Friday, November 10, 2023

कृत्रिम बुद्धीमत्तेची भीती का?

 



सध्या कृत्रिम बुद्धीमत्ता (ए.आय) आणि यंत्रमानव (रोबोटिक्स) तंत्रज्ञानाने जगातील असंख्य लोकांची झोप उडवलेली आहे. उद्याच्या जागातील सामाजिक आणि अर्थजीवनावर याचे काय विपरीत परिणाम होणार आहेत हे सांगू पाहणा-या विचार्वांतांची दाटी सध्या वाढलेली दिसते. दोन नोव्हेंबरला लंडन येथे तर कृत्रिम बुद्धीमत्तेच्या संदर्भात शिखर परिषद झाली व दोन दिवसाच्या चर्चेनंतर ए.आय. मध्ये गंभीर, विनाशक आणि नुकसानदायक अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जाणीवपूर्वक अथवा अजाणतेपणे उपस्थित होऊ शकतात कारण कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानात अशा अपायकारक संभावना आहेत असे घोषित केले गेले. करणा-या या घोषणापत्रावर अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, चीनसारख्या अठ्ठाविस देशांनी सह्या केल्या असून नवीन निर्बंधांना तयार करून लागू करण्याबाबत सहमती दर्शवलेली आहे.
कोणतेही नवे तंत्रज्ञान आले कि त्याच्या दुरुपयोगाबद्दल शंका घेऊन त्याला घाबरून जाणे हे आपल्या जगाला नवे नाही. समाजविघातक प्रवृत्तींची जगात वानवा नाही हे तर एक दुर्दैवी वास्तव आहे. दहशतवादी संघटनाही या तंत्रज्ञानाचा वापर करून विनाशक गोष्टी करवू शकतात. विकृतबुद्धी लोक ए.आय. वापरून बनावट व्हिडिओ बनवून बेमालूमपणे ते खरेच आहेत असे वाटतील या पद्धतीने प्रसारित करून कोणालाही बदनाम करू शकतात. सायबर गुन्हेगारी कृत्रिम बुद्धीमत्तेचा आधार घेऊन आर्थिक ते खाजगी माहितीचा अपहार करू शकतात. आधीहे हे होताच होते पण आता त्याचा वेग वाढेल अशी चिन्हेही दिसू लागलेली आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता खरे तर अजून बाल्यावस्थेत आहे, पण तिच्यात प्रतिक्षणी वेगाने सुधारणा केली जाते आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचे वरील तोटे जरी असले तरी कामाच्या व निर्णयक्षमतेच्या वेगात व अचूक हाताळणीच्या बाबतीत ए. आय. अत्यंत यशस्वी ठरत असल्याने ते बलाढ्य कॉर्पोरेटसाठी फायद्याचे ठरते आहे हेही एक वास्तव आहे.
कोणतेही नवे तंत्रज्ञान आपल्यासोबत काही साईड इफेक्ट्सही आणत असते हा मानव जातीचा अनुभव आहे. जेव्हा माणसाला शेतीचा शोध लागला तेंव्हाही मानवी जीवनात समग्र उलथापालथ झालेली होती. त्याला सामाजिक, सांस्कृतिक, मानसशास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय पैलू होतेच. शेतीमुळे हजारो वर्ष भटकंती करणारा मानव समाज स्थिर होऊ लागला. हे परिवर्तन विलक्षण होते व ते सहजासहजी स्वीकारलेही गेले नाही. शेतीमुळे अतिरिक्त उत्पादनाचे काय करायचे हा प्रश्न जसा उपस्थित झाला व त्यातून व्यापाराचा शोध लावला गेला असला तरी अतिरिक्त शेतीउत्पादन साठवण्याच्या पद्धतीमुळे अनेक नव्या रोगांचा जन्म झाला. या रोगांसाठी प्रतिकारक्षमता विकसित होण्यास अनेक पिढ्या गेल्या, कोट्यावधी लोकांचे मृत्यूही झाले. व्यापारामुळे रोगरायाही दूर दूर पर्यंत पसरवण्यास हातभार लागला. ज्या जनजाती या शेतीप्रधान मानवापासून दूर राहून आदिम जीवन जगत होत्या त्या जेंव्हाही या कृषीमानवाच्या साहचर्यात गेल्या तेंव्हा ते या जीवाणू-विषाणूशी कधी लढलेच नसल्यामुळे त्यांचे मात्र शिरकाण झाले. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका खंडात युरोपियन गेले तेच ही "जैविक अस्त्रे" सोबत घेऊन आणि जरी त्यांची स्वत:ची प्रतिकार शक्ती नैसर्गिक दृष्ट्या तयार झालेली असली तरी तेथील मूळ रहिवाशांचे तसे नव्हते. त्यामुळे एकार्थाने हा वंशसंहारच होता.
म्हणजेच शेतीचे अभिनव तंत्रज्ञान हे सुरुवातीला मानवजातीसाठी वरदान न ठरता शापच ठरले असेही म्हणता येईल. आज जगात लोकसंखेचा भस्मासुर निर्माण झाला आहे तोही शेतीच्या शोधामुळेच आणि अतिरिक्त उत्पादनपद्धतीमुळे असेही म्हणता येईल. पण मानवजातीला शेतीने स्थिर केले, अर्थव्यवस्था ते राजव्यवस्था आणि संस्कृती दिली हेही खरे. लाभ आणि हानीचा ताळेबंद कोणत्याही नव्या तंत्रद्न्यानाबाबत असतोच. तोटा कसा कमी होईल आणि नव्या तंत्रज्ञानाचे अधिकाधिक लाभ कसे मिळवता येतील हे पाहणे मानवजातीचे काम असते हे विसरून चालणार नाही.
पुढेही अनेक नवे शोध लागत नवी तंत्रज्ञाने आली, रुळली आणि कालौघात मागेही फेकली गेली. मनुष्य ज्या गोष्टींना सरावलेला असतो अशाच वैचारिक पर्यावरणात राहणे पसंत करतो. नवे ज्ञान हे जुने परिचित पर्यावरण नष्ट करत असल्याने त्याची भिती वाटणेही स्वाभाविक आहे. नव्या ज्ञानाला जग नेहमीच घाबरते तर चतुर लोक त्याचा आधी फायदा घेऊन प्रगती करतात. जुनी नैतिक मुल्ये व्यर्थ ठरतात, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे ज्ञान सर्व श्रद्धा उखडून फेकायला कारण ठरले असले तरी अनेक शास्त्रद्न्याना छळाला तोंड द्यावे लागले तर अनेक ठार मारले गेले. यंत्रयुगानेही अशाच अनेक आर्थिक आणि नैतिक समस्या उभ्या केल्याच होत्या. संगणक युगाने त्यात अजून भर घातली आणि आता “माणसाचे काय?” हा गंभीर प्रश्न जगभर चर्चेत आला. आणि आता तर कृत्रिम बुद्धीमत्ता आणि रोबोटिक्स माणसाला आव्हान द्यायला उभे ठाकलेले आहेत. जुन्या काळात तंत्रज्ञान येतांना जी भवितव्याच्या साशंकतेची भीती व्यक्त केली जात होती तशीच ती आताही होत आहे. उद्या आताचे बीट सिस्टमचे संगणक जाऊन क्वांटम प्रणालीवर चालणारे संगणक येतील तेंव्हा त्यांच्या अचाट क्षमतेमुले आताचे संगणक बाद होऊन नवी अतिशक्तीशाली प्रणाली येईल तेव्हाही आज होते आहे तशीच चर्चा हिरीरीने केली जाईल. सामाजिक आणि नैतिक प्रश्न उठवले जातील यात शंका नाही.
पण मानवी प्रवृत्ती हीच नवेनवे शोध घेण्याची आहे. त्याचे कुतूहल त्याला स्वस्थ बसू देत नाही. आज आहे त्यापेक्षा नवे, वेगळे आणि अधिक क्षमतेचे कसे निर्माण करायचे हा ध्यास त्याला नैसर्गिकपणे जडलेला आहे. जुनी नीती रद्दबातल ठरवून नवी नीतीमुल्ये जन्माला घालणेही त्यातच आले. नैतिक मूल्यांचा बदलता इतिहास पाहिला तर आपणच थक्क होऊन जाऊ. बरे नवे तंत्रज्ञान येताच राहणार. आता नवीन तंत्रज्ञानाला घाबरायचे कि त्यावर स्वार व्हायचे आणि आपल्याला हव्या त्या इष्ट दिशेला जायचे हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. आज जुने वाटणारे तंत्रज्ञान जेंव्हा आले तेंव्हा ते नवेच होते आणि त्याला घाबरणारेही होतेच. भविष्यातही तेच घडणार आहे.
माणसाला अधिकाधिक प्रगत, प्रगल्भ आणि कल्पक बनवणे हे प्रत्येक नव्या तंत्रद्न्यानाचे उद्दिष्ट असते. मानवी जीवन सुखकर व्हावे व साधी दैनंदिन कामे करण्यात वेळ न घालवता अधिकाधिक सर्जनशील कार्याकडे मानव जातीला कसे वळवता येईल हे पाहणे तंत्रज्ञानाचे ध्येय असते. यात समाजविघातक प्रवृत्तींना आळा कसा घालायचा, त्यासाठी कोणते कायदे करायचे हे शासनव्यवस्थेचे कार्य आहे. अशा प्रवृत्ती जगात नेहमीच अस्तित्वात होत्या व राहतील, म्हणून ज्ञानाची शिखरे पादाक्रांत करू नयेत असे थोडेच आहे?

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...