Saturday, April 3, 2021

ऋग्वेदातील सरस्वती नेमकी कोठे?


04 Apr 2021

 


विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवीपूर्व अभ्यासक्रमात सिंधू संस्कृतीचे नामकरण 'सरस्वती संस्कृती' करण्याचे सूतोवाच केल्याने इतिहास संशोधकांमध्ये खळबळ उडाली असली तरी सरकार व सरकारी विलान मात्र या बदलामुळे संतुष्ट आहेत.

खरे तर पुरातत्त्व खात्याने २०१६ मध्येच आपल्या अहवालात पूर्वीचे सारे संकेत धुडकावून लावत घग्गर नदीला 'सरस्वती' असे संबोधले होते. अभ्यासक्रमाचे झपाट्याने वैदिकीकरण सुरू असल्याचे गेल्या काही वर्षांतील हालचालींमुळे दिसते. या लेखात आपल्याला मुळात हा सरस्वतीचा आग्रह का आणि ही नदी मुळात कोठे वाहते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

घग्गर म्हणजे सरस्वती आहे काय, हे आधी आपण ऋग्वेदाच्याच आधारे पाहूयात. ६.६१, ७.९५ व ७९६ ही तीन सरस्वतीसुक्ते असून अन्य काही सूक्तांतही सरस्वती नदीचे उल्लेख आहेत. दुसऱ्या मंडलातील एका सूक्तात (२.४१.१६-१७) वैदिक ऋषींनी सरस्वतीला देवी व माता मानून तिची प्रार्थना केली आहे. या सूक्तात या नदीला 'नदीतमे, अम्बितमे, देवीतमे' असे संबोधले आहे. वेदांत सिंधू, सरस्वती व शरयू यांची गणना महानद्यांत केली असून सरस्वती ही सर्वश्रेष्ठ नदी आहे. ऋग्वेदातील दुसरी एक महानदी म्हणजे शरयू होय. (ऋ. १०.६४.९, ४.३०१८, ५.५३.९) ही नदी अफगाणिस्तानात आजही हरोयू अथवा हरी-रुद म्हणून वाहते. (अवेस्तन भाषेत रुद म्हणजे नदी). सरस्वती ही अवेस्त्यामध्ये या प्राचीन पारशी धर्मग्रंथामध्ये 'हरैवेती' म्हणून उल्लेखली गेलेली नदी असून आज ती हेलमंड या नावाने ओळखली जाते. याच हेलमंड नावाचे खोरे अफगाणिस्तानात प्रसिद्ध आहे. सरस्वतीप्रमाणेच शरयू नदीही हिंदुकुश पर्वतराजीत उगम पावते. गोमल नदीचेही उल्लेख ऋग्वेदात आहेत आणि ही नदीसुद्धा गुमल या नावाने आताच्या अफगाणिस्तान व पाकिस्तानातून वाहते. ऋग्+वेदाचा भूगोल सर्वस्वी दक्षिण अफगाणिस्तान आहे. सरस्वती नदी ही दक्षिण अफगाणिस्तानातून वाहते. तिथे तिला हरैवेती किंवा हरवती असं म्हणतात. भारतात या नावाची कोणतीही महानदी अस्तित्वात नाही. ज्या टोळ्यांचे उल्लेख ऋग्वेदात त्या टोळ्यासुद्धा इराणमधल्या आहेत. उदा. तुर्वसा (तुराणी), पार्थ (पार्थीयन), पख्त (पख्तून), भलानस (बलुची), परशु (पर्शियन), आर्य (इराण) इ. या जमाती आजही इराण, अफगाणिस्तान, पश्चिमोत्तर व तुर्कस्थानात अस्तित्वात आहेत.

आता अफगाणिस्तानात असलेली मूळची सरस्वती भारतात उचलून आणण्याचे कारण काय, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे कारण आहे, या नदीच्या काठावर सापडलेली दीड हजारांपेक्षा अधिक सिंधू संस्कृतीकालीन अवशेष. आर्य येथलेच आणि सिंधू संस्कृतीचे निर्मातेही वैदिकच हे सिद्ध करण्याच्या नादात भूगोलच नव्हे तर भूगर्भशास्त्रसुद्धा बदलण्याचा हा अशास्त्रीय प्रयत्न आहे. महत्त्वाची बाब अशी की, पुरातत्त्वीय संशोधनांनुसार घग्गर ही संपूर्ण १७५० पूर्वी पर्जन्यमान चांगले असल्याने एक मोठी नदी असली तरी ती नेहमीच मान्सूनवर अवलंबून होती. हिमालयातून तिचा उगम होत नाही. घग्गरच्या पात्रातील गाळ व रेतीवर केलेल्या अनेक भूशास्त्रीय परीक्षणांतून हे सिद्ध झाले आहे की, इसपू दहा हजार वर्षांपासून त्यात हिमालयीन गाळाचे अवशेष मिळत नाहीत. ऋग्वेदात वर्णन केल्याप्रमाने पहाडांतून झेपा घेत खाली उतरणारी, रथसदृश वेगवान अशी घग्गर पुरातन काळातही नव्हती. इसपू १७५० नंतर सिंधू खोऱ्यात पर्जन्यमान खालावले. विदेश व्यापार ठप्प झाला. नागरी वसाहती ओस पडू लागल्या. लोकांनी जगण्याच्या पद्धती बदलल्या. घग्गर नदीचे पात्र आक्रसले, तर वाळवंटात काही ठिकाणी ही नदी रेतीखालून क्षीण वाहू लागली. पाकिस्तानात हक्रा येथे पुन्हा पात्रात आली.

घग्गर नदीच्या खोऱ्यात जपानी व ब्रिटिश संशोधकांनी केलेल्या भूशास्त्रीय संशोधनात घग्गर ही वैदिक सरस्वती असूच शकत नसल्याचे विपुल पुरावे समोर आलेले आहेत. घग्गर नदी ही गेल्या दहा हजार वर्षांपासून मान्सूनवर अवलंबून असलेली सामान्य नदी होती, हिमालयातून तिला कधीही जलपुरवठा होत नव्हता, हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे ऋग्वेदातील सामर्थ्यसंपन्न देवतेसारखी 'अंबितमे' मानली गेलेली, हिमालयापासून उगम पावलेली सरस्वती घग्गर नव्हे. शिवाय वैदिक विलान 'उपग्रहीय चित्रांमुळे हरवलेली सरस्वती सापडली.' असा दावा करत होते; पण प्रत्यक्षात घग्गर नदी कधीही हरवलेली नव्हती. ती आजही मान्सूनमध्ये वाहती नदी आहे. तिला १९८८ ते २०१३ पर्यंत आठ मोठे पूरही आल्याची नोंद आहे. मग जे हरवलंच नव्हतं, गुप्तच झालेलं नव्हतं ते कसं सापडेल? उलट अवेस्त्यातील हरहवतीची वर्णनं आणि ऋग्वेदातील सरस्वतीची वर्णनं एकसारखी आहेत, हा योगायोग नाही. वैदिक विदवानांनी हिडेकू मेमेकू, गिसन, तोशिकी ओसाडा, पिटर क्लिफ्ट, संजीव गुप्ता यांसारख्या भूशास्त्रसंशोधकांनी या दशकातच केलेल्या घग्गरच्या पात्रावरील भूशास्त्रीय संशोधनं वाचायचे कष्ट घेतले पाहिजेत.

ऋग्वेदाची रचना ज्या खळाळत्या सरस्वतीकाठी झाली, ती सरस्वती भारतातली असू शकत नाही. कारण मुळात ऋग्वेदाची रचना इसपू १५०० ते इसपू १२०० या काळात सुरू होती आणि भारतातील घग्गर नदी वेदरचना सुरू होण्यापूर्वीच आटली होती हे पुरापर्यावरणाने सिद्ध केले आहे. त्यामुळे घग्गर नदीला बळजबरीने सरस्वती ठरवत एका संस्कृतीचेच नामांतर करत तिच्या निर्मितीचे नसते श्रेय घेण्याचा प्रयत्न सांस्कृतिक दहशतवादात मोडतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. वैदिक धर्म येथलीच निर्मिती सिद्ध करण्याचा आटापिटा भारतीय ज्ञानपरंपरेशी विसंगत आहे. सिंधू-घग्गर संस्कृती वैभवाच्या शिखरावर गेली व तिचा ऱ्हासही झाला (इसपू ७००० ते इसपू १७५०) तेव्हा वैदिक धर्माचा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे सिंधू संस्कृतीशी 'वैदिक' संबंध जोडण्याचा प्रयत्न अश्लाघ्य आहे; पण हे सरकार मुळात वैदिकवादी असल्याने आणि कोणत्याही ऐतिहासिक तथ्यांशी त्याला कर्तव्य नसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे.

सरस्वती नदीकाठी ऋग्वेद लिहिला गेल्याने ती नदी वैदिकांना पूज्य वाटणे स्वाभाविक आहे. सरस्वती नदीचे दैवीकरण करत तिला ज्ञानाची देवता मानणेही समर्थनीय आहे; पण संस्कृती वर्चस्ववाद निर्माण करत आपली पाळेमुळे येथीलच आहेत, हे दाखवण्याच्या केवीलवाण्या प्रयत्नांतून त्या नदीचा भूगोलच बदलून टाकणे, हे जागतिक ज्ञानक्षेत्रातही हास्यास्पद ठरते आहे आणि याचे भान सरकारला नसले तरी सर्वसामान्य जनतेला असले पाहिजे. वैदिकांनी त्यांच्या व्यक्तिगत स्तरावर काय मान्य करायचे व काय अमान्य हा त्यांचा अधिकार आहे; पण अशास्त्रीय अनैतिहासिक दावे जर अभ्यासक्रमात घुसवून धादांत खोटा इतिहास सर्वांच्या माथ्यावर मारला जाणार असेल तर मात्र त्याचा विरोध व्हायला पाहिजे. सरस्वती नदी भारतात नाही आणि वैदिकांचा सिंधू संस्कृतीशी कसलाही संबंध नाही, हे वारंवार सिद्ध झालेले ऐतिहासिक सत्य आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.


No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...