Friday, December 2, 2022

यशवंतराव होळकर : भारताचे तळपते स्वातंत्र्यतेज!


 


१८०३ सालापासून इंग्रजांशी अथक युद्धे करत त्यांना भारतातून बाहेर हाकलण्यासाठी अविरत युद्धे करत राहिलेले भारतीय स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांनी मुकंदरा येथून आग्र्यापर्यंत पाठलाग करत मॉन्सनसारख्या कसलेल्या सैनानीची जी दुर्गती केली त्यामुळे इंग्लंडची पार्लमेंट हादरली. भारताबाबतची सर्व धोरणे त्यांना बदलावी तर लागलीच पण गव्हर्नर जनरल वेलस्लीसारख्या त्या काळात मुत्सद्दी मानल्या जाणा-या धुरंधराचीही हकालपट्टी करावी लागली. भरतपुरच्या युद्धाने तर इंग्रजांचे कंबरडे मोडले. हा सर्व लढा एकाकी राहिला कारण ब्रिटीशांचे मांडलिकत्व पत्करून ऐषारामाची सवय लागलेले भारतीय रजवाडे यशवंतरावांनी वारंवार आपल्या स्वातंत्र्य युद्धात सहभागी व्हा अशी आवाहने करूनही त्यापासून दूर राहिले. त्यामुळे हा लढा एकहाती झाला. पण यशवंतराव जिद्दी होते. भारतीय स्वातंत्र्य हा त्यांचा १८११मध्ये शेवटचा श्वास घेईपर्यंत त्यांचा ध्यास राहिला.

 

३ डिसेंबर १७७६ रोजी पुणे जिल्ह्यातील वाफगाव येथील किल्ल्यात त्यांचा जन्म झाला. युवावस्थेत ते प्रवेशले तेंव्हापासून त्यांच्यावर संकटांची वादळे कोसळू लागली. महायोद्धे सुभेदार तुकोजीराजे होळकर यांचे ते कनिष्ठ पुत्र. अहिल्यादेवींच्या वत्सल आणि धोरणी सहवासात त्यांची वाढ झाली. पण १७९५मध्ये दुर्दैवाने अहिल्यादेवी गेल्या. पिता तुकोजीराजे होळकर यांचे त्यानंतर अवघ्या दोनच वर्षात म्हणजे १७९७ मध्ये देहावसान झाले. याचा लाभ घेऊन दुस-या बाजीरावाने आपल्या बलाढ्य सरदारांची मदत घेत होळकर संस्थान हडप करण्याचा चंग बांधला. थोरले बंधू काशीराव बाजीरावाच्या कह्यात गेले. होळकर गादीचा लायक वारस मल्हारराव (द्वितीय) पेशव्यांची भेट घेऊन गादीचा मसला सोडवावा या विचाराने पुण्यात आपल्या बंधुंसह आले असताना मध्यरात्री अचानक हल्ला करुन खुन करण्यात आला. या हल्ल्यातुन वाचलेल्या यशवंतराव आणि त्यांचे बंधु विठोजी यांना जीव वाचवण्यासाठी पळून जावे लागले. नागपूरकर भोसलेंनी त्यांना आश्रय देण्याच्या नावाखाली कैदेत टाकले आणि त्यांना पेशव्यांच्या हवाली करण्याचा चंग बांधला. यशवंतरावांनी कडेकोट पहा-यातून, अकरा फुट उंचीच्या भिंतीवरून उडी मारून तेथून पलायन केले. खिशात दमडी नाही, फक्त अन्यायी पेशवाई संपवायची ही आकांक्षा. अशा अवस्थेत त्यांनी खिशात दमडी नसता, शिंदे-पेशव्यांचे सैन्य त्यांना पकडण्यासाठी मागे लागले असता, त्यांनी हिमतीने खानदेशातील भिल्लांची सेना उभारत केवळ आपल्या पराक्रमाच्या जीवावर कसलेल्या सेनानींशी युद्धे करत माळवा व महेश्वर जिंकून घेतले. होळकर संस्थान पेशव्यांच्या घशातून काढून घेतले. पेशवाईशी पूर्ण संबंध तोडण्यासाठी त्यांनी स्वत:चे स्वातंत्र्य घोषित केले. ६ जानेवारी १७९९ रोजी राज्याभिषेक करून घेत त्यांनी स्वत:ची राजमुद्रा घोषित केली. शिवरायांनंतर करून घेतलेला हा दुसरा आगळा राज्याभिषेक.

 

पेशवा गप्प बसला नाही. विठोजी होळकर यांनीही महाराष्ट्रात पेशवाईविरुद्ध उठाव केला. ब्रिटीश सैन्याची मदत घेऊन विठोजी होळकर यांचा पराभव करुन कैद करण्यात आले. शनिवार वाड्यासमोर हत्तीच्या पायाखाली चिरडून त्यांची निघृण हत्या केली गेली. यशवंतराव पुण्यावर चालून आले. हडपसर येथे महायुद्ध झाले. पेशवे व दौलतराव यांच्या सेनेचा समूळ विनाश केला. बाजीराव पेशवा घाबरून पळत सुटला तो सरळ इंग्रजांना शरण गेला. ३१ डिसेंबर १८०२ रोजी यशवंतराव त्यांना विनवण्या करत असतानाही वसईला त्यांच्याशी तह करून पेशवाईचा अस्त करून घेतला.

 

या क्षणापासून यशवंतराव इंग्रजांबाबत सावध झाले. इंग्रजांचा धोका विस्तारत चालला आहे हे त्यांच्या एव्हाना लक्षात आल्याने त्यांनी आपसांतील वैरभावाला मुठमाती देत, अगदी दौलतराव शिंद्यांशी व नागपुरकर भोसलेंशीही मेळ घालण्याचा प्रयत्न केला. देशभरच्या संस्थानिकांना पत्रे पाठवत, भेटत त्यांना भारत इंग्रजांपासुन स्वतंत्र करण्याचा चंग बांधला. पण यश मिळत नव्हते. सारे राजे-रजवाडे आपले मांडलिकत्व पत्करत असताना यशवंतराव का आपल्या बाजूने येत नाही या प्रश्नाने इंग्रजही चकित झाले. त्यांनी यशवंतरावाशी तह करण्याचा प्रयत्न केला तर यशवंतरावांनी त्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. शेवटी इंग्रजांनी १६ एप्रिल १८०४ रोजी युद्ध घोषित केले तर त्या युद्धाची सुरुवात यशवंतरावांनी केली. २२ मे १८०४ रोजी त्यांच्यावर चाल करून यायच्या तयारीत असलेल्या कर्नल फॉसेटच्या कुछ येथील तळावर अचानक हल्ला करून तेथील दोन बटालियन कापून काढल्या. इंग्रजांविरुद्ध सुरु केलेया स्वातंत्र्ययुद्धाची ही सलामी होती.

 

त्यानंतर एका पाठोपाठ एक अशा इंग्रजांशी कडव्या लढाया देत अशक्यप्राय वाटणारे विजय मिळवले. मुकुंद-याच्या युद्धात त्यांनी अभिनव युद्धतंत्र वापरत इंग्रजांची समुळ फौज कापुन काढली. याचे पडसाद इंग्लंडमधेही पडले आणि भारताबद्दलचे संपुर्ण धोरण बदलणे इंग्रजांना भाग पडले. "काय वाट्टेल त्या अटींवर यशवंतराव होळकरांशी शांततेचा तह करा..." असा आदेश घेऊन नवा गव्हर्नर जनरल भारतात आला. इकडे भरतपुरच्या युद्धात शवंतरावांनी अजुन नव्या तंत्राने इंग्रजांना धुळ चारली. याच युद्धात सहभागी असणारे इंग्रज सेनानी नंतरच्या (१८१५ च्या) नेपोलियनच्या प्रसिद्ध वाटर्लू युद्धातही सामील होते आणि त्यांनी नोंदवुन ठेवलेय की भरतपुरचे युद्ध वाटर्लुपेक्षा अवघड होते. तेथपासुनच यशवंतराव व नेपोलियनची तुलना सुरु झाली.

 

"आधी देशाचे स्वातंत्र्य..." हा यशवंतरावांचा नारा १८०३ पासुन घुमला होता. पण या लढ्यात दुर्दैवाने कोणीही रजवाड्यांनी साथ न दिल्याने हा लढा एकाकीच राहिला. तरीही त्यांची विजयाची उमेद मिटली नाही. शीख तरी आपल्या युद्धात सामील होतील या आशेने जनरल लेक पाठीशी असतानाही पार लाहोर गाठले. पण त्यांनीही इंग्रजांच्या नीतीला बळी पडून यशवंतरावांना साथ देण्यास नकार दिला. पारतंत्र्याची मोहिनीच एवढी पडली होती कि स्वातंत्र्याचा अर्थच भारतीय रजवाडे विसरून गेले होते.

 

पण यशवंतराव नाउमेद झाले नाहीत. त्यांनी तात्पुरता इंग्रजांशी आपल्या अटींवर मैत्रीचा तह केला तो पुन्हा एकट्याच्या बळावर उभारी घेण्यासाठी. सारा देश सूप्त असतांना एक मनुष्य एकाकीपणे झुंजत होता, त्याला इंग्रज या भुमीवर नको होते. माळव्यात परत येताच त्यांनी सर्वप्रथम आपली राजधानी भानपुरा या आताच्या मंदसोर जिल्ह्यातील शहरात हलवली. आता कोणी आपल्याला तोफा देणार नाहीत याची खात्री पटल्याने तेथे त्यांनी तोफा ओतण्याचा मोठा कारखाना काढला. एक लक्ष प्रशिक्षित सैन्य उभारण्याच्या दिशेने त्यांनी वेगाने वाटचाल सुरु केली. कारखान्यात रात्रंदिवस तोफा ओतायचे काम सुरु होते. मेजर माल्कम हा यशवंतरावांचा कडवा विरोधक, पण तो म्हणतो, स्वत: यशवंतराव अनेकदा फाउंड्रीत तोफा ओतायचे काम करत असत. ध्येयाशी एवढी निष्ठा कोणातही आढळुन येणार नाही. आपल्या राज्यात आल्या आल्या, खरे तर एवढी दोन-अडिच वर्षांची दौड, सततची जीवघॆणी युद्धे, जीवावरची संकटे यातुन निघालेल्या कोणत्याही माणसाने शांततेचा उपयोग काही काळ तरी विश्रांतीसाठी केला असता...पण यशवंतराव खरच अजब रसायन होते. या मागे त्यांचे कारण होते...योजना होती.

      हे लाखाचे सैन्य आणि दोनशे मोठ्या तोफा त्यांना हव्या होत्या... 

      कारण त्यांनी स्वत:च सरळ इंग्रजांची तत्कालीन राजधानी कलकत्त्यावर आक्रमणाची योजना आखली होती. देशाचे स्वातंत्र्य सर्वोपरी होते...स्वत:ची विश्रांती नाही! पण हे अथक कष्ट शरीराला किती मानवणार? १८११ मध्ये त्यांचा अकाल झाला. भारताच्या क्षितीजावर उगवलेल्या पहिल्या स्वातंत्र्यसूर्याचा अस्त झाला. कलकत्यावरील स्वारी राहूनच गेली. स्वतंत्र भारताने नेहमीच त्यांचे कृतज्ञतापूर्ण स्मरण केले पाहिजे.

 

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...