Monday, September 19, 2022

आदमची गोष्ट


 

पुर्वेने नवा दिवस उगवल्याची घोषणा केलीआतापर्यंत अंधाराशी हातमिळवणी करून एकाकार झालेले जंगल त्या धुसर उजेडाने आपले स्वतंत्र अस्तित्व टोकदारपणे दाखवू लागले. निराकाराला आकार येवू लागला आणि प्रगाढ शांततेवर पक्षांच्या किलकिलाटीच्या बुट्ट्याही उमटू  लागल्या. पलिकडच्या पहाडाआडुन सुर्याने जसे डोके वर काढले तसा अभेदातील भेद अधिक ठळक झाला. ्घनदाट वृक्षराजींचे शेंडे सोनेरी प्रकाशात उजळुन निघाले. ही वेळ आली कि आदम अरण्यातून झिरपणा-या या किरणांना अलगद तुडवत आपल्या कामगिरीवर निघे. त्याला घाई अशी कधी नसे. निसर्ग हर क्षणाला बदलत असे आणि ते परिवर्तन आपल्या निरागस डोळ्यांत साठवत, चिरपरिचित असलेल्या हरीण-पाडसांशी, खारोट्यांशी, हुप्प्यांशी गप्पा मारत आदम निगुतीत आपले मार्गक्रमण करे

 

हा त्याचा दिनक्रमच होता जसा. दिस माथ्यावरून ढळेपर्यंत तो जळणासाठी लाकडे तोडे. आजवर त्याने जीवंत झाडांवर कु-हाड चालवली नव्हती. वठलेली मरू घातलेली अनेक झाडे अरण्यात होती. तो त्यातल्याच एखाद्या झाडाची लाकडे तोडे. स्वत:ला पेलता येईल एवढा भारा झाला कि मग तो वेलींनी शिस्तीत बांधुन तो खांद्यावर घेई व अरण्यापार एका टेकडीच्या मागे असलेल्या गो-यांच्या वसाहतीकडे त्याच निगुतीत चालू लागे. संध्याकाळर्यंत तो आरामात ते अंतर चाले. घनदाट राईतुन विरळ झाडी व डोंगराळ मार्ग आला कि त्याला नको असलेल्या जगात प्रवेशल्यासारखे वाटे. शेवटचा डोंगर ओलांडला कि गो-यांची वसाहत येई. तो त्या वसाहतीमधून कधीच गेला नव्हता. तिला वळसा घालुनच तो जाई. या वसाहतेच्या टोकाला, झाडीत, एखाद्य वाळीत टाकलेल्या काळ्या माणसासारखी एक लाकडाची वखार अंग चोरुन वसलेली होती. सरळसोट लाकडांचे ओंडके आणि त्याच्याच काढलेल्या फळ्यांचे ढीग वखारीचे आवार भरून होते. वखारीत घुसले कि पायाखाली भुसा व लाकडांचे तुकडे. एक वेगळाच वास येथे भरलेला असे. शवागारात यावा तसा. मृत झाडांचा. त्याला हे नकोसे वाटे. जेवढ्या लवकर आपले ओझे विकता येईल तेवढ्या वेगाने, त्या दिवशी मिळेल त्या किंमतीला तो विके आणि वेगात बाहेर पडे. आजुबाजुला तर त्याने कधीच लक्ष दिले नव्हते. अगदी सायंकाळी बाहेर फिरायला पडलेल्या नटव्या सुंद-यांकडेही त्याचे लक्ष नसे. किंबहुना हे जगच त्याच्या समजुतीबाहेरचे होते आणि समजून घ्यायची गरजही त्याला कधी वाटली नव्हती.

 

त्याची रोजची कमाई एकसारखी नसे. घासाघिस करणेही त्याच्या स्वभावात नव्हते. किंबहुना तो बोलेच इतका कमी कि अनेकांना तो मुका वाटे. आज किती पेनी मिळाल्यात यावर तो काय खरेदी करायची हे ठरवे. गो-यांची वसाहत सोडली कि उजव्या बाजुला चढावर काळ्यांची जुनी-पुरातन, जीव हरवलेल्या वठलेल्या झुडुपांप्रमाणे पसरलेली वस्ती होती. त्याची खरेदी तेथेच होई. कधी काळा पाव, पावटा, भात आणि मीठ घ्यायला परवडतील एवढे पैसे असत किंवा ब-याचदा त्यातही कटौती करावी लागे. पण त्याचीही त्याला खंत नसे. खरेदी झाली कि ती पाठंगुळीला टाकून तो अरण्यातील आपल्या झोपडीकडे संथपणे चालू लागे. दिवस जेंव्हा अंधाराची गळाभेट घेण्याच्या तयारीत असे तेंव्हा तो थकल्या पावलांनी आपल्या झोपडीत परते.

 

अरण्यात त्याची झोपडी एका छोट्या तळ्याकाठच्या मोकळ्या जागेत होती. येथे तो आपल्या मंदबुद्धी बायकोच्या सहवासात कितीतरी वर्ष रहात होता. त्याच्या गांवातील लोक तर आता त्याच्या या एकाकी ठिकाणी जंगलात राहण्याच्या निर्णयावरून चिडवायचेही विसरून गेले होते आणि आदमलाही आपण गांवात ...गांव कसले...काळ्यांचा घेट्टोच तो... का राहत नाही हा प्रश्नच पडत नसे. पण जसा तो परततांना अरण्यात पुन्हा प्रवेशे त्याचा थकवा कोठल्या कोठे पळून जाई. अरण्याचा गंध त्याला मत्त करी. अंधारात अरण्याचा हवेच्या झोतांवर होणारा सळसळाट, पक्षांचा रात्रनाद आणि द-याखो-यांतील हिंस्त्र प्राण्यांच्या डरकाळ्या कानावर पडल्या कि त्याला घरी आल्याचा आभास मिळे. त्याच्या एरवी एक रेषही न हलणा-या चेह-यावर आत्मतृप्तीचे मंद हसू विखरे. त्याची चाल परत संथ होई...ती हे अंधारी निबीड रोमांचक अरण्य आपल्या रोमारोमांत भरून घेण्यासाठी.

 

जेंव्हा पावसाचे वादळी तडाखे बसत तेंव्हा तो हातातील काम सोडुन देई. एखाद्या खडकावर वा ओंडक्यावर पाऊस झेलत अनावर कुतुहलाने चिंब निथळत्या, वादळांना शरणागत होत पुन्हा ताठ होण्याचा प्रयत्न करणा-या अरण्याकडे अथवा दुथडी भरून वाहणा-या ताम्री नदीकडे पहात बसे. त्याची लोखंडाच्या कांबीसारखी काळीशार मजबुत शरीरयष्टी निसर्गाचे सारेच आघात कृतज्ञतामय आनंदात झेलण्यात धन्यता मानत असे. मग ती शरीर गोठवणारी थंडी का असेना. या उघड्या-वागड्या पण एका स्वर्गीय लयीत जगणा-या जगात त्याचे जग पुर्ण समर्पण भावनेने मिसळून गेले होते. अरण्य त्याच्याच देहाचा-मनाचा अविभाज्य भाग होता जसा.

 

 आदम जेंव्हा पोरगेलासा होता नि घेट्टोत रहात होता तेंव्हा शेकोटीजवळ बसून दारू पीत त्याचा आज्जा त्याला त्याच्या तरुणपणाच्या गोष्टी रंगवून सांगत असे. त्याचे खोल गेलेले निस्तेज डोळे त्या गोष्टी सांगतांना जीवंत होत. चंदेरी रात्री एखाद्या हरणाचा अथवा सिंहाचा पाठलाग करत असतांनाच्या गोष्टी सांगे तेंव्हा त्याचा आवाज सभोवतीच्या अंधाराला जणू ललका-या देईत्याची सांगायची शैलीही अशी होती कि आदमला वाटे तोही जणू त्या अरण्यातून प्रवास करतोय...धोकेदायक गुंफांत प्रवेशतोय...अशक्यप्राय वाटा तुडवतोय. आदमला वाटे या गोष्टी कधी संपुच नयेत. पण आज्जा गोष्ट सांगता सांगता पीतही भरपूर असल्याने त्याची जीभ जडावू लागे, सिंहाच्या जागी हरीण तर हरणाचे माकड कधी होई याचा पत्ता लागायचा नाही. शेकोटीही विझत आलेली असे नि आज्जा तसाच कलंडुन गाढ झोपी जाई. आदम स्वत:च अरण्य बनलेला असे. त्यातून फिरत असे. झेपावणारे हिंस्त्र प्राणी त्याच्या रक्तात्न निवांत शांतपणे वाहत असत. त्याला लवकर झोप लागायची नाही. अरण्य साद द्यायचे. उद्या पुन्हा दुसरी गोष्ट आज्जाकडून ऐकायची असा निर्धार करत डोळे मिटुन तो मन अरण्यात झेपावत राही.

 

गो-यांसोबतही आज्जा अनेकदा शिकारीला गेलेला. ते किस्से सांगतांना आज्जाच्य स्वरात तिरस्कार असे. उपहास असे. या गो-यांना कोणत्या प्राण्याला कसे मारायचे याची अक्कल कशी नाही हे तो उदाहरणे देवून सांगे. त्यांच्याकडे बंदुकी होत्या. भेकडाचे शस्त्र...आज्जा म्हणे. धनुष्यबाण आणि भाल्याने शिकार करण्यात जे शौर्य आहे ते हाकारे काढत बंदुकीतून गोळी झाडण्यात होते? अरे हाड...आज्जा जाळात थुंके नि मग भांडे पुन्हा तोंडाला लावे. पण त्या बंदुकीनेच त्यांचाही घात केला होता. पाहता पाहता ते गुलाम झाले होते.

 

आदमही एकताच अरण्यात भटकायला निघून जाई. ताम्री नदीच्या काठावर तासन्तास बसे. आज्जाने सांगितलेल्या कथा आठवत. तो स्वत:शी हसे. मी नाही शिकारी बनणार...तो म्हणे. अरण्यातील प्राणी मारण्यात काय अर्थ? हा- एखादा सिंह अंगावर आला तर गोष्ट वेगळी. त्यापेक्श्ढा त्याला ताम्रीच्या अविरत वाहणा-या प्रवाहाकडे ओपाहत बसणे किंवा झाडाखाली बसून वेगवेगळे पक्षी व माकडांच्या गंमती पाहण्यात जास्त मजा वाटे.  

 

आदम तरुणावस्थेत जसजसा प्रवेशत गेला तसतसे त्याचे बोलणेही कमी होत गेले. त्याला कोणी दिलखुलास हसलेलेही पाहिले नाही. नवख्या लोकांना तर तो मुकाच आहे असे वाटे. गो-यांनी काळ्यांना सुसंस्कृत करण्यासाठी घेट्ट्त शाळाही उघडलेली होती. काळ्यांना प्रभुप्राप्ती व्हावी, त्यांनी त्यांचे रानटी देव विसरून जावे म्हणून त्यांचे धर्मांतरही केलेले होते. घेट्टोचे स्वत:चे असे काळ्यांसाठीचे चर्चही होते. खरे तर चर्च आधी आले. शाळा नंतर. त्याला त्याच्या बापाने शाळेत घातले होते. पण आदमचा जीव रमला नाही. अक्षरे त्याला निरर्थक वातल्याने ती शिकायचा-लक्षात ठेवायचा त्याने किंचितही प्रयत्न केला नाही. बायबलमधील उतारे घोकायचे तर त्याच्या जीवावर येई. तोंडातल्या तोंडात गुळमुळीत लापशी चघळावी तशी ती गो-यांची भाषा. उलट आपली भाषा भाल्यासारखी टोकदार आणि कलिंगडासारखी गोडकोणी मित्र त्याच्याशी इंग्रजीत बोलू लागला कि तो जणू ती भाषा आपल्याला समजतच नाही असे दाखवे व निघून जाई. जेत्यांची भाषा आपली भाषा कशी होऊ शकते? त्याला प्रश्न पडे. पण तो विरोधही करत नसे. त्याचा विद्रोह अबोल होता. किंबहूना आपण विद्रोही आहोत हेही त्याला माहित नव्हते. पण त्याच्या मानवी आसमंतात जे घडत होते ते त्याचे मन अजाणतेपणे टिपत चालले होते.

 

आपल्या पणजोबा-खापर पणजोबांवर किती अन्याय झाले याच्या दबक्या आवाजात सांगितल्या गेलेल्या कथा त्याने ऐकल्या होत्या. आजही त्यात फरक पडला नव्हता. ते काळे होते. गो-यांच्या दृष्टीने आदिवासी होते. मुर्ख आणि मतिमंद होते. त्यांना संस्कृतीच नव्हती. ते त्यांचे मत होते आणि ते बलावर काळ्यांवर लादत होते. हे कोण उपटसुंभ? ते तर परके होते आणि एखाद्या शापासारखे या भुमीवर येऊन आदळले होते. या भागावर आपल्याच पुर्वजांचे राज्य गोंमर्की देव जन्माला आला तेंव्हापासून होते. आता गोंमर्की देवाचे पर्वतावरचे स्थानही नष्ट झाले होते. आकाशातील बापाचे चर्च गांवात होते. काळे आता गुलाम होते. लहानपणी अनेकांना साखळदंडांत बांधून फटके मारत नेतांना त्यांनेही पाहिले होते. कोठे नेतात याचा कोणालाच अंदाज नव्हता. जग केवढे आहे आणि हे गोरे लोक कोठले हे आता आता समजू लागले होते. ही समज गुलामीतून येत होती हे त्यातील दुर्दैव. पण काय गरज आहे जग माहित असण्याची? येथलेच आसपासचे जग समजायला जन्म जातो. आदमला वाटे.

 

गो-यांनी फसवून आणि बंदुकीच्या जीवावर आपल्याला गुलाम बनवले ही खंत होतीच. आता काही बंधने सुधारणेच्या नांवाखाली हटली असले तरी काळे हे गुलामच होते व त्यांना घेट्टोतच रहावे लागे. गतकाळातील अत्याचाराच्या कथा मात्र म्हाता-या-कोता-यांच्या शरीरावरील जखमांच्या व्रणांच्या रुपात अजुनही सांगितल्या जात. आताचे हे अर्धवट स्वातंत्र्य भक्षाच्या शरीरातील सर्व रक्त शोषून झाल्यावर त्याला मरायला सोडुन देण्याप्रमाणे होते. त्यांचा मुळचा स्वतंत्र श्वास लुबाडला गेला होता. नवे जग बनत होते पण ते त्यांचे नव्हते. काळे आता पाटलोनी-शर्ट घालू लागले होते आणि आपल्याच जुन्या वेशभुषा आणि सवयींची कुचेष्टा करू लागले होते. धर्म तर कधीच बदलला गेला होता. इंग्रजीत बोलता येण्याला अपार प्रतिष्ठा मिळाली होती. जुने उत्सव, ढोलांच्या दनदनाटावरील बेफाम नृत्याकडॆ आज ते उपहासाने पाहत...ते करु पाहणा-यांना गावंढे म्हणत. जणू जुने जग हे कधी अस्तित्वातच नव्हते. ते झपाट्याने बदलत होते...इतके कि आदम पार मागे फेकला गेला होता जसा. त्याला या काळाशी..मनांशी जुळवून घेता येत नव्हते हा जणू दोषच बनला होता जसा.

 

 

आदमचे मुकेपण गहिरे होत चालले होते.

 

त्याचा बाप काळ्यांसाठी असलेल्या चर्चमद्ध्ये अटेंडंटचे काम करे. त्याने आदमचे लग्न करायचे ठरवले. आदम मुलींबाबत फार म्हणजे फारच बुजरा. मुली आजुबाजुला असल्या कि तो संकोचून जाई. उलट वस्तीवरच्या मुली फारच मोकळ्या ढाकळ्या. तसेही त्यांच्या जमातीत मुला-मुलींमद्ध्ये खुलेपणाचेच वातावरण असे. पण आदमला त्या वातावरणाचा फायदा घेण्याचीही कधी इच्छा झाली नाही. खरे तर त्याला जीवनाबद्दलच आकर्षण उरले नव्हते तर मुलींचे कोठून असणार? त्याने बापाच्या प्रस्तावाला विरोधही केला नाही कि स्विकृतीही दिली नाही. मुकच राहिला. बापाने धावपळ करून शेजारच्या वस्तीवरील एक मुलगी त्याच्यासाठी शोधली. तीही मतीमंद वाटावी अशीच. आदमचे लग्न पार पडले. आदमच्या व्यक्तिगत इच्छेचा प्रश्न नव्हता. त्यांची पहिली रात्र एकार्थाने भयंकर होती. हा बेडवर चिडीचूप शुन्यात पहात बसलेला तर बायको हा पुढाकार घेईल या अनिवार इच्छेने वाट पहातेय. ती जंभया देवू लागली. तरीही आदम बसलेलाच. शेवटी ती म्हणाली, "मी झोपते आता. तुला एकच सांगते...अजुनही मी कुमारिकाच आहे...म्हणजे तुला काही संशय येत असेल तर..."

 

अनोलखी स्त्रीशी कसे वागावे या संभ्रमात तो होता. तिच्या शब्दांनी त्याला धीर दिला पण साहस नाही. असे  नाही कि तारुण्यसुलभ भावनांचा ज्वालामुखी त्याच्यात उसळत नव्हता. पण अशा वेळीस वागायचे कसे हे कोठे त्याला माहित होते? शेवटी बायकोनेच पुढाकार घेतला नि मग सारे ठीक झाले.

 

तो तेंव्हा जगण्यासाठी वखारीवरच काम करे. त्याच्या सभोवती ओंडक्यांचे ढीग असत. त्याचे काम होते ते ओंडके उचलून आणायचे आणि राक्षसी यांत्रिकी करवतीसमोर ठेवायचे. ती करवत सफाईने ओंडक्याच्या चिरफळ्या उडवत जाई. संपुर्ण ओंडक्याच्या फळ्या निघाल्या कि दुसरा ओंडका. मेहनत खूप होती. त्याला त्याचे काही विशेष वातत नव्हते. वाटे ती खिन्नता. त्या चिरफळणा-या ओंडक्यांकडे पाहून त्याला वेदना होत. अरण्यात आपल्या मस्तीत वाढलेली झाडे तोडून आणली जात. हे ओंडके त्याला मेलेल्या नग्न पुरुषांसारखे दिसत. वखार झाडीतच विसावलेली होती. एकीकडे कत्तल करून आणलेल्या झाडांचे ओंडके चिरफाळत असतांना ती झाडे हवेवर डोलत...सळसळत जणू काही निरागस बोलू पाहत तेंव्हा त्याला अपराधी वाटे. जणु तोच या विनाशाला-हव्यासाला जबाबदार होता. "हे मी काय करतो आहे?" त्याला प्रश्न पडे. "मी माझ्या सगेवाल्यांना असा चिरफाळू शकेल?"

     

तो अशा प्रश्नांत बुडुन जात जरा स्तब्ध झाला कि गोरा सुपरवायझर त्याच्या अंगावर धाऊन येत म्हणे -"डुकरा, तुला यासाठी पगार देतो का? चल उठ....कामाला लाग नाहीतर गांडीवर लाथ मारील..." तो निमुटपणे उठे. दुसरा ओंडका उचलून आणायला निघे. त्याला रागही येत नसे वा भितीही नव्हती कि खंतही. किमान तो ती दाखवत नव्हता. जीवन आहे तसे त्याने स्विकारले होते.   

 

पण कधीतरी याचाही कंटाळा येतोच. किंवा त्याच्या मूक मनाने काही अव्यक्त विचार केला असेल. पण आजकाल रात्री झोपतांना त्याच्या मनात विचार उगवू लागले. हे आपण का झेलतो आहोत? या वातावरणात आपण रुजू शकत नाही तर त्यात का राहतो आहोत? आपल्याला आपल्याच आत्म्याच्या चिरफळ्या करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? जर तो स्वतंत्र असेल, म्हणजे, खरेच स्वतंत्र असेल तर आपल्याला जे आतून वाटते तसे आपण का वागू शकत नाही?

 

कामाची वेळ संपल्यावर तो अन्यमनस्कपणे इतस्तत: फिरत बसे. आपल्या आत सहजगत उगवलेल्या प्रश्नांनी ज्वालामुखीचे रुप कसे घेतले हे त्यालाच समजले नाही. पण बापाला आपल्याला काय वाटते हे कसे सांगावे? आज्जा तर मृतांच्या राज्यात कधीच निघून गेलेला. आपण जे बोलू ते बायकोला कितपत समजेल ही आशंका. मुळात आपण बोलतच नाही. कोणाशीच नाही. स्वत:शी तरी आपण बोलतो का? पण आता हा आतील बोलण्याचा निनाद विस्फोटत चालला आहे. मस्तक फुटेल असे वाटतेय. रविवारी तो जंगलात जाई. झाडांशी, ताम्रीच्या वाहत्या पाण्याशी बोलण्याचा प्रयत्न करे. पण शब्दही बेईमान. आपल्याकडे शब्दही नाहीत कि काय?

 एके गहि-या रात्री त्याला राहवले नाही. एकाएकी बाजुलाच गाढ झोपलेल्या बायकोला त्याने हलवून जागे केले आणि आवेगी स्वरात म्हणाला -"मी नाही राहू शकत येथे. घुसमटतोय मी. आपण जंगलात रहायला जावूयात. वखारीवर काम करायची माझी तीळमात्र इच्छा नाही. या माणसांत रहायची इच्छा नाही. हे बघ...आपण दोघे जाऊ. तू काळजी करू नकोस. तू आज जशी जगतेहेस तशीच...त्याहीपेक्षा जास्त सुखात ठेवेल मी तुला."

 तीने डोळे फडफडवत तो काय म्हणतोय ते त्या अर्धझोपेत समजावून घेण्याचा प्रयत्न केला. तो अनिवार आशेने ती काय म्हणतेय याची वाट पहात होता.

 त्याची बायको खरेच मतीमंद होती की नाही, काय माहित पण ती हलक्या स्वरात म्हणाली, "तुला तसे वाटत असेल तर तसे. मी तयार आहे. जंगलात राहणे ही मजाच असेल कदाचित!"

 आदमला हे अनपेक्षीत होते. लग्नानंतर पहिल्यांदाच त्याला आपल्या मनात बायकोची छ्बी उंचावल्यासारखे वाटले. त्याने तिला असोशीने जवळ घेतले आणि चुंबनांच्या मा-यात तिला गुदमरवून टाकले. आजची रात्र ख-या मधुचंद्राची होती.

 बायकोमुळे त्याचे धैर्य वाढले होते. सकाळी तो बापाला सामोरा गेला. तो तेंव्हा डुकराची भाजलेली बरगडी खात बांबुच्या खुर्चीवर बसला होता. बापाला त्याने कसली प्रास्तविक न क्लरता आपला निर्णय सांगितला. बापाच्या हातातील डुकराची बरगडी पडता पडता वाचली. तो डोळे विस्फारून आपल्या वाया गेलेल्या मुलाकडे पाहू लागला. याला नक्कीच वेड लागले असले पाहिजे. त्याने सावरत आदमचा निर्णय मुर्खाप्रमाणे असल्याचे घोषित केले आणि आपल्या झातातील खाद्याकडे लक्ष केंद्रेत केले. पण आदम त्याच ठाम स्वरात म्हणाल्यावर बाप पिसाळला. आक्खे घर डोक्यावर घेतले. धमक्यांचा व शिव्यांचा पाऊस पादला. आदम मुकपणे निर्विकार उभा होता. त्याच्यावर काहीच परिणाम होत नाहीसं बघून बापच हतबल झाला. पुन्हा आपल्या खुर्चीवर बसला. म्हणाला-

 " का अशी अवदसा सुचतेय तुला मुला?" त्याने खचलेल्या स्वरात विचारले. "अरे, असा विचार करणेही मुर्खपणा आहे. आपल्या नातलगांत, गांववाल्यांत रहावे, प्रगती करावी, गोंडस नातवे द्यावीत नि त्यांचे भविष्य या लोकांपेक्षा मोठे घडेल हे सारे करण्याऐवजी जंगलात रहायला जाण्याचा विचार पाखंड नाही काय? गो-यांएवढेच...किंबहुना त्यांच्यापेक्षा श्रीमंत व्हावे अशी स्वप्ने तुला पडतच नाहीत काय? ज्या वखारीत आज तू मजूर आहेस तोच एक दिवस विकत घ्यायचे नुसते स्वप्न पाहिले असतेस किंवा ज्या जमीनी आपल्या होत्या...ज्यावर आपल्या बापदाद्यांनी घाम गाळला त्या पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तरी मला धन्य वाटले असते. असले कोणते भूत तुझ्यावर स्वार झालेय कि माझ्या स्वप्नांवर थुंकतो आहेस तु? अरे...जरा शहाणा हो..." त्याचा बाप थकल्या स्वरात म्हणाला.

 काही क्षण आदम आपल्या बापाकडे त्याच स्थिर...निर्विकार नजरेने पहात राहिला. मग म्हणाला-

 "पा, मला मुळात काही नकोच आहे. असं नाही कि मला माझ्या काही इच्छा नाहीत. आहेत. नक्की आहेत. पण येथे माझा जीव घुसमटतोय. माझ्या मनावर येथे रोज अत्याचार होताहेत. मला या घुसमटींपासून स्वातंत्र्य हवे आहे. खरे स्वातंत्र्य. ही माझी इच्छा आहे पा. मला खोटी स्वप्ने भुलवत नाहीत. आपण हरलो आहोत. आपण किती चांगले इंग्रजी बोलू शकलो तरी माझ्यासाठी ती जितांची भाषा आहे. माझी रांगडी पण अनवट भाषा मला प्रिय आहे. अरण्य मला प्रिय आहे. मला माणसांचा सहवासच नकोय. कंटाळलोय मी त्याला. मी लढु शकत नाही. खरे तर मी शरण चाललोय निसर्गाला. माझ्या आत्म्याची वसती जेथे आहे तेथेच मी राहणे हे माझे स्वातंत्र्य आहे. माझ्या उध्वस्त जीवनाचे विखुरलेले तुकडे मला पुन्हा गोळा करायचेत पा. जे आयुष्य आपल्याला मुळात समजतच नाही ते निमुटपणे जगत राहणे हे पाप होईल. मला ते करायचे नाही. आजचे जगणे मला समजत नाही. लोकांना जे स्वातंत्र्य वाटते ते स्वातंत्र्यही मला समजत नाही. वैभवाच्या आजच्या बललेल्या संकल्पनाही मला समजत नाहीत. तसाही मी मतिमंदच आहे. मला जाऊद्या पा....प्लीज..."

 आतापर्यंत मुक्यात जमा झालेला आपला पोरगा एवढे बोलल्याचे पाहून बापाला आश्चर्य वाटले. जणू आजवरच्या जगण्यातले मुकेपण एवढ्यातच बोलून गेला होता. तो मागे रेलला. त्याला कसलाच काही अर्थ लागत नव्हता.

 "गोरे दयाळू आहेत आदम. समजत नाही का तुला? त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. हे जग काय आहे, ज्ञान आणि विज्ञान काय आहे हे त्यांच्यामुळेच आपल्याला समजलं. नाहेतर काय होतो आपण? रानटी! होय...रानटी होतो आपण...मागासलेले. कसलीही अक्कल नसलेले. आता स्वातंत्र्य आलंय. का नाही त्याचा वापर करत त्यांच्याशीच स्पर्धा करत त्यांच्यापेक्षा अधिक प्रगती करायची? का नाही? त्यांच्या कला शिकून त्यांना पराजित करायची स्वप्न पहा मुला. असले अभद्र विचार करू नकोस."

 बाप म्हणाला व प्रतिक्रियेसाठी मुलाकडे टक लाऊन आशेने पाहु लागला. आदमचा चेहरा अजुनही निर्विकारच होता. जणु त्याच्यावर काहीही प्रभाव टाकु शकणार नव्हते.

 बराच वेळ गेल्यावर आदम पुर्ववत स्वरात म्हणाला,

 "पा, आपण त्यांच्यासारखे होण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांच्यासारखेच होऊ शकणार नाही. एका मातीतील रोप दुस-या मातीत त्याच उल्ल्हासाने रुजत नाही. ते त्यांच्या जगात श्रेष्ठच राहतील कारण काय श्रेष्ठ हे ठरवण्याची साधनेही त्यांच्याकडेच असतील. त्यांची नीति व आपली नीति वेगळी. आपल्या जगण्याचे मार्ग नि त्यांचे मार्ग यात कसलेही साम्य नाही. नक्कल करुन काय साध्य होणार? धड आपलेही नाही नि धड त्यांचेही....असले वेडपट जगणे का म्हणून लादून घ्यायचे? त्यांच्या कला शिकल्याने आपण त्यांच्यासारखे नाही होऊ शकत. आपले पुर्वज मुर्ख नि येडचाप होते एवढेच त्यातून आपण सिद्ध करु...बस्स! त्यांनी आपल्याला हरवले...गुलाम केले कारण त्यांची साधने व शक्ती आपल्याकडे नव्हती. आपण हजारो वर्ष शांतीत जगलो कारण आपण सुसंस्कृत होतो. पण या सुसंस्कृतपणात एक दुबळेपणही असते. सुसंस्कृतांवर कधी ना कधी रानटी बर्बर आक्रमण करतात...पराभव होतो...गुलामी वाट्याला येते. म्हणून जिंकणारे सुसंस्कृत ठरत नाहीत. आणि मुळात कोण पुढारलेला आणि कोण मागास हे ठरवण्याचे नेमके कोणते मापदंड आहेत? ते कोणी ठरवायचे? ठरवणा-यांना ते केवळ जेते आहेत म्हणून हे ठरवण्याचा अधिकार प्राप्त होतो काय? गोरे आज आपल्यावर राज्य करताहेत म्हणजे ते पुढारलेले आहेत असे कसे असेल?

 "मला वेडपट स्वप्ने पडत नाहीत. मला असंस्कृतांशी स्पर्धाही करायची नाही. कोणी करावी कि न करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी क्रांतीकारक नाही. मला माझे असे जीवनाबाबतचे विचार आहेत. तेच आहेत जे माझ्या पणजाचे नि खापरपणजोबाचे होते. ही क्रांती नाही. कोणता नवा विचारही नाही. मला येथले जगणे आवडत नाही...जगण्याची ही पद्धतही आवडत नाही नि या जगाची स्वप्ने मला स्पर्शतही नाहीत. जेथे माझी स्वप्ने आहेत तेथे मात्र मी गेलेच पाहिजे. स्वातंत्र्य असेल तर ते स्वातंत्र्य आहे. पा...मी जाणार."

 आदमचा आवाज आता किंचित चढला होता. चेह-यावरील नसा टरटरुन फुगल्या होत्या. आपण लढाई हरलो आहोत हे बापाच्या लक्षात आले. तो पुन्हा मागे झुकला. खांदे पडले. डोळ्यांत एक अपार दुबळेपण दाटून आले. काहीच होणार नाही हे त्याच्या लक्षात आले होते. हळुहळू त्याच्या डोळ्यांत पाणी तरळु लागले नि पाहता पाहता तो हमसून हमसून रडू लागला. आदम काही क्षण थांबून तेथून निघून गेला.

 

 

*

 

आदमने उत्तरेकडच्या घनदाट अरण्यातील तळ्याकाठची एक जागा हेरून ठेवली होती. इकडे आजकाल माणसंचुकुनहे फिरकत नसत. अशीच जागा त्याला हवी होती. तेथे त्याने साताठ दिवस राबून एक झोपडी उभारली. कुंपनही घातले. मग एके दिवशी गरजेपुरते सामान घेऊन त्याने बायकोसह आपल्या स्वप्नातेल जागेकडे प्रस्थान ठेवले. बापाचा आक्रोश, सगेवाल्यांचा शेवटचा त्याचे मन वळवायचा प्रयत्न...त्याच्यावर कशाचाच परिणाम झाला नाही. जगण्यासाठी तो शिकारीचा मार्गही सहज निवडू शकत होता. पण त्याने तसे काही केले नाही. खरे तर त्याने तोही विचार करून ठेवला होता. अरण्यात वठलेली अथवा वादळवा-यात उन्मळलेली झाडे अथवा फांद्यांची कमतरता नव्हती. त्याने स्वत:चा दिनक्रम आखून घेतला होता. रोज सकाळी तो दिवस उगवला कि कु-हाड खांद्यावर टाकुन निघे. भवतालच्या नित्य बदलांची नोंद घेत अरण्य श्वासांत भरून घेत निवांतपणे हेरुन ठेवलेल्या एखाद्या वठलेल्या व कधीकाळी उन्मळून पडलेल्या झाडाकडे जाई. लाकुडतोड्याचा हा व्यवसाय जगण्यापुरते उत्पन्न देणारा होईल याची त्याला खात्री होती. कधीकधी त्याच्या क्रमात निसर्गाचा झंझावात अथवा पाऊस खंड पाडे. काम थांबवून तो एकतर ताम्री नदीचा किनारा गाठत वाहत्या प्रवाहाकडे पाहत राही वा झोपडीकडे परते.

 बरे, त्याची बायकोही कामसू होती. झोपडीचा परिसर तिने राबून शेतीचा एक तुकडाच बनवला होता. भाजीपाला तर लावेच पण एका कोप-यात डुक्करं पाळण्यासाठी छान जागा केली होती. जरा थोड्या पेन्या अजून साठल्या कि डुकरांची पैदास करण्याचा तिचा विचार होता. अनेक वर्ष गेली पण ते काही झाले नाही. आदमच्या कमाईत अन्नधान्य-मीठ निघे. बस्स. अजून काय हवे होते. तिचा वेळही चांगला जाई. ते पैसेवाले बनू शकत नव्हते पण भुकेने मरणारही नव्हते.

 आजही आदम घनदाट अरण्यात शिरला. जंगलाचा चिरपरिचित वास अजून दडद झाला. त्याने तो फुफुसांत भरून घेतला. जणू काही तो प्रथमच या अरण्यात आक्ला असावा त्या अनिवार कुतुहलाने झांडांचे बुंधे, लपेटलेल्या वेलींच्या जाळ्या, रानफुले एखाद्या फांदीआडून दिसणारे आकाशाचे तुकडे पाहत चालू लागला. आपल्याहे पायांना मुळे फुटून आपण असेच झाडासारखे या जमीनीत पाय रोवून स्थिर का नाही हाही प्रश्न त्याला पडला. रानपक्षाचे थवे त्याला अचंबित करत होते. अनंतकाळचा विसावा म्हणजे हे अरण्य असे त्याला नेहमीच वाटे. हे त्याचे खरे घर होते. सतत बदलणारे घर. प्रतिक्षणी बदलणारा हा निसर्ग. अंकुरणारी नवी झुडुपे, वेली अवचित दिसत. झाडांची कधी पानगळ तर कधी तरारून फुटणारी नवी पालवी. झाडांच्या बुंध्यावर कधी हिरवे ताजे शेवाळ तर कधी ढोल्यांतुन नवजात पिल्लांचा कोलाहल. झाडांची सुकली गळालेली पाने जमीनीत मिसळून जात...अस्तित्व न ठेवता...पुन्हा गगनचुंबी वृक्षांच्या नव्या पालवीतून जीवंत होण्यासाठी हा. हे सारे प्रतिक्षण नवीन होते. त्याला एक सहजसुंदर लय होती. हे असे संगीत होते जे परमात्म्याखेरीज कोण गाणार?

 

कोठे थबकत, कोठे धीम्या गतीने, ओहोळांशी खेळत, लहान निरागस मुलासारखा त्या जंगलाचाच एक हिस्सा असल्यासारखा मंद्र सुरावटीप्रमाणे चालत राहिला.

 मग तो आपल्या आजच्या ध्ययस्थानाजवळ पोहोचला. तेथे एक आतुन पोखरलेला निष्प्राण वृक्ष कसाबसा कधीही कोसळेल या अवस्थेत उभा होता. त्याने आता बाजुलाच वेलीआडून पाहणा-या तुर्रेबाज सरड्याकडे दुर्लक्ष केले. त्या मृत झाडाच्या पलीकडे जमीन हुंगत फिरणा-या पाडसाकडे त्याने कौतुकाने पाहिले. झाडी येथे एवढी दाट होती कि आभाळ नसावेच असे वाटले. तो त्या वठलेल्या झाडाजवळ गेला. बुंध्याचा आदमास घेतला. कु-हाड सावरली आणि एक पहिला घाव घालायला ती उंचावली नि त्याच्या कानावर अरण्याच्या गहन शांततेला तडे देणारा मानवी कोलाहल पडला. त्याचा उंचावलेला हात सावकाश खाली आला. तो दचकला होता. बावरला होता. इतकी वर्ष गेली. असे कधी झाले नव्हते. तो मागे सरकला. त्या गडद सावल्याही त्याला सुरक्षित वाटेना. आतापर्यंत निवांत हिंडणारे पादसही कान टवकारत झेपावत आडोशाला निघून गेले होते. तो धपापत्या उराने एका वेलींच्या दाटीआड दडला आणि कानोस घेऊ लागला.

 

पुन्हा अधुन मधून आवाज-आरोळ्या येवू लागल्या. हा काय गोंधळ आहे हे त्याच्या लक्षात आले आणि तो पुरता धास्ताऊन गेला. उरातील धडधड पिसाट झाली. श्वास फुलला. अतीव भयाने तो कोमेजुनही गेला. जरा वेळ तो स्वत:चा आक्रोश नि भय काबुत आणत राहिला. मग येणा-या आवाजांचा माग काढत, दबकत झाडी-वेलींतुन वाट काढत निघाला. त्याला एका उतारावरून येणार एक गोरा आणि पाचसहा रंगाचे डबे घेतलेले काळे दिसले. ते शिकारीच्या मोहिमेवर नव्हते. गोरा सांगेल त्या जातीच्या झाडावर ते काळे दिसेल अशी खूण करत. हे कशासाठी चालले आहे हे त्याच्या लक्षात आले. वेदनांनी चेहरा पिळवटून निघाला. हातातील कु-हाडीवरची पकड सुटली. शरीर झंझावातातील वृक्षांसारखे कापले. ते दुष्ट हेतुने अरण्यात आले होते. रानटी. ते मार्किंग करत करत सावल्यांतून पुढे निघून गेले. त्यांचा आवाजही विरत गेला. अरण्याने भेदल्या गेलेल्या अथांग शांतीशी पुन्हा जुळवून घेतले. तो उठला. तो मृत वृक्ष तोडण्याची त्याची इच्छा मेली होती. त्याकडे लक्षही न देता तो अरण्यातून आपल्या झोपडीकडे सुसाट धावत सुटला.

 तो इतक्या लवकर आणि असा आलेला पाहून शेतीच्या तुकड्यात काम करणारी त्याची बायको चकित झाली. त्याच्या चेह-यावरचे भुताळ भाव पाहून तीही भयभीत झाली. तिने काय झाल्याचे विचारले ओपण धपापता उर घेऊन श्वास नियंत्रित करू पाहणारा आदम मुकच राहिला. काय घडले असावे याचा अंदाज करत बायकोने मस्तक शिणवायचा प्रयत्न केला पण तिला काहीच सुचले नाही.

 

सूर्य मावळला. अंधाराची गच्च दाटी झाली. अरण्य अंधारात हरवून गेले. एकाएकी तो गुढग्यावर कोपर टेकवून ओंजळीत चेहरा लपवून हमसून हमसून रडू लागला.

 त्याची बायको पुतळ्यासारखी स्तब्ध उभी, मंद दिवटीच्या प्रकाशात त्याच्याकडे पहात राहिली. कोणती वेदना छळते आहे माझ्या आदमला? एकाच प्रश्नाने तिच्या मनात कहूर केले होते. रात्रीने पहाटेची ज्या अनिवारपणे वाट पहावी ती त्याचा आवेग शांत होण्याची वाट पहात होती.

 खूप वेळाने त्याने चेह-यावरचे हात काढले. अश्रुंनी भिजलेला चेहरा त्या प्रकाशात अंधारातून कोरुन काढलेल्या कातळासारखा दिसला. त्याने बायकोकडे पाहिले. मग एकाएकी आवेगाने म्हणाला-

 

"हे अरण्यही आता नष्ट केले जाईल! जमीनीची सावली जाईल...ती भेगाळेल. वाहती ताम्री एक दिवस वहायची थांबेल. ते दुष्ट हेतुने या अरण्याला नष्ट करण्यासाठी घुसलेत. त्यांची पापी नजर याही अरण्यावर पडलीय. आज त्यांने किंमती झाडे निवडलीत. उद्या सर्वच. ही झाडे म्हणजे त्यांच्या लेखी चलन आहे. कत्तलखोरांच्या आवेशात ते या माझ्या झाडांची कत्तल करतील.  हे माझे घरच नष्ट करायला निघालेत. नीच. यांचे राक्षसी मन कसे भरत नाही? यांना थोडीही दयामाया का नाही? या अरण्यातील पशू-पाखरे कोठे जातील हा साधा विचार यांना शिवत कसा नाही? हलकट. डुक्करं जशी. हैवान!"

 तो त्याच्या गहन वेदनायुक्त संतापात बोलत राहिला. त्याच्या आक्रोशाला सीमा नव्हती. संताप तर असा कि  शक्य असते तर त्याने त्यांचीच कत्तल उडवली असती. स्वत:च्या असहायतेवर प्रथमच त्याला चिरड आली. अश्रुंची एक सर भळाळत वाहिली.

 

त्याची बायको मुकपणे त्याचा आक्रोश ऐकत राहिली. हा केवळ झाडे तोडली जाणार म्हणून का रडतो आहे? या परिसरातला गेली कित्तेक दशके हाच मुख्य धंदा नव्हता का? काळ्यांचे पोट हाच धंदा भरे. गोरे मालामाल होत ते वेगळे. पण तसेही ही झाडे काही काळ्यांनी स्वत: लावून जोपासलेली नव्हती. ती त्यामुळे लुटही नव्हती. मग ही वेदना कशाला?

 तिच्या मनात प्रश्न येत होते खरे, पण शब्दांत ते कसे मांडायचे हे थोडीच तिला माहित होते? तिचा नवरा दु:खात होता. आक्रोशत होता. त्याने काही विचार केला असेलच कि! ती त्याच्या वेदनांत साकळत गेली. तिच्याही नजरेसमोर वृक्षरहित वैराण नि भकास आसमंत तरळू लागला. कसे जगणार आपण या वैराणीत? तिलाही प्रश्न पडला. नव-याच्या वेदनांवर फुंकर घालावी असे वाटले ...पण कशी? तिला काही उमजेना.

 ती अवचित पुढे सरली. त्याच्यासमोर बसली नि चेह-यावरून हात फिरवला. त्याने तिच्याकडे नि:ष्प्राण डोळ्यांनी पाहिले. तिच्याही डोळ्यांत पाणी तरळले.

 "बरे झाले आपल्याला मुलं नाहीत!" ती एकाएकी म्हणाली. त्याने घनघोर अंधारातही आपल्या आदिम स्वरात हेलकावणा-या अरण्यसागरावर एक नजर टाकली. मग बायकोकडे पाहिले. ही झाडे म्हणजे देव तर त्यातील प्राणी-पक्षी म्हणजे त्याची लेकरं. एक दिवस हे अरण्यही राहणार नाही. त्याने सुस्कारा सोडला. बायको त्याच्याकडे अनिवार आशेने पहात होती.

 "बरे झाले आपल्याला मुलं नाहीत!" तोही म्हणाला. मग एकाएकी प्रपातासारखा, बायकोलाही चकीत करत म्हणाला, "नाही. त्यांचे या धरतीवर स्वागत नाही. बरे झाले आपल्याला मुलं नाहीत. त्यांना हे सैतानी तांडव तरी पहायला मिळणार नाही. पण आपल्याला जगले पाहिजे. इलाज नसला तरी हे क्रौर्य पाहिलेच पाहिजे. आपल्याला जगले पाहिजे हे भोगण्यासाठी ....यातला आत्मविनाशी मुर्खपणा पाहण्यासाठी. ही जमीन भकास होत आपल्यालाही पोटात घेईपर्यंत तरी आपल्याला जगलेच पाहिजे."

 त्याने बायकोला आपल्या खिन्न मिठीत घेतले आणि हुंदके देऊ लागला. भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे समजतच नसलेले अरण्य त्याच्या सनातन उद्गारांनी हुंकारत राहिले. कड्या-कपा-यांतून संचारणारी प्राणीसृष्टी जगण्याचा संघर्ष करत विचरत राहिले. वेळ पुढे जात राहिला. दिवस फटफटला. दिवसाचे नवे चक्र पक्षी आपल्या ललका-यांनी घोषित करत त्या अरण्याला नवा अर्थ देत राहिले. जगण्याचे संगीत पानापानांतून गायले जात राहिले...आपला मृत्यू नजिक आला आहे हेही न समजता.

 एक मतीमंद म्हणून ओळखला जाणारा आदम आपल्या तेवढ्याच मंदबुद्धी बायकोच्या खांद्यावर मस्तक ठेऊन भकासपणे अरण्याकडे पहात बसला.

 

* * *

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...