Wednesday, May 3, 2023

तृतीय नेत्र - खिळवून ठेवणारी थरार कादंबरी

 

तृतीय नेत्र - खिळवून ठेवणारी थरार कादंबरी


image.png  

इंग्रजी भाषेत थरार, फँटसी कादंबऱ्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. स्टीफन किंग, जेके रोलिंग, अगाथा ख्रिस्ती असे कित्येक लेखक आणि त्यांच्या कादंबऱ्या जगभर प्रसिद्ध आहेत. कित्येक कादंबऱ्यांवर चित्रपट आणि वेबसिरीज आल्या आहेत आणि त्याही प्रचंड यशस्वी झाल्या आहेत. आपल्याकडे हा प्रकार तसा क्वचितच पाहायला मिळतो. सुहास शिरवळकरांचा सन्माननीय अपवाद सोडला तर हा प्रकार फारसा कोणी हाताळताना दिसत नाही. अशा लेखनाला वाचक नाही असंही नाही. आजही गावोगावच्या वाचनालयात सुशिंच्या थरार कादंबऱ्यांना सर्वात जास्ती मागणी असते. तसेच इंग्रजी लेखकांच्या थरार कादंबऱ्यांना देखील महाराष्ट्र मोठी मागणी आहे. तरीही मोजके लेखक आणि इंग्रजी भाषेतून अनुवाद सोडले तर या जॉनरचं मूळचं लिखाण कमी आहे.

थरार कादंबरी लिहिणं हा किचकट प्रकार आहे. गुंतागुंतीची कथा कुठेही रटाळ न वाटू देता त्यातला थरार कायम ठेवत पुढे नेणं हे फार कौशल्याचं काम आहे. त्यातही बाहेरच्या लेखकाची छाप न पडू देणं हे त्याहीपेक्षा अवघड काम आहे. हे अवघड काम संजय सोनवणींनी त्यांच्या पूर्वीच्या “असुरवेद” सारख्या थरार कादंब-यांप्रमाणे नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'तृतीय नेत्र' या कादंबरीत अगदीच सहजपणे केलं आहे.

संजय सोनवणी हे तसे इतिहास संशोधक आणि किचकट विषयांचे अभ्यासक म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहेत. असं असलं तरीही अतिशय वेगळा विषय घेऊन लिहिलेली तृतीय नेत्र ही कादंबरी क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी आहे. कित्येक प्रसंग वाचताना ते आपल्या डोळ्यासमोर घडतंय असंच वाटून जातं.

विजयनगरचा सम्राट राजा कृष्णदेवरायने हंपीच्या विरुपाक्ष मंदिरात एक दुर्मिळ रक्तवर्णी हिरा बसवला जो पुढे सोळाव्या शतकात रहस्यमयरित्या गायब झाला. हंपी शहर नष्ट झाल्यानंतर काळाच्या ओघात तृतीयनेत्रचा इतिहासही नाहीसा झाला. एकविसाव्या शतकात राहुल भोसले या तरुण इतिहास संशोधकाला पेशवे दफ्तरात एक कागदाचा तुकडा हाती लागतो. त्यातील अस्पष्ट मजकूर वाचून तो संभ्रमात पडतो. त्यातील मजकुराचं कोडं उलगडत असतानाच सुरु होते एक न थांबणारी खुनांची मालिका. त्या हिऱ्याच्या मागावर असलेली एक आंतराष्ट्रीय गुन्हेगारांची टोळी, त्यांचा म्होरक्या असलेला एक इतिहास तज्ज्ञ जो तो हिरा हस्तगत करण्यासाठी कोणत्याही थराला जायला आणि कितीही मुडदे पडायला तयार आहे. आणि त्याला झुंज देतोय तो आपल्या कादंबरीचा नायक राहुल आणि त्याची सहकारी कविता. त्यात त्याला वेगवेगळ्या पातळ्यांवर पोलीस, प्रशासन, गुंड इत्यादींसोबत करायला लागलेला संघर्ष अशी या कादंबरीची रूपरेषा आहे.

एखाद्या थरारपटाप्रमाणे ही कथा पुढे जाते. कथानक कुठेही रटाळ होत नाही. त्यामुळे एका बैठकीत ही ३०० पानी कादंबरी वाचून होते. आपल्या इतिहासात या कथेची मुळं असल्यामुळे ही कथा विशेष भावते. राजा कृष्णदेवराय, हंपी, शिवकाळ, सुरतेची लूट या आपल्या परिचयाच्या घटनांतून वाट काढत ही कथा पुढे जात राहते त्यामुळे आपण कथेशी भावनिकरित्या जोडलेलो राहतो. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अठरापगड जातीच्या मावळ्यांनी त्यांच्या लोकगीतांतून पिढ्यानपिढ्या जतन केलेल्या इतिहासाचं महत्व ही कादंबरी अधोरेखित करते.

सध्याच्या काळातील सामाजिक, राजकीय आणि जातीय प्रसंग लेखकाने जागोजागी पेरल्यामुळे ही कथा आपल्याच आजूबाजूला घडत असल्याचं जाणवतं. या कथेवर कुठेही इंग्रजी थरारक कादंबऱ्यांची छाप जाणवत नाही त्याचं हे एक महत्वाचं कारण आहे.

कथेला आवश्यक असणाऱ्या पात्रांना उभं करणं त्यांचे बारकावे टिपणं यात सोनवणींचा हातखंडा आहे. कादंबरीतले छोट्यातलं छोटं पात्रही लेखक हुबेहूब आपल्यापुढे उभं करतो. त्यामुळे प्रत्येक पात्र आपल्या विशेष लक्षात राहतं. त्यातही मुख्य खलनायक असलेला इतिहास संशोधक तर सुपर व्हिलनच आहे. एखादा थंड डोक्याचा विद्वान पैशाच्या मागे लागून आपल्या बुद्धीचा गैरवापर कसा आणि किती निर्दयपणे करू शकतो हे लेखकाने एकदम खुबीने उभं केलं आहे. इतिहास संशोधक असलेले शास्त्री, पोलीस इन्स्पेक्टर शिंदे, खलनायकाची सहकारी मीनाक्षी ही पात्रंसुद्धा आपल्या डोळ्यासमोर हुबेहूब उभी राहतात.

थरार कादंबरी असूनही त्यातल्या समकालीन प्रचलित जातीय समजुतींवर केलेलं भाष्य आपल्याला विचार करायला लावतं. इतिहासाचं चाललेलं विकृतीकरण, पुराव्यांची अफरातफर, त्याचे जातीय कंगोरे, प्रशासनातील जातीयवाद या गोष्टी सद्य परिस्थितीची जाणीव करून देतात.

एकंदर या कथेचं आपल्या इतिहासात असलेलं मूळ, त्याचबरोबर त्यातली समकालीन जातीय, सामाजिक समीकरणे आणि एखाद्या वेबसिरीज प्रमाणे डोळ्यासमोरून जाणारा कथेचा उत्कंठावर्धक पट पाहता लवकरच या कादंबरीवर एखादी वेबसिरीज आली तर अजिबात नवल वाटणार नाही.

- अक्षय बिक्कड



तृतीय नेत्र

लेखक- संजय सोनवणी

प्राजक्त प्रकाशन

पृष्ठसंख्या- २९८

मूल्य- रु. ३६०/- मात्र

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...