Friday, September 23, 2022

धनगरांच्या वैभवाचा ऐतेहासिक दुर्मिळ दस्ताऐवज



संजय सोनवणी लिखीत " धनगरांचा गौरवशाली इतिहास" : धनगरांच्या वैभवाचा ऐतेहासिक दुर्मिळ दस्ताऐवज
--------------------------------------—-----------
सुप्रसिध्द साहित्यिक तथा इतिहास संशोधक संजय सोनवणी हे स्वतः अतिशय व्यक्तीगत कठीण प्रसंगातून जात असतांना हे पुस्तक लिहिले असे त्यांनी प्रस्तावनेतच नमूद केलेले आहे. तरीसुद्धा लेखनापासून तसूभरही विचलित न होता पुस्तक लेखनाचे काम अविरतपणे पूर्ण केले.
या पुस्तकाची प्रस्तावनाच एवढी जबरदस्त आहे की जणू लेखक सहज बोलत बोलत प्रचंड इतिहासाचा एकेक धागा उलगडत वाचकांना धनगरांच्या इतिहासाचे ज्ञान, वर्तमानाचे भान आणि भविष्याची जाण करून देतात.
198 पृष्ठात जेवढा सामावता येईल तेवढा अत्यंत परिश्रमाने धनगरांचा इतिहास लेखकाने एकूण बारा प्रकरणात गुंफलेला आहे.
पहिल्या प्रकरणात भारतीय प्राचीन संस्कृतीचा वेध घेतांना पुरातन काळातील सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृती यांचा नेमका भेद ते स्पष्ट करत पशुपालकांच्या प्राचिन संस्कृतीच्या निर्मितीचे योग्य निर्देशन मांडतात. तद्वतच शैव धर्म व वैष्णव धर्म यातील भेद स्पष्ट करत वैदिक धर्माचे वेगळेपण अत्यंत स्पष्टपणे नमुद करतात.
इस पूर्व 1000 ते 3 -या शतकापर्यंत केवळ मगधापर्यंतच वैदिक धर्म प्रबळ होता . गुप्तकाळात वैदिक धर्माला राजश्रय प्राप्त झाल्यामुळे वैदिकांचा बोलबाला वाढला.हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केलेले आहे.
दुस-या प्रकरणात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल यांचे विस्तृत विवेचन व संशोधनिय आकलन यांचा ससंदर्भ मेळ बसवत सोनवणी यांनी पंढरपूरचा पांडूरंग ज्याला विठ्ठल देखिल संबोधतात त्याच्या भोवती जाणीवपूर्वक गुंफलेल्या वैदिकांच्या कपोलकल्पीत दंतकथांचा समाचार घेत त्या कथांची काजळी समुळ पुसत विठ्ठल म्हणजेच पांडूरंग हा पशुपालक धनगरातील वीर पुरूष तथा सम्राट होता आणि त्यांचे साम्राज्यही होते हे सिद्ध केलेले आहे. पौंड्रंक या शब्दाचे मराठी सुलभीकरण म्हणजे पांडुरंग होय. नि पौंड्रांची राजधानी पौंड्रपूर व त्याचेच पुढे पंढरपूर झाले. ही अतिशय ताकदिची मांडणी लेखकाने केलेली आहे.
तिस-या प्रकरणात ' खंडोबा ' यांची मांडणी केलेली आहे.अगदी प्रस्तावनेतच सोनवणी यांनी पृष्ठक्रमांक 16 वर शेवटच्या परिच्छेदात विठ्ठल, खंडोबा, जोतीबा, धुळोबा, बिरोबा ही दैवते धनगरांचे पराक्रमी पूर्वजच होते असे स्पष्ट नोंदवत खंडोबाच्या विविध अंगांची अतिशय समर्पकपणे मांडणी करतात.
चौथ्या प्रकरणात अखंड भारताचा निर्माता " सम्राट चंद्रगुप्त मौर्य " यांची मांडणी करतांना ब-याच मतामतांतरांचे मोठ्या ताकदीने सोनवणी यांनी खंडण केलेले आहे. चंद्रगुप्ताच्या बालपणाच्या पूर्वपारंपारिक कथा , चाणक्य- चंद्रगुप्त बालपणीच्या भेटीच्या रंजक कथा , धनानंदाने चाणक्याचा अपमान करणे व चाणक्याने नंद राज्याचा सर्वनाश करण्याची प्रतिज्ञा घेत शेंडीला गाठ बांधणे या आतापर्यंतच्या ऐकिव कल्पनांना लेखकाने पूर्णतः फाटा दिलेला आहे ." चाणक्यासारखा विद्वान मुत्सद्दी केवळ नंदाने अपमान केला म्हणून त्याच्या विनाशाची प्रतिज्ञा करत चंद्रगुप्ताकरवी ते कार्य पार पाडेल आणि त्यासाठी काही काळ का होइना देशात अराजकाची स्थिती आणत शत्रुला फायदा देईल असे म्हणने वा तसा विचार करणे हा चाणक्याचा आणि चंद्रगुप्ताचाही अवमान आहे." ( पृष्ठ क्र.53) असे सोनवणी यांचे म्हणने तथ्याला धरून आहे.
भारतावरील अलेक्झांडरचे आक्रमण चंद्रगुप्त व चाणक्य यांनी प्रखर देशप्रेमापोटी परतवून लावण्याचा संयुक्त स्वातंत्र्य लढा उभारला असे लेखकाने केलेले विधान सत्याच्या परामर्श घेणारे आहे. एवढेच नव्हे तर चंद्रगुप्त मौर्य हे घराणे पशुपालक धनगरच होते हे ते सप्रमाण सिद्ध करत ठासून सांगतात .
पाचव्या प्रकरणात आताच्या महाराष्ट्र राज्याची उभारणी करणा-या सातवाहनांचा इतिहास मांडलेला आहे. इ.स.पूर्व 230 मध्ये हे घराणे उदयाला आले. सिमुक (किंवा सिंधुक) हा या घराण्याचा संस्थापक होता. महाराष्ट्रासहित गुजरात, मध्यप्रदेश, दक्षिण भारत , कर्नाटक, गोवा आणि आंध्र एवढ्या प्रदीर्घ भूभागावर सातवाहनांचे साम्राज्य होते. हे साम्राज्य सुमारे 450 वर्षे टिकले. संजय सोनवणी एका बाजूने " भारतात एवढा प्रदीर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे कोणतेही घराणे झाले नाही ." हे नमुद करतात तर दुस-या बाजूने " शकांच्या पारतंत्र्यापासून महाराष्ट्राला मुक्त केले . आज महाराष्ट्र सातवाहनांचे उपकार विसरलेला आहे. हैद्राबाद येथे मात्र गौतमीपुत्र सातवहनाचा भव्य अश्वरूढ पुतळा आहे " याची जाणीवही करून देतात. सातवाहनांना अनेक इतिहासकारांनी ब्राम्हण घराणे ठरवण्याचा प्रयत्न केला; परंतू सातवाहऩ हे पशुपालक धनगर जमातीतील होते हे लेखकांनी अनेक दाखले देत सिद्ध केलेले आहे.
त्याबरोबरच पुढील काही प्रकरणात विजयनगरच्या साम्राज्याची स्थापना करणारे हरिहर - बुक्क व देवगिरीचे यादव या धनगर राजघराण्यांचा वैशिष्ट्य पूर्ण इतिहासाची मांडणी केलेली आहे. तद्वतच होळकर राजवंशातील महाराणी अहिल्याई, आद्य स्वातंत्र्यवीर महाराज यशवंत, शहिद विठोजी ,तुळसाबाई, आद्य महिला स्वातंत्र्य विरांगणा भीमाई यांचाही रोमहर्षक इतिहास मांडत अनेक नाविण्यपूर्ण ऐतेहासिक बाबिंना लेखकाने उजाळा दिलेला आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकांनी अभ्यासण्यासारखे आहे.
एकंदरीत " धनगरांचा गौरवशाली इतिहास " हे पुस्तक धनगरांच्या ऐतेहासिक वैभवाचा दुर्मिळ दस्ताऐवज असून धनगरांना ज्ञानसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता प्राप्तीच्या दिशेने घेऊन जाणारा दीपस्तंभ आहे.
धनगर जमातीत वाचन, लेखन व संशोधन संस्कृतीचा तथा विज्ञानवादी संस्काराचा प्रचंड अभाव आहे. त्यामुळे लेखकाचे प्रयत्न स्तुत्य आहे. एकीकडे धनगरांच्या इतिहासाचे विखूरलेले अवशेष एकत्रीत करत दुसरीकडे वैदिकांनी धनगर जमातीच्या इतिहासाच्या अनुषंगाने मन, मस्तिष्कावर लावलेली कपोलकल्पित दंतकथांची काजळी समूळ पुसण्याचा प्रयत्न या दोन्ही बाबी संजय सोनवणी सरांनी योग्य व तटस्थपणे या पुस्तकातून साधलेल्या आहेत.
होमेश भुजाडे
नागपूर
9422803273
पुस्तकाचे नाव: धनगरांचा गौरवशाली इतिहास
लेखक: संजय सोनवणी
एकूण पृष्ठं : 198
किंमत: 200/- रूपये
प्रकाशक: पुष्प प्रकाशन, पुणे.

संजय सोनवणी सरांचे आभार
——————————————
आदरणिय ,
सोनवणी सर
नमस्कार
जय यशवंत...
सर,आपल्या असामान्य प्रतिभेतुन अत्यंत मौलिक असा आम्हा वाचकांना ज्ञानवृद्धीगंत करणारा खजिना आपण वेळोवेळी देत आला आहात,पुढे ही देत रहाल यात शंका नाही.
आजच्या जमान्यात नवनविन ऐतिहासिक विषयावर अनेक संशोधनपर साहित्य येत आहे पण ती तटस्थपणे,किंवा नाण्याच्या तिसर्या बाजुने विचार उलगडत मांडलेले असतेच असे खात्रीशिर म्हणता येत नाही,त्यास कोणता तरी वास लागलेला असतो,पण आपण मात्र तो कुठल्याही दुर्गंधीला थारा न देता हा किल्ला आपल्यातील प्रामाणिक प्रतिभेच्या जोरावर लढवतआहात हे नक्की.
एका अस्सल पुराव्याच्या आधाराने आपण सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यावर पानिपतावरील प्रस्थापित इतिहासकारांनी केलेला खोटा आरोप कसा निराधार आहे हे उजेडात आणुन त्या योद्ध्यावरील आरोप खोडुन काढत आम्हा वाचकांना सत्य इतिहास माहीत करुन दिला त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
यशवंतराव होळकर हे लुटेरे नसुन ते एकाच वेळी वैश्विक महासत्तेला व भारतीय सत्तेला आपल्या पराक्रमाच्या जोरावर ललकारणारे ,आधुनिक युध्द कौशल्य निपुन आद्य स्वातंत्र्यवीर होते.हे आपणामुळे माहीत झाले.आजच्या व पुढील अनेकपिढ्यांना महाराजा यशवंत होळकर यांचे चरीत्र स्फुर्तीदायी , प्रेरणादायी व उर्जादायी ठरणार आहे.यात शंका नाही.
नुकतेच आपण "धनगरांचा गौरवशाली इतिहास"हे पुस्तक वाचकांच्या हाती दिले.हा इतिहास आपण का लिहला याचे विवेचन आपण प्रस्तावनेत दिले आहे.यातुन आपली वंचित समाजा विषयी असलेली तळमळ व त्याच बरोबर आपला उदात्तदृष्टीकोन लपत नाही.खरे तर याच दृष्टीकोनातुन मागेच इतिहास बाहेर आला असता तर ,या समाजा मध्ये आजच्या विषमतेला स्वाभिमानाने तोंड देण्याचे धैर्य निर्माण होत तसेच त्या समाजातील न्युनगंडात्मक भावनेचा र्हास होवुन या समाजात एतिहासिक प्रेरणेने अन्याया विरुद्ध लढण्याची उर्मी केव्हाच संचारली असती.आणि कदाचित या समाजाचे चित्र आजच्या पेक्षा वेगळे असते.

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...