प्रत्यय या पहिल्या-वहिल्या धर्मसंसदेत दिला ते त्यांना जैन तत्वज्ञानाचा मुख्य गाभा समजला होता म्हणून.

त्या अर्थाने आज जगाला ख-या अर्थाने सर्वधर्म समभाव समजायचा असेल तर हे जैन तत्वज्ञान पुरेसे आहे. असे असले तरी खुद्द जैन धर्मी आज श्वेतांबर-दिगंबर या मुख्य पंथांत विभागले गेलेले तर आहेतच पण अनेक उपपंथांच्या निर्मितीमुळे पंथा पंथांतच सामरस्याचा अभाव आहे. मुलभूत तत्वद्न्यानाचा आशय न समजून घेता कर्मकांडात्मक व्यावाहारांतच तल्लीन होण्याची प्रवृत्ती बळावलेली आहे. अन्य धर्मांशी आजही जैन संघर्ष करत नसले तरी आपल्याच धर्मांतील पंथांत स्पर्धा, असुया व कर्मकांडात्मक बडीवाराची भरमार आहे. जैन इतिहास आणि तत्वज्ञान यावर अलीकडे अधिक गांभीर्याने संशोधक व अनेक साधू-साध्वीही वळाले असले तरी त्यांचे प्रयत्न मर्यादित आहेत. खरे तर आपल्या तत्वद्न्यानाचे महत्व त्यांनाच समजले नसावे की काय असे वाटावे अशी स्थिती आहे.

हे अये असले तरी जैन तत्वज्ञान मुळात जैनानीच अनुसरावे व प्रचारित करावे असे काही नाही. जैन तत्वज्ञानात जगाला मार्गदर्शन करत नैतिक मुल्यांची प्रतिष्ठापना करण्याचे सामर्थ्य आहे. आणि धर्म नव्हे पण तत्वज्ञान प्रसारित करण्यासाठी तटस्थ अन्य धर्मांतील विचारवतांनी पुढे यायला हवे आहे.

धर्मद्वेष धार्मिक अहंकारातून येतो. त्यात स्वार्थही निहित असतात...मग ते राजकीय असोत की आर्थिक. या स्वार्थांबाहेर पडत जीवनविषयक मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करत अखिल मानव जातीला स्नेहाच्या, प्रेमाच्या धाग्यात एकत्र बांधायचे असेल तर अनेकांतवाद अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. त्या तत्वद्न्यानाची आधुनिक परिप्रेक्षात नव्याने रचनाही होऊ शकते. मनुष्याला “वैश्विक मानव” बनवण्याचे उदारमतवादी सामर्थ्य जैन तत्वज्ञानात आहे हे मात्र सर्वांनाच लक्षात घ्यावे लागणार आहे!

-       संजय सोनवणी


(आंतर भारती दिवाळी अंक, २०२० मध्ये प्रकाशित)



No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...