Saturday, August 13, 2022

विश्वात मानव एकटाच?

  




आपल्याला ज्ञात असलेला जीवसृष्टी असलेला पृथ्वी हा एकमात्र ग्रह आहे. विश्वात अन्यत्र कोठे पृथ्वीसदृश्य ग्रह आहेत काय याचा आधुनिक विज्ञान शोध घेते आहे. असे काही ग्रह दूरच्या आकाशगंगांत सापडले असले तरी तेथे जीवसृष्टी आहे कि नाही, तेथे वातावरण आहे कि नाही, असल्यास त्याचे स्वरूप नेमके काय आहे याचा तपास अद्याप आपल्याला लागलेला नाही कारण ती आपल्या विज्ञानाची आजची मर्यादा आहे. प्रकाशाचा वेग ही मर्यादा असल्याने आणि या तारे व आकाशगंगा आपल्यापासून काही कोटी ते अब्जावधी प्रकाशवर्ष दूर असल्याने आणि अदयाप मानवाला प्रकाशाचा वेग गाठता येणे आज तरी सर्वस्वी अशक्य आहे. समजा तसा वेग गाठता जरी आला तरी प्रकाशवेगाच्या स्थितीत मानवी काळ आणि शरीर-भौतिकीत नेमकी काय तोडमोड होणार याचे भाकीतही वर्तवता येणे अशक्य आहे. समजा सारे अडथळे ओलांडून आपण विश्वाच्या या अथांग पसा-यात कोणा एका ग्रहावर जीवसृष्टीच्या शोधात निघालो तरी इप्सित स्थळी पोचेपर्यंत कैक पिढ्या अंतराळातच खपतील हे अजून वेगळेच. आणि समजा ज्याही पिढीचे लोक जीवसृष्टी असलेल्या ग्रहावर प्रत्यक्ष पोचतील तेंव्हा तेथे कोणत्या प्रकारच्या जीवसृष्टीशी मानवाचा सामना होईल? तेथील जीवसृष्टी जगण्यासाठी पृथ्वीप्रमाणेच वातावरण असावे लागेल ही संकल्पना कदाचित उध्वस्तही होइल! तेथील वातावरण अत्यंत वेगळे व मानावासाठी विषारी किंवा अत्यंत प्रतीकुलही असू शकेल. बरे, मानवी डोळ्यांना दिसू शकणारी ती जीवसृष्टी असेल कि वेगळ्याच, माणसाला आज अज्ञात अशा, तत्वांनी बनलेली आणि म्हणून पाहण्यासाठी मानवी डोळा नव्हे तर विशिष्ट तत्वांनीच बनलेल्या डोळ्यांची आवश्यकता असेल? ते जीव प्रगत असतील कि उत्क्रांतीच्या प्राथमिक टप्प्यावर असतील? कि मानव तेथे पोचायला कोट्यावधी किंवा अब्जावधी वर्ष निघून गेल्यामुळे तेथील जीवसृष्टी उत्क्रांत होत तोवर नष्टही झालेली असेल? समजा ते जीव हयात असले आणि मानवापेक्षा अधिक तंत्र-प्रगत असले तर ते मानवाचे स्वागत कसे करतील? मानव त्यांच्यापासून शिकायचा प्रयत्न करेल कि त्यांच्यावरच मानवी वृत्तीनुसार कुरघोडी करण्याचे प्रयत्न करत शेवटी नष्ट होईल? कि त्यांच्यापासून काही नवे शिकून पृथ्वीच्या दिशेने तीच अनंताची यात्रा करेल? आणि तो निघाला तेंव्हापासून अब्जावधी वर्षानी परतेपर्यंत पृथ्वीवरील जीवसृष्टीची अवस्था काय असेल? पृथ्वीवर मानव तेंव्हा असेल कि तोही नष्ट झालेला असेल? मग हे परत आलेले जीव नेमके काय करतील?

       प्रश्न अनेक आहेत. काही प्रश्न तार्किक आहेत तर काही कल्पनात्मक आहेत. शेवटी या सर्व संभावना आहेत. आज तरी माणूस विश्वात एकाकी आहे अशीच भावना वैद्न्यानिक जगात व्याप्त आहे. तरीही त्याची अनावर जिज्ञासा विश्वात अन्यत्र कोठे जीवसृष्टी आहे काय याचा शोध सुरूच आहे. हजारो विज्ञान कथा-कादंब-या व चित्रपटही परग्रहवासी या संकल्पनेभोवती फिरतांना आपल्याला दिसतात. मानवी तत्वज्ञानावरही या एकाकीपणाची आणि म्हणूनच वैश्विक तादात्म्याची छाया आहे. एक कि अनेक या वादातून तत्वज्ञान पूर्वीच गेलेले आहे व शेवटी अद्वैत (एकमेवत्व) काही वेळा जिंकले आहे.

       एरिक वोन डॉनिकेनसारखे विक्षिप्त संशोधक मात्र या स्थितीवर वेगळाच तोडगा काढतांना आपल्याला दिसतात. मनुष्य हा पृथ्वीतलावरील एकमेवद्वितीय असा बुद्धिशाली प्राणी. तो या पृथ्वीतलावरचा असूच शकत नाही. अवकाशस्थ महाप्रगत मानव (देव) आपल्या अवाढव्य अंतराळयानात बसून पृथ्वीवर आले. पृथ्वीवरील नाझ्काच्या रेषा असोत कि पि-यामिड, महरौलीचा न गंजणारा लोहस्तंभ असो कि कैलासासारख्या अद्भुत लेण्या...म्हणजे पुरातन मानवाने एवढ्या प्रगत आणि आज अज्ञात असलेल्या तंत्रज्ञानाचा जो आविष्कार दाखवला आहे तो केवळ या एलीयंसमुळे. मानव हा एलीयांस आणि येथील माकडांचा संकरीत उपज असावा असाही तर्क अनेकांनी केलेला आहे. पुराकथाही त्यासाठी वेठीस धरल्या गेल्या आहेत. शेवटी देव म्हणजे परग्रहावरील अतिप्रगत जीव असा संदेश यात अनुस्यूत आहे. अद्भुताची ओढ असलेल्या मानवावर अशा संकल्पनांचे प्रभाव पडणे स्वाभाविकच आहे. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनीही पृथ्वीवर माणूस उपराच!नावाचे पुस्तक लिहून या सिद्धांताची पाठराखण केल्याचे आपल्याला दिसते. हे जगभर झाले. डॉक्यूमेंट-या जशा निघाल्यात तसे चित्रपटही निघाले. हे दावे अनेकदा लबाड्या करून केले गेले असल्याने अद्याप तरी या सिद्धांताला सिद्ध करू शकेल असा एकही पुरावा मात्र प्राप्त झालेला नाही. फार फार तर त्याला आपण वास्तव सांगत असल्याचा दावा करणारी अद्भुतरम्य कथा म्हणू शकतो. मनोरंजन करून घेण्यापलीकडे त्यांचे काही विशेष मोल नाही.

       असे असले तरी मानवाला अद्भुताची आवड पुरातन काळापासूनच आहे. त्याचे देव हे नेहमीच अधिक काळ जगणारे अथवा अमर्त्य असतात. त्यांची कृत्ये, त्यांचे राग व द्वेष हे कल्पनातीत प्रलयंकारी असतात. त्यांच्यात अगणित दिव्य्य शक्ती वास करत असतात. असे असले तरी ते देव-देवी दिसतात माणसासारखेच. हो, अन्य प्राणीही देव मानले गेलेत पण त्यांच्यावर मानवी गुण-दोषांचे आरोपण आहेच. ही निर्मिती, देवांची अथवा धर्माची, मानवाने जगण्यातील अनिश्चितता आणि मृत्यूचे असलेले निरंतर भय, यातून केली असे मानले जाते. देव-देवता या भयावरील उतारा ठरल्या. अतिप्राचीन काळातील उत्खननांत मिळाली आहेत ती बहुढंगी दफने. मृतांबद्दलच्या श्रद्धा व त्यांचे मृत्युनंतरचे जीवन सुखकर व्हावे म्हणून मृतांसोबत त्याच्या आवडीच्या वस्तू व प्राणीसुद्धा गाडायची प्रथा आपल्याला जगभर दिसते. इजिप्तमधील अजस्त्र पि-यमिड ही मुळात दफनस्थानेच आहेत. फार कशाला ज्याला आपण जगातील आदिम धर्मग्रंथ म्हणू शकू तो बुक ऑफ डेडसहा पि-यमिडसच्या भिंतींवर कोरलेला ग्रंथ मृताची यात्रा सुखकर पार पडो या बाबतच्या प्रार्थनांनी व मंत्रांनी भरलेला आहे. म्हणजे आदिम कला या मृत्योत्तर जगासाठी अवतरल्या असेही आपल्याला म्हणता येईल. विदर्भातील महापाषाणयुगातील वर्तुळाकार दफने हाही एक पुरावा आपल्याकडीलच आहे. थोडक्यात एकाकीपणा आणि मृत्युभय यातून मानवी कला, तत्वज्ञान, धर्म इत्यादी आविष्कारांना महत्व आले व ते सतत सुप्त पातळीवर मानवी मनावर राज्य करत असते हे आपल्या लक्षात येईल.

       म्हांजेच एकीकडे विद्न्यानही अंतता: याच मानवी प्रेरणांनी व्यापलेले असल्याने विश्वात कोठे जीवसृष्टी आहे काय याचा शोध सुरु आहे. विश्वात आपण एकाकी आहोत ही भावना कोठेतरी त्रस्त करत आहे. ही केवळ मानवी जिज्ञासा आहे असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही. पृथ्वीचा कधीतरी नाश होईल”  या संकल्पनेचा पगडा त्यांच्यावर असावा अशी शंका येणे स्वाभाविक आहे. अलीकडेच डॉ. स्टीफन हॉकिंग्ज यांनी मानवाला शंभर वर्षात मंगळावर स्थलांतरीत व्हावे लागेल.अशी भविष्यवाणी केलीच होती. हा फार तर वैद्न्यानिक मनातील सुप्त भावनेचा प्रकट उद्गार म्हणता येईल.

       मानवाची स्वभाववैशिष्ट्ये, कल्पना, ज्ञान-विज्ञानाच्या संकल्पना या शेवटी तो पृथ्वीसापेक्ष वातावरणात आणि तत्वांच्या प्रभावात निर्माण झालेल्या आहेत. त्याची सारी सामर्थ्ये पृथ्वीवरील प्राकृतिक प्रभावांच्या मर्यादेत आहेत. ती तशीच्या तशी अन्यत्र असतील व अशा ठिकाणी मानव अथवा जीवसृष्टी असू शकतील अशी त्याची स्वाभाविक कल्पना आहे. माणसाचा शोध असीम आहे हीसुद्धा त्याची सापेक्षतेतील सीमित मर्यादा आहे. विश्वात अन्यत्र कोठे जीवसृष्टी असेल अथवा नसेल, देव असतेल अथवा नसतील, पण मानवी कल्पनासृष्टीत (जे एका परीने दुसरे विश्वच असते) मात्र काहीही संभव आहे. कधी त्या कल्पना तर्कशुद्ध गणिती पद्धतीने मांडल्या जातात किंवा पुराणकथास्वरूपात वावरत राहतात. आणि यालाच आपण मानवी जीवन म्हणतो!

-संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी

    महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी -संजय सोनवणी   आम्ही मराठी माणसे इतिहासात फार रमतो. बरे, ज्याही इतिहासात आम्ही रमतो तेवढ्या ...