Monday, October 30, 2023

आदिवासी-वनवासी-मुलनिवासी


आदिवासी हा शब्द “अबोरिजिनल्स” या शब्दार्थाच्या फक्त काही अंशी जवळ जातो. “अबोरिजिनल्स” म्हणजे “मूलनिवासी”. युरोपियन लोकांनी अन्यत्र जेथेजेथे मुळच्या लोकांचा विनाश करत भूमी बळकावत त्यांना अत्यल्पसंख्य केले त्यांना ही उपाधी वापरली जाते. प्रख्यात गांधीवादी ठक्करबाप्पा (अमृतलाल ठक्कर) यांनी आदिवासी हा शब्द भारतातील आदिम जमातीसाठी सर्वप्रथम वापरला असे मानले जाते. त्या अर्थाने आदिवासी आणि “अबोरिजिनल्स” या शब्दार्थात साम्य नाही.
आदिवासी म्हणजे आपल्या पुरातन जीवनसंस्कृतीशी आणि निसर्गाशी तादात्म्य ठेवत सर्वस्वी स्वतंत्र संस्कृती, भाषा, दैवत संकल्पना आणि पुराकथा असलेले लोक. ते अरण्यवासी असतातच असे नाही. ते जिप्सीसारखे भटके, धनगरांसारखे निमभटकेही असू शकतात. नागर संस्कृतीपासून दूर असलेले, फटकून असलेले आणि स्वतंत्र आदिम व निसर्गानुकुल जीवन जगणारे लोक म्हणजे आदिवासी. जगात असे अनेक समाज आजही आहेत.
आदिवासी शब्द गांधीशिष्याने प्रथम वापरला असल्याने रा.स्व. संघाला अर्थात या शब्दाचा तिटकारा आहे. त्यापेक्षा त्यांनी “वनवासी” या शब्दाला जन्म दिला आहे. वनात राहणारे ते वनवासी. भारतीय संस्कृतीत वनवास हा शब्द शिक्षेसार्खा वापरला जातो. राम-पांडव यांचा वनवास आपल्याला माहित आहे. त्या अर्थाने काही काळ का होईना राम-पांडव असे अनेक पुराकथाचे नायक वनवासी होते. वनवासी हा शब्द नागर जीवनापासून दूर राहिलेल्या व आदिम पद्धतीचे स्थिर अथवा भटके जीवनयापन करणा-या लोकांना लावणे म्हणजे त्यांना जाणीवपूर्वक अरण्यात रहायला अथवा नागर समाजापासून दूर रहायला भाग पाडले गेले होते असा अर्थ निघतो आणि तो समाजशास्त्रीय इतिहासाच्या दृष्टीने योग्य नाही.
आदिवासी हा शब्द समर्पक असून आदिम जीवनपद्धती जगणारे व आपापली स्वतंत्र संस्कृती पाळणारे ते आदिवासी ही व्याख्या सत्याच्या जवळ जाते. पण मूलनिवासी किंवा मूळ भूमिपुत्र असे जे रूप दिले जाते ते मात्र “अबोरिजिनल्स” या शब्दाच्या व्याख्येजवळ जाते आणि हा अर्थ आदिवासीना लागू पडत नाही. जगात कोणीही मूलनिवासी नाही. सारे एके काळी भटकेच होते. पंधरा-वीस हजार वर्षपूर्वी शेतीचा शोध लागल्यानंतर लोक स्थिरावू लागले. नागरी संस्कृती प्रकट होऊ लागली. पण अनेक समाज नागरी जीवनापासून अलिप्त राहिले. त्यात पशुपालक/मेंढपाळ असे निमभटके ते दुर्गम भागात जाऊन वसलेले लोक सामील होते. त्यांची जीवनशैली आदिमच राहिल्याने त्यांनाच आदिवासी म्हटले जाते.
रा.स्व. संघाने मात्र दिलेला “वनवासी” हा शब्द त्यांना लागू होत नाही. किंबहुना तो आदिवासींचा अपमानच करतो हे लक्षात घेतले पाहिजे.
-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...