Friday, March 19, 2021

मुत्सद्दी-लढवैय्ये सुभेदार मल्हारराव होळकर!


दौलतीचे थोरले सुभेदार, मराठी साम्राज्य उत्तरेत पसरवून, अटकेपार झेंडे लावून दिल्लीच्या तख्तावर स्वामित्व गाजवणारा महान मुत्सद्दी आणि लढवैय्या सेनानी म्हणून मल्हारराव होळकरांचे भारतीय इतिहासात मोठे स्थान आहे. त्यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांचा झंझावाती जीवनपट समजावून घेणे आजही उद्बोधक आहे.
मल्हारराव जेजुरीजवळील होळ येथे एका अत्यंत सामान्य मेंढपाळाच्या घरात जन्मले. खंडुजी होळकर हे त्यांचे पिता. पण त्यांचा मल्हारराव लहान असतांनाच अकाली मृत्यू झाला. त्यांच्या मातोश्रीने तळोदा (जिल्हा धुळे) येथील आपले बंधू भोजराज बारगळ यांच्याकडे आश्रायार्थ प्रस्थान केले. मामांकडे असतांना मल्हारराव मेंढपाळी करत करत होते. भोजराज बारगळ हे त्रिंबकराव कदमबांडे या स्वतंत्र सरदाराच्या फौजेत एक सरदार असल्याने पुढे मल्हाररावही बारगीर म्हणून वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांच्यासोबत उत्तरेतील मोहिमांवर जात असत. त्यामुळे मल्हाररावांना अगदी तरुण वयात माळवा पायतळी तुडवता आला. तेथील राजकारणाशी त्यांचा परिचय झाला. नंदलाल मंडलोई या इंदोरच्या एका जमीनदाराबरोबर झालेला मल्हाररावांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. १७१९च्या बाळाजी विश्वनाथच्या दिल्ली मोहिमेच्या वेळेस मल्हारराव स्वत:चे पथक घेऊन त्यात सामील झाले होते. त्यामुळे दिल्लीचे राजकारणही त्यांच्या लक्षात आले. बाळाजी परत फिरल्यावर त्यांनी स्वतंत्रपणे माळव्यात आपला जम बसवायला सुरुवात केली. बाजीराव पेशवा झाल्यानंतर त्याने जेंव्हा उत्तरकेंद्रित राजकारण सुरु केले तेंव्हा त्याला मल्हाररावासारख्या उत्तरेतील अनुभवी सेनानी/मुत्सद्द्यांची गरज होती. त्याने मल्हाररावांना आपल्या बाजूला वळवून घेण्याचे प्रयत्न १७२२ पासून सुरु केले असले तरी बाजीराव आणि बडवानीचा शासक मोहनसिंग राणे याच्यात आणि लढाई सुरु होऊन मल्हाररावांनी त्यात बाजीरावाच्या वतीने मध्यस्थी केली नाही तोवर, म्हणजे १७२५ पर्यंत ते स्वतंत्रच राहिले. मल्हाररावांचे महत्व ओळखून मल्हाररावांना माळव्याचे आधिपत्य देत बाजीरावाने त्यांना बरोबरीचे स्थान देत स्वत:सोबत घेतले. इंदोर त्यामुळे मल्हाररावांच्या अखत्यारीत आले. तेंव्हा इंदोर हे छोटे गाव होते. त्याला मल्हाररावांनी देशभरातून कारागीर, व्यावसायिक निमंत्रित करून एक व्यापारी शहर बनवले. मुत्सद्दी लढवैय्याची ही अर्थनीती आणि दूरदृष्टी इंदोरला एका वैभवाच्या शिखरावर त्यांच्याच काळात घेउन गेली.
उत्तरेत स्थान मिळवतांना त्यांना असंख्य लढाया लढाव्या लागल्या. १७३७ साली झालेले दिल्लीचे युद्ध, भोपालच्या युद्धात निजामाचा केलेला दारुण पराभव, वसईला केलेले पोर्तुगीजांविरूद्धचे युद्ध, रोहिले आणि बंगशांविरुद्ध केलेले फरुकाबादचे युद्ध, राजपुतांचे युद्ध करून मिटवलेले वारसाहक्काचे वाद यामुळे मल्हाररावांचा लौकिक तसेच यशाची कमान वाढतीच राहिली. पातशाहीच्या रक्षणाचा करार पातशहाने होळकर-शिंदेंच्या लष्करी शक्तीला महत्व देत त्यांच्याशी केला आणि पातशाही मराठी सत्तेच्या दबावाखाली आली. तख्तावर कोण बसणार याचे निर्णय मल्हाररावांच्या हाती आले. त्यांचे व्यक्तिगत राज्यही राजस्थान ते दोआब यापर्यंत पसरले.
या काळात दुर्दैवाने त्यांच्यावर आघात केला. त्यांचा एकुलता लढवैय्या पुत्र खंडेराव कुंभेरीच्या युद्धादरम्यान युद्धभूमीवर लढतांना ठार झाला. त्यांचे पत्नी अहिल्या सती जायला निघाली. मल्हाररावांनी अहिल्येला सती जाण्यापासून परावृत्त केले आणि तिलाच आपला पुत्र मानत युद्ध प्रशासनाचे धडे द्यायला सुरुवात केली. हे मल्हाररावांचे त्या वेळचे काळापुढचे पुरोगामी कृत्य होते. त्यामुळेच जगाला अहिल्यादेवींसारखी एक कुशल, मानवतावादी आणि दूरदृष्टीची प्रशासिका मिळाली. महिलांचा एवढा सन्मान मध्ययुगात कोणी केल्याचे उदाहरण नाही.
अटक स्वारीच्या वेळेस राघोबादादा पेशवा जरी सेनापती असला तरी अटक जिंकायचे कार्य मल्हाररावांनी केले. तुकोजीराजांना तेथे दीड वर्ष सीमेच्या रक्षणासाठी ठेवले गेले. त्यामुळे अब्दालीने पुढील स्वारी केली ती खैबर खिंडीतून नव्हे तर बोलन खिंडीतून. बुराडी घाटावर दत्ताजी शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर मल्हारराव आणि जनकोजी शिंदेने गीमी काव्याने हल्ले करून अब्दालीच्या नाकी दम आणला. सिकंदराबाद जिंकले, अब्दाली शेवटी तह करून परत जायला तयार झाला. १३ मार्च १७६० रोजी तह झालाही पण दक्षिणेतून भाऊसाहेब पेशवा मोठे सैन्य घेऊन येतो आहे ही वार्ता मिळाल्याने तह फिस्कटला. पानिपत युद्ध झाले. उत्तरेतील होळकर-शिंदे  या अनुभवी सरदारांचे ऐकायचेच नाही असे भाऊचे धोरण असल्याने मराठी सैन्य चुकीच्या ठिकाणी अडकले आणि दुर्दैवी पानिपत झाले.
पानिपत युद्धानंतर मल्हाररावांनी उत्तरेतील घडी पुन्हा बसवली. कुरा येथे इंग्रज सैन्याचाही पराभव केला. यानंतर त्याना कानाच्या दुखण्याने गाठले आणि शेवटी आलंपूर येथे २० मे १७६६ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात, “मल्हारराव होळकर हे मुत्सद्दीपणा आणि झुंझार लढवैय्या असे अद्वितीय रसायन होते. असा दूरदृष्टीचा वीर मुत्सद्दी अठराव्या शतकात दुसरा कोणी झाला नाही. पातशहांवर त्यांचा जसा वचक होता तेवढाच वचक पेशव्यांवरही होता. अहिल्यादेवी ही तर त्यांची जगाला श्रेष्ठ देणगी.” आज जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
-संजय सोनवणी.

 


No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...