Friday, November 10, 2023

दिपावली अर्थात यक्षरात्रीचा सांस्कृतिक इतिहास!

 दिपावली अर्थात यक्षरात्रीचा सांस्कृतिक इतिहास!

संजय सोनवणी

 

दीपावली हा सण मुळचा कृषिवल/पशुपालक संस्कृतीचा दीपोत्सव आहे. आज आठवण राहिली नसली तरी प्राचीन काळी याच उत्सवाला "यक्षरात्री" असे म्हणत. कुबेर हा यक्षांचा अधिपती असून शिवाचा खजीनदार मानला जातो. बुद्धपुर्व काळापासून भारतात देशभर "यक्ष" संस्कृतीचा मोठा प्रभाव होता हे आपल्याला सर्व धर्मीय म्हणजे जैन, बौद्ध, हिंदू लेणी-मंदिरांतील यक्ष प्रतिमांवरुन व यक्षाच्या नांवाने असलेली गांवे/जमीनी/तलाव यावरून लक्षात येते. यक्ष हे वन, अरण्य, तलावाचे संरक्षक मानले जात असून त्यांची सर्वत्र पूजाही होत असे. दीपावलीचे मुळचे नांवही यक्षरात्रीच होते हे हेमचंद्राने तर नोंदवलेच आहे, वात्स्यायनाच्या कामसूत्रातही नोंदलेले आहे. सातवाहन ते अनेक राजांच्या शिलालेखांत यक्षांच्या नावाने तलाव तर होतेच पण जमिनीही यक्षांच्या नावाने ओळखल्या जात. महाभारतातील यक्षप्रश्न प्रकरण माहित नाही असे लोक क्वचितच असतील.

यक्ष या शब्दाचा अर्थच मुळात प्रकाशमान असा आहे. महाभारतात यक्ष हे ज्वाला अथवा सुर्यासारखे तेजस्वी असतात असे म्हटले आहे. या श्रद्धेतुनच दिपोत्सव यक्षांसाठी सुरु झाला व त्यांनाच यक्षरात्री असे म्हटले जावू लागले असे जी. बी कानुगा म्हणतात. (Immortal love of Rama, तळटीप. पृष्ठ-२७-२८) धनसंपत्ती देणारे, व धसंपत्तीचे रक्षक असलेल्या यक्षांना दिपोत्सव करुन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा उत्सव प्राचीन काळी सुरु झाला.

असूर संस्कृती भारतात मुख्य असली तरी प्रत्येक संस्कृतीच्या प्रभावक्षेत्रात उपसंस्कृत्याही सहास्तित्वात असतात. यक्ष संस्कृतीचा उदय हा गंगेच्या गहन अरण्याच्या क्षेत्रात झाल्याचे मानले जाते. गुढत्व, भय, अद्भुतता या मिश्र भावनांतून यक्षकल्पना अरण्यमय प्रदेशांत जन्माला आली असावी. आज यक्ष हा जल, अन्न-धान्य-पशु व संपत्तीचा संरक्षक मानला गेला आहे. अगदी पुरातन काळी यक्ष हे वृक्ष व अरण्याचे रक्षक मानले जात. पुढे कृषी संस्कृतीच्या उदयानंतर ते ग्रामरक्षक या स्वरुपातही विराजमान झाले.  यक्ष पुजा ही इतकी पुरातन आहे कि यक्ष म्हणजेच पुजा असे दक्षीणेत आजही मानले जाते. यक्षपुजा ही आजही शैवजन करत असतात...पण सांस्कृतिक लाटांत विस्मरणामुळे ते यक्ष आहेत हेच माहीत नसते. उदाहरणार्थ वीर मारुती, वीरभद्र, खंडोबा, भैरवनाथ, जोतीबा इ. दैवता या यक्षश्रेणीतीलच आहेत. ते संरक्षक आहेत ही जनमानसाची श्रद्धा आहे...आणि म्हणुनच त्यांचे स्थान हे शक्यतो शिवेबाहेर व पर्वतावर असते...कारण ते ग्रामरक्षक असतात ही श्रद्धा. त्यांना शिवाचेच अवतार अथवा अंश मानले जाते.

उपनिषदांची रचना करणारे हे यक्ष संस्कृतीचेच प्रतिनिधी होते असे ठामपणे म्हणायला पुष्कळ वाव आहे. यक्ष हा शब्द अद्भूत, विश्वनिर्मितीचे गुढ कारण या अर्थाने उपनिषदांत वापरला जात होता. ब्रम्ह हाही एक यक्षच. (ऋग्वेदात ब्रम्ह ही देवता नसून त्याती ब्रम्हचा अर्थ मंत्र असा आहे.) पण मुळची उपनिषदे ही वैदिक नसून आगमिक असूर/यक्ष संस्कृतीच्या लोकांनी परिणत तत्वज्ञानाच्या आधारे वैदिक संस्कृतीला केलेला प्रतिवाद आहे हे लक्षात घ्यायला हवे.

गौतम बुद्धाच्या शाक्यकुलाचा कुलदेव शाक्यवर्धन नांवाचा यक्षच होताच तर खुद्द बुद्धालाही यक्ष म्हटले गेलेले आहे. जैन धर्मातही यक्ष-यक्षिणी तीर्थकरांचे सेवक मानले गेले आहेत. मातृपुजा अथवा सुफलनविधी यक्षिणींनाही केंद्रस्थानी ठेवून होत असावेत कारण त्या शिल्पांत नेहमीच नग्न दाखवलेल्या असून त्यांचे नितंब व स्तन प्रमाणापेक्षा मोठे दाखवले जातात. सर्वात जुनी यक्षमुर्ती ही सनपूर्व चवथ्या शतकातील असून ती परखम येथे मिळाली. आता ती मथुरा संग्रहालयात ठेवलेली आहे. पुढे महायान संप्रदायातही यक्षपुजा सुरु राहिली. यक्ष मुर्ती देशात सर्वत्र आढळल्या असून यक्षगानाच्या स्वरुपात दक्षीणेत कलादृष्ट्याही यक्षमाहात्म्य जपले गेलेले आहे.

एवढी व्यापक देशव्यापी असलेली यक्षपुजा पुराणांनी केलेल्या वैदिक कलमांत हळू हळू विस्मरणात गेली. कुबेर व रावणाचे बाप बदलले गेले. पुराणांनी यक्षांना अतिमानवी, माणसांना मारून खाणारे, जलाशयांजवळ निवास करणारे कुरूप-भिषण, लोकांना झपाटणारे वगैरे असे चित्रित केले. तरीही यक्ष ही संरक्षक देवता आहे व तिचा निवास जल-वृक्ष यात असते ही लोकस्मृती लोप पावली नाही. महाकवी कालिदासाने मेघदुतात एक शापित यक्ष मेघामार्फत आपला निरोप कसा यक्षिणीला पाठवतो याचे हृदयंगम वर्णन आहे. यक्षपुजा आजही आपण करीत असतो पण त्यातील अनेक देवता मुळस्वरुपातील यक्षच आहेत याचे भान मात्र हरपलेले आहे. दिपावलीही खरे तर यक्षरात्रीच असली तरी तेही आपले भान सुटले आहे.

कुबेर हा शिवाचाच प्रतिनीधी...यक्षांचा अधिपती...धनसंपत्तीचा रक्षक...खजीनदार. एक कृषि-हंगाम जावुन दुसरा येण्याच्या मद्धे जो अवकाश मिळतो...त्या काळात या कुबेराचे अभिवादन करत समस्त कृषिवल असूर संस्कृतीचा जो महानायक बळी त्याच्या स्मरणाने नवीन वर्ष सुरु करण्याची ही पद्धत. त्यालाच आपण बळी प्रतिपदा म्हणतो...नववर्षाची सुरुवातच सर्वश्रेष्ठ, शैव संस्कृतीचा आजही जनमानसावर राज्य करीत असलेल्या महात्मा बळीच्या नांवाने सुरु होणे स्वाभाविकच आहे.

या दिवशी विष्णुचा अवतार वामनाने बळीस पाताळात गाडले अशी एक भाकड पुराणकथा आपल्या मनावर आजकाल बिंबलेली आहे. तरीही बळीचे महात्म्य संपलेले नाही. असे असूनही बळीचे पुराणही नाही, नाटक-खंडकाव्येही नाहीत, बळी नेमका कधी व कोठे झाला याचीही स्मृती हरपली आहे. ज्या आहेत त्या लोककथा, लोकगीते व महाभारत-पुराणांतुन येणा-या भ्रष्ट वैदिकीकरण झालेल्या कथा. बळीच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात पाठवणा-या (अथवा गाडणा-या) वामनाच्या नांवे मात्र संपुर्ण पुराण आहे, पण या देशात तो काही केल्या वंदनीय झाला नाही. मात्र बळीएवढी अपार लोकप्रियता भारतीय जनमानसात कोणाचीही नाही हेही वास्तव आहे. एवढी कि दिवाळीचा नुसता एक दिवस त्याला दिला आहे असे नव्हे तर नववर्षारंभच बळीच्याच नांवाने होतो. सात चिरंजीवांपैकी त्याला एक मानले जाते. हा एक चमत्कार आहे. असूर संस्कृतीचे अवशेष बळीच्या स्मृतीने कालजेयी ठेवले आहेत.  किंबहुना बळीराजा हा भारतीय संस्कृतीचे प्रतीकस्वरूप बनून बसला आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.

वामन हा विष्णुचा अवतार मानला जातो. किंबहुना सारेच अवतार या ना त्या कारणासाठी विष्णुने घेतले असे सर्व पुराणे उच्च रवात सांगत असली तरी ते वास्तव नाही. मुळात विष्णुचा संप्रदाय जन्माला यायच्या आधीही वैदिकांत अवतार कल्पना होती. पण अवतार घ्यायचे कार्य विष्णुकडे नव्हे तर प्रजापती या देवतेकडे होते. पहिल्या मत्स्य, कुर्म व वराह या तीन अवतारांचे स्पष्ट सूचन शतपथ ब्राह्मण (२.९.१.१) तैत्तिरिय आरण्यक व तैत्तिरिय ब्राह्मणात आहे. हे तिन्ही अवतार प्रजापतीचे. पण ते नंतर विष्णुच्या नांवावर खपवण्यात आले.

 

 अवतार घेण्याचे कार्य पुढे उत्तरकालात (तिस-या-चवथ्या शतकानंतर, गुप्तकाळात) पुरांणांनी वैष्णव पंथ वर आला तेंव्हा विष्णुकडे सोपवले. अवतारांचेच पहाल तर महाभारतातील नारायणीय उपाख्यानात फक्त सहा अवतारांचा निर्देश आहे. पुढे ती दहा, नंतर बुद्ध आणि हंस अवतार धरुन बारा तर भागवत पुराणात हीच संख्या २४ एवढी आहे. पुढच्या पुराणांत मात्र दहा ही संख्या नक्क्की केली गेली. इसपुचा पहिल्या शतकापर्यंत कृष्ण हा पांचरात्र (नारायणीय)या  आगमिक संप्रदायातील एक मुख्य व्यूह (दैवत नव्हे) होता. त्याचे अपहरण तिस-या चवथ्या शतकाच्या आसपास झाले. वासूदेव आणि कृष्ण एक नव्हेत. देवकीपुत्र कृष्ण हा महाभारतपूर्व साहित्यात ज्ञानी यती मानला गेला आहे व त्याच्या आईचे नांव (देवकी) असले तरी त्याच्या पित्याचे नांव उल्लेखलेले नाही. रामाचे म्हणाल तर अवतार या स्वरुपात रामोपासनेचा प्रचार बाराव्या शतकानंतर झालेला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे महाभारतातील नारायणीय उपाख्यान पाहिले तर नारायण व विष्णू या देवताही वेगळ्या आहेत, एक नव्हेत.

वामन अवताराची कल्पना एकाएकी विकसीत झालेली नाही हेही येथे लक्षात ठेवले पाहिजे. किंबहुना या कथेचा विकास तीन टप्प्यांत झालेला आहे. ते कसे हे पाहुयात.

ऋग्वेदात विष्णु तीन पावलांत त्रिभुवन व्यापतो (ऋ. १.२२.१७) असे म्हटले आहे. तेथे विष्णु हा सुर्याचे रुपक म्हणून येतो. सकाळ-दुपार-सायंकाळ ही त्याची रुपकात्मक तीन पावले. या तीन पावलांत तो विश्व आक्रमतो ही मुळची वैदिक निसर्ग-रुपकाची संकल्पना. येथे बळीचा काहीही संबंध नाही.

ऋग्वेदानंतर ज्या साहित्याचा नंबर लागतो त्या शतपथ ब्राह्मणात वामनावताराची येणारी कथा तर वेगळीच आहे. तिचाही बळीशी काडीइतकाही संबंध नाही. शतपथ ब्राह्मण एक पुराकथा सांगते. ते असे कि देवासूर युद्धात देवांचा पराभव झाला. घाबरलेले सारे देव पळून गेले. मग देवांना हाकलल्यावर रिक्त झालेली पृथ्वी वाटुन घ्यायला समस्त असूर बसले. या वाटपात देवांना जागाच मिळेना त्यामुळे असहाय झालेले देव पुन्हा असुरांकडे गेले आणि पृथ्वीचा किमान छोटा तरी हिस्सा आम्हास मिळावा अशी विनवणी केली. तेंव्हा असुरांनी एका बटु वामनाच्या तीन पावलांएवढी भुमी देवांना द्यायची तयारी दर्शवली. तो बटू वामन खरे तर विष्णु होता. मग वामनरुपधारी विष्णुने विशाल होत तीन पावलात त्रिभुवन व्यापले व असुरांनाच भुमीपासून वंचित केले. (शतपथ ब्राह्मण १.२.२.१-५).

 
या कथेत समस्त असूर आहेत. विष्णु आहे व त्याची तीन पावलेही आहेत. नाहीय तो बळीराजा!

 
पुढे हीच कथा अजून विकसीत करत मुळच्या कथेचा आधार घेऊन वामन आणि त्याला बळीराजाचे तीन पाऊल दान ही पुराणपंथी कथा बनवण्यात आली. येथे वामनाच्या रुपातील विष्णू न येता विष्णुचा वामनावतार आला. बळीच्या कथा महाभारत व अनेक पुराणांत वेगवेगळ्या स्वरुपात येतात. बळीचे महाबलाढ्य असूर असणे व वामनाची तीन पावले हा भाग वगळला तर कोणत्याही कथेत एकवाक्यता नाही. बळीने स्वर्ग जिंकून देवांना हरवले. ते घाबरून रुपे बदलून परागंदा झाले. पौराणिक कथा बळीने यज्ञ केला व त्या प्रसंगीच वामनाने तीन पावले जमीन दान मागितली असे सांगतात. यातही गफलत अशी कि असूर हे यज्ञविरोधक व यज्ञविध्वंसक होते, यज्ञकर्ते वैदिक नव्हे. पण एनकेनप्रकारेन यज्ञमाहात्म्य वाढवण्यासाठी ही क्लुप्ती केली गेली आहे हे उघड आहे.

 
सर्व कथा पाहिल्या तर हे स्पष्ट आहे कि वामन अवतार कथा जुन्याच (बळीशी संबंध नसलेल्या) कथांत बळीची भर घालवून बनवल्या आहेत. वामन अवतारात कसलेही तथ्य नाही त्यामुळे वामनाने बळीचा खून केला किंवा पाताळात पाठवले यातही तथ्य नाही. बळी महान राजा होता याबाबत एकाही पुराणकथेतही दूमत नाही. पण वाईट हे होते त्यांच्या दृष्टीने कि तो देवांचा (म्हणजे वैदिकांचा) शत्रू होता.

 
बळीची घटना भृगूकच्छमध्ये घडली म्हणजे तो तेथीलच असावा असा एक अंदाज वर्तवला जातो व त्रिपाद भुमीची घटना घडल्यावर तो केरळात गेला असेही मानण्यात येते. केरळमधील लोक आजही बळीला आपला राजा मानतात. कन्याकुमारीच्या दक्षिणेस कित्त्येक कोसांवर समुद्रात घुसलेल्या भुशिरावर बळीची राजधानी होती व नैसर्गिक उत्पातात महान बळीची राजधानी समुद्रात बुडाली असे उल्लेख प्राचीन तमिळ वाड्मयात येतात.

शतपथ ब्राह्मणात वर्तमानकालीन देश म्हणून प्राच्य देश व तेथील लोकांचा उल्लेख येतो. निर्वासित वैदिक लोक भारतात आले तेंव्हा ते कुरु-पांचाल विभागात वसले व धर्मप्रचारही सुरु केला. प्राच्य देशात असूरांची राज्ये असून ते यज्ञ करत नाहीत, त्यांचे स्वत:चे पुरोहित आहेत. दक्षिण दिशा त्याज्ज्य नंतर झाली असली तरी या काळात वैदिकांनी प्राच्य त्याज्ज्य मानली. हा प्राच्य देश म्हणजे आजचे बिहार व त्यापलीकडील पुर्वेचा प्रदेश. वैदिकांना तेंव्हा तो भुगोल माहितच नव्हता. महाभारतात या भागांतील अंग, वंग, कलिंगादि पाच राज्यांचा उल्लेख आला आहे व ही पाचही राज्ये बळीच्या त्याच नांवाच्या पुत्रांनी स्थापन केली असा उल्लेख आहे. त्यामुळे या प्रदेशाला "बालेय क्षेत्र" असे नांव होते. त्यामुळे असूर ही कविकल्पना न मानता ती खरीच वेगळ्या संस्कृतीची माणसेच होती असे मानावे लागते. (Some Aspects of Ancient Indian Culture by D. R. Bhandarkar, पृष्ठ-३५)

इतिहासात बळी नांवाचा राजा तरी खरेच घडला होता काय हाही प्रश्न उद्भवने स्वाभाविक आहे. यच्चयावत देशात त्याच्याबद्दल आदरभाव असणे, त्याच्या नांवाचे राजकीय विभाग असने, त्याला अनेक राजवंशांनी पुर्वज मानने, त्याच्या वंशातील राजांचे उल्लेख मिळणे या बाबी तो खरेच होऊन गेला हे ठामपणे ठरवायला पुरेसे नसले तरी वामनावतारात जशी गफलत आहे तशी बळीच्या बाबतीत नाही. वैदिकांनाही बळीचे माहात्म्य खोडुन काढता आले नाही. त्यांना त्यांच्या विपर्यस्त कथांतही ते मान्य करावेच लागले.

वैदिक भारतात आले तेंव्हा  त्याचे वंशज राज्य करत होते असे वैदिक साहित्यावरुनच दिसते. म्हणजे वैदिक भारतात येण्यापुर्वीच बराच काळ आधी बळीराजा होऊन गेला होता. बळीराजा झाला तेंव्हा भारतात वैदिकांचा धर्मही नव्हता नि वैदिकही जर नव्हते तर बळीला पाताळात पाठवायला त्यांचा विष्णू कसा येईल हा विचार आपल्या विद्वानांनी केलेला दिसत नाही. अवतार संकल्पना हीच मुळात वैदिक धर्मातही उशीराची आहे. वेदातील विष्णू हा उपेंद्र व दुय्यम देवता आहे. त्याला महत्व प्राप्त झाले तेच मुळात गुप्तकाळात. असे जर स्पष्ट आहे तर मग विष्णूचा अवतार वामनाचा संबंध आम्ही कसा मान्य करतो?


अर्थात महाबळी आज सर्व भारतीयांचा अधिराज आहे. त्याचा कोणी खून केला, पाताळात गाडले वगैरे वैदिकांनी आपले माहात्म्य वाढवण्यासाठी बनवलेल्या भाकडकथा आहेत. वामनाची कोणी अपवाद वगळता पुजाही करत नाही.

अर्थात ही कथा निर्माण केली म्हणून बळीराजाचे महत्व कमी झालेले नाही. झाले असते तर ती "वामनप्रतिपदा" झाली असती...बळीप्रतिपदा नव्हे. पण तसे झाले नाही...थोडक्यात हिंदुंनी आपल्या सांस्कृतीक श्रद्धा जपल्या, पण वैदिक धर्मियांनी बनवलेल्या कथाही सातत्यपुर्ण प्रचारामुळे कालौघात डोक्यात घुसवुन घेतल्या. बळीला पाताळात गाडुन वैदिक टेंभा मिरवणा-या वामनसमर्थकांच्या हे लक्षात येत नाही कि नववर्षारंभ बळीच्या नावाने का? कारण ते बळीमाहात्म्य संपवुच शकत नव्हते...एवढेच...म्हणुन भारतात या वामन-अवताराची पुजा कोणी करत नाही...त्याचे भारतात बहुदा एकच मंदिर आहे. बलीप्रतिपदेला आपण बळीचीच पूजा करतो...वामनाची नाही. किंबहुना दिपोत्सावातील हा अत्यंत महत्वाचा दिवस व नववर्षाचा प्रेआरंभ महात्मा बळीला वाहिलेला आहे.

अश्वीन अमावस्येला आपण आज जे लक्ष्मीपुजन करतो त्याचाही असाच सांस्कृतीक अनर्थ झालेला आहे. मुळात ही यक्षरात्री असल्याने या रात्री लक्ष्मीपुजन नव्हे तर कुबेरपूजन करण्याची पुरातन रीत. कुबेर हा शिवाचा खजीनदार. धनसंपत्तीचा स्वामी. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पुजणे हा मुळचा सांस्कृतीक कार्यक्रम. परंतू गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पुजा होऊ लागली. नंतर कालौघात मात्र कुबेराला गायबच करण्यात आले.

खरे तर विष्णू आणि लक्ष्मी हा संबंध जोडण्यात आला तोही उत्तरकाळात. गुप्तकाळात. ऋग्वेदात विष्णुला मुळात पत्नीच नाही. श्रीसूक्त हे प्रक्षिप्त असून ते उत्तरकाळात जोडले गेले आहे (गणपती अथर्वशिर्षाप्रमाणे) पण यातही विष्णु व लक्ष्मी यांचा पती-पत्नी संबंध, विष्णुचे शेषशायी समुद्रतळीचे ध्यान वगैरे वर्णित नाही. तो उपेंद्र आहे यापलीकडे त्याला महत्व नाही. त्याचे महत्व वाढवले गेले ते गुप्तकाळात. गुप्तांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिला त्यामुळे गुप्तकाळ सुवर्णकाळ मानायची प्रथा पडली. पण सांस्कृतिक गोंधळाचा काळ म्हणजे गुप्तकाळ हे लक्षात घ्यायला हवे.

हा उत्सव मुळचा अवैदिक (आगमिक व म्हणजेच हिंदुंचा, वैदिकांचा नव्हे) असल्याचे अनेक पुरावे जनस्मृतींनी आजही संस्कृतीत जपलेले आहे. मुळच्या यक्षरात्रीचे अनेक अवशेष आजही जनस्मृतीतून गेले नाहीत असे जी. एन. कानुगा (तत्रैव) म्हणतात. बंगालमद्ध्ये लक्ष्मीऐवजी कालीची पुजा करंण्यात येते. अनेक समाज यक्षरात्रीला गोवर्धन पर्वताची कृष्णासहित पूजा करतात. कृष्ण हा मुळचा इंद्रविरोधी (म्हणजेच वैदिक विरोधी) ही जनस्मृती आजही कायम आहे. काही लोक आजही लक्ष्मीबरोबरच कुबेराचीही पुजा करतात. म्हणजेच मुळचे अवशेष वैदिकांना समूळ पुसटता आलेले नाहीत.

वसुबारस, धनतेरस (धनतेरस हा शब्द "धान्यतेरस" असा वाचावा...कारण धन हा शब्द धान्य शब्दाचा पर्यायवाची आहे.) हे सण कृषिवल एतद्देशीय संस्कृतीचीच निर्मिती आहे. कृषीसंस्कृतीत गाय-बैलाचे स्थान केंद्रवर्ती होते व आजही बव्हंशी आहे. या सणाचा राम वनवासातून परत आला या भाकडकथेशीही काहीएक संबंध नाही.

आता राहिले नरकासुराचे. नरकासूराच्या दुष्टपणाच्या व सोळा हजार राजकन्यांना बंदिवासात ठेवण्याच्या कथेत तथ्यांश असता तर नरकासुराच्या नांवाने एक दिवस लोकांनी अर्पण केला नसता. व-असूर सांस्कृतीक (कथात्मक) संघर्षात असूर महामानवांना बदनाम करण्यासाठी अशा भाकडकथा रचण्यात आल्या हे उघड आहे. भारतात सोळा हजार राजकन्या कैदेत ठेवायच्या तर तेवढे उपवर मुली असणारे राजे तरी हवेत कि नकोत? या कथेने नरकासुराला तर बदनाम केलेच पण कृष्णालाही बदनाम केले गेले. मुळात ही कथा का निर्माण झाली हे समजावून घ्यायला हवे. कृष्ण वैदिक नव्हता, असुही शकत नव्हता कारण त्याचा काळ वेदपुर्व असल्याचे संकेत खुद्द महाभारतात मिळतात. हे वास्तव समजावून घेतले कि अशा भाकडकथांचा उलगडा होतो. जनसामान्यांत नरकासूर अप्रिय नव्हता हे त्याच्या नांवाचाच सण आहे हे वास्तव लक्षात घेतले कि सांस्कृतीक पेच पडत नाहीत. त्याची कथा ही कालौघात अशी विकसित झालेली आहे.

भागवतानुसार नरकासूर हा भुदेवीचा पुत्र होता. बाणासुराच्या सहकार्याने त्याने प्राग्ज्योतिषपुरचा (आसाम) राजा घटकासुराला हटवून स्वत:चे राज्य स्थापन केले. विष्णुचा एक भविष्यातील अवतार नरकासुरास नष्ट करेल अशी भविष्यवाणी असल्याने भुदेवीने विष्णुचीच प्रार्थना करून त्याच्यासाठी दिर्घायुष्य आणि तो सर्वशक्तीमान असावा असे वरदान मागितले. शक्तीने उन्मत्त झालेल्या नरकासुराने सरळ स्वर्गाकडेच मोर्चा वळवला आणि देवांना पळवून लावले. अशा रितीने नरकासूर स्वर्ग आणि पृथ्वीचा अधिपती बनला व त्याने १६००० स्त्रीया (अथवा राजकन्यांना) पळवून प्राग्ज्योतिषपूर येथे बंदिवासात ठेवले. सर्व भयभीत देव मग विष्णुकडे गेले व या आपत्तिपासून सुटकारा मागितला. विष्णुने आपण नरकासुराला दिर्घायुष्य दिले असल्याने त्याला आता नाही पण कृष्णावताराच्या वेळीस त्याला ठार मारू असे देवांना आश्वासन दिले. नरकासुराचा जन्म वराह अवताराच्या वेळीस झाला असेही ही कथा म्हणते. वराहानंतर कृष्ण अवतारापर्यंत किती कालावधी लोटला असेल याची कल्पना करा! तोवर विष्णुने देवांना स्वर्गाबाहेरच ठेवले, मधल्या, रामावतारानेही नरकासुराच्या बाबतीत काहीच केले नाही असेच ही कथा सुचवत नाही काय?

या कथेनुसार कृष्णाला नरकासुराबाबत मात्र काहीच माहित नव्हते. त्याला नरकासुराच्या स्त्रीयांवरील अन्यायाची माहिती सत्यभामेकडून समजली. कृष्णाने पाठोपाठ गरुडावर बसून प्राग्ज्योतिषपुरच्या नरकासुराच्या किल्ल्यावर हल्ला चढवला. नरकासुरही ११ अक्षोहिन्यांचे सैन्य घेऊन कृष्णावर तुटून पडला. पण शेवटी कृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक उडवले. मरण्यापुर्वी नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला कि आपल्या मृत्युदिवसाचे स्मरण पृथ्वीतलावरील लोकांनी विशेष दिपप्रज्वलन करून सण साजरा करून करावे. त्या स्मृतिदिनालाच आपण नरक चतुर्दशी समजतो.

याच कथेची वेगळ्या स्वरुपात अजून एक पण थोडी वेगळी कथा येते. नरकासुराशीच्या युद्धात कृष्ण जखमी होऊन बेशुद्ध पडला. यामुळे संतप्त सत्यभामेने दुप्पट आवेशाने युद्ध केले व त्यात अखेरीस नरकासूर ठार झाला. येथेही मरण्यापुर्वी त्याने सत्यभामेकडे वरीलप्रमाणेच वरदान मागितले. म्हणजे नेमके कोणाकडुन नरकासुराला मारलेले दाखवावे याचा संभ्रम पुराणकथाकारांच्याही मनात होता.

नरकासुराने बंदीवासात ठेवलेल्या या सोळा हजार स्त्रीयांशी नंतर कृष्णानेच विवाह केला असे मानले जाते! या स्त्रीया (किंवा राजकन्या) कोणाच्या व कोठकोठल्या होत्या याचा उल्लेख नाही आणि किती काळ त्या बंदीवासात होत्या याचाही उल्लेख नाही! कारण नरकासुराने (ही कथा खरी मानली तर हजारो वर्ष राज्य केले!) बरे, सर्व पृथ्वीवर त्याचे राज्य असते तर रामाचे, रावणाचे कौरवांचे, जरासंघाचे अणि जनकादि अन्य शेकडो राजांचे राज्य भारतात कोठून आले असते? एवतेव ही भाकडकथा मुद्दाम बनवण्यात आली हे उघड आहे.

ही झाली पुराणकथा. शाप-वरदानकथा भाकड असतात व सणांचे स्पष्टीकरण देण्यासाठी अथवा जुने माहात्म्य पुसट करण्यासाठी बनवलेल्या असतात हे उघड आहे. मिथके तयार करून इतिहास धुसर केला जातो. वैदिक त्यात किती चतूर होते हे सर्वांना माहितच आहे. मुख्यत्वे या कथेकडे असूर आणि वैदिक संस्कृतीतील संघर्षातुन पहावे लागते. वैदिक साहित्यात पुर्वेकडील व दक्षीणेकडील सर्व प्रदेश असुरांनीच व्यापला असल्याचे म्हटले आहे. (शतपथ ब्राह्मण). कामरुप हे शाक्त तांत्रिकांचे एक पुरातन केंद्रस्थान होते. नरकासूर आणि कामाख्याची एक कथा भ्रष्ट स्वरुपात आजही अवशिष्ट आहे. ती पाहता तो शक्तीभक्त होता यात शंका राहत नाही. त्याला भुदेवीचा पुत्र दाखवून तेवढे स्मरण पुराणकारांनी ठेवले. महाभारत युद्धात नरकासुराचा पुत्र भगदत्त कौरवांच्या बाजुने लढला असे म्हटलेले आहे. पण महाभारत आजच्या रुपात बनले तेच मुळात चवथ्या शतकात आणि हरिवंश लिहिले गेले ते सहाव्या-सातव्या शतकात. महाभारतात जवळपास आशिया खंडातील सर्वच राजे या ना त्या बाजुने सामील झाले होते असे लिहिलेले आहे. ते ऐतिहासिक मानता येत नाही.

कृष्णाचे म्हणावे तर आईच्या बाजुने तोही असुरच होता. पित्याची बाजू स्पष्ट होत नसली तरी तीही असुरच असण्याची शक्यता आहे. बाणासुराच्या राज्यातील असूर कन्यकांशी विवाह करायला यादव गणातील किती तरुण धावले व खुद्ध बाणासुराच्या कन्येशी, उषेशी, कृष्णपुत्र अनिरुद्धाने कसा विवाह केला याचे वर्णन महाभारतातच येते. कृष्णाचे वैदिकीकरण करतांनाही अनेक मिथके जोडली तरी मुळचे वास्तव लपवता आले नाही. बाणासूर महात्मा बळीचा पुत्र मानला जातो व तोही महान शिवभक्त होता. असुरश्रेष्ठांना बदनाम करण्यातील मोहिमेचा भ्रष्ट कथा बनवणे हा एक भाग आहे असे स्पष्टपणे म्हणता येते. थोडक्यात पुराणकथांनी नरकासुराला बदनाम करत मुळचे नरकासुराचे रुप विकृत केले आहे. असे असले तरी त्याच्या नांवाचा विशेष दिवस प्रतिवर्षी साजरा होतो, त्यात खंड पडलेला नाही व त्याच्या स्पष्टीकरणासाठीच मरण्यापुर्वी त्याने तसे वरदानच मागितले होते अशा स्पष्टीकरण कथा बनवल्या गेल्यात हे उघड आहे.

प्रत्यक्षात आसाममध्ये आजही नरकासुराचा सांस्कृतिक जीवनावर मोठा प्रभाव आहे. कामरुपावर सत्ता गाजवणा-या अनेक घराण्यांनी आपला पुर्वज नरकासुरास मानले आहे. गौहत्तीच्या  दक्षीणेकडील एका पर्वतास त्याचे नांव आहे. कामाख्या मंदिराशी नरकासुराच्या अनेक दंतकथा (चांगल्या अर्थाने) निगडित आहेत.

म्हणजे, कधीही झाला असो, असूर शैव संस्कृती प्रबळ असण्याच्या काळात आसाममद्धे नरकासूर होऊन गेला असावा. पुर्वेकडील बालेय देश (म्हणजे बळीवंशाने स्थापन केलेली राज्ये) व त्याहीपलीकडील असुरांचीच राज्ये ही वैदिक धर्माच्या प्रसाराला अडथळा होती. त्याबाबत अनेक तक्रारी शतपथ व ऐतरेय ब्राह्मणात नोंदवलेल्या दिसतात. पण नरकासुराचे नांव या दोन्ही ब्राह्मणांत येत नाही. येते ते उत्तरकालीन साधनांत व विपर्यस्त स्वरुपात. त्याच्या मृत्युशी कृष्णाचा संबंध जोडणे अनैतिहासिक आहे कारण मुळात त्या युद्धाची कथाच दोन वेगवेगळ्या रुपात येते. ती खरी असती तर अशी वेगळी संस्करणे दिसली नसती.

म्हणजेच असले युद्ध काही झाले नाही. नरकासुराला कोणी युद्धात मारले नाही. त्याला कोणी भविष्यातील अवतार घेईपर्यंत निरंकुश राज्य करण्याचे दिर्घायुष्याचे वरदानही दिले नव्हते कि त्याच्या नांवाने कोणता तरी सण लोक साजरा करतील असे विधानही केले नव्हते. कीर्तिवंत नीतिमान असूरश्रेष्ठ म्हणुनच लोकांनी स्वयंस्फुर्तीने त्याला बळीसोबतच त्याचे माहात्म्य दिले. म्हणजे तो पृथ्वीचा सम्राट नव्हता. स्वर्गाचा त्याने पराभव केला म्हणजे वैदिकांचा पराभव केला एवढाच मिथ्थकथेचा अर्थ . त्याचे राज्य कामरुपापर्यंत मर्यादित होते. तो बाणासुराचा समकालीन असू शकतो, पण भाकड पुराणकथांतून तसा ठाम निष्कर्श काढता येत नाही.

दुसरे असे कि व्रतराजामद्ध्ये नरकचतुर्दशी या काम्य व्रताची माहिती येते. हाही अत्यंत उत्तरकालीन व्रते सांगणारा ग्रंथ असला तरी यात नरक चतुर्दशीला नरकासुराच्या नांवाने दिवे लावत, व्रतकर्त्याच्या कुलात जेही कोणी अग्नीत दग्घ होऊन मेले असतील वा जे अदघ्धच राहिले असतील या सर्वांना परगती मिळो अशी प्रार्थना चूड पेटवून करावी असे म्हटले आहे. या व्रताची सांगता शैव ब्राह्मणाला वस्त्रालंकार व भोजन देवून करावी असेही म्हटले आहे. या व्रतात नरकासुराची अन्य कोणतीही कथा सामाविष्ट नाही. पण नरकासुराला धार्मिक महत्वही होते म्हणजे तो दुष्ट होता हा भ्रम जाणीवपूर्वक निर्माण केला गेला होता हे स्पष्ट होते.

नरकासूराचा संबंध "नरक" या पापी मृतात्म्यांना यातना देण-या लोकाच्या नांवाशी जोडला जातो. मुळात "नरक" या शब्दाची संस्कृतात कोणतीही व्युत्पत्ती नाही. यास्काचार्यानेही ती केलेली नाही. हा शब्द मुळचा संस्कृतातील नाही असे स्पष्ट दिसते. तरीही मोठ्या कष्टाने ती शोधण्याचा प्रयत्न अनेक विद्वानांनी केला आहे. Comparative etymological Dictionary of classical Indo-European languages (Rendich Franco) मद्ध्ये "क" म्हणजे प्रकाश. आनंद. उत्साह. (मूळ धातू "काश" धातुपासून अर्धांग का घेतले तर.) नर म्हणजे माणुस व अक हा शब्द लागून नरक...म्हणजे आनंदविहिन माणूस असा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. याचा व नरकाच्या वर्णनाशी काही संबंध नाही हे उघड आहे. खरे तर त्याने नर+क=आनंदी-उत्साही माणुस असा अर्थ का घेतला नाही? कि नरक हा शब्द्च मृत्युशी जोडला गेल्याने नाईलाजाने त्याने तसे केले?

L Renou
यांनी "वैदिक निऋतीतून निर्रया - निर्रका- नारक- नरक असा प्रवास झाला असावा अशी शक्यता वर्तवली आहे. ("Language of the Nirukta" तळटीप -मंत्रीनी प्रसाद) पण ही व्युत्पत्ती निरर्थक अशीच आहे. निऋतीवरून नैऋत्य दिशेचे नांव आले असे म्हटले जाते पण नरकासुराच्या राज्याची दिशा ती नाही. तर या शब्दाची व्युत्पत्ती अनिश्चित असल्याचे "Pali-English Dictionary" (Thomas William Rhys Davids, William Stede) एवतेव नरक हा शब्द मुळचा वैदिक दिसत नाही तसेच त्याचा अर्थही आज घेतला जातो तसाच मुळचा असण्याची शक्यता नाही.

थोडक्यात नरकासूर ही एक ऐतिहासिक, दंतकथा बनलेली पण महान, अशी व्यक्ती असावी. आसाममद्ध्ये राज्य करत असतांनाही देशव्यापी किर्ती त्याने निर्माण केली, इतकी कि आजही आपण देशभर नरकासुराचे स्मरण करतो, भलेही ते वैदिक कलमांमुळे विपर्यस्त स्वरुपात असो! शिव-शक्तीच्या या देशातील पुरातन संस्कृतीने आपले अस्तित्व निरपवाद टिकवले आहे. प्रश्न फक्त त्यांवरील वैदिक पुटे काढण्याचा आहे. आणि यांच्या भोंगळ कथांत एवढ्या विसंगत्या आहेत कि ते सहजशक्यही आहे. नरकासुराच्या पाठोपाठ आपण महात्मा बळीचे पुजन करतो...नववर्ष सुरू करतो ते उगीच नाही. 



थोडक्यात आपण देशभर साजरी करत असलेला दीपावली उत्सव हा मुळचा यक्षरात्री उत्सव आहे...कुबेर आणि त्याचे अनुयायी यक्षांच्या स्वागतासाठीचा, वैभवप्राप्तीच्या प्रार्थनांचा दीपोत्सव आहे. कृषी संस्कृतीचा तोच खरा मुलाधार आहे. असूर संस्कृती व त्याचीच उपसंस्कृती म्हणजे यक्ष संस्कृती हे लक्षात घेतले पाहिजे. यक्ष संस्कृतीचे मूळ स्वरूप समजावून घेऊन यक्ष संस्कृतीचेच आपण दीपोत्सवाच्या निमित्ताने आचरण करत असतो आणि बळी व नरकासुरासारख्या प्रजाहितदक्ष, संस्कृतीरक्षक सम्राटांचेही आपण कृतद्न्यतापूर्वक स्मरण करत असतो हे लक्षात घ्यायला हवे. दीपावली महोत्सवाचा हाच अन्वयार्थ आहे.

 

-संजय सोनवणी


 

No comments:

Post a Comment

शेरशहा सुरी: एक कुशल प्रशासक

  शेरशहा सुरीने हुमायूनचा पराभव केला आणि त्याला भारताबाहेर हाकलले. दिल्लीत आता कोणी शासक उरला नसल्याने शेरशहाने स्वत:ला दिल्लीचा सम्राट घोषि...