Tuesday, December 7, 2021

प्रा. नरके यांच्यावर झालेली टीका

 आज माझे संपादक मित्र घन:श्याम पाटील यांचा सा. चपराकमधील प्रा. हरी नरके यांच्यावर टीका करणारा लेख वाचण्यात आला. (८ डिसेंबर २०१४) m

 

 या लेखानंतर मला जे "जातीय" संघटनांच्या आणि नरके-विरोधाचे आनंदाच्या उकळ्या फुटणारे फोन आले त्यामुळे मी ही प्रतिक्रिया देण्यास बाध्य आहे. घन:श्याम पाटील यांना त्यांच्या लेखनाचे स्वातंत्र्य आहेच आणि त्यांना जे पटत नाही त्याविरुद्ध आसुड उगारण्याचा हक्कच आहे हे मान्य करुन "उकळ्या" फुटणा-यांसाठी मला खालील बाबी स्पष्ट करायच्या आहेत.

१. प्रा. हरी नरके हे प्रथम एक माणुस आहेत. व्यक्तीगत गुणदोष प्रत्येकात असतात समाज-सांस्कृतिक बाबी ज्या ज्या काळात प्रभावी होत्या त्याचा त्यांनी कैवार घेतला आहे. ते एके काळी बामसेफ/मराठा सेवा संघ यांच्या समर्थनार्थ शस्त्रे परजत होते हे वास्तव लक्षात घेतांना त्यांनी भुमिका बदलल्यावर आधीच्या भुमिकेबद्दल बालगंधर्व रंगमंदिरात जाहीर कार्यक्रमात जनतेची जाहीर माफी मागितलेली आहे. हे नैतिक धैर्य कोणी पुर्वी दाखवले याचा लेखा-जोखा या चळवळवाल्यांनी द्यावा.
२. प्रा.. हरी नरके हे माझे बंधुसमान मित्र आहेत. त्यांची मते आणि माझी मते जुळतातच असे मात्र आजिबात नाही. आम्ही आमचे व्यक्तिगत अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपलेले आहे. ते प्रत्येकाने जपलेच पाहिजे. पण अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे विकृत खच्चीकरण नव्हे याचेही भान ठेवले पाहिजे. मुळात आज शोषित-वंचित यांच्या बाजुने आग्रही बोलणारे दुर्मिळ आहेत. घन:श्याम पाटील यांची भुमिका शोषित वंचितांच्या बाजुची आहे. सर्वार्थाने या शोषित वंचित समाजांना शोषितच ठेवणा-या सरंजामदारशाही विरुद्ध जाहीर भुमिका घेणारे किती आहेत? बामसेफी लोकांनी त्यांच्या विरुद्ध विकृत भुमिका घेतली म्हणून प्रा. नरके यांनी कधीही डा. आंबेडकर व आंबेडकरी समाजाविरुद्ध रोष प्रकट केला नाही. तरीही हेच लोक विकृत पद्धतीने पाटील यांच्या लेखाचा नालायक उपयोग करत असतील तर तो पाटील यांच्या लेखाचा पराभव आहे असे मी मानतो.
३. आज बहुजन समाजाला, बरोबर असतील किंवा टिकार्ह असतील, जागे करणा-या विद्वानांची नितांत गरज आहे. विचारमंथनातुनच समाज पुढे जात असतो. कोणीही बरोबरच आहे असा दावा नाही. ज्यांनी वयाच्या कोवळ्या वयात चळवळीची सुरुवात केली त्या प्रा. नरकेंच्या जीवनातील भल्या-बु-या प्रसंगांची आठवण देत त्यांचे परिवर्तन व त्या टप्प्यावर आले असता त्यांना मागे खेचण्याचे वैचरिक दारिद्र्य कोणी दाखवू नये...कारण याच चळवळवाल्यांची वैचारिक लायकी काय हे मला चांगलेच माहित आहे.
४. "आम्ही त्यांना पोसले..." "आम्ही त्यांना मोठे केले" हे आज म्हणणारे दळभद्री, दुस-यांना सोडा, स्वत:ला कितपत मोठे करु शकले हा प्रश्न विचारायलाच हवा.
५. रेणके आयोगाची स्तुती हरीभाऊ करत होते हे खरे आहे. पण मीच त्या अहवालातील त्रुटी दाखवून दिल्यावर प्रा. नरके यांनी त्या अहवालावर जाहीर टीका केली...रेणके हे त्यांचे सासरे असुनही जाहीरपणे आणि आधीच्या चुकीची कबुली देत. हे नैतिक धाडस आज कोणत्या (टुक्कार असले तरी) विचारवंतात आहे हे कोणी दाखवून दिले तर बरे होइल.
६. विचारवंताची/प्रबोधकाची वाट सोपी नसते. खडतर असते. कोणीच मित्र नसतो. मित्र असावेत हे कोणाला वाटत नाही? पण आधीचा, तरुणाइचा, उत्साहीपणा, बेडरपणा समाजच झाकोळत जातो. मानवी चुका मग अपरिहार्य ठरतात. आपला समाज नालायक आहे हे कोण कबूल करेल? प्रा. नरके चुकीचे असतील तर आपण बरोबर आहोत याचे यथायोग्य स्पष्टीकरण हवे.
७. घन:श्याम पाटील यांनी लेख लिहिला. टीका करण्याचा त्यांचा अधिकार मान्य करुयात. त्या टीकेचा गैरफायदा घेत अधिकचा मसाला मला सांगत जे मनोविकृत आज मला फोन करते झाले यांचा मात्र निषेध करायचीही त्यांची लायकी नाही.
एकच सांगतो....संपुर्ण मानवतेची आमची भुमिका आहे...त्या प्रवासात भले-बुरे लोक भेटणार...काही बोगस निघणार....क्वचित रत्नेही सापडणार....
रत्ने असोत कि काटे.....
वाट तुडवली जाणारच याचे भान या हितशत्रुंनी लक्षात घ्यावे.

1 comment:

  1. बामसेफ ही विघातक संघटना आहे. पण नरके आधी बामसेफ मध्येच होते. जेव्हा त्यांना कोणी ओळखत नव्हते तेव्हा त्यांना ओळख बामसेफ ने दिली मग ते प्रसिद्ध झाले. आता त्यांना आणखीन मोठं व्हायचं आहे. त्यामुळे त्यांनी बामसेफ सोडली. साधारण मार्केटिंग अश्याच प्रकारे करतात सुरुवातीला जम बसवायचा असेल तेव्हा लहान मार्केट मध्ये उतरतात व तेथे प्रसिद्धी मिळाली की मग मोठ्या मार्केट मध्ये शिरतात. नरकेनि अनेक लोक करतात तसा फक्त बामसेफचा वापर केला.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...