Wednesday, November 22, 2023

रंग आणि अभिव्यक्तीचे मानसशास्त्र

 रंग आणि अभिव्यक्तीचे मानसशास्त्र

-संजय सोनवणी

 

रंगांचे मानसशास्त्र हे स्वयंभू अथवा उपजत मानसशास्त्र (Innate) आहे. जन्मापूर्वी तो काळोखाच्या म्हणजेच काळ्या रंगाच्या संन्नीद्ध्यात असतो. पण त्याला गर्भरुपात रंगांची जाणीव असते काय हा प्रश्न आहे व तो सोडवण्याचे कोणतेही साधन आपल्याकडे नाही. पण रंगजाणीवा अबोध पातळीवरका होईना (जनुकांत) असण्याची शक्यता आहे असा अंदाज आपण निश्चयाने बांधू शकतो आणि त्याचे कारण म्हणजे जन्मांधावर केले गेलेले प्रयोग. पण गर्भस्थितीत मेंदूत काय प्रक्रिया चाललेल्या असतात याबाबत ठाम विधान करता येणे शक्य नाही, किंबहुना मुल जन्माला येते तेंव्हाच तो भवताली रंगांचा सागर पाहू लागतो. ते रंगांना प्रतीसादही देऊ लागते. जन्मापासूनच रंग-जाणीवा विकसित होत त्या मुलाच्या मानसशास्त्रावर परिणाम घडवायला सुरुवात करतात आणि त्यातून प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र रंग-मानसशास्त्र घडू लागते. कोणत्या प्रकारचे रंग त्याच्या भवताली प्रकर्षाने असतात त्यावर रंगजाणीवा सकारात्मक अथवा नकारात्मक पद्धतीने विकसित होत जातात आणि रंग हे त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनू लागतात. शिवाय तो राहतो तेथील सामाजिक, धार्मिक स्थितीही वेगवेगळ्या रंगांबाबतचे आकलन, व त्यावरील प्रतिक्रिया निश्चित करू लागतात. कोणता रंग साधारणपणे काय प्रतिक्रिया घडवतो याबाबत सर्वसाधारण ढोबळ सिद्धांत असले तरी व्यक्तीसापेक्षतेमुळे त्या सिद्धांतांतही त्रुटी राहून जातात. सार्वकालिक सर्वत्र लागू पडेल असा रंगाच्या मानसशास्त्राबाबत सिद्धांत तयार करता येत नाही तो यामुळेच.

प्राचीन काळापासून प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक भागात रंगांबाबतचे सामाजिक आकलन बदलते राहिले असल्याचे आपल्या लक्षात येईल. असे असले तरी रंगांना मनुष्य आपापल्या स्वभावानुसार व एकंदरीत आकलनात असलेल्या सामाजिक प्रभावांच्या परिणामात आपापल्या पद्धतीने प्रतिसाद देत असतो. भगवा, नीळा, हिरवा असे काही रंग धार्मीक परिप्रेक्षात पाहिले जात असल्याने त्या रंगांचीही आवड-निवड त्या त्या धर्माच्या लोकांप्रमाणे ठरत जाते. यात पुन्हा भौगोलिक स्थानपरत्वे बदलती प्रादेशिक सामुहिक मानसिकता व तेथील पर्यावरणाचाही मोठा सहभाग असतो. यामुळे उपजत रंगजाणीवा बाह्य प्रभावात विकसित होत राहतात आणि व्यक्तिगत मानसशास्त्राच्या परिप्रेक्षात व्यक्ती रंगांचा अर्थ लावत असतात. रंगांचे मानसशास्त्र असे विकसित होत जाते. इतके कि ते व्यक्तीच्या एकूण “स्व” चे प्रारूप घडवत नेते. व्यक्तीच्या मानसशास्त्राचा व वर्तनशास्त्राचा ते एक भाग बनून जाते. अगदी मानसिक उपचार पद्धतीत कलर थेरपीचाही उपयोग केला जातो. याचे इजिप्त आणि चीनमध्ये प्राचीन उदाहरण इसपू दोन हजारपासून मिळते. पण त्यात कितपत शास्त्रीय दृष्टीकोन होता याबाबत शंका आहे. पण विसाव्या शतकातील मानसशास्त्रद्न्य कार्ल जुंग याने शास्त्रशुद्ध पद्धतीने रंग आणि त्यांचा अर्थ याचा शास्त्रीय अभ्यास सुरु केला. किंबहुना रंग-मानसशास्त्राचा पायाच जुंगने घातला असे म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही.

कलानिर्मिती हा “स्व” चाच एक विस्तारित भाग असल्याने अन्य घटकाप्रमाणे रंगही उघडपणे नसले तरी  अबोध पातळीवर सोबत वावरतच असतात. किंबहुना मानवी मनोविश्व हे रंगांनीच व्यापले असल्याचे आपल्याला दिसेल. कलानिर्मिती हा मानसिक प्रकटीकरणाचा भाग असल्याने कलाकृती म्हणजे मानसिक रंगांचे प्रकटीकरण अशी कलेची व्याख्या करता येईल इतका रंग आणि सृजनशक्ती यांचे जवळचे नाते आहे.

चित्रकराला रंग हेच माध्यम असल्याने त्याची रंग जाणीव ही रंगांच्या मूर्त स्वरूपात सामोरे येते. तरीही त्याने आपल्या चित्रासाठी केलेल्या रंगनिवडीवरून आपण चित्रकाराचे मानसशास्त्रही समजू शकतो. किंबहुना रंग हेच चित्रकाराच्या भावना दृश्य स्वरूपात येण्याचे साधन बनून जाते. येथे सरळ सरळ रंगांचा व रगांतून अभिव्यक्तीचा संबंध असल्याने चित्रकाराची कला ही रंगांखेरीज होणे शक्य नाही. चित्र पाहणारे त्या रंगातून काय बोध घेतील वा प्रतिक्रिया देतील हे त्या त्या दर्शकाचे मानसशास्त्र ठरवत असल्याने कलाकृती आवडणे-न आवडणे वा काहीच प्रतिक्रिया नाही असे तटस्थ प्रकार पडू शकतील. पण येथेही मानसशास्त्राची एक गम्मत आहे. समजा एखादी कलाकृती आधीच गाजवलेली असेल तर दर्शकही त्या कलाकृतीचा अआस्वाद “स्व” परिप्रेक्षात न घेता बाह्य प्रभावात घेत जातात. रंगसंगतीचे व चित्राचे आकलन बाह्य प्रभावाखाली होत जाते. अगदी नाटक-चित्रपट आणि कादंब-या याबाबतही अनेकदा बाह्य प्रभाव व्यक्तीचे मानसंशास्त्र व्यापून टाकतात. तेंव्हा त्यांचे आकलन कितपत वस्तुनिष्ठ असेल हे सांगता येणे शक्य नाही.

सहसा चित्रकार हे चित्रकलेत शिक्षित असतात. चित्रकला शिकवली जात असता रंगांबाबतचे “शास्त्रीय” आकलनही त्यांना शिकवले जात असते तसेच रंगांबाबतचे संकेतही शिकवले जात असतात. कोणत्या रंगासोबत कोणता रंग जाऊ शकतो आणि कोणता नाही याबाबतची षिद्धे-निषिद्धेही त्या शिक्षणात सामील असतात. मग चित्र काढतांना रंगांची निवड करताना या अशा निषिद्धांचाही प्रभाव असल्याने स्व-अभिव्यक्ती मर्यादित होऊन जाते. अन्य शाखांत शिक्षण घेणा-यांचेही रंगांचे आकलन शिक्षणक्रमात येणा-या माहितीप्रमाणे होत जाते. मेडिकलच्या विद्यार्थाचे रंगांबाबतचे आकलन आणि अभिव्यक्ती जशी बनत जाते ती तशीच इंजिनिअरिंग च्या विद्यार्थाची बनते असे सहसा दिसत नाही. थोडक्यात शिक्षणव्यवस्थाही रंगांबाबतचे दृष्टीकोन नियंत्रित करत जातात हे आपल्या लक्षात येईल.

पण हे झाले चित्रकाराचे. लेखक-कवी (पटकथा लिहिणारेही यात आले.) मात्र रंगांचा वापर करत नाहीत असे मानले जाते. लेखन हा बव्हंशी काळा-पांढरा असा दुरंगी खेळ असतो. पूर्वी अनेक लेखक लिहितांना मूड जमवायला वेगवेगल्या रंगांच्या शाईच्या पेनांचा वापर करायचे. पण ही रंगनिवड ते लिहित असलेल्या प्रसंगातील भावना दर्शवतील असे असायचे कि त्यांना त्या क्षणी कोणत्या रंगात लिहिणे आवडायचे व त्यावरून ते लेखणीच्या शाइचा रंग ठरवायचे याबाबत काही सांगता येणे शक्य नाही. कारण मुळात याबाबत त्या त्या लेखकांनी वेगळे स्वतंत्र टिपण लिहिले आहे असे मला तरी आढळलेले नाही. आता तर बहुतेक लेखक संगणकावर टायपत असल्याने जरी रंग बदलणे/वापरणे सोयीचे असले तरी तसे प्रयोग कोणी करत नाही. याचे कारण लेखकाची अभिव्यक्तीची साधनेच वेगळी आहेत. आपल्या लेखनात अगदी कपडे, भिंती-इमारतींचे रंग, आकाश-समुद्र ते सर्व निसर्ग याची वर्णनेही तो करतो ती काळ्या रंगात. ही वर्णने वाचून वाचकाच्या मनात त्या त्या रंगांचे चित्र उमटत जाते पण त्या रंगाच्या छटा ज्याही मनात येतात त्या व्यक्तीपरत्वे बदलत जातात. शिवाय लेखकाला अशा रंग निवडीतून स्वत:चा असा काही संदेश द्यायचा असतो कि तो ज्या स्थितीचे वर्णन करतो व त्या स्थितीत सहसा जे रंग वापरले जातात त्यांचाच उल्लेख करतो हे वाचकाला माहीतच असेल असेही नाही.

तरीही काही लेखक आपल्या कथनाला ठाशीवपणा यावा, जे लिहितोय ते दृश्य अथवा घटना जास्त जळजळीत प्रखरपणे वाचकांपर्यंत जावी यासाठी आपल्या कथनात रंगांचा अत्यंत कलात्मक उपयोग करत असतात. नीळा-करडा समुद्र, रक्ताळलेला वाटेल असा लालभडक समुद्र, उदास –म्लान हेलकावता काळोखी समुद्र, निळ्या विशाल पंख्यांसारखे आभाळ, इत्यादी पद्धतीने लेखक रंगांचा वापर विविध भावनांच्या दर्शनासाठी करत असतात. “फुलपाखरी” आयुष्य, लाल होणा-या कानाच्या पाळ्या, गुलाबी गाल, लाल-रसरशीत ओठ या तर वापरून अक्षरश: चोथा झालेल्या रंगउपमा तर अनेकदा अनुकरणातून आलेल्या दिसतात. त्यातून लेखकाला आपल्या पात्राची खरेच भावस्थिती दर्शवायची असते असे नाही. याला आपण रंगांचे साहित्यिक संकेत म्हणू शकतो. अशा संकेतांत तोचतोच पणा आला कि तेही कंटाळवाणे वाटत जाऊन वाचकाची रसहानी होण्याचाच संभव अधिक असतो. पण प्रतिभाशाली लेखक मात्र रंगांचा उपयोग आपला आशय वाचकापर्यंत पोहोचावण्यासाठी अत्यंत समर्थपणे करतात. त्यासाठी जी. ए. कुलकर्णी यांच्या “विदुषक” कथेतील शेवटचा उतारा वानगीदाखल देण्याचा मोह आवरत नाही.

“.....ती ऐकताच वटीकेजवळील अरुंद पथमार्गावरून अंगावर कृष्णवर्णाचे उत्तरीय वस्त्र घेतलेली एक युवती धावत आली. डोंबाजवळ येताच तिने अर्ध अंगावरील आवरण बाजूला केले व ती त्याला भिडली. त्वरित गतीने आल्यामुळेतिच्या तारुण्यरेषा कंपित होत होत्या. तिच्या वक्ष:स्थलावर जणू वासना तप्त झाल्याप्रमाणे भासणारा रक्तमणी होता आणि जणू त्याची दाहकता क्षणभरच सुसह्य असल्याप्रमाणे प्रकाशकण त्यास स्पर्श करताच परावर्तीत होत होते. ध्रुवशिला जवळ येताच डोंबाने तिला आपल्या सावळ्या हातांनी वेटाळले.

      “आणि मग ती दोघे वृक्षांच्या निबिड हिरव्या अंधारात विरून गेली !”

खरा लेखक/कवी हा एक महान चित्रकारच असतो. त्याची लेखनात केलेल्या रंगांची निवड ही एकूण भावनाप्रवाहाला तीव्र करत नेते आणि वाचकांच्या मनावर एक वेगळाच भावनिक “रंग” परिणाम घडवून आणते. बरेचसे लेखक रंगांचा उपयोग केवळ करायचा म्हणून करतात त्यांना असे उत्कट दृश्य उभे करता येत नाही. ते तेथेच असफल ठरतात. कारण लेखक हा केवळ स्वत:साठी लिहित नसतो तर अदृश्य असला तरी कोणी वाचक असतोच ज्याला तो आपली कथा सांगत असतो.

आणि समजा त्याने रंगांचे वर्णन अथवा अस्फुट उल्लेख आपल्या अभिव्यक्तीला ठसठशीत करण्यासाठी जरी केले नाही तरी त्याच्या शब्दांचा समुच्चय आणि मांडणी हेच एक आपोआप रंगाने न काढलेले शब्दचित्र बनून जाते आणि वाचकासाठी ते त्याच्या मन:चक्षुसमोर साकारत जाते.  विविध भावनांच्या अमूर्त रंगछटा त्याला दिसू लागतात. त्या रंगछटांच्या एकूण मिश्रणातून ती कलाकृती साकार होत जाते. पण त्या रंगात विसंगती असेल, तारतम्य नसेल तर कलाकृती हवा तो परिणाम साध्य करू शकणार नाही. अर्थात यामागे वाचकाचेही रंग-मानसशास्त्र कार्य करत असते. अप्रिय रंगसंगती निर्माण होत असतील तर तो त्या साहित्याला हातही लावत नाही किंवा अर्धवट वाचून सोडून देतो. कारण रंगाबाबतच्या त्याच्याही जाणीवा विकसित झालेल्या असतात. आणि त्या लेखकाच्या मानस-जाणीवाशी त्या मेळ खातातच असे नाही. पण रंग कोणत्या ना कोणत्या प्रकारे मानवी मानसशास्त्राशी अटळपणे जोडलेले असतात.

पण हे झाले लेखनात येणा-या रंगांच्या उल्लेखांबद्दल. पण लिहायला सुचते कसे आणि लेखक आपली पात्रे-घटना नेमक्या कोणत्या रंगात पाहतात हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. यापेक्षाही महत्वाचा प्रश्न म्हणजे लेखक आधी घटना कल्पितो कि आधी त्याला अस्फुटपणे रंगातच कथा दिसू लागते? रंग हे जर विविध भावनांचे प्रतीक असतील आणि रंगसमुच्चयातून जर कृती आधी दिसत असेल आणि नंतर तिचे सुटे आकलन करून त्या छटा शब्दांच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न म्हणजे कलाकृती असा अर्थ असेल तर?

कलाकृती सुचते तो क्षण येथे महत्वाचा आहे. हा क्षण अत्यंत धूसर असतो. पण ही धूसरता काही रंग घेऊन असते. ते रंग भावनिक मिश्रणातून उद्रेकलेले असल्याने त्यांना तसे वेगवेगळे स्वतंत्र अस्तित्व नसले तरी त्यात एक सुसंगती असते. अजून काहीच स्पष्ट नसते आणि तरीही संभावना जागृत झालेल्या असतात. हे रंग बाह्य जगात उपलब्ध असलेल्या छटांचेच असतील असे नाही. ते अमूर्त पातळीवर सतत मनात घोंघावणा-या आणि बाह्य जगात अस्तित्वात नसलेल्या रंगांचे वर्णन न करता येण्यासारखे पण त्याला जाणवणारे रंग असू शकतात. हे रंग कधीकधी अचानकपणे कोणत्यातरी मानसिक प्रेरणेने काहे छटा घेऊन उसळतात आणी कल्पनेचे बीज निर्माण करून जातात. रंग प्रतीके असतात कारण रंगांशी मानवाने बालपणापासून मानसिक नाते जुळलेले असते आणि तरीही जगात दिसणा-या कृत्रिम किंवा नैसर्गिक रंगांपेक्षा प्रत्येकाचे रंगाबाबतचे आकलन भिन्न असू शकते. पिवळा रंग प्रत्येकाला वेगळ्या अर्थाने पिवळा दिसू शकतो. तसेच प्रत्येक रंगाचे आहे. आणि अमूर्त रंग तर व्यक्त करण्यापारचे  त्यामुळे त्या रंगांचे वर्णन करता येणे अशक्यप्राय असले तरी मुळ कल्पना रंगातच सुचतात आणि नंतर त्या कधीतरी घेतल्या तरच शब्दरूप घेत उलगडत जातात. आणि हा माझाही अनुभव आहे. मला कादंबरी किंवा कविता सुचते तेंव्हा मनात फक्त विशिष्ट पण वर्णन न करता येईल अशा रंगांच्या लाटा उमदळू लागतात. तेही रंग अमूर्त भावनांचे आविष्कार असतात. “...आणि पानिपत” कादम्बरी सुचली ती कसल्यातरी करड्या-निळ्या मळकट धुरकट  रंगांच्या लाटा आणि त्यावर नृत्य करणा-या चार मानवी काळ्याकुट्ट सावल्यांच्या रुपात. त्याचा अन्वयार्थ लागणे तसे इतरांना शक्य नाही पण ज्याला अशी रंगीत दृश्ये दिसतात त्या लेखकाला तो अर्थ लागतो. तसाच मलाही लागला. स्वच्छ निळ्या प्रकाशाच्या समुद्रात पहुडलेली मोरपंखी मूर्ती मला अर्धवट दिसली तीच “शून्य महाभारत”ची सुचताक्षणीची बीजरुपी कल्पना. आणि हा नीला रंग म्हणजे बाह्य जगात मी कधीही न पाहिलेल्या छटेचा. मला तरी कल्पना रंगात सुचतात. कल्पना रंगमय असतात कारण रंग हे माणसाच्या अभिव्यक्तीचे मुळचे, आदिम म्हणता येईल असे साधन राहिलेले आहे. जेंव्हा लिहिण्याची कलाही आली नव्हती किंवा भाषाही तयार व्हायला सुरुवात व्हायची होती त्या काळात माणसाने निसर्गातूनच उपलब्ध झालेल्या रंगातून आपापली आद्य अभिव्यक्ती केली. अगदी मृतांनाही रंगवायची प्रथा काही आदिमानव समुदायांत होती असे पुरातत्वावरून दिसते. रंगांमध्ये आध्यात्मिक अर्थ शोधण्याचे प्रयत्न होत असतात कारण रंग आणि मानवी सुप्त अथवा अबोध मानसिकता रंगांशी सम्बब्ध असावी असे वाटणा-या लोकांचीही कमतरता नाही हे आपण सहज पाहू शकतो.

रंगांच्या उत्पत्तीबद्दल भौतिक सिद्धांत असले तरी रंग आणि मानवाच्या त्या त्या रंगाच्या दर्शनाने निर्माण होणा-या भावना हा मानसशास्त्राचा अभ्यासाचा विषय आहे. रंगांना मानवी मन प्रतिसाद देते या अनुभवाने अगदी मार्केटिंगमध्येही रंग आणि उत्पादनाला मिळू शकणारा प्रतिसाद यावरही धमासान चर्चा होत असतात. कोणत्या वेष्टनाचे उत्पादन ग्राहकाला आकर्षित करून घेईल याबाबत काही संकेत बनलेले आहेत. कोणता रंग कोणत्या भावना उद्दीपित करू शकेल यानुसार कलर थेरपीही निश्चित केली जाते. कोणत्या प्रकारची रंगसंगती कोणत्या भावनेचे निर्माण करेल यावर विचार करून दृश्यातील रंग ठरवून त्यानुसार अगदी चित्रपटातील दृश्येही चित्रित केली जातात. पण हे झाले बाह्य दृश्य रंगांबाबत. पण कल्पनाही आधी रंगात सुचाव्यात एवढे रंग आपल्या मानसिकतेत घट्ट रुजले असावेत हे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही कारण मनुष्य जन्मापासून अनंत नैसर्गिक रंगांच्या साहचर्यात जगत असतो. मग ते रंग सभोव्तालातील असतील अथवा पार अनंत तारकाविश्वाचे. प्रत्येकाच्या मानसिकतेनुसार अथवा ग्रहणशक्तीनुसार प्रत्येकावर निर्माण होणारा प्रतिसाद वेगळा असू शकतो, पण प्रतिसादच नाही असे होत नाही.

जन्मांधाना रंग समजत नाहीत कारण त्यांनी ते पाहिलेलेच नसतात असा जागतिक समज तत्वद्न्य जॉन लॉक याने सर्वप्रथम प्रश्नांकित केला आणि नवी संशोधनाचे द्वार उघडले. आणि आता शास्त्रद्न्याचे नवे संशोधन सांगते की जन्मांध व्यक्तीने रंग पाहिले नसले तरी त्यांच्या रंगजाणीवा आणि दृष्टी असणा-यांच्या रंगजाणीवा अगदी समान असतात. जॉन हॉपकिंस विद्यापीठाने जन्मांध आणि डोळस व्यक्तींवर प्रयोग करून हा निष्कर्ष काढला आहे. म्हणजेच रंग कधीच पाहिला नसला तरी रंगांबाबतच्या जाणीवा सर्वाच्या जवळपास समान असतात, पण आकलन व अभिव्यक्ती मात्र व्यक्तीच्या मानसिकतेनुसार वेगळ्या असू शकतात. जन्मांधाला ही रंगजाणीव कोठून येते? त्याने तर रंग पाहिलेलेच नाहीत. याचा अर्थ मानवी मनात (किंवा मेंदूत) रंगविषयक भावना उद्दीपित करणारे एखादे केंद्रक असले पाहिजे जे बाह्य जगातील रंग पाहता आले नाही तरी एखाद्या कलाकाराला कल्पना आधी आकलनात न येणा-या रंगातच दिसते त्याप्रमाणे जन्मांधालाही मनातल्या मनात रंग दिसत असू शकत असतील. हे रंग काल्पनिक कि बाह्य जगातल्यासारखे हे सांगण्याची सोय मात्र आपल्याला नाही कारण आधीच म्हटल्याप्रमाणे डोळस माणसांचेही एकाच रंगाबाबतचे आकलन भिन्न असू शकते तर मग जन्मांधांचेही तसेच होत असणार. पण त्यांची जगाबाबतची कल्पना फक्त “काळ्या” रंगात असेल असे समजण्याचे मात्र काहीएक कारण नाही.

रंगांना सांकेतिक अर्थ देण्याचा प्रयत्न हा मानवी प्रतिभेला आकुंचित करणारा प्रकार आहे हे मात्र येथे आग्रहाने नमूद केले पाहिजे. त्यामुळे रंग हे त्या त्या सांकेतीकतेच्या बेडीत अडकून बसतात आणि नव्या अभिव्यक्तीचे मार्गही मर्यादित होत जातात. या सांकेतिकता धुडकावून लावणारे आणि बंडखोरी करत आपली अभिव्यक्ती करणारे व्हान गॉगसारखे काही चित्रकार आज जगात लोकप्रिय आहेत. याचे कारण पाहणाराही आपण दिलेल्या रूढ सांकेतीक्तेनेच कलाकृतीकडे पाहिलं असा काही नियम नाही. सांकेतिकता ही सामुदायिक मानसिकता स्वीकारेलच असेही नाही. रंगजाणीवा सर्वांत असल्या तरी प्रत्येकाचे रंगविश्व वेगळ्या अर्थाने समृद्ध असते. पण धार्मिक अथवा सामाजिक प्रवादांमुळे काही रंग प्रिय तर काही अप्रिय बनून जात असतील तर तो रंगांवर केलेला अन्याय तर आहेच पण स्व-मानसिकतेशी केलेला द्रोहही आहे.

कला या रंगांतच कल्पिल्या जात असल्यामुळे आणि जे अभिव्यक्त होते त्याचा पटही वाचक अथवा दर्शकासमोर रंगमय अवस्थेत अभिव्यक्त होत असल्याने मानवी मानसिकता हीच मुळात रंग या संज्ञेशी चिरंतनपणे जुळलेली आहे असे म्हणावे लागते. त्यासाठी रंगस्वातंत्र्यही असणे, त्यावर कोणत्याही बाह्य कल्पना न लादत त्यांना संकुचित न करणेही तेवढेच महत्वाचे आहे.

 -संजय सोनवणी

(शब्दोत्सव दिवाळी अंकात प्रकाशित. २०२३)


 

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...