Thursday, September 29, 2022

“काव्य फुले”- वादाचे कारण कशासाठी?

 



सावित्रीबाई फुले यांच्या “काव्य फुले” काव्यसंग्रहाचे शिव-पार्वतीचे चित्र असलेले मुखपृष्ठ आणि आत एका कवितेत सरस्वतीचे आदरपूर्वकल घेतलेले नाव तसेच बहिणाबाई चौधरी यांनी सरसोती देवीला माय म्हटले यावरून वैदिकवाद्यांना जोर आलेला आहे. शिव-पार्वती या मुळात सर्जनाच्या पुरातन भारतीय (हिंदू) देवता असल्याने त्यांच्याबद्दल आदर-भक्तीभाव असणे हे स्वाभाविक आहे. वेदांमध्ये शिवाला शिस्नदेव म्हणून त्याज्ज्य ठरवले आहे हे वैदिकवाद्यांनाही माहित असले पाहिजे. किंबहुना प्रतिमा-मुर्तीपुजाच वैदिकांना त्याज्ज्य होती. भारतात आल्यावर त्यांनी त्यांचे वैदिकीकरण करत स्वीकारले असले तरी शिव-पार्वती वैदिक देवतासाम्भारातील दैवत नाही हे स्वयंस्पष्ट आहे. फारतर त्यांना येथील लोकसमूहाची श्रद्धा टाळणे अशक्य झाल्याने त्यांनी त्याचे वैदिकीकरण करत स्वीकारले असे म्हणता येईल.

 

काही दैवते जनसमुदायावर सत्ताधारी वर्ग अथवा प्रभावशाली वर्गही लादत असतो व प्रभाव निर्माण करत असतो. उदा. कुशाणकाळात पारशी देवता नना (ज्यावरून आपला नाणे हा शब्द सिद्ध झाला आहे.) ही देवता सर्व नाण्यांवर विराजमान असे. अनाहिता ही पारशी देवीही मोठ्या प्रमाणावर पुजली जायची. तिचीही मंदिरे होती. kushan सत्ता गेली आणि या देवताही गेल्या. सरस्वती, विष्णू यासारख्या काही वैदिक देवतांचा मोठ्या प्रमाणावर गवगवा केल्याने त्याही सर्व हिंदू समाजातही काही प्रमाणात का होईना कालौघात झिरपल्या यात काहीही नवल नाही.

सावित्रीबाई अथवा बहिणाबाई या संस्कृती-धर्माच्या चिकित्सक अभ्यासक नव्हत्या. त्यांच्यापुढचे प्रश्न वेगळे होते. ते सोडवण्यासाठी भावनिक दृष्ट्या ज्याही बाबी इष्ट ठरतील त्यांचा त्यांने स्वीकार केला. मुळात समाजावर वैदिक प्रभाव आजही तेवढा ओसरलेला नाही तर त्यांच्या काळात काय स्थिती असेल याची आपण कल्पना करू शकतो.

 

बहुजनवादी (हिंदू आणि अन्यधर्मीय) मात्र अशा गोष्टी समजावून न घेता आपल्या निरंकुश अडाणीपणातून धर्म-देवता या सर्वच बाबी नाकारतात. त्यासाठी तेही लबाड्या करतात. सावित्रीबाईंचे काव्यगुण हे यांच्या खिजगणतीत नसतात कारण त्यांच्या कवितासंग्रहावारेल शिव पार्वतीचे चित्र आडवे येते. हा सांस्कृतिक भोंगळपणा आहे.

 

दुसरीकडे उजवे (वैदिक) बेलगाम होत सोयीस्कर वेळी अशा बाबी बाहेर काढतात आणि या अनाभ्यासी पुरोगामी विचारवंतांची पंचाईत करून टाकतात. याचा अर्थ हा नव्हे कि त्यांचाही अभ्यास असतो.

 

अलीकडेच मुत्तुरामन कृष्णमूर्ती या गृहस्थांनी “कोणताही देव ब्राह्मण नव्हता...” किंवा कोणीतरी म्हत्ल्याप्रमाने “शिव हा तर अनुसूचित जमातीचा...” अशी विधाने करून वैदिकांना दोषमुक्त करण्याचा प्रयत्न केला. शिव-पार्वती या सृजनाची प्रतीके असलेल्या व प्रतीकरुपातच पुजल्या जाणा-या हिंदू देवता आहेत. त्यांना कोणत्याही जातीय वर्गवारीत बसवणे हे सांस्कृतिक गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे. नामसाधर्म्याचा गैरफायदा घेत सांस्कृतिक पितृत्व घेण्याचा प्रयत्न तर वैदिकांचा लाडका छंदच आहे. थेम्स नदी हे तमसा या वैदिक नदीचा अपभ्रंश आहे असे अनेक उद्योग आपण पाहिलेलेच आहेत. रेणुका देवीचेही तसेच केले गेलेले आहे.

 

 

राहिले वैदिक धर्माचे, तर त्यांच्या सर्वच देवता या ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य वर्णात वाटल्या गेलेल्या आहेत. असे असतांनाही कोणताही वैदिक देव ब्राह्मण नाही हे विधान अज्ञानातून आलेले आहे हे उघड आहे. पण तो वैदिक धर्माचा आतला मामला आहे. हिंदूंना त्याच्याशी काही घेणे असण्याचे कारण नाही.

 

विद्येची देवी म्हणून मुळात नदी असलेल्या देवतेची प्रतिष्ठा वाढवल्यावर व प्रचार केल्यावर हिंदूंनीही सरस्वतीचा स्वीकार केला असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. प्रभाव हे अनेक कारणानी पाडले जातात. सांस्कृतिक वर्चस्वतावाद त्यामागे असतोच. शेवटी कोणते दैवत कोणी भजावे अथवा मानावे हा ज्याच्या त्याच्या समजुतीन्चा वा श्रद्धेचा प्रश्न असतो. हिंदूंनी व वैदिकांनी तर पीरांनाही स्वीकारले आहे, भजले आहे. शेख मोहम्मदावर तर रामदासांनी आरती लिहिली होती. म्हणून रामदास हे मुस्लीम होत नाहीत. अनेक मुस्लीम संतकवींनी राम-कृष्ण-विठ्ठलावर काव्ये लिहिली आहेत. पण हिंदू देवता कोणी पुजल्या म्हणून ते हिंदू होत नाहीत आणि वैदिक देवतांना आपल्या काव्यात स्थान दिले म्हणून ते वैदिक समर्थक होत नाहीत. त्या त्या काळातील सांस्कृतिक प्रभावांचा हा परिपाक असतो. पण कोणते दैवत कोणाचे हे आंतरिक आकलन असणेही तेवढेच महत्वाचे.

 

सहज मनाने केला गेलेला कोणत्याही देवतेचा स्वीकार हा सांस्कृतिक समन्वयाकडे नेवू शकतो. पण त्यामागे सांस्कृतिक अतिक्रमणाचा हेतू असेल तर तो कोणत्याही सुजाण समाजाने हाणून पाडला पाहिजे. तुम्ही देव मानता कि नाही ही तुमची व्यक्तिगत भावना आहे. ती तुम्हालाही श्रद्धाळू समाजावर लादन्याचा अधिकार नाही. तुमचे काम चिकित्सा करणे, कोण कोणाचे हे तरी पक्के करणे हे आले पाहिजे व ते सांगत राहिले पाहिजे. लादने हा वैदिकांसारखाच सांस्कृतिक दहशतवाद होईल!

 

वैदिकांनीही कोणी एखाद्या हिंदूने (तुमच्या भाषेत बहुजनाने) कधीकाळी वैदिक देवता, वेद यांचे नाव घेतले होते म्हणजे “पहा पहा...तुमचेच अमुक ढमुक काय म्हणतात ते” असे खोडसाळ प्रश्न विचारून आपलेही दिवाळे निघाले असल्याचा प्रत्यय देवू नये. त्यामुळे हिंदू आणि वैदिक धर्म एक होत नाहीत!

 

हे सत्यच आहे कि वैदिक समाज अल्पसंख्यांक असला तरी गुप्त काळापासून तरी राजसत्ताच्या सोबत राहून भारतीय समाजावर त्याने प्रचंड वर्चस्व गाजवले आहे. वेदोक्त संस्कारांच्या स्तोमातून आजही बरेचशे लोक बाहेर पडलेले नाहीत. मध्ययुगात काय स्थिती असेल याची आपण कल्पना करू शकतो. आता तरी हिंदूंनी या प्रभावातून मुक्त होत आपले पाळेमुळे स्वतंत्र केली पाहिजेत.

 

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...