Wednesday, January 25, 2023

वज्रसूची आणि ब्राह्मण

  वर्णव्यवस्थेवर हल्ला चढवणारी पहिली कृती म्हणून वज्रसुचीचा उल्लेख करावा लागतो. वज्रसुची अश्वघोष या आद्य बौद्ध संस्कृत महाकवी अश्वघोशाच्या नावावर मोडत असली तरी त्याबद्दल विद्वान साशंक आहेत.   याचे कारण म्हणजे अश्वघोष हा वज्रसूचीचा कर्ता आहे ही माहिती फक्त "सूत्रालंकार" या असंग नामक पेशावर येथील बौद्ध विद्वानाने लिहिलेल्या ग्रंथात ७७ क्रमांकाच्या सुत्रात मिळते. परंतू तिबेटी, तंजावरी येथील साधनांत कोठेही अश्वघोषाच्या नांवावर ही कृती असल्याचे नमूद नाही. इ-त्सिंगनेही अश्वघोषाच्या लेखनात या कृतीचा समावेश केलेला नाही. सर्वात प्रथम ही कृती बौद्ध साहित्यात अवतरते ती त्रिपिटक-सूचीत. ही सूची सन ९७३ ते ९८१ च्या दरम्यान चिनी भाषेत अनुवादित झाली. पण या ग्रंथानुसार वज्रसूचीचा लेखक अश्वघोष नसून धर्मकिर्ती आहे असे दिसते.

दुसरा असाही प्रतिवाद केला जातो कि अनेक ब्राह्मण बौद्ध धर्मात आलेले असल्याने त्यांच्या मनातील वर्णश्रेष्ठत्व काढून टाकावे अशा मर्यादित हेतूने व बौद्ध धर्मप्रचारात होणारा ब्राह्मणांचा अडथळा तात्विक आधाराने दूर केला जावा या उद्देशाने प्रतिवादात्मक व ब्राह्मणी व्यवस्थेतीलच उदाहरणे देत वज्रसूचीची निर्मिती झाल्याने अश्वघोशाच्या साहित्यामध्ये तिचा समावेश केला गेला नाही. पण हे खरे मानले तर अश्वघोषही ब्राह्मणच असल्याने बुद्ध चरितात मोठ्या प्रमाणावर गौतम बुद्धाचे ब्राह्मणीकरण झाले असे जोहान्स ब्रोंकहोर्स्ट यांनी आपल्या “Buddhism in the Shadow of Brahmanism” या ग्रंथात म्हटले आहे. बुद्ध जन्मानंतर होणा-या सप्तर्षीकरवी होणारी भविष्यवाणी, ब्राह्मणांनी दृष्टांत सांगणे, शुद्धोदनाने ब्राह्मणांना धन देणे तसेच नंतर असित महर्षीचे तेथे अवतरणे व त्याची पाद्यपूजा शुद्दोदनाने करणे आदी भाग जो पूर्वीच्या पाली साहित्यात नव्हताच अशा ब्राह्मण वर्णाच्या महत्तेच्या कथा बुद्धचरितामध्ये सामाविष्ट केल्या गेलेल्या आहेत. हाच लेखक वर्णव्यवस्थेचा डोलारा कोसळवणारे लेखन करेल काय अशी शंका येणेही स्वाभाविक आहे. अश्वघोष हा बौद्ध धर्माला नवे मतितार्थ देणारा पंडित होता असे मत लेव्ही यांनी व्यक्त केली असून तरीही वज्रसुची ही कृती फार नंतरची असून तिचे कर्तुत्व अश्वघोशाला देता येत नाही असे मत जे. के. नारायण यांनी “Literary History of Sanskrit Buddhism” या ग्रंथात  व्यक्त केले आहे. होब्सनच्या मते वज्रसूचीवर (अश्वघोषाची म्हणवली जाणारी) शैव तत्वज्ञानाचा प्रभाव आहे. अश्वघोषाची वज्रसुची वाचली तर याचा पडताळा येवू शकतो. शिवाय या लेखनात संस्कृत समासांचा फार मोठा वापर असून दुस-या ते चवथ्या शतकातील अन्य कोणत्याही संस्कृत लेखनात ते अप्राप्य आहेत. त्यामुळे वज्रसूचीचे श्रेय अश्वघोषाला देता येणे अवघड आहे जरी त्याच्या वज्रसुचीचाच उपोद्घात मंजूघोषांचा शिष्य अश्वघोशाचाच लेखक म्हणून उल्लेख करत असली तरी. अर्थात आपले लेखन गतकाळातील कोणा न कोणा प्रसिद्ध व्यक्तीच्या नावावर थोपन्याची प्रवृत्ती जी वैदिक पंडितांमध्ये दिसून येते तिचेच अनुकरण प्रस्तुत वज्रसूचीच्या लेखकाने केलेले दिसते.

दुसरी बाब अशी कि गौतम बुद्ध हे चातुर्वर्ण्य कर्मावर असतो असे सांगत असताना खतीय (अथवा क्षत्रीय) वर्ण शीर्षस्थानी ठेवत असताना वज्रसूचित मात्र ब्राह्मण हा श्रेष्ठ असून ब्राह्मण कोणास म्हणावे याचीच प्रामुख्याने चर्चा केलेली आहे. अन्य कोणत्याही वैदिक वर्णाचा त्यात उल्लेख नाही. अश्वघोशाच्या वज्रसूचित खालील गोष्टी प्रामुख्याने येतात.

१. वज्रसूचीत बौद्ध तत्वज्ञानाचा कोठेही मागमूस नाही.
२. वज्रसूचीने आपले मत सिद्ध करण्यासाठी वेद, मनूस्मृती, पुराणे व महाभारताचा आधार घेतला आहे.


३. शिव व पार्वतीचा स्पष्ट उल्लेखही अश्वघोषाच्या नांवावर असलेल्या आवृत्तीत मिळतो व तिचा अनुवाद बी. एच. होब्सन यांनी केला असून तो रॉयल एशियाटिक सोसायटीने १८३५ साली प्रसिद्ध केला आहे..
४. आत्मा, मोक्ष, जीव, ब्रह्म, इ. या बौद्ध तत्वज्ञानात नसलेल्या संज्ञा अश्वघोषाच्या म्हणुन प्रसिद्ध वज्रसूचीत येतात.
५. श्रेष्ठ ब्राह्मण कोण हे सांगणे हा वज्रसूचीचा अंतिम उद्देश आहे. 

दुसरीकडे  १०८ उपनिषदांच्या सूचीत (मुक्तिका उपनिषद) "वज्रसूचिका उपनिषद" या नांवाने वज्रसूची अवतरते. हे उपनिषद सामवेदाशी संबंधित आहे असेही नमूद आहे. या उपनिषदाचा कर्ता अज्ञात असला तरी त्याचे कर्तुत्व आदि शंकराचार्यांचे असल्याचे व हे शैव उपनिषद असल्याचे काही उल्लेख मिळतात. परंतु ब्रह्मसूत्रभाष्यात चातुर्वर्ण्य आणि ब्राह्मण श्रेष्ठतेचा पाठ देणारे शंकराचार्य याचे लेखक असण्याची शक्यता नाही. हे उपनिषद बाराव्या ते चवदाव्या शतकाच्या दरम्यान लिहिले गेले असावे असे काही विद्वानांचे मत आहे. उपनिषदांतर्गत वज्रसुचिका उपनिषद म्हणुन जी आवृत्ती प्रसिद्ध आहे तिचा गाभा व अश्वघोषाच्या नांवावर आढळना-या आव्रुत्तीचा ढांचा समसमान आहे. काही ठिकाणी उदाहरणे विस्त्रुत आहेत तर कोठे कमी. परंतु अर्थबदल होत नाही

या दोन्ही वज्रसुचीचे लेखक कोण आणि नेमके कधी झाले हे निश्चयाने सांगता येईल अशी स्थिती नाही. शिवाय दोन्ही वज्रसूचींमध्ये आश्चर्यकारक रीत्या साम्य असल्याने कोणती आधीची व कोणती नंतरची हे ठरवता येणे येणे मात्र तेवढे अवघड नाही. त्रिपिटक-सूचीत (सन ९७३ ते ९८१) वज्रसूचीचे नाव आहे पण ती धर्मकीर्तीच्या नावावर नोंदलेली आहे. म्हणजे मूळ बौद्ध वज्रसूची किमान आठव्या शतकात उपलब्ध होती असे म्हणावे लागते.

पाश्चात्यांना मात्र वज्रसूचित वर्णनिषेध जाणवला असल्याने त्याचा अनुवाद एकोणीसाव्या शतकाच्या प्रथमार्धातच झाल्याचे आपल्याला दिसून येईल. विल्किन्सन यांचाही अनुवाद महत्वाचा असून त्यांनी १८३९ मध्ये प्रसिद्ध केला होता. याच ग्रंथात त्यांनी सुबाजी बापू यांनी वज्रसूचीतील विवेचनाचा प्रतिवाद करणारे संस्कृत लेखन त्यांच्या विनंतीवरून प्रसिद्ध केले असून त्यात वज्रसूचीतील ब्राह्मण कोणास म्हणावे याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाना दिलेले उत्तरही प्रसिद्ध केलेले आहे.

दोन्ही वज्रसुचीचा मुख्य गाभा हा ‘ब्राह्मण कोणास म्हणावे?” हा आहे. यात अनेक जन्माने ब्राह्मण नसले अथवा गैर रीतीने जन्माला आले असले तरी ब्राह्मण झाले याची अनेक उदाहरणे दिलेली आहेत. दोन्ही वज्रसूचित यज्ञसंस्थेचे पावित्र्यही गृहीत धरण्यात आले आहे. पण ‘ब्राह्मण’ या वर्णाचे वा शब्दाचे एवढे उदात्तीकरण का याचे उत्तर मात्र दोन्ही वज्रसूची देत नाहीत. श्रेष्ठ मनुष्य कोणास म्हणावे या ऐवजी ब्राह्मण कोणास म्हणावे व त्याच्यात काय गुण असले पाहिजेत यावरच जास्त भर आहे.

संत बहिणाबाइंनी सतराव्या शतकात अभंगरूपाने वज्रसुचीचा अनुवाद केला अथवा त्यावर आधारित अभंगांची रचना केली असे मत महाराष्ट्रातील विद्वज्जनात प्रचलित आहे. विश्वनाथ कोल्हारकर यांनी १९२६ साली संत बहिणाबाईंची गाथा प्रसिद्ध केली होती. त्यात वज्रसूचीवर आधारित आहेत असे मानले जाणारे अभंग सामाविष्ट आहेत.

संत बहिणाबाई या गंगाधरपंत यांच्या द्वितीय पत्नी असून त्यांच्या तापट स्वभावाने त्यांना गांजले होते, आणि त्या पुढे संत तुकारामांच्या शिष्या बनून तुकाराम महाराजांच्या नउ टाळक-यांपैकी एक झाल्या असा अल्प परीचयही त्यांनी दिला आहे. वज्रसूचीचा अनुवाद अथवा भावांतर करण्याचे कार्य तुकाराम महाराजांनी त्यांच्यावर सोपवले किंवा रामदासी पंचायतनातील जयरामस्वामी यांच्याकडून संत बहिणाबाई यांना वज्रसुची माहित झाली असेही एक मत आहे. त्या विवादात न पडता बहिणाबाई यांच्या अभंगांकडे एक नजर टाकणे योग्य ठरेल.

जयराम स्वामी यांच्याशी त्यांचा पूर्वपरिचय असावा असा एक अभंग आहे.

जयराम समर्थ ज्ञानाचा सागर ।
साक्ष तें अंतर त्याचें तया ॥ १ ॥
बोलाविलें तेणें हिरंभटाप्रती ।
माझी तया स्थिती पुसीयेली ॥ २ ॥
सांगितला तेणें वृत्तान्त सर्वही ।
वर्तला जो कांहीं गृहीं त्याचें ॥ ३ ॥
स्वप्नागत गुरु तुकोबाचे रूपें ।
स्वप्नींचिये कृपें बोध केला ॥ ४ ॥

आणि

कृपा उपजली जयराम स्वामीसी ।
आले पाहायासी भाव माझा ॥ १ ॥
देखोनी तयासी आनंद वाटला ।
कंठ कोंदटला आनंदाने ॥ २ ॥

बहिणाबाईंचे अनेक अभंग आत्मवृत्तपर आहेत. या अभंगातून भावस्थिती आणि वास्तव याची सरमिसळ आहे हे सहज लक्षात येईल. आता आपण त्यांच्या वज्रसूचीवर आधारित आहेत अशी मान्यता असलेल्या अभंगांकडे वळूयात.

कोल्हारकर यांनी हे अभंग “ब्रह्मकर्मपर अभंग” या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेले असून ते अभंग क्रमांक ४०४ ते ४५२ अभंगामध्ये सामाविष्ट केलेले आहेत. या अभंगांत “ब्राह्मण कोणास म्हणावे”” हा मुख्य प्रश्न चर्चेत आहे. डॉ. रा. चि. ढेरे यांनी या ३९ अभंगांमधील १८ अभंग वज्रसुचीकोपनिषदाचा अनुवाद होय असे जाणवल्याने ते व्यवस्थित लावले आणि अभ्यासकांच्या सोयीसाठी प्रसिद्ध केले. परंतु ब्रह्मकर्मपर अभंगात इतरही अनेक अभंग आहेत त्याटील काहींवर एक नजर टाकली पाहिजे.

उलट –

“ब्रम्हत्वाची खूण जप गायत्रीचा । जो सर्व वेदाचा मूळमंत्र ॥१॥ तयाहून परते आहेसे सांगती जाणाव ते मतिमंद हीन ॥ २॥ गुणसाम्य ऐसी म्हणती मूळमाया । गायत्री ते जया बम्हरूप ॥ ३॥ अकार उकार मकाराष्ये बज । ओंकाराचें निज उन्मनी हे ॥ ४ ॥ इजपासुनीया जाले वेदविद । गायत्री प्रसिद्ध वेदमाता ॥ ५ ॥ बहिणी म्हण जया गायत्रीचा जप । तो ब्रह्मस्वरूप केवळ जाणा ॥ ६॥

किंवा-

वर्णाश्रम धर्म शुद्ध आचरावा । भगवंत घरावा एका भावें ॥ १ ॥ ऐसे जो न करी ब्राम्हणाचा तो धर्म । जाणावा अधम पापदेहा ॥ २॥ आघीं स्नान- संध्या गायत्रीचा जप । करावा निष्पाप अष्टोत्तरशत ॥ ३ ॥ त्यावरी मग तर्पण करावें । धर्म हा स्वभावें विप्रालागीं ॥ ४॥

अशांसारखे अभंग वेद, गायत्रीनिष्ठा अशा काही वैदिक वर्णाश्रमसंस्थेचा पाया असलेल्या तत्वांशी फारकत घेताना दिसत नाही. एका अभंगात त्या म्हणतात-

“पिंडब्रम्हांडासी करोनिया ऐक्य । मनी महावाक्य बोघ झाला ॥१॥ तयासी ब्राह्मण बोलिजे साचार । बह्मसाक्षात्कार प्रत्यक्ष हा ॥२॥ मी-तू पणाचा सबलांश सांडिला । जीव शिव केला ऐक्य ज्ञानें ॥ ३ ।। महाकारणदि देह चार पाहें । शोधानियां जाये तूर्यपदा ॥ ४ ॥ सोह हंस मंत्र अखंड उच्चार । समाधि साचार अखंडत्व ॥ ५ ।॥। बाहिणा म्हणे ब्रह्मवेत्त हे ब्राह्मण । यांचिया दर्शन मुक्ति जोडे ॥ ६ ॥ हे आणि असे काही अभंग पाहिले तर बहिणाबाई ब्राह्मण कोणास म्हणावे याची तत्वचर्चा करत असून ती चर्चा तत्कालीन वैदिक दृष्टीतून आहे हे लक्षात येईल.

वज्रसूची आणि बहिणाबाईंचे ब्राह्मणसंबंधी अभंग हे “ब्राह्मण कोणास म्हणावे?” या प्रश्नाशी निगडीत असल्याने बहिणाबाईंचे अभंग वज्रसूचीचा अनुवाद अथवा त्याधारित असावेत असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु प्रत्यक्षात बहिणाबाई मुळ वज्रसुचीतील ( मग ती वैदिक असो कि बौद्ध) उदाहरणे एखादा अपवाद सोडला तर देत नाहीत. उदा,

आतां वर्ण हाची ब्राम्हण म्हणावा । तरी तो अनुभवा नये कांहीं ॥ १॥ ब्राम्हण वेगळा वर्णही अतीत । पहातां निश्चित भासतसे ॥ २॥ श्वेत तो ब्राम्हण क्षत्रिय आरक्त । वैश्य वर्ण पीत नाही ऐसे ॥३॥ कृष्ण वर्ण शुद्र नाहीं ऐेसा भेद । आयुष्याचा बांध सारखाची ॥ ४ ॥ बहिणी म्हणे वर्ण ब्राम्हण तो नव्हे । विवे- चूनि पाहे मनामाजीं ॥ ५ ॥

हे आणि असे काही वज्रसूचीवर आधारित अभंग वगळता अन्य ३१ अभंग पाहिले तर बहिणाबाई ब्राह्मण कोणास म्हणावे याची तत्वचर्चा करत असून ती चर्चा स्वतंत्रपणे केली आहे हे लक्षात येईल. “ब्राह्मण” नेमके कोण? या प्रश्नातून हे चिंतन पुढे आले असावे. या प्रश्नातूनच त्यांना वज्रसूचीही प्राप्त होऊन त्यातील गाभ्याचा त्यांनी अनुवाद केल्याचे दिसते.

वज्रसुचीतील विवेचनाचा अनुवाद म्हणून खालील अभंगाकडे पाहता येते.

“आतां वर्ण हाची ब्राम्हण म्हणावा । तरी तो अनुभवा न ये कांहीं ॥ १॥ ब्राम्हण वेगळा वर्णही अतीत । पहातां निश्चित भासतसे ॥ २॥ श्वेत तो ब्राम्हण क्षत्रिय आरक्त । वैश्य वर्ण पीत नाही ऐसे ॥३॥ कृष्ण वर्ण शुद्र नाहीं ऐेसा भेद । आयुष्याचा बांध सारखाची ॥ ४ ॥ बहिणी म्हणे वर्ण ब्राम्हण तो नव्हे । विवे- चूनि पाहे मनामाजीं ॥ ५ ॥“

भारतीय मानसिकतेवर पडलेले वर्णसंस्थेचे अपार गारुड आणि ब्राह्मण हा श्रेष्ठ वर्ण मानला गेल्यामुळे अहंकाराची लागण या वर्णातील समुदायाला होणे स्वाभाविकच होते. जी. एस. घुर्ये यांनी तर पाचव्या ते सातव्या शतकातील ताम्रपटांचा अभ्यास करून प्रतिपादित केले आहे कि गुप्तकाळानंतर ब्राह्मण वर्णात वैदिकेतरांनी शिरण्याची लाटच आली होती आणि त्यासाठी अनेक बोगस गोत्रेही बनवण्यात आली. (Caste and Race by GS Ghurye) घुर्ये यांनी एपिग्राफिका इंडिका या ग्रंथात प्रकाशित दिडशे दानपत्रे (ताम्रपट व शिलालेख) यांचे विश्लेशन जे केलेय ते महत्वाचे आहे. या पटांत एकूण  ३१६१ ब्राह्मणांचा उल्लेख आहे ज्यांना जमीनी दान केल्या गेल्या. यात आसाम, राजस्थान व मध्यप्रदेश धरून उत्तर भारत, गुजराथ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तमिळनाडू प्रांतांत दिल्या गेलेल्या दानपत्रांचा समावेश आहे. हे ताम्रपट/लेख इ.स. पाचव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंतचा काळातील आहेत. यात असंख्य अन्यत्र अस्तित्वात नसलेली गोत्रेही कशी बनवली गेली आहेत यावर त्यांनी प्रकाश टाकला असून हे new recruits होते असेही प्रतिपादित केले आहे. वर्णसंस्थेचे असे लोक कडवे अभिमानी बनले असेही त्यांचे प्रतिपादन आहे.

अनेक बनावट पुराकथांनीही ब्राह्मणश्रेष्ठत्व वाढवण्यासाठी हातभारच लावला हे आपण रामायण-महाभारत ते पुराणांतील असंख्य उदाहरणांवरून आपण पाहू शकतो.

भारतीय विचारविश्वाचा याला निर्माण केला गेलेला दोषही म्हणता येईल कारण “ब्राह्मण” या शब्दाला त्यामुळे दिव्यत्वच प्राप्त झाले आहे असे दिसून येईल. ब्राह्मण हा शब्द एक श्रेष्ठ वर्ण, जाती किंवा समाजघटक मानत त्याभोवतीच भारतीय विचारविश्व फिरत राहिले. नाईलाजाने मग “ब्राह्मण कोणास म्हणावे?” याची चर्चा सुरु झाली. वज्रसुचीतही परंपरा ज्यांना ब्राह्मण मानते ते ब्राह्मण नसून “ब्राह्मण” तत्व हे विशिष्ट गोष्टींवर अवलंबून नाही यावर भर दिला गेला आहे. चातुर्वर्ण्याऐवजी एकच वर्ण अभिप्रेत असल्याचेही सूचन वज्रसूचीतून मिळते पण यातून वर्णव्यवस्था आणि तिचा वैदिक आणि वैदिकेतरांवर जो पगडा आहे त्याचे निराकरण होत नाही कारण त्याचा बौद्धिक तत्वचर्चेशिवाय व्यवहारात काही उपयोग नाही. आणि हे गेल्या किमान एक हजार वर्षांच्या इतिहासाने सिद्ध केले आहे.

असे असले तरी चातुर्वर्ण्याचाच आभास होईल असा “ब्राह्मण” शब्द का हाही प्रश्न विचारात घेतला गेला पाहिजे.

महाभारतात युधिष्ठिरालाही हाच प्रश्न विचारला गेला होता तेंव्हा त्याने " ज्याच्या अंगी ज्ञान, भुतदया, शील, क्षमा इ. गुण आहेत त्याला ब्राह्मण म्हणावे." अशी ब्राह्मणाची व्याख्या केली आहे. पौराणिक व्याख्या पाहिली तर "जो ब्राह्मण मातापित्यांच्या पोटी जन्माला आला आहे, उपनयन झाले आहे, ज्याने वेदाध्ययन केले आहे, जो यज्ञकर्म जाणतो तोच ब्राह्मण होय." पण वैदिक धर्माचा मुख्य आधारस्तंभ जो ऋग्वेद त्याची व्याख्या पाहिली तर “जो वैदिक मंत्र रचतो तोच ब्राह्मण.” अशी व्याख्या आहे. औपनिषदिक व्याख्या पाहिली तर “जो ब्रह्म जाणतो तो (कोणीही असला तरी) ब्राह्मण असतो.” तसे पाहिले तर मुळात आज जगात कोणीही ब्राह्मण असू शकत नाही. जर ब्राह्मण हेच अस्तित्वात नसतील तर आपण कोणत्या “ब्राह्मणत्वा”ची चर्चा करत असतो आणि वर्तमानातील सामाजिक व्युहरचना ठरवत असतो यावर साकल्याने विचार केला पाहिजे. “ब्राह्मण” या शब्दाचेच अलौकिकरण टाळले पाहिजे. वज्रसुची अथवा बहिणाबाईंचे अभंग त्या शब्दालाच वेगवेगळ्या अंगाने प्रतिष्ठा देत असतील तर त्याचाही साकल्याने विचार केला पाहिजे. जे ब्राह्मण आहेत त्यांतील सुबाजी बापूसारख्या व्यक्तीने आधुनिक काळातही “वज्रसूची टंक” लिहून वज्रसूचीतील मतेही खोडून काढायचा प्रयत्न केला हेही येथे विसरता येत नाही. ब्राह्मण या शब्दाची चर्चा आली कि ती सकारात्मक असो कि नकारात्मक, वर्णसंस्थेची चर्चा अपरिहार्य असते आणि त्यात ब्राह्मणमहत्ता आपोआप अधोरेखित केली जात असते. खरे तर ही वैदिक धर्माची अंतर्गत बाब आहे. चातुर्वर्ण्य हा वैदिक धर्माचा पाया आहे. लोकधर्मातून आलेल्या लोकांनी त्याची चर्चा करत ती संस्था आपल्यावर ओढवून घेण्यात अर्थ नाही. मुळात ब्राह्मण या शब्दाला एवढे वलय प्राप्त होण्याचे कारण काय याचेही चिंतन व्हायला हवे ते आजही होते आहे असे दिसत नाही.

वैदिक व्याख्यांनुसारच “ब्राह्मण” हेच अस्तित्वात नसतील तर आपण कोणत्या “ब्राह्मणत्वा”ची चर्चा करत असतो आणि वर्तमानातील सामाजिक व्युहरचना ठरवत असतो यावर साकल्याने विचार केला पाहिजे. “ब्राह्मण” या शब्दाचेच अलौकिकरण टाळले पाहिजे. वज्रसुची अथवा बहिणाबाईंचे अभंग त्या शब्दालाच वेगवेगळ्या अंगाने प्रतिष्ठा देत असतील तर त्याचाही गंभीरपणे विचार केला पाहिजे. ब्राह्मण या शब्दाची चर्चा आली कि ती सकारात्मक असो कि नकारात्मक, वर्णसंस्थेची चर्चा अपरिहार्य असते आणि जी वैदिक धर्माची अंतर्गत बाब आहे. लोकधर्मातून आलेल्या लोकांनी ती करण्यात अर्थ नाही. वज्रसुचीनेसुद्धा एक प्रकारे ब्राह्मण माहात्म्य वाढवायला हातभार लावला आहे.

-संजय सोनवणी


(ज्ञानबा-तुकाराम २०२३ च्या वार्षिकात बहिणाबाई विशेषांकात प्रकाशित झालेला लेख. संपादा- डॉ. श्रीरंग गायकवाड)

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...