ब्राह्मण, ब्राह्मण्य आणि ब्राह्मण्यवाद हे आज चर्चेचे विषय झाले आहेत. या तीनही बाबी एकच आहेत म्हणुन त्या तिरस्करणीय आहेत असा आक्षेप अनेकदा नोंदवला जातो. ब्राह्मण्यवादाचा "संसर्ग" इतर जातीयांनाही होवु लागला आहे असेही म्हणण्यात येते. यावर ब्राह्णण समाजाचा आक्षेप आहे असे दिसते. ब्राह्मण्य हा जणु काही एक रोग आहे असा अर्थ त्यातुन निघतो, त्यामुळे काही ब्राह्मणही "मी ब्राह्मण आहे पण बाह्मण्यग्रस्त नाही" असे म्हणु लागतात. खरे तर ही एक विपरीत स्थिती आहे आणि त्यावर चर्चेची निकड आहे.
"ब्राह्मण" हा वैदिक धर्मातील एक वर्ण आहे. ती हिंदू धर्मातील जात नाही हे लक्षात घेतले जात नाही. जातीसंस्थेच्या निर्मितीचे पापही ब्राह्मणांवर ढकलले जाते. हे ऐतिहासिक सत्य नाही. खरे तर "ब्राह्मण" या शब्दाला खुद्द ब्राह्मणांनी एवढे वलयांकित करून ठेवले आहे कि ब्राह्मण, ब्राह्मण्य, ब्राह्मण्यवाद इत्यादी सद्न्यांतून ब्राह्मण या शब्दाचा कोणताही अर्थ घेतला तरी ब्राह्मण हा वरिष्ठ घटक आहे असाच अर्थ निघतो. अश्वघोष यांच्या नावावर खपवले जाणारे वज्रसुची असो कि शंकराचार्यांच्या नावावर खपवले जाणारे वज्रसुची उपनिषद असो, त्यातही ब्राह्मण कोणास म्हणावे यावरच चर्चा आहे. जणू काही "ब्राह्मण" या शब्दास अपरंपार महत्व देत कोणाला तरी कोणत्या तरी व्याख्येत ब्राह्मण म्हणून कसे बसवता येईल याचेच चर्चा आपल्याला दिसेल.
बरे, ब्राह्मण या शब्दाच्या अनेक व्याख्या आहेत. उदा. "जो मंत्र रचतो तो ब्राह्मण" ही ऋग्वेदाची व्याख्या आहे, मग त्याचा अन्य व्यवसाय काहीही असो. उपनिषदांच्या द्रुष्टीने पाहिले तर "ज्यालाही ब्रह्माचे ज्ञान आहे तो ब्राह्मण." महाभारतात युधिष्ठीराने " ज्याच्या अंगी द्न्यान, भुतदया, शील, क्षमा इ. गुण आहेत त्याला ब्राह्मण म्हणावे." अशी ब्राह्मणाची व्याख्या केली आहे. पौराणिक व्याख्या पाहिली तर "जो ब्राह्मण मातापित्यांच्या पोटी जन्माला आला आहे, उपनयन झाले आहे, ज्याने वेदाध्ययन केले आहे, जो यद्न्यकर्म जाणतो तोच ब्राह्मण होय." आणि शेवटची व्याख्याच व्यवहारात (सोईस्कर भाग ठेवून) आजतागायत टिकून राहिली आहे हे समाजशास्त्रीय इतिहास पाहिला कि लक्षात येते. कर्माने , जन्माने नव्हे तर कर्माने ब्राह्मण होता येते असे विधान हा आजवर निखळ खुळचटपणा आहे हे इतिहासाने सिद्ध केलेले आहे.
बरे, ब्राह्मण या शब्दाच्या मोहिनीत अडकून किंवा त्यामुळे होऊ शकणा-या लाभांवर डोळा ठेवून किती हिंदू बोगस ब्राह्मण झाले याचा इतिहास तर खुद्द घुर्ये यांनी सविस्तर दिला आहे. जन्माने ब्राह्मण असणे, सोयीस्कर रीत्या कोणतेही गोत्र ठोकून देत जानवे घालून स्वयंघोषित ब्राह्मण होणे हे इतिहासात सर्रास झाले आहे. आजचे अनेक ब्राह्मण अशा बोगस ब्राह्मणांचे वंशज आहेत. वैदिक धर्मीय वर्चस्वाच्या काळात असे होणे स्वाभाविक आहे.
पण या झाल्या इतिहासातील गोष्टी. वर्तमानातही "ब्राह्मण" ही सद्न्या जर विवादाचे कारण झाली असेल तर त्याला कारण "ब्राह्मण" काहीही झाले तरी श्रेष्ठच असतात हा अहंगंड आहे हे आपल्याला आढळून येईल. अन्यथा आपण “ब्राह्मण” असलो तरी गांधीजींना मानतो असे “विश्वम्भरी” विधान आले नसते.
ब्राह्मण, ब्राह्मण्य याच्या कितीही व्याख्या केल्या तरी यात “ब्राह्मण” हा शब्द केंद्रीभूत असतो आणि या शब्दाच्या मोहिनीने ब्राह्मण म्हणवणा-या वर्गाला ग्रासून टाकलेले आहे हे आपल्या लक्षात येईल. मग ब्राह्मण कोणास म्हणावे याबाबत इतिहासकाळापासून ते आजपर्यंत कोणीही कितीही उड्या मारल्या तरी ब्राह्मण (वैदिक) आणि बहुजन (हिंदू) यांच्यात कधीही ख-या अर्थाने सामाजिक सामंजस्य निर्माण झालेले नाही असेही आपल्याला दिसून येईल.
पण हा घोटाळा झाला आहे त्या अर्थी ब्राह्मणपक्षांची काहीतरी गफलत होते आहे.
म्हणजे वैदिक वर्णाधारित अर्थानेही आम्ही उच्च...आणि परत स्वत:ला हिंदू म्हणवून घेऊन जात म्हणुनही उच्च असा काहितरी त्यांचा ग्रह झाला आहे.
जे ब्राह्मण आजही स्वत:ला श्रेष्ठ समजतात त्यांना त्यांचा धर्म आणि धर्मोक्त तरतुदी किती माहित आहेत हाही प्रश्नच आहे. खरे तर मनुस्म्रुती ते मिताक्षरीपर्यंत क्षत्रीय-वैश्यांपेक्षा ब्राह्मणांवर जेवढे कठोर आचार-विचारादि नैतीक बंधने आहेत ती पाळायचे ठरवले असते तर मुळात जगात आज एकही “ब्राह्मण” म्हणवणारा व्यक्ती अस्तित्वात नसता, वैदिक धर्माचा अस्त कधीच झाला असता. ब्राह्मणाने शेती करणे, व्यापार करणे, शस्त्र हाती घेणेच काय पण नुसते पाहणेही निषिद्ध आहे. असे करणारा ब्राह्मण तात्काळ धर्मबाह्य होइल अशी स्म्रुत्योक्त तरतुद आहे.
पण जर इतिहास पाहिला तर असे दिसते की ब्राह्मणांनीच या स्म्रुती धाब्यावर बसवल्या. महाभारतात द्रोणाचार्य, क्रुपाचार्य हे ब्राह्मण असुनही शस्त्र हाती घेउन युद्ध करतांना दिसतात आणि द्रोणाचर्यांच युद्धातील म्रुत्युस कोणी "ब्रह्महत्या" म्हनत नाही. इसपुच्या दुस-या शतकात पुष्यमित्र श्रुंग हा ब्रुहद्रथ राजाची हत्या करुन सत्ताधारी बनुन हजारो बौद्धानुयायांची कत्तल करतांना दिसतो. शेती ते व्यापार यात ब्राह्मण हिरिरेने पडलेले दिसतात. "सेवा" धर्म त्याज्य असुनही ते सेवकही बनलेले दिसतात. आता तर अनेक ब्राह्मण त्यांना धर्मोक्त अति-त्याज्य अशाही सेवा-व्यवसायांत आहेत. त्यांनी इतिहासात वंशपरंपरेने दरोडे घालण्याचेही उद्योग केले आहेत. सेनार्तने "बुंदेलखंडातील ब्राह्मण वंशपरंपरेने दरोडेही घालण्याचा उद्योग करत असत आणि त्यांना प्रतिश्ठाही होती." असे नमुद केले आहे. थोडक्यात जीवनयापनासाठी ब्राह्मणांनी जवळपास सर्वच क्षेत्रे निवडली असे स्पष्ट दिसते आणि त्यात चुकीचे काहीएक नाही. "आपद्धर्म" म्हणून त्यांने त्या अधर्मचरणानपासून बिनबोभाट सुटकाही करून घेतलेली दिसते.
स्म्रुतींचा आधार घेतला तर असे सर्व ब्राह्मण आज मुळात "ब्राह्मण" म्हनवुन घेण्यास पात्र नाहीत असे स्पष्ट दिसते. केवळ जन्माधारीत ब्राहमण्य म्हणजे "ब्राह्मण" अशी सोयिस्कर भुमिका ब्राह्मण समाजाने घेतली आहे. स्वत: एकही धर्मनियमांचे पालन करत नसता इतरांनी मात्र ते केलेच पाहिजे आणि ब्राह्मणांचा आदर केला पाहिजे, वेदांचा, वैदिक संस्क्रुतीचा अभिमान बाळगलाच पाहीजे, वैदिक धर्माचा सन्मान वैदिक धर्माशी संबंध नसलेल्या हिंदूंनीही ठेवलाच पाहिजे अशा प्रकारची भुमिका काही ब्राह्मण विव्द्वान घेतात. एवढेच नव्हे तर वैदिक आणि त्यातल्या त्यात ब्राह्मण हेच भारतीय संस्कृतीचे जन्मदाते आहेत या अहंगंडातून त्यातुनच या वादंगाचा जन्म झाला आहे.
आणि तो अभिमान बाळगावा अशी अपेक्षा ठेवित, इतर दोन वैदिक वर्णांना जवळपास धर्मबाह्य करून अथवा बोगस पुराकथा निर्माण करून भारतीय सामाजेतीहासाची अक्षम्य हानी करण्याचे पातक वैदिक विद्वानांवर जाते. थोडक्यात स्वत: वैदिक धर्माचे तत्व सोयीने धुडकावून लावायचे, आपद्धर्म या नावाखाली काहीही खपवायचे कृत्य ब्राह्मणांनी प्राचीन काळापासून केलेले आहे.
ब्राह्मण म्हणजे काय याच्या व्याख्या केल्या असल्या तरी त्या केवळ बचावू वृत्तीच्या होत्या असे म्हणणे भाग आहे कारण मुळात “ब्राह्मण” या संज्ञेला एवढे ग्लोरिफाय करण्याची आवशकता का होती आणि आजही का आहे याचे उत्तर कोणीही ब्राह्मण देत नाही. खरे तर “ब्राह्मण” या संज्ञेची कोणतीही तर्कसुसंगत परिभाषा नाही. आणि ती समजा असली तरीही ती न करता अथवा त्या संज्ञेचा त्याग न करता वा त्याचे ग्लोरिफिकेशन कसे मूर्खपणाचे होते हे न सांगता केवळ व्यक्तिगत स्तरावर आपलेच विचार कोणी लादण्यासाठी का होईना हिंदू व्हायचा प्रयत्न करत असेल तर ते स्वागतार्ह नाही. कारण ब्राह्मण म्हणवणा-या अखिल समाजाचे ते वास्तव नाही. आणि हे भारतीय इतिहास विकृत करण्याचे प्रयत्न याच धर्मातील अध्वर्यू अखंडपणे करताना दिसत असतांना आणि तथाकथित पुरोगामी ब्राह्मणांकडून एकही निषेधाचा सुर उमटत नसतांना तर नाहीच नाही.
ब्राह्मणांनी "ज्ञान" कोंडले असा एक ब्राह्मणांवर आरोप आहे. कै. नरहर कुरुंदकर या संदर्भात म्हणतात "ब्राह्मणांनी त्यांचे ज्ञान उधळुन वाटले असते तरी समाजाला त्याचा काही एक उपयोग नव्हता कारण मुळात ते ज्ञान समाजोपयोगी नव्हते." कुरुंदकरांची गफलत अशी आहे कि ज्ञान समाजोपयोगी होते कि नव्हते हे ठरवण्याचा आधार कोणता? ते ज्ञान त्यांनी कोंडले हे खरे कि ते जेही काही होते ते ज्ञान त्यांच्या धर्मापुरते मर्यादित होते आणि ते वाटण्याचा प्रश्नच नव्हता हे खरे?
माझे मत असे आहे कि हिंदूंनी “ब्राह्मण” या संज्ञेला नको तेवढे वलय देत त्यांचा विरोध करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याच वेळेस त्यांना ब्राह्मणाबद्दल असूयाही आहे. खुद्द ब्राह्मण वैचारिक व्युहात सापडले असताना हिंदूंनी त्याच गर्तेत पडायचे काहीही कारण नाही. हिंदूंसमोर वेगळे प्रश्न आहेत. ब्राह्मण त्यांचे प्रश्न वैदिक धर्मपद्धतीने सोडवतील. तो त्यांचा सामाजिक प्रश्न आहे. जेथेहे त्यांचा व अन्य कोणत्याही धर्माचा वर्चस्ववाद सुरु होईल तेथे विरोध केलाच पाहिजे. पण दर वेळेस ब्राह्मणांना आरोपीच्या पिंज-यामध्ये उभे करने सांस्कृतिक इतिहासानुसार अंगलट येऊ शकते याचेही भान ठेवायला पाहिजे. शेवटी त्यांचा धर्म वेगळा हे कधीच विसरता कामा नये.
-संजय सोनवणी
( ज्येष्ठ साहित्त्यिक कै. ह. मो. मराठे यांनी २०१० साली त्यांच्या विद्वेषाविरुद्ध जागरण मंच तर्फे प्रकाशित होणा-या एका पुस्तिकेसाठी माझ्याकडे लेख मागितला होता. ती पुस्तिका प्रकाशित नाही झाली पण त्यासाठी मी लिहिलेला हा लेख.)
No comments:
Post a Comment