Friday, September 23, 2022

ईशान्य भारतातून पूर्वेला जोडणारे मार्ग!

 

 


 काश्मीर व लेहमधून हिमालयीन पर्वतराजीतून जाणा-या प्राचीन व्यापारीमार्गांची माहिती आपण घेतली. ईशान्य भारतातुनही तिबेट, चीन ते दक्षिण-पूर्व आशिया खंडातील राष्ट्रांशी जोडणारे अनेक मार्ग प्राचीन काळापासून अस्तित्वात होते. येथून केवळ व्यापाराच नव्हे तर अनेक मानवी स्थलांतरेही झालेली आहेत. सांस्कृतिक बाबींची जशी देवान-घेवाण झाली तशीच उत्पादन व पीकपद्धतीचीही झाली. इशान्य भारताचे विशिष लोकजीवन बनले आहे ते या सान्निध्यामुळे. तेथील लोकजीवन समजावून घ्यायचे असेल तर त्या भागातून जाणा-या व्यापारी मार्गांवर काय काय घडामोडी घडल्या याचाही अभ्यास आवश्यक बनून जातो. 

 इतिहासकाळात उपलब्ध ऐतिहासिक नोंदींनुसार तेराव्या शतकातील खिलजी घराण्याच्या मुहम्मद बख्तियार या बंगालच्या मुस्लीम शासकाने तिबेटवर आक्रमण केले होते. त्यासाठी त्याने आसाममधील गुवाहटीजवळील हाजोपासून निघणारा, त्सोना नदीच्या किना-याने झेदांग येथे गेला व तेथून ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिणेच्या बाजूने ल्हासाच्या दिशेने वाटचाल सुरु केली. हा मार्ग पूर्वेकडे तसाच पुढे जात तत्कालीन चीनी राजधानी चेंगडूपर्यंत जात असे. बख्तियार तिबेटमधील चुंबी खो-यापर्यंत पोचू शकला. तिबेटी सैन्याने गनिमी काव्याने त्याची वाट तेथेच अडवली आणि घनघोर युद्धात बख्तियारचा पराभव केला. बख्तियार परत फिरला तेंव्हा त्याच्या बरोबर फक्त शंभराच्या आसपास सैनिक उरलेले होते. तो थकलेल्या आणि आजारी अवस्थेत देवकोट येथे आला असता त्याच्याच घराण्यातील अली मर्दन खिलजीने त्याचा खून केला. बख्तियार हा इतिहासात कुप्रसिद्ध असून त्यानेच बिहार स्वारीच्या दरम्यान विक्रमशिला, ओदांतपुरा या विद्यापीठांना उध्वस्त केले तर नालंदा विद्यापीठ पुरेपूर नष्ट केले. असे असले तरी त्याची तिबेट स्वारी इतिहासात प्रसिद्ध आहे कारण त्याने रूढ मार्ग टाळून तुलनेने अपरिचित अशा प्राचीन व्यापारी मार्गाचा वापर स्वारीसाठी केला होता.

 पेरिप्लस ऑफ एरिथ्रेयन सी या पहिल्या शतकात लिहिल्या गेलेल्या एका ग्रीको-रोमन हस्तलिखितात इशान्य भारतातील धीस हे स्थान व बेसाते नावाच्या जमातीचा तेजपत्ता या मसाल्याचा व्यापार करत असल्याबाबत उल्लेख आहे. धीस म्हणजे प्राग्ज्योतीषपूर तर बेसाते म्हणजे भुतिया जमात होय असा विद्वानांनी निर्वाळा दिला आहे. भुतिया जमातीने आसाम, तिबेट, चीन व बंगालशी पुरातन काळापासून व्यापारी संबंध ठेवला होता असे यावरून दिसते.

 चीनमधील युनान प्रांत अरुणाचल प्रदेशाला तसा सर्वात जवळचा. बिहारआसामम्यानमार युनान ते थेट थायलंडकंबोडिया व्हिएटनामपर्यंत जाणारे मोठे किमान तीन मार्ग तरी इसवी सनपुर्व दुस-या शतकापासून वापरात होते. अन्यही कमी अंतराचे पण चीनला जोडनारे चार मार्ग ऐतिहासिकदृष्ट्या नोंदवले गेलेले आहेत. उदाहणार्थ आसाममधून सिचुआनला जाणा-या एकमेव मार्गाची नोंद जरी अरबांनी करून ठेवली असली तरी भारतात मात्र त्याबाबत फारशी माहिती लिहून ठेवलेली मिळत नाही. हा मार्ग फार दुर्गम होता. या मार्गाने सिचुआनला पोचायला दोन महिने लागत आणि हा मार्ग रानटी चिन्यांनी वसाहती केलेला असून विषारी दमटपणाने भरलेला, जीवघेणे साप आणि विषारी झाडाझुडुपांनी भरलेला असल्याचेही नोंदीत म्हटले आहे. याचाच अर्थ अशाही स्थितीत प्राचीन काळापासून हा मार्ग वापरात होता व धाडसी व्यापारी व्यापार करत होते हे सिद्ध होते. म्यानमार-आसाम मार्गाबाबतही अनेकदा चर्चा झालेली असली तरी पुरातन मार्गांचे पुनरुज्जीवन आपल्याला अजून नीटसे साधलेले नाही हे उघड आहे.

 खरे म्हणजे हे मार्ग उत्तरेतील मध्य आशियाला जोडणा-या मार्गांइतकेच केवळ व्यापारच नव्हे तर सामरिक दृष्ट्यासुद्धा महत्वाचे आहेत. १९६२ च्या युद्धानंतर चाळीस वर्ष बंद झालेला नथु-ला खिंडीतील मार्ग व्यापारासाठी पुन्हा वापरात येऊ लागला होता पण डोकलाम वादानंतर पुन्हा त्यात खिळ बसली आहे. चीनने एकीकडे प्राचीन रेशीम मार्गांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करीत "वन बेल्ट वन रोड" हा महाकाय प्रकल्प नवा रेशीम मार्ग बनवण्यासाठी हाती घेतलेला आहे. एके प्रकारची भारताची कोंडी करण्याचा हा चीनचा प्रयत्न स्वत:ची मार्ग बांधणी ते इशान्य भारतातुन येणा-या मार्गांची अडवणुक यातून दिसतो. वन बेल्ट वन रोड प्रकल्पात भारत सहभागी झालेला नाही याचाही राग चीनला आहेच.

 आजवर पश्चिमेकडेच डोळा असलेल्या भारताने मध्य आशिया व पुर्वेकडील राष्ट्रांकडे व्यापार व सामरिक दृष्ट्या विशेष लक्ष दिले नाही. प्राचीन मार्ग आज वापरात राहिलेले नसल्याने ते लोक-स्मृतीतही फारसे राहिलेले नाहीत. प्राचीन मार्गांचे पुनरुज्जीवन करत चीनला टाळत पुर्वेकडील देशांशी खुष्कीच्या मार्गाने दळणवळण वाढवायला हवे होते. १९९३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी "पुर्वेकडे पहा" अशी हाळी दिली होती. त्याचा परिपाक म्हणून इंग्रजांनी दुस-या महायुद्ध काळात आखलेल्या "स्टिलवेल" प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचे घाटले होते. स्टिलवेल प्रकल्पानुसार ब्रह्मपुत्रा खो-यातून जाणा-या पुरातन व्यापारी मार्गाची पुनर्बांधणी करीत म्यानमार ते थायलंड आणि मलेशिया जोडायचे घाटत होते. या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचे नरसिंह रावांनी ठरवले. म्यानमारनेही यात रस घेतला होता. अन्यही राष्ट्रांशी बोलणी सुरु होती. या धोरणानुसार म्यानमारफिलिपाइन्सकंबोडिया वगैरे पुर्वेकडील देशांशी व्यापारी आणि लष्करी संबंध दृढ करणे हा हेतू होता आणि या देशांना जोडणा-या रस्त्यामुळे त्याला मोठीच मदत होणार होती. शिवाय याचे सामरिक व राजकीय लाभही भारताला होणार होते.

 आजही आपला पश्चीमीतील देशांशी व्यापार व राजनैतिक संबंध सातत्याने येत असले तरी आपला पुर्वेकडील देशांशी होणारा व्यापार नगण्य आहे. सांस्कृतिक व राजनैतिक बाबींपासून भारतीय शक्यतो अलिप्त राहतात आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे पूर्वेकडील देश निकट असले तरी तिकडे पाहण्याची आपली दृष्टी संकुचित आहे. याचा दुष्परिणाम असा कि व्यापारवृद्धीसाठी स्थानिकांनी जे प्रयत्न करायला हवेत तेही केले जात नाहीत. याचा नकळत झालेला दुष्परिणाम असा कि पूर्वेकडील राष्ट्रांतील महत्वाची कंत्राटे चीनच्याच घशात जात आहेत. भारत एक प्रबळ व्यापारी प्रतिस्पर्धी म्हणून पुढे न येण्याला दळनवळनातील सुलभता नसणे हे महत्वाचे कारण आहे. किमान हा रस्ता जर बनला तर या देशांतील अंतर खूप कमी होणार आहे. त्यामुळे व्यापारात व सेवा पुरवण्यात आज आहे त्यापेक्षा अनेक पट आघाडी घेता येणे शक्य आहे. म्यानमारमधील तेल आणि वायुच्या साठ्यांचा उपयोग मध्यपुर्वेवर असलेले सध्याचे अवलंबित्व कमी करण्यातही उपयुक्त ठरनार आहे. शिवाय सामरिक हालचालींसाठी सुद्धा या रस्त्याचा उपयोग होईल असे तज्ञांचे म्हणणे आहे.

 पण एकंदरीत अनास्थेमुळे प्रत्यक्षात या प्रकल्पाला फारसे पुढे नेता आले नाही. यात चीननेही खूप खोडे घातले. नंतर अटलबिहारी वाजपेयींनी पुर्वेकडे पहा या धोरणाला उचलून धरले पण प्रत्यक्षात काही व्यापार करार होण्यापलीकडे रस्त्याचे काम काही पुढे सरकले नाही. त्यानंतर तर या विषयाला विस्मरनातच टाकले गेले. खरे तर चीनला शह देण्यासाठी अशा मार्गांची नितांत गरज होती व आहे. आपण सध्या फक्त सीमाभागात रस्ते बांधण्यावरच जोर दिला आहे. पण हे पुरेसे नाही हे भारताने लक्षात घेण्याची गरज आहे. आपली सामरिक व आर्थिक शक्ती वाढवण्यासाठी उत्तरव उत्तरपुर्वेकडील पुरातन व्यापारी मार्गांचे पुनरुज्जीवन करणे काळाची गरज आहे. चीनला शह द्यायचा असेल आणि भारताचा व्यापार-उदीम वाढवायचा असेल तर  बासणात बांधुन ठेवलेले "पुर्वेकडे पहा" हे धोरण पुन्हा नव्याने राबवणे आवश्यक ठरते.

 -संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...