Friday, July 23, 2021

धर्मांतराचा प्रश्न

 

माझा आक्षेप उपरेंकृत प्रायोजित धर्मांतराच्या आवाहनाबाबत आहे. ज्यांना स्वत:च्या आणि ज्या धर्मात इतरांनीही जावे याबाबतचा त्यांचा अभ्यास काय हाच माझा प्रश्न होता व आहे. हेच आवाहन बौद्ध भंतेंनी अथवा त्या धर्माच्या लोकांनी ओबीसींना करणे व का धर्मांतर करावे हे पटवून देणे ही वेगळी बाब आहे. प्रत्येकाला आपापल्या धर्माचा प्रचार-प्रसार करण्याचा अधिकार आहे. बाबासाहेबांनी वैदिक मंडळींनी त्यांच्या न्याय्य मागण्यांना प्रतिसाद न दिल्याने धर्मांतराचा निर्णय घेतल्यानंतर अन्य अनेक धर्मपर्यायांचा विचार करून विवेकाने बौद्ध धर्माची निवड केली होती. तत्पुर्वी महाड येथील परिषदेत त्यांनी हिंदू धर्मात "एक-वर्ण" असावा या आशयाचा ठरावही पारित करुन घेतला होता. वैदिकांना, ज्यांना वैदिक वर्णव्यवस्थेमुळेच हिंदू समाजाचे आपण अध्वर्यू ठरतो ही जाण असल्याने व तोवर तरी वैदिक धर्म आणि शुद्रातिशुद्रांचा धर्म वेगळा असल्याची माहिती शुद्रातिशुद्रांना नसल्याने त्यांनी "एकवर्ण" (म्हणजेच सर्व हिंदू समान) ही भुमिका मान्य होण्याची शक्यताच नव्हती. परंतू आता स्थिती बदललेली आहे.

त्रैवर्णिकांचा धर्म (ज्यांना वेद-वेदोक्तादिचा जन्मसिद्ध अधिकार आहे) वेगळा असून शुद्र व अतिशुद्रांचा धर्म वेगळा आहे हे स्पष्ट झालेले आहे. या स्पष्ट सीमारेषा लक्षात आल्यानंतर धर्मांतर नव्हे तर धर्मशुद्धीची आवश्यकता निर्माण होते. वर्णव्यवस्था हे वैदिक धर्माचे मूख्य अंग असल्याने व त्याचा पगडा हिंदूवर पडला असल्याने वैदिक धर्माला स्वतंत्र करणे आवश्यक बनले आहे ते यामुळेच. याउप्परही ज्यांना स्वेच्छेने धर्मांतर करायचे आहे त्यांना त्यांचे स्वातंत्र्य आहेच. माझ्या व्यक्तिगत जीवनात मी कोनताही धर्म पाळत नाही. संशोधनकार्याव्यतिरिक्त मी कोणत्याही धर्मस्थळी आजतागायत गेलेलो नाही. किंबहूना सारेच एक दिवस धर्मापार जावेत कारण धर्माची निर्मितीच भयातून झालेली आहे हे मीच माझ्या नीतिशास्त्र या ग्रंथात स्पष्ट केले आहे. परंतू ज्यांच्यासाठी आजही धर्म हा कळीचा मुद्दा आहे त्यांना त्यांचा धर्म मुळ कोणता आहे व त्यात भेसळ नेमकी कशी झालेली आहे हे स्पष्ट करत जाणेही तेवढेच आवश्यक आहे अन्यथा वैदिक वर्ण-कलमांचा फोफावा असाच राहील.

धर्म जेंव्हा व्यावहारिक कारणांमुळे अथवा राजकीय कारणांमुळे बदलला जातो त्याला मी धर्मांतर मानत नाही कारण धर्माच्या मुळ हेतुशीच ते विसंगत आहे. धर्मबदल हा नैतीक पायावर व स्वयंनिर्णयाने झाला तरच तो चिरंतन टिकतो. अन्य कारणांमूळे झालेल्या धर्मांतरामुळे किती मुळचे संस्कार पुसले गेले हा प्रश्न समाजशास्त्रीय अभ्यास केला तर तो ब-यापैकी अनुत्तरीत राहतो. आजही भारतीय इस्लाम, जैन, ख्रिस्ती ते शिख धर्मात ओबीसी वर्ग-प्रवर्ग आहेत यावरून मला काय म्हनायचे हे समजून येईल. तेंव्हा धर्मांतर हे उत्तर नसून धर्मात घुसलेल्या वर्णीक वैदिक धर्मियांचे विलगीकरण हे खरे उत्तर आहे असे मला वाटते. हिंदू ओबीसींनी बौद्ध ओबीसी झाल्याने काय सामाजिक बदल घडणार आहे?

मला कल्पना आहे कि स्पष्ट भुमिका अनेकांना आवडत नाही. आपापल्या धर्मावर प्रत्येकाचे प्रेम असते व तो वाढावा असे वाटणे वावगे नाही. परंतू ज्यांना धर्मांतराचे आवाहन केले जात आहे त्यांचीही भुमिका असू शकते याचे भान ठेवले जात नाही. असे आवाहन करायला आपण कोणाची निवड करत आहोत याचेही भान गमावले जाते. कोणाला खूष करण्यासाठी मी तरी लिहित नाही. एक साहित्यिक आणि संशोधक म्हणून बौद्ध समाजाला माझे काहीच योगदान नाही असे ज्यांना वाटते त्याबद्दल मी काही बोलु इच्छित नाही...किंवा त्याचे भांडवलही आजतागायत मी कधी केलेले नाही. मी माझे काम करत आहे...तुम्ही तुमचे काम करत रहा. एवढेच...

उपटसुंभाप्रमाणे हनुमंत उपरे नामक गृहस्थाने कोणाची तरी सुपारी घेऊन ओबीसी धर्मांतराची मोहीम सुरू केली आहे. अलीकडेच याच गृहस्थांनी "कर्मकांडाला नाकारण्यासाठी धर्मांतर" असेही विनोदी विधान केले आहे. आजच दै. लोकसत्ताने प्रा. देवल बुक्क नामक धर्मांतर विरोधक गृहस्थांचे या सम्दर्भात विरोधी पत्रही प्रसिद्ध केले आहे. असो. कर्मकांड नाकारण्यासाठी धर्म बदलावा लागतो हे अत्यंत विनोदी विधान आहे. कर्मकांड नसलेला धर्म यच्चयावत विश्वात नाही. कर्मकांड नाकारण्याचा हक्क कोणत्याही धर्माने हिरावून घेतला नाही. मशीदीत गेलेच पाहिजे अथवा पाच वेळा नमाज पढलाच पाहिजे असा हट्ट मुस्लिमांसाठी इस्लामही धरत नाही. हिंदू धर्मात पूजा हेच एकमेच कर्मकांड आहे. वैदिक धर्म, जो हिंदू धर्माला प्यरासाइटप्रमाणे चिकटला आहे, त्यामुळे काही बिनडोक कर्मकांडे हिंदू धर्मात घुसली आहेत हे वास्तव आहे. पण ती पाळलीच पाहिजेत असाही हट्ट नाही. पाप-पुण्याला भिनारी भेकड माणसे ती पाळायला जातात हेही खरे आहे, पण त्यांना विरोध होतो आणि होत राहील. वैदिकांनी आपली काही कर्मकांडे सोडली तर यज्ञादी कधीच सोडली आहेत. इतरांवर लादलेली छद्म कर्मकांडे झिडकारायला आम्ही सज्जच आहोत. वैदिकांच्या वर्णव्यवस्थेवर लाथ मारत एकमय समाजाकडे आम्ही वाटचाल करतच आहोत. मग धर्म बदला म्हणजे काय? आम्ही आमच्या धर्मातील घुसखोरांना हाकलण्याऐवजी आम्ही आमचा धर्म का म्हणुन बदलायचा? आमच्या धर्मात आम्हाला त्रुटी सापडल्या तर आम्ही एक तर त्या दुरुस्त करायला सक्षम असले पाहिजे किंवा एखाद्या धर्माची मुलतत्वे पटली तर व्यक्तिगत पातळीवर धर्म बदललाही पाहिजे. सुपा-या घेऊन उपरे यांच्यासारख्या उपरा उद्योग कोणी करत असेल तर त्याला ठासून विरोध होणारच. मी वैदिक धर्मियांना हिंदू मानत नाही हे सर्वांना माहितच आहे. वैदिकांची हिंदू धर्मातुन हकालपट्टी क्रमप्राप्त आहे. ती यथावकाश होईलच याचीही खात्री आहे. हिंदुंनी आपापल्या कोनत्याही धार्मिक कार्यास (जन्म, लग्न, मृत्यु) वैदिकांना बोलावू नये त्यांना पौरोहित्य देवू नये. रुद्राभिषेक ते सत्यनारायण या भाकड वैदिकोपजीवी प्रथा तात्काळ बंद कराव्यात. आपला धर्म नीट समजावून घ्यावा. परधार्मिकांच्या वर्चस्वास बळी पडू नये.
आणि त्याच वेळीस उपरेसारख्या सुपारीबाज माणसाला दूर ठेवावे. ओबीसी ही काय उपरेची वा त्याला सुपारी देणा-यांची मालमत्ता नाही. माझे आवाहन आहे कि धर्मांतर नव्हे तर कुप्रव्रुत्तींना आणि वैधर्मियांना धर्मातून बाहेर करा. धर्म साधा सहज आणि सर्वांना कवेत घेता येणारा...आणि म्हणुणच...कधीही धर्मापार होता येणारा बनवा.
यासाठी धर्मांतर हे उत्तर कधीही नव्हते आणि नाही. धर्म ही व्यक्तिगत बाब आहे आणि ती तशीच राहण्यात "धर्म" आहे.
All reactions:
Sanjay Kshirsagar, Sandip Fargade and 79 others
137 comments
12 shares
Share

1 comment:

  1. आदिवासी स्वताला वैदिक किंवा हिंदू मानत नाही त्यामुळे त्यांचा धर्म वेगळा आहे. अस्पृश्य चांभार महार मांग व इतर अस्पृश्य जातींना मंदिर प्रवेश नव्हता कारण त्यांचा धर्म वेगळा होता. मनुस्मृती मध्ये देखील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र हे चारच वर्ण आहेत पाचव्या वर्णात अस्पृश्यांना घ्यायला मनु विरोध करतो.

    ReplyDelete

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...