Friday, January 15, 2021

भाऊ परतौनी आला...

 भाऊ परतौनी आला-संजय सोनवणींची खिळवून ठेवणारी कादंबरी-प्रा.हरी नरके



संजय सोनवणी हे चतुरस्त्र लेखक आहेत. ज्या ताकदीने ते वैचारिक ग्रंथ लिहितात त्याच ताकदीने ते कादंबर्याही लिहितात. काही लेखक ललित लेखन उत्तम करतात पण ते वैचारिक साहित्यापासून दूर असतात. तर काही याच्या उलटही असतात. या दोन्हींवर मांड असणं म्हणजे एकाच वेळी दोन्ही हातात तलवारी घेऊन दोन्ही हातांनी लढण्याएव्हढे अवघड काम आहे. त्यांची नवी ऎतिहासिक कादंबरी वाचली.
ही कादंबरी पानिपताच्या लढाईत गायब झालेल्या भाऊसाहेब पेशव्यांवर आहे. ती एकदा हातात घेतली की पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवता येत नाही.
गतिमान कथानक, अनेक पातळ्यांवरची गुंफन, कलात्मकता आणि इतिहासावरची पकड यांच्यामुळे ही कादंबरी गारूड करते. यातला काळ १७६१ नंतरचा आहे. लेखकाचा इतिहासाचा अभ्यास इतका मजबूत आहे की तो काळ, त्यावेळचे समाजजीवन, पेशवाईतली सत्तेची साठमारी, अनागोंदी, नाना फडणवीसची कुटील राजनिती, निष्ठुरता याचे लेखकाने घडवलेले दर्शन चकित करणारे आहे.
सोनवणी हे चित्रशैलीचे लेखक आहेत. जणू त्या घटना आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत असे प्रत्ययकारी, कलात्मक आणि पकड घेणारे रहस्य ते आपल्याला उलगडवून दाखवतात. पानिपतच्या लढाईत भाऊ मारले गेले असेच मानले जाते. तरिही भाऊसाहेबांचे अनेक तोतये नंतर उपटले होते, त्यांची ओळख पटवून त्यांना शिक्षा करण्यात आली, हे आपल्याला माहित असते. इथे मात्र वेगळेच घडते. ते विस्मयकारी असूनही विश्वासार्ह आहे. रहस्यकथेचा थरार असलेली ही कादंबरी अनेक पातळ्यांवर वाचकांना गुंतवून ठेवते. वाचनियता, कलात्मकता आणि ऎतिहासिक विश्वासार्हता या मापदंडावर ही कादंबरी फार उंचीवर जाते.
कादंबरीत घडोघडी वाटा, वळणे आणि उड्या यांची मजा आहे. तरिही विेषयांतर नाही. अपघात आणि धक्के असले तरी त्यामुळे रसभंग न होता वाचक अधिकच गुंतत जातो.
एक अफलातून कादंबरी असेच " भाऊ परतौनी आला" चे वर्णन करावे लागेल. अवघ्या १२४ पृष्ठांमध्ये जी जादूभरली सफर सोनवणी वाचकांना घडवतात ती बहारदार आहे.
काही जात्यंधांनी कादंबरी न वाचताच सोनवणींना ट्रोलिंग केले होते. सोनवणींची दृष्टी नितळ, निरामय आणि निर्वैर आहे. त्यांच्यावर जातीयतेचा आरोप करणारे विकृतच असले पाहिजेत. सोनवणी माझे इयत्ता आठवीत वर्गमित्र होते. गेल्या वीसेक वर्षात मी त्यांची शंभरेक पुस्तकं वाचली. त्यांचे संशोधन, निर्भिडपणा, लढाऊबाणा, शोधाच्या स्वतंत्र वाटा आणि विषयांची विविधता केवळ स्तिमित करणारी आहे. त्यांच्या असूरवेद, आणि पानिपत यासारख्या कादंबर्या तर मराठीच्या लेण्या आहेत.
कादंबरीची गुणवत्ता, वाचकावर गारूड करण्याची ताकद, प्राजक्त प्रकाशनचे जालिंदरभाऊ चांदगुडे यांची देखणी निर्मितीमुल्ये, संतोश धोंगडे यांचे कमाल मुखपृष्ठ आणि अवघी रुपये १६० इतकी रास्त किंमत यामुळे हे पुस्तक सामान्य वाचकांनी अवश्य संग्रही ठेवायला हवे. अवघ्या महिन्यापुर्वी ती प्रकाशित झालीय. सर्व पुस्तक दुकानांमध्ये उपलब्ध आहे.
पुस्तकासाठी संपर्क- ९८९०९५६६९५, प्राजक्त प्रकाशन, १३२८/२९ शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, पुणे, ४११ ००२,

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...