Wednesday, August 10, 2022

"भाऊ परतौनी आला"

 



"भाऊ परतौनी आला"

-संदीप जाधव
खरंतर इतिहासाला आपण कधीच आव्हान नाही देऊ शकत, एका ठराविक वेळेनंतर जे घडलंय ते असंच घडलं असेल किंवा घडलं असू शकेल अस मान्य करूनच त्या घटनांकडे पहावं लागतं. परंतु असं असलं तरी आज इतिहासात डोकावताना अशा बऱ्याच घटना आपल्या समोर येतील जिथे अजूनही आपले विचार थांबतात, आपण एका ठाम मताला पोहचूच शकत नाही.
याचं सर्वांत मोठं आणि भल्याभल्यांची मती गुंग करणारं उदाहरण म्हणून शिवाजी महाराजांनी आग्ऱ्याहून औरंगजेबाच्या कैदेतून संभाजी महाराज आणि आपल्या इतर साथीदारांसोबत केलेलं यशस्वी पलायन या घटनेकडे पाहता येईल. आज तब्बल ३५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटून गेला तरीही आपण एका ठाम मताला नाही पोहचू शकलो की आग्ऱ्यातून महाराज नक्की कसे निसटले.
आग्ऱ्यातील या वादळी घटनेनंतर जवळपास ९५ वर्षांनी आणखी अशी एक घटना इतिहास घडली ज्याबद्दल अजूनही संभ्रम आहे. आणि ती घटना म्हणजे पानिपतात अब्दालीसोबतच्या महासंग्रामात सदाशिवराव पेशवा अर्थातच भाऊसाहेब पेशवा यांचं रणभूमीवरुन नाहीसं होणं आणि तब्बल १३ वर्षांनी दख्खनेत पुन्हा प्रकट होणं. सदाशिवरावांच्या अशा इतक्या वर्षांनी अचानक प्रकटल्याने त्यावेळच्या राजकारणात उडालेला धुरळा आणि आपल्याच लोकांकडून तोतया ठरवून त्यांना दिलेल्या देहदंडाच्या शिक्षेने झालेला या सर्वाचा शेवट. पण खरंच ही घटना इतकी साधी आणि सहज बाजूला ठेऊन पुढे जाण्यासारखी आहे का? मातृभूमीच्या संरक्षणासाठी अब्दालीसोबत लढलेले पानिपतचे युद्ध म्हणजे मराठा साम्राज्याच्या डोक्यावरची भळभळती जखमच. पेशव्यांच्या काळात अटकेपार गेलेल्या मराठा साम्राज्यास पानिपतच्या युद्धातील पराभवानंतर उतरती कळा लागली. पेशव्यांच्या गादीचे उत्तराधिकारी असलेले विश्वासराव युद्धात धारातीर्थी पडले. पानिपतावर सैन्याचे सेनापती म्हणून गेलेले सदाशिवराव भाऊ युद्धाच्या धामधूमीत कुठे गायब झाले हे कोणालाच समजले नाही. नानासाहेब पेशव्यांना काशीराजकडून आलेल्या पत्रात विश्वासराव आणि सदाशिवभाऊ यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याचे कळवण्यात आले होते. बऱ्याच लोकांचा आणि साक्षात भाऊंच्या पत्नी पार्वतीबाईंचा असा विश्वास होता की भाऊ अजूनही जिवंत आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी सदाशिवराव भाऊंचे तोतया प्रकटले होते.
यातील एखादा तोतया खरेच सदाशिवराव भाऊ नसेल कशावरून? राघोबादादांसोबत एकाहून एक पराक्रम करत अटकेपार गेलेले भाऊ खरंच पानिपतात कामी आले असतील की ते खरंच परत आले असतील? त्यांच्या अनुपस्थितीत १३ वर्षांमधे बदलेल्या राजकारणाचा ते कशावरून बळी ठरले नसतील? कशावरून त्यांना तोतया ठरवून परस्पर शिक्षा नसेल दिली? जर खरंच परत आलेली व्यक्ती तोतया होती तर पानिपतच्या युद्धानंतर भाऊ गेले असं समजून त्यांचं श्राद्ध घातल्यानंतरसुद्धा आपल्या कपाळी कुंकू लावून त्यांची वाट पाहणाऱ्या पार्वतीबाईंसमोर त्यांना का नाही उभं केलं गेलं? का नाही पार्वतीबाईंसमोर त्या तोतयाची शहानिशा केली गेली? ती व्यक्ती जर खरंच तोतया होती तर कोकणातून पुण्यावर स्वारी करताना इतकं मोठं सैन्य त्याच्या सोबत का उभं राहिलं? असे एक ना अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात.
पानिपतच्या युद्धात सदाशिवराव भाऊ वाचले होते याचा खरंतर कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही पण 'तोतयाचे बंड' हे प्रकरण पेशवेकाळात खूप गाजले होते. सुखलाल नावाचा कनोजी ब्राह्मण माधवराव पेशव्यांच्या काळात सदाशिवराव भाऊंचा तोतया म्हणून प्रकट झाला होता आणि काही कारस्थानी लोकांच्या मदतीने त्याने पेशवाई विरुद्ध बंड पुकारले होते याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत, तोच धागा पकडून संजय सोनवणी यांनी ऐतिहासिक घटनेला कल्पनेची जोड देऊन लिहिलेली ही कादंबरी आपल्याला विचारात नक्कीच पाडते. कथा काल्पनिक असली तरी बरेचसे ऐतिहासिक संदर्भ लेखकांनी यामधे दिलेले आहेत. संजय सोनवणी यांची १२४ पानांची, एकाच बैठकीत वाचून पूर्ण होणारी "भाऊ परतौनी आला" ही छोटेखानी कादंबरी ज्या वादग्रस्त 'तोतया प्रकरणावर' बेतली आहे तो सदाशिवराव भाऊंचा पानिपत पासून पुण्यापर्यंतचा एक काल्पनिक प्रवास आहे! हा प्रवास इतिहास म्हणून न पाहता एक कलाकृती म्हणून पहिला तर वाचकाला नक्कीच एक वेगळी सफर घडवून आणतो.
संजय सोनवणी यांची एक वाचनीय कलाकृती "भाऊ परतौनी आला"!
-संदीप प्रकाश जाधव
प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन
पृष्ठे- १२४, मूूल्य- १६० रुपये

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...