Thursday, November 23, 2023

सातवाहन ते यादव

सातवाहन ते यादव...सुवर्णाक्षरात लिहावा असा इतिहास!

-संजय सोनवणी

 महाराष्ट्र हा भारत देशाचे मध्यवर्ती राज्य आहे. किंबहुना दक्षिण आणि उत्तरेच्या संस्कृतीचा मध्यबिंदू आहे. असे असले तरी महाराष्ट्राची संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण असून तिचा स्वतंत्र आविष्कार दिसून येतो. महाराष्ट्रातील पौराणिक काळ आणि ऐतिहासिक काळ हे दोन स्वतंत्र टप्पे आहेत. महाराष्ट्राचा पौराणिक इतिहास रामायण-महाभारतापासून सुरु होत नाहे तर विठ्ठल, खंडोबा, ज्योतिबा, बिरोबा, मायाक्का या दैवतप्रतिष्ठा लाभलेल्या पुरातन ऐतिहासिक व्यक्तीपासून सुरु होतो. नंतरच्या काळात या पौराणिक इतिहासावर उत्तरेतील पुराणकथांनी अतिक्रमण करून त्यांना विष्णू, कृष्ण, इंद्र इत्यादी. देवतांशी संबंध जुळवत सांस्कृतिक आक्रमणाचा प्रयत्न केला असला तरी त्यांचे पृथकत्व लपवता आलेले नाही. उत्खानीत प्रागइतिहासानेही ते सिद्ध केलेले आहे.

 

दायमाबाद, जोर्वे, इनामगाव इत्यादी ठिकाणी झालेल्या उत्खनानांतून हे स्पष्ट होते कि मानवी वसाहतीचा कालखंड प्राचीन असून सिंधूकालीन संस्कृतीशी समांतरपणे जात आहे. ताम्रपाषाण युगाच्या अस्ताच्या काळात (सनपूर्व १२००) महाराष्ट्रात शुष्क हवामानाचा काळ सुरू झाला. पर्जन्यमान खूप घटले. आद्य शेतक-यांच्या ज्याही काही थोडक्या वसाहती होत्या त्याही निर्मनुष्य झाल्या. तरीही शेळ्या-मेंढ्या घेऊन निमभटके मेंढपाळ (धनगर) महाराष्ट्रात तग धरून राहिले. इसपू आठव्या शतकाच्या आसपास महाराष्ट्रात महापाषाणयूग अवतरले. या काळाचे सर्व पुरावे मध्य भारत व दक्षीण भारतात मोठ्या प्रमानावर मिळून आलेले आहेत. खानदेश, विदर्भ व मराठवाड्यांतील पुरावे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या काळाला महापाषाणयुग म्हणण्याचे कारण म्हणजे या लोकांनी बांधलेली थडग्याभोवतीची मोठ्या शिळांची वर्तुळे. ही विशिष्ट प्रकारची दफनपद्धती होती. यात प्रेतास अथवा त्याच्या अस्थिंना खड्ड्यात पुरले जाई व सोबत अनेक मातीच्या भांड्यांतून मृतासाठी अन्नपाणी ठेवले जाई.  याखेरीज कु-हाडी, तलवारी, भाले, घोड्यांचे अलंकारही पुरले जात व थडग्याभोवती शिळांची वर्तुळाकार रचना करण्यात येई.

या शिलावर्तुळांच्या आसपास या लोकांच्या काही तात्पुरत्या वसाहतीही सापडलेल्या आहेत. नायकुंड येथे गोल झोपड्यांचे अवशेष मिळाले असून त्यामुळे महापाषाणयुगातील लोक गोल झोपड्यांमध्ये राहत असावेत असे मत अजय मित्र शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.. झोपडीच्या आतल्या बाजुस दोन मोठे खड्डे सापडले असून त्यात शेळ्या-मेंढ्या, हरिणांची अर्धवट जळकी हाडे सापडलेली आहेत. मानववंश शास्त्रज्ञांच्या मते स्थिर लोकांची प्रवृत्ती ही आयताकृती घरे बांधण्याची असते तर अस्थिर-निमभटके लोक गोलाकार घरे बांधतात असे डा. म. के. ढवळीकर यांनी नोंदवलेले आहे. (महाराष्ट्र राज्य ग्यझेटियर; इतिहास-प्राचीन काळ, खंड १, पान १००) शेळ्या-मेंढ्यांचे अवशेष आणि निमभटक्या लोकांना साजेशा गोलाकार झोपड्या सापडणे, घोड्यांचीही दफने सापडने यावरुन हे सिद्ध होईल कि सनपुर्व आठव्या शतकापासून महाराष्ट्रात धनगरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर होते तर स्थिर वसत्यांचे प्रमाण नगण्य होत गेले होते. ढवळीकर म्हणतात, "महापाषाणयुगीन लोक फक्त पावसाळ्यापुरते एका ठिकाणी वसती करुन राहत. उरलेल्या आठ महिन्यात मात्र भटके जीवन जगत असावेत. कारण उदरनिर्वाहासठी ते पशुपालन व मेंढपालनावर अवलंबून होते."

यावरुन हे स्पष्ट होते कि महाराष्ट्र तसेच आंध्र या काळात निमभटक्या मेंढपाळांनी व्यापलेला होता. नागर संस्कृतीने पुन्हा बस्तान बस्तान बसवायला सनपुर्व पाचशेपर्यंत वेळ घेतला असला तरी प्राबल्य हे मेंढपाळांचेच होते. त्यामुळे स्थानिक सत्ताही त्यांच्याच असणे स्वाभाविक आहे. दफनांची ही वैशिष्ट्यपुर्ण संस्कृती त्यांनी प्राकृतिक उत्पातामुळे केली असली तरी ती नंतर त्यांनी सोडून दिली. पाषाणदैवते मात्र कायम राहिली.

 

सातवाहन

 

सातवाहनांच्या उद्यापूर्वी महाराष्ट्र हा राजकीय दृष्ट्या अनेक प्रादेशिक तुकड्यात वाटला गेलेला होता. असिक, मल्ल,अशी अनेक छोटीमोठी राज्ये होती. त्यांचा राजकीय इतिहास दुर्दैवाने उपलब्ध नाही. तो मिळतो तो सातवाहन घराण्याच्या उद्यापासून. आताच्या महाराष्ट्रात उदयाला आलेले परंतु उत्तरेत गुजरात, मध्यप्रदेश ते खाली दक्षीणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले, ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवीपुर्व २३० मद्धे हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. छीमुक  (किंवा सिंधुक) सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. त्यापुर्वी ते काण्व राजांचे महाराष्ट्रातील मांडलिक असावेत असे पुराणे सुचवतात. डा. अजय मित्र शात्री यांच्या मते ते मौर्य अथवा काण्व घराण्याचे महाराष्ट्रातील राज्यपालही असू शकतील पण तसा सिद्ध करणारा अन्य पुरावा उपलब्ध नाही. हे घराणे स्वतंत्ररीत्या तत्कालीन राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत उदयाला आले असे म्हणावे लागते.  ही सत्ता साडेचारशे वर्ष टिकली. भारतात एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे ऐतिहासिक घराणे झाले नाही. मध्य आणि दक्षीण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला. महाराष्ट्राची आजच्या संस्कृतीचा पाया सातवाहनांनी घातला असे म्हटले तर अतिशयोक्ति होणार नाही.

कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना "आंध्र" असे म्हटले आहे. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पौंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक वैदिकेतर वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना पौंड्रांसमवेत असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार लक्षात यावा. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा "आंदर मावळ" शब्दही हे स्थान आंध्र लोकांनी व्यापले असल्याचे दर्शवते. आंदरा हे नदीचे नावही त्यातूनच उत्पन्न झाले असे दिसते. या मूळ आंदर शब्दाचा औंड्र हा संस्कृत अपभ्रंश  अपभ्रंश असावा असे म्हटले तरी वावगे होणार नाही.

आंध्रांच्या अनेक शाखा होत्या. काही ओडिसात, काही आंध्रात तर काही महाराष्ट्रात प्राचीन काळापासून वसल्या असाव्यात. आंध्र नांवामुळे सातवाहन कुळ हे मुळातील आंध्र प्रदेशातील असावे असा बहुतेक विद्वानांचा समज होता. पण पुराणांनी त्यांचा उल्लेख आंध्र जसा केलाय तसाच "आंध्र जातीय" असाही केला आहे. आंध्र जातीय म्हणजे आंध्र कुलीय, त्या प्रदेशातीलच मुळचा असा नव्हे असा तर्क काही विद्वानांनी दिला आहे. आणि असे असले तरी आपल्या प्रतिपादनात प्रत्यवाय येण्याचे कारण नाही कारण आंध्र प्रदेशही औंड्र समाजानेच शासित केलेला प्रदेश असल्याने व ओरिसातही त्यांचे वास्तव्य असल्याने एखादी शाखा प्राचीन काळीच महाराष्ट्रातही वसली असल्यास आश्चर्य नाही. जुन्नर ही सातवाहनाची पहिली राजधानी. हे वास्तवही ते मुळचे आंदर मावळातील रहिवासी असावेत हे दर्शवते.



सातवाहन नांव

सातवाहन हे नांव कसे व कोठून आले याबाबत विद्वानांनी खूप वाद घातला आहे. सातवाहन हे घराणे नंतर सातकर्णी नांवानेही ओळखले जाऊ लागले. शिलालेखांत या वंशाचे नांव सादवाहन, सदकनी असेही आले असे असून संस्कृत ग्रंथांत सातवाहन, सातकर्णी, शातवाहन असेही आले असले तरी या नांवाची व्युत्पत्ती काय हे मात्र कोडेच आहे असे डा. अजयमित्र शास्त्री म्हणतात. वाहने वाटतो म्हणून सातवाहन असे जसे म्हटले जाते तसे जे. प्रिझलुक्सी यांच्या मताप्रमाणे "सादम" या मुंड भाषेतील शब्दावरुन हा शब्द आला आहे व त्याचा अर्थ घोडा असा होतो. अशा अनेक व्युत्पत्त्या शोधायचा प्रयत्न राजवाडेंपासून के. गोपालाचारींनी केला असला तरी या नांवाची उत्पत्ती लागलेली नाही. कारण सर्व विद्वानांनी संस्कृतात या शब्दाचा अर्थ शोधायचा प्रयत्न केला आहे. इसवीसनापुर्वी मुळात संस्कृत भाषाच तयार झालेली नव्हती तर संस्कृतात त्याची उत्पत्ती सापडेल कशी? (पहा- भाषेचं मूळ-संजय सोनवणी) वा. वि. मिराशी म्हणतात कि, सातवाहन हेच मुळचे नांव असून त्याची व्युत्पत्ती काहीही असो. या वंशनामाच्या इतर व्युत्पत्त्या काल्पनिक आहेत. (सातवाहन आणि पश्चिमी छत्रप- ले. वा.वी. मिराशी)

 
सातवाहन या शब्दाचे मूळ आपल्याला प्राकृतातच व जसे आहे तसेच स्विकारावे लागते. सदकणीचे कृत्रीम रूप संस्कृतात सातकर्नी करुन "सात कानांचा” असा अर्थही कसा चुकीचा होतो असे विद्वानांनीच मान्य केले आहे.  थोडक्यात सातवाहन या नांवाचा (जसा महाराष्ट्रातील अनेक आडनांवांचा आज अर्थ लागत नाही.) अर्थ शोधत बसणे निरर्थक आहे.

 

सिंधुक सातवाहन (किंवा छिमुक सातवाहन) हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. त्याने आपली सत्ता तेलंगणापर्यंत पोहोचवली असे दिसते कारण त्याचे बनेक नाणी त्या भागत मिळालेली आहेत. अजय मित्र शास्त्री व वा. वि. मिराशीं यांनी सातवाहनांना चक्क ब्राह्मण ठरवायचा प्रयत्न केला आहे. त्याचेही निराकरण येथे करणे गरजेचे आहे.

नाशिकच्या वासिष्टीपुत्र पुलुमावि याच्या शिलालेखात "एकबम्हण" आणि "खतियदपमानमदन" या शब्दांचा त्यांनी "गौतमीपुत्र सातकर्णी हा अनुपम अथवा अद्वितीय ब्राह्मण होता व त्याने क्षत्रियांचा गर्व व अभिमानाचे दमन केले होते." असा घेतला आहे. मिराशींनीही हाच कित्ता गिरवला आहे. सातवाहन ब्राह्मण असते तरी आम्हाला त्यावर आक्षेप नव्हता, पण जे नाही ते कसे स्विकारले जाणार? पहिली बाब ही लक्षात घेतली पाहिजे कि पुराणे सातवाहनांना स्पष्टपणे शूद्र (वैदिकेतर) म्हणतात. एवढे मोठे ब्राह्मण राजघराणे असते तर पुराणांनी त्यांना शूद्र म्हणण्याचे धाडस केले नसते. उलट महाकाव्ये लिहिली असती. दुसरी बाब म्हणजे "औंड्र" (आंध्र) हे शुद्रच आहेत असे ऐतरेय ब्राह्मणानेही म्हटलेले आहे. महाभारतात त्यांना बळीराजाचे पुत्र म्हणजेच असूर म्हटले आहे. आरंभीच्या सातवाहनांचा नागवंशीयांशी रक्तसंबंध होता हे तिसरा सातवाहन राजा याच्या राणीच्या "नायनिका" (नागनिका) या नांवावरुनही स्पष्ट होते. एवढे सारे असतांना "एकबम्हण" या एकाच ठिकाणी येणा-या एकाच शब्दावरून त्यांना ब्राह्मण ठरवायचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. .

सातवाहन जर वैदिक असते तर सातवाहन या शब्दाचा वैदिक अर्थ लागला असता, पण तो तसा लागत नाही हे आपण पाहिले. ते वैदिक असते तर शिलालेखात त्यांच्या गोत्राचा उल्लेख अवश्य आलाच असता, पण तो तसा कोठेही येत नाही.

दुसरे असे डा. डी. आर. भांडारकर यांनी एकबम्म्हण या शब्दाचा अर्थ "ब्राह्मणांचा रक्षक" असा घेतला आहे. खतिय हा शब्द क्षत्रियांना उद्देशून नसून शक क्षत्रपांना उद्देशून आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. के. गोपालाचारीही या मताशी सहमत आहेत. इतिहासकार शैलेंद्र नाथ सेन आपल्या Ancient Indian History and Civilization ग्रंथात स्पष्टपणे म्हणतात कि सातवाहन राजे सहिष्णू असल्याने त्यांनी बुद्धिष्ट लेण्यांना जशी दाने केली तशीच ब्राह्मणी धर्मालाही आश्रय दिला व स्वत:ला ‘एकबम्म्हण’ म्हणवून घेतले. (पान १७४)

गौतमीपुत्र सातवाहनाने नहपान या शक क्षत्रपाचा उच्छेद करुन गमावलेले साम्राज्य मिळवले होते. हे लक्षात घेता क्षत्रपांना (Xatroi) खतियांचा गर्व उतरवणारा असे सातवाहन म्हणत असतील तर या शब्दाचा अर्थ परशुरामाप्रमाणे क्षत्रियांचा गर्व उतरवणारा असा करुन मिराशी व शास्त्री चूक करत होते हे उघड आहे.



सातवाहन सत्ता व महत्कार्य

 
सिंधूक अथवा छिमुख सातवाहनाने काण्वांच्या सत्तेविरुद्ध बंड करत स्वतंत्र सत्ता स्थापन केली ती सनपुर्व २२० मद्ध्ये. सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान ईत्यादि देशांत फैलावलेला होता. भडोच, कल्याण, चेऊल ई. पश्चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमानात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुंफांतील प्रदिर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणे दक्षीणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते. हाल सातवाहन या कलाप्रेमी आणि कवी सम्राटाने "गाथा सप्तशती" जशी संपादित करून स्वत:ही काव्य रचला केल्या तशाच गुणाढ्याची "बृहत्कथा", वररुचीचे प्राकृत प्रकाश हे माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या. हाल सातवाहनाने आपल्या बलाढ्य आरमारातून श्रीलंकेवर स्वारी करून तेथील राजकन्या लिलावती याच्याशी कसा विवाह केला याचे कल्पनारम्य चित्रण "लीलावई" या काव्यग्रंथात आले आहे. महाराष्ट्रातील आजचे गिरिदुर्ग ही सातवाहनांचीच निर्मिती. रायगड हा मुळचा सातवाहनांनी बांधलेला किल्ला.


सातवाहन घराण्यात एकुण तीसपेक्षा अधीक राजे झाले. अनेक राजे आपल्याला केवळ नाण्यांवरून माहित आहेत. सातवाहन हे आगम (शैव) धर्म पाळत होते त्याचा स्पष्ट उल्लेख नाशिक शिलालेखात "आगमाननिलया", म्हणजे आगम प्रणित धर्म पाळणारे असा येतो. राजांची नांवे शिवश्री, स्कंद, पुलुमावी, शक्तीश्री, सिमुख (सं शिवमुख), शिवस्वाती अशी बव्हंशी शिव-शक्ती वाचकच आहेत. सातवाहनांनी वैदिकांच्या समाधानासाठी यज्ञही केला होता. त्यामुळे वेदिश्री असेही एक यज्ञवाचक नांव येते. एक राणी तर नागणिका (नाग वंशीय) असल्याचेही दिसते.

एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवतांना चढ-उताराचेही प्रसंगही येणे स्वाभाविक होते. गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेंव्हा अशीच बिकट परिस्थिती होती. क्षहरात घराण्यातील शकवंशीय क्षत्रप नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण-गोमंतकही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथल्या बंदरांतून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. मध्यभारत ते दक्खनची प्रजा एका अर्थाने गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.

 
नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. ३२ मद्धे नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वा-या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकुन घेतला. गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेंव्हा सातारा-क-हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता.

 
परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री जैन परंपरेचा हवाला देऊन लिहितात, 'गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.'  शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- "खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस"

 
एका अर्थाने हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्राने आपल्या नितांत पराक्रमाने परत जिंकून घेतले. पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे सामर्थ्य कोणात आले नाही.  नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. इसवी सनाच्या ७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस. या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरु केले ते म्हनजे सालाहन (शालिवाहन नव्हे) शक. (ज्या साली शकांचे हनन केले तेंव्हापासून सुरु होणारे संवत्सर) या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली.

हा महान वंश सन २२० पर्यंत सत्तेवर होता. जवळपास ४५० वर्ष या वंशाने राज्य चालवले. आजच्या महाराष्ट्राच्या संस्कतीची बीजे तर रोवलीच पण माहाराष्ट्री प्राकृत साहित्यात स्वत:ही मोलाची भर घालत आजच्या मराठीची पायाभरणी केली. महाराष्ट्र म्हणजे सातवाहन. सातवाहनांच्या काळत लोकांवर धार्मिक बंधने नव्हती. जातींची बंधने मुक्त होती. कोणीही कोणत्याही व्यवसायात जाऊ शके. स्त्री-पुरुषांतही केवढी समता होती हे हालाच्या गाथा सप्तशतीवरुन स्पष्ट दिसते. कररचना सौम्य होती. सातवाहनांनी एवढे किल्ले व नगरे उभारली पण स्वत:चे राहणीमान साधे ठेवले. जुन्नर व पैठण या त्यांच्या दोन राजधान्या. पैठणला त्यांनी जागतिक व्यापाराचे केंद्र बनवले. व्यापारी मार्ग बांधले. बंदरे उभारली. बलाढ्य आरमार उभारले. कुशाण सत्तेला विंध्यापाशीच थोपवून धरले. शकांच्या पारतंत्र्यापासून महाराष्ट्राला मुक्त केले. आज महाराष्ट्र सातवाहनांचे उपकार विसरला आहे. हैद्राबाद येथे मात्र गौतमीपुत्र सातवाहनाचा भव्य अश्वारुढ पुतळा आहे...एवढेच!

सन २२० नंतर सातवाहनांचे साम्राज्य त्यांच्या वंशजांमध्ये पुढे विभक्त झाले. विदर्भ, कोल्हापूर, कर्नाटक असे ते स्वतंत्र रीत्या विखुरले आणि या घराण्याचा राजकीय अस्त झाला.

उत्तर भारतात उदयाला आलेले पश्चिमी छत्रप काही काळ उत्तर महाराष्ट्रावर सत्ता गाजवत होते. यात क्षहरात घराण्यातील नहपान हा क्षत्रप प्रभावी होता. यांनी आधी गुजरातमध्ये राज्य स्थापन करून महाराष्ट्रातही पाय रोवले. या नहपानाचा पराभव गौतमीपुत्र सातकर्णीने कसा केला हे आपण पाहिलेच आहे. दुसरा वंश कार्दमक. यातील चष्टन हा राजा महत्वाचा मानला जातो पण त्याने महाराष्ट्रावर कधी शासन केल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत. हा उज्जैनीचा राजा होता अशी मान्यता आहे. नहपानाच्या एका कन्येशी अथवा नातीशी एका सातवाहन राजाचा विवाहही झाला होता. क्षत्रपांचे राज्य परकीय असले तरी ते स्थानिक धर्माचे पालन करत. त्यांची अनेक लोकोपयोगी कामे प्रसिद्ध आहेत.  संस्कृत भाषा विकसित झाल्यानंतर क्षत्रप हे सर्वप्रथम या भाषेचा उपयोग आपल्या शिलालेखात करू लागले. राजा रुद्रदामनचा सन १६० मधील शिलालेख हा पहिला संस्कृत लेख मानला जातो. तत्पूर्वी संस्कृतच्या अस्तित्वाचा एकही शिलालेखीय अथवा नाणकीय पुरावा उपलब्ध नाहे.

वाकाटक घराणे हे विदर्भात उदयाला आले. सातवाहन सत्ता दुर्बल झाल्यानंतर विदर्भातून या घराण्याचा पहिला राजा विन्ध्यशक्ती याने स्वत:चे राज्य स्थापन केले असले तरी त्याने स्वत:ला राजा म्हणवून घेतले नाही. प्रवरसेन पहिला याने सन २७५ मध्ये मात्र पित्याने स्थापन केलेले राज्य वाढवले. हा अत्यंत महत्वाकांक्षी राजा होता. त्याने राज्याचा विस्तार विदर्भाबाहेरही वाढवला. त्याचे राज्य दक्षिणेत तुंगभद्रा नदीपर्यंत पोहोचले होते. क्षत्रपाकडून तो खंडणीही वसूल करत असे. उत्तरेतील बलाढ्य सत्ता भारशिव नागांची होती. प्रवरसेनाने या घराण्यांबरोबर वैवाहिक संबंध प्रस्थापित करून आपली शक्ती वाढवली. सुमारे साठ वर्ष राज्य केल्यानंतर प्रवरसेनाने आपले राज्य आपल्या तीन पुत्रात वाटून दिले. कदाचित त्याला गृहकलहाचा सामना करावा लागला असावा.  पुढे नंदिवर्धन, वत्सगुल्म हे वाकाटक राज्याचे नवे भाग पडले. गुप्त साम्राज्याशीही विवाहसंबंध जुळवण्यात आले. प्रभावती गुप्ता ही या घराण्यातील अत्यंत महत्वाची महिला. रुद्र्सेन (दुसरा) याची ती पत्नी. पतीच्या अकाले निधनानंतर तिने नंदिवर्धन शाखेचे राज्य मोठ्या सामर्थ्य आणि कौशल्याने सांभाळले. तिचे अनेक दानलेखही उपलब्ध आहेत. इसवीसनाच्या तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत दक्षिणेत जे राजवंश झाले त्यांमध्ये वाकाटक राजवंश हा श्रेष्ठ असून त्याच्या कामगिरीने अखिल दक्षिण भारताच्या संस्कृतीवर फार मोठा परिणाम झाला आहे.असे एका फ्रेंच इतिहासकाराचे उद्गार आहेत.

सहाव्या शतकाच्या मध्यात कलचुरीवंशाच्या पहिल्या ज्ञात राजा कृष्णराज याने तीनही शाखांच्या ताब्यात असलेला प्रदेश जिंकून घेतला आणि वाकाटक साम्राज्याचा अंत झाला. वाकाटक घराणे हे दीर्घ काळ राज्य करत असल्याने विदर्भाच्या व उर्वरित महाराष्ट्राच्या संस्कृतीवर सातवाहनांपाठोपाठ त्यांचाही मोठा प्रभाव पडला. त्यांनी अनेक मंदिरे निर्माण केली. ते शिवभक्त असले तर प्रभावती गुप्ता मात्र वैष्णव असल्याने विष्णू मंदिरेही विदर्भात अस्तित्वात आली.  अर्थात या घराण्याची माहितीही आपल्याला नाणी, कोरीव व ताम्रपट लेख यातुनच बव्हंशी उपलब्ध होते. पुण्यातही प्रभावती गुप्ताचा एक ताम्रपट मिळालेला असून वाकाटक घराण्याची वंशावळ अजंता येथील सोळाव्या क्रमांकाच्या लेण्यात कोरलेली आढळते. यावरून एकत्र त्यांचा राज्यविस्तार मराठवाडा व दक्षिण महाराष्ट्रातही झालेला असण्याची शक्यता आहे.

उर्वरीत महाराष्ट्रात त्यावेळेस काही भागात अहिर (खानदेश) तर दक्षिण महाराष्ट्रात काही स्थानिक सत्ता होत्या. ईश्वरसेन हा अहिर घराण्याचा ज्ञात राजा होय पण या घराण्याबद्दल ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. कोकणावर त्रैकुटक वंशाची सत्ता होती. यांनी काही विशेष अलौकिक केलेले नसले तरी महाराष्ट्राची सांस्कृतिक धारा मात्र जतन केली.

सहाव्या शतकाच्या मध्यात वातापीचे (बदामीचे) चालुक्य ही दक्षिणेत उदयाला आलेली एक मोठी सत्ता. पहिला पुलकेशी हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. सन ६११ मध्ये सत्तेवर आलेल्या दुस-या पुलकेशीने महाराष्ट्रात हातपाय रोवायला सुरुवात केली. कोकणमधील सत्तेचा विनाश करून पुलकेशीने तेथील नंतर आलेल्या मौर्य राजवटीचा अंत केला. तेथून त्याने गुजरातवर स्वारी केली. यातूनच पुलकेशी आणि हर्षवर्धनचे युद्ध उद्भवले. दुसरा पुलकेशी अशा रीतीने ९९००० गावे जेथे आहेत त्या तीन महाराष्ट्रक प्रदेशांचाही स्वामी बनला. याच काळात राष्ट्रकुटही गप्प बसलेले नव्हते. महाराष्ट्रावरील चालुक्यांची सत्ता फार काळ टिकलेली दिसत नाही. सन ६८१च्या सुमारास विनयादित्य हा चालुक्य राजा सत्तेवर आला. त्याच्या काळातच महाराष्ट्र चालुक्यांबरोबरच राष्ट्रकुट, कल्याणीचे चालुक्य, शिलाहार यांचीही काही भागांवर सत्ता प्रष्ठापित व्हायला सुरुवात झाली होती असे दिसते.

मानपुरचे (मान्यखेट) राष्ट्रकुट म्हणून ओळखली जाणारी राष्ट्रकुटांची एक शाखा चालुक्यांच्या उद्यापूर्वीच दक्षिण महाराष्ट्रावर सत्ता कार्यत होते असे उपलब्ध पुराव्यांवरून मानले जाते. सन ७७२ ते सन ९८२ या काळात हे साम्राज्य कार्यरत होते. लातूर येथील हे मुळचे घराणे. वेरूळ येथे त्यांची पहिली राजधानी असण्याची संभावना आहे. राष्ट्रकुट हे मुळच्या “रठ्ठीकुत” या प्राकृत शब्दाचे संस्कृतीकरण आहे. वेरूळ येथील शिलालेखातून दंतीवर्मन हा या घराण्याचा संस्थापक असल्याचे दिसते. राष्ट्रकुट काळ हा महाराष्ट्राच्या अतुलनीय वैभवाचा काळ मानला जातो. सुरुवातीला केवळ मराठवाडा, खानदेश हे प्रांत या घराण्याच्या अखत्यारीत होते. वेरूळ, अजंता येथील कोरीव लेणी त्यांच्या कलासक्तीची ग्वाही देतात. वेरुळचे कैलास मंदिर हे राष्ट्रकुट राजा कृष्ण (पहिला) याच्या कारकिर्दीत खोदले गेले. गुहेश्वर शिव हे या घराण्याचे कुलदैवत. पण अमोघवर्षासह बहुतेक राष्ट्रकुट राजे हे जैन धर्मीय होते. त्यांच्या काळात महाराष्ट्रात जैन धर्माने उभारी धरली व अनेक जैन तीर्थक्षेत्रेही निर्माण झाली. जिनसेनकृत आदिपुराण, पुष्पदंतकृत  महापुराण सारखे जैन महाग्रंथ माहाराष्ट्री प्राकृतात लिहिले गेले. स्वत: अमोघवर्ष अत्यंत कर्तबगार तर होताच पण त्याने रत्नमालिका व राजमार्ग या दोन ग्रंथांची निर्मिती केली. या राजवटीत अनेक जैन मंदिरे व लेण्यांची निर्मिती करण्यात आली.  कर्क प्रतापशिल हा या घराण्यातील महाबलाढ्य राजा होता. त्याने अनेक छोट्या राजवटीना मांडलिक करून स्वत:ला “मांडलीकांचा अधिराज” ही बिरुदावली घेतली. याच्या सरत्या काळापर्यंत चालुक्य सत्ता पूर्ण उध्वस्त झालेली होती. तापी नदीपासून दक्षिणेस गोदावरी नदीपर्यंतचा भूभाग कर्काच्या ताब्यात होता. विदर्भात त्याचा भाऊ उत्तरगण हा त्याच्यातर्फे शासन चालवत होता. सातव्या शतकाचा उत्तरार्ध हा कर्काच्या नावाने लिहिला तरी हरकत नाही.

विन्ध्यापासून कन्याकुमारीपर्यंत राष्ट्रकुट राजांच्या सत्ता होत्या असे अभीमानाने` म्हटले जाते. द्न्तिदुर्ग राजाने गुजरातवर स्वारी करून गुजरातमधील लाट प्रदेश सन ७४० मध्ये आपल्या अखत्यारीत आणला होता. कोकणही त्याने आपल्या कब्जात घेतला होता. आपल्या राजवटीच्या अखेरच्या काळात त्याने माळवा, कलिंग आणि कोसल राज्यावरही आक्रमण केले होते. दुस-या कृष्णाच्या काळात (सन ८९०) त्याला भोज-प्रतीहारांशी संघर्ष करावा लागला होता. या युद्धामुळे राष्ट्रकुटांचे गुजरातवरील वर्चस्व संपुष्टात आले.

सन ९६८ च्या सुमारास कृष्ण (तिसरा) याच्या कारकीर्दीनंतर खोट्टीग हा चवथा अमोघवर्ष हे नाव धारण करून सत्तेवर आला पण त्याच्या कारकिर्दीत साम्राज्याचे पतन झाले. त्यांची तत्कालीन राजधानी मालखेड लुटून फस्त करण्यात आली. यादवांची सत्ता त्यावेळेस डोके वर काढत होती. भिल्लम याद्वाने कलचुरी आणि कल्याणीच्या चालुक्यांना मदत केली आणि हे साम्राज्य नष्ट झाले. असे असले तरी महाराष्ट्राची जडणघडणीत राष्ट्रकुटांचा मोलाचा वाटा आहे हे स्पष्ट आहे. अन्य राजसत्तांच्या इतिहासाप्रमाणेच राष्ट्रकुटांचा इतिहासही संदिग्ध आहे. पण या वंशाच्या अनेक शाखांनी भारतात विविध भूभागात राज्ये केली आणि आपला सांस्कृतिक ठसा उमटवला याबाबत मात्र शंका नाही.

बदामीच्याच चालुक्यांचे वंशज असलेले कल्याण (बिदर जिल्हा, कर्नाटक) येथील सत्तेनेही महाराष्ट्रातील काही भागावर आपली सत्ता प्रस्थापित केली होती. यांचे कोरीव शिलालेख कवठे, मिरज, येऊर, नीळगुंड येथे मिळून आलेले आहेत. तैल (दुसरा) हा या शाखेचा पहिला राजा. राष्ट्रकुटांन हरवून हा सत्तेवर आला. राष्ट्रकुटाचे बहुतेक सर्व मांडलिक याच्या आधिपत्याखाली आले. यात महाराष्ट्रातील यादवही होते. तैलाने सन ९८० मध्ये परमारांचा पराभव करून दक्षिण गुजरात जिंकून घेतला. महाराष्ट्रासह शिमोग्यापर्यंत त्याचे राज्य पसरले. तो पराक्रमी आणि मुत्सद्दी शासक होता. जाकब्बे या त्याच्या राणीपासून त्याला सत्याश्रय व दशवर्मन हे दोन पुत्र झाले. सत्याश्रय सत्तेवर आल्यावर त्याला चोलांच्या विस्तारवादाचा सामना करावा लागला. सत्याश्रयाने चोलान्ना तुंगभद्रेपाशीच रोखले. त्याचा भाऊ दशवर्मनची कन्या आक्कादेवी हे प्रशासक म्हणून ब-याच प्रदेशाचा कारभार पाहत असे. त्यामुळे सत्याश्रयास आक्रमणाला तोंड देणे सोयीचे गेले.  आकादेवी ही कुशल प्रशासक होती व ती सत्याश्रयानंतरही प्रशासिका राहिली. चोल, होयसळ आणि कलचुरीन्शी दीर्घकाळ संघर्ष करावा लागल्याने महाराष्ट्रावर ठसा उमटवता येईल अशी काही कामगिरी करता आल्याचे दिसत नाही. जयसिंह या राजाने आपली कन्या अव्वलादेवी तिस-या भिल्लम याद्वाला दिली होती. किंबहुना महाराष्ट्राचे शासन त्यांचे मंडलिक म्हणून यादवच पहात होते असे दिसते. पुढे यादवांनी त्यांची सत्ता झुगारून देत आपले सार्वभौमत्व घोषित केले.

उत्तर व दक्षिण कोकण हे प्रांत शिलाहार वंशाच्या दोन शाखांच्या अखत्यारीत होते. कोल्हापूर परिसर तिस-या शाखेच्या अखत्यारीत होता. या वंशाच्या या अशा तीन शाखा. या तीनही शाखांचे वंशज जीमूतवाहन हा आपला मूळ पुरुष मानत असत. शिलाहारांची कोकणावर सत्ता प्रस्थापित होण्याआधी तेथे चालुक्यांची सत्ता होती. (सातवे शतक) पुढे हे राष्ट्रकुटाचे मांडलिक बनले. झंझ या शिलाहार वंशाच्या राजाचे वर्णन अल मसुदी या दहाव्या शतकात चेउल बंदरावर भेट देण्यासाठी येवून गेलेल्या अरब प्रवाशाने केले असून दहाव्या शतकातील समाजव्यवस्थेचे दर्शन त्याच्या लेखनात घडून येते. झंझ हा शैव असून त्याने शिवाची बारा मंदिरे बांधली होती. अजुनही त्या मंदिरांचे अवशेष कोकण व घाटमाथ्यावर मिळून येतात. उत्तर कोकणच्या शिलाहारांनी प्रदीर्घ काळ सत्ता गाजवली. (इ.स. ८०० ते इ.स. १२६५) दक्षिण कोकणचे शिलाहार केवळ सन १०२४ पर्यंत सत्ता गाजवू शकले. कोल्हापूरचे शिलाहार हे कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगाव एवढ्या प्रांताचे अधिपती होते. यांचे राज्य सन ९४० ते १२१२ पर्यंत टिकले. अर्थात कोल्हापूरचे शिलाहार हे कलचुरींचे मांडलिक होते. पण विजयादित्य या शिलाहार राजाने बिज्जल या कलचूरी राजाचे सार्वभौमत्व मान्य करण्यास नकार दिला व त्यामुळे त्यांच्यात युद्ध झाले. अर्थात या दोन्ही बाजूंनी आपापल्या लेखात त्यांचीच बाजू विजयी झाल्याचे घोषित केले असल्याने नक्की काय झाले हे सांगता येणे अशक्य आहे.

मात्र पुढे यादव सत्ता बलाढ्य झाल्याने सन १२१२ मध्ये कोल्हापूर शिलाहारांचा यादव सैन्याने खिद्रापूरजवळ पराभव केला व तत्कालीन शिलाहार राजा भोज याला पन्हाळगड येथे कैद करून ठेवले. अन्य शिलाहार शाखांचा पराभव चालुक्य राजांनी केला.

यानंतर महाराष्ट्रात येतो तो यादवकाळ. हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण काल असून सांस्कृतीक उलथापुलथीचा हा काळ आहे. संत चळवळ जशी याच काळात उभी राहिली तशीश मुस्लीम सत्ताही याच राजवटीचा अंत करत महाराष्ट्रावर स्थापन झाली. याच काळात महानुभाव पंथ उदयाला आला तसाच वारकरी संप्रदायाचा जन्मही याच काळात झाला. दुसरेकडे यादवांच्या मंत्र्याने, हेमाद्रीने चतुर्वर्गचिंतामणी हा ग्रंथ लिहून पारलौकिक जीवनाकडे लोकांना आकृष्ट केले. महाराष्ट्रातील महाभयंकर दुष्काळ, जो दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणून ओळखला जातो तो चवदा वर्ष टिकलेला महाभयंकर दुष्काळही याच काळातील. देवल स्मृतीसारखी वैदिक स्मृतीही याच काळात महाराष्ट्रात लिहिली गेली. नाथपंथाचा उत्कर्षही याच काळातील. एकंदरीत राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक घडामोडी या काळात फार मोठ्या प्रमाणावर झाल्या. त्यांचे पडसाद आजही महाराष्ट्री जनमाणसावर फार मोठे आहेत.

हेमाद्रीने केलेल्या विवेचानानुसार दृढप्रहार हा या घराण्यातील आदिपुरुष. तो द्वारका येथे जन्माला आलेला असून दक्षिणेत येत त्याने सिन्नर येथे आपली राजधानी वसवली. अर्थात यादव हे उत्तर भारतीय होते हे मत आता कोणी मान्य करत नाही. राजांचे व्युत्पत्ती चंद्र-सूर्य किंवा कोणा दैवतसमान वंशातून झाली हे दाखवण्याचा दरबारी पंडितांना हव्यास असतो, त्याचेच दर्शन हेमाद्रीच्या लेखनात घडते. हेमाद्रीच्या म्हणण्यानुसार सेउणचंद्र हा दृढप्रहारचा पुत्र. डॉ. श्रीनिवास रीत्ती हे दृढप्रहार द्वारकेहून आला हे अमान्य करत सिन्नर (सिंदिनगर) ही सेउणचंद्राची पहिली राजधानी हे मान्य करतात. यादव हे नाशिक परिसरातच उदयाला आले व ते मुळचे तेथलेच होते व त्यांनी तत्कालीन स्थितीचा फायदा घेत सत्ता स्थापन केली हे स्पष्ट आहे. यादवांच्या राजधान्या आधी सिन्नर, मग चांदवड व शेवटी देवगिरी हा क्रम पाहिला तरी हे स्पष्ट होईल.

दृढप्रहार ही काल्पनिक व्यक्ती असली तरी पहिला सेउणचंद्र हा सन ८३५ मध्ये सत्तेवर आला याबाबत इतिहासकारांचे एकमत आहे. त्याने शासित केलेल्या प्रदेशाला सेउणदेश असे म्हटले गेलेले आहे. हा राष्ट्रकुट राजा पहिल्या अमोघवर्षाचा मांडलिक होता. या राजवंशातील दुसरा भिल्लम (सन ९७० ते 1005) याच्या काळात राष्ट्रकुटांची सत्ता खिळखिळी झाल्याने दक्षिणेत तैल या चालुक्य राजाने आपले सत्ता प्रस्थापित केली. दुस-या भिल्लमला चालुक्यांचे मांडलिकत्व विकार्ण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. शिलाहार राजा झंझची कन्या राणी लक्ष्मी ही त्याची पत्नी होय. पुढे याच लक्ष्मीने आपला पुत्र वेसुगी हा अकाली निधन पावल्याने त्याच्या अल्पवयीन मुलाला - तिस-या भिल्लमला राज्यावर बसवून त्याच्या तर्फे अत्यंत कुशलतेने राज्यकारभार चालवला.

पहिल्या सिंघन (इस. १११० ते ११४५) याने विक्रमादित्य सहावा याचे मांडलिकत्व स्वीकारून परांद्यापर्यंत आपले राज्य पसरवले. बाराव्या शतकात पाचवा भिल्लम याने मात्र कलचुरी , होयसळ आणि काकतीय यांच्याशी जवळपास १० वर्ष अथक संघर्ष केला. त्याने केलेल्या युद्धांचे क्रमवार माहिती उपलब्ध नसली तरी त्याने पुणे, सोलापूर, श्रीवर्धन, मंगळवेढा, चालुक्यांची राजधानी कल्याण, परांडा किल्ला, इत्यादी विस्तृत भागावर सत्ता स्थापन करून सर्वभौम यादव साम्राज्याची द्वाही फिरवली. असे असूनही त्याला अंतर्गत आणि बाह्य शत्रूंशी अतोनात संघर्ष करावा लागला. कदम. सिंद, सावंत यासारख्या सत्तांनी यादवांचे सार्वभौमत्व मान्य करून त्यांचे मांडलिक व्हायला नकार दिला. तरीही कोकणाव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्र यादवांच्या सत्तेखाली आणला हे भिल्लमचे अलौकिक कार्य होय. एवढेच नव्हे तर त्याने चालुक्य राजांच्या अर्ध्या भागावर स्वामित्व मिळवले. दक्षीणेकडून होयसळांचे सातत्याने होणारे आक्रमण रोखले. शिवाजीपूर्व शिवाजी असे सार्थ वर्णन करता येईल असा हा महाराष्ट्राचा सातवाहनांनंतरचा  व शिवाजी महाराजांच्या उद्यापूर्वीचा हा एकमेव महायोद्धा व शासक. अर्थात या भिल्लमची दाखल महाराष्ट्राने घेतलेली दिसत नाही जशी गौतमीपुत्र सातकर्णीचीही घेतलेली नाही. हा महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा दुसरा उद्गाता असे अद्वितीय कार्य ज्याने केले तो असा अप्रसिद्धीच्या कालान्धारात दबला जावा हे मराठी माणसाचे दुर्दैव.

दुसरा सिंघन याने राज्यविस्ताराचे धोरण कायम ठेवत माळवा व शेवटी शिलाहारांकडून कोल्हापूर जिंकून घेतले. होयसळांवर मात केली. कोकणात तेंव्हा केशीराज हा उत्तर कोकणाचा शासक होता. सिंघणाने त्याच्यावर स्वारी करून त्याला आपला मांडलिक केले. अशा रीतीने कोकणही यादव साम्राज्याचा भाग बनला. त्याने गुजरातवरही स्वारी केली. इस्लामी स्वा-यांना यामुळे पायबंद बसेल अशी त्याची कल्पना होती. उत्तर भारत आपल्या ताब्यात घ्यावा अशी महत्वाकांक्षी योजना होती. त्यामुळे तरी उत्तरेत मुस्लीम स्वा-यांनी अस्ताव्यस्त झालेली व्यवस्था सुरळीत करता येईल अशी त्याची कल्पना होती. पण उत्तरेतील, विशेषता गुजरातेतील राजाने त्याचा विश्वासघात केला. चौलुक्य सोलंकी राजांनी मित्र पक्षात फुट पाडन्यासाठी एक कट केला व सिंघनला संख राजाविरुद्ध उभे केले. संख त्याची बाजू सोडून पळून गेला. या घटनेनंतर सिंघनने सोळंकीविरुद्धची मोहीम गतिमान केली. सोमेश्वर लिखित “कीर्तीकौमुदी” आणि जयसिंहाच्या “हमीरा मादा सर्वाना” या ग्रंथातून ही माहिती मिळते. एकंदरीत यादव साम्राज्य वाढत होते. अगदी वनवासीचे कदंबयांच्या रक्षणाची जबाबदारीही सिंघनाने घेतली.

त्यानंतर यादव वंशात अनेक पराक्रमी राजे झाले. त्यांचे कोरीव लेख प्रसिद्ध आहेत. १२७१ साली रामदेव हा सत्तेत आला ते मुळात कट करून. त्याने आपला चुलत भाऊ आम्मण यास पदच्युत करून १२७१ साली आपला राज्याभिषेक करून घेतला. याचा काळ अस्थिरता आणि युद्धात गेला. हेमाद्री हा त्याचा मंत्री. त्याने रामदेवाला वैदिकाभिमानी बनवले ते हेमाद्रीने त्याला सत्तेत येण्यासाठी सहकार्य केले म्हणून. हेमाद्रीला त्याचे फळ मिळाले ते मुख्य प्रधानपदरुपात. पण कटातून सत्तेवर आलेला रामदेव हा जात्याच अदूरदृष्टीचा होता. दुस-या सिंघमने मुस्लीम सत्तांविरूद्धचे आखलेले धोरण तो साफ विसरला. अल्लाउद्दीन खिल्जीच्या संभाव्य आक्रमणाला विरोध करण्याची तयारी न करता तो होयसळ राजांविरुद्ध मोहिमा आखण्यात व्यस्त झाला. त्याच्या मोठ्या सैन्याच्या अनुपस्थितीत देवगिरीवर अल्लाउद्दीनचे आक्रमण झाले. घाबरलेल्या रामदेवाने तह केला. यादवांनी गेल्या तीनशे वर्षात जमा केलेली संपत्ती अल्लाउद्दिनने धुवून नेली. येथेच यादव साम्राज्याचा अंत सुरु झाला. अशा रीतीने सन ८३५ मध्ये सुरु झालेली यादव सत्ता शेवटी १३१८ साली संपली. आणि त्याचे कोणत्याही तत्कालीन सत्तांना वाईट वाटल्याचे दिसत नाही कारण मुळात रामदेव कट करूनच सताधारी बनलेला होता. यादव सत्तेचा अंत व्हायला हेमाद्रीची फितुरी आणि स्वार्थ कारण झाले ही माहिती महानुभाव साहित्यात नोंदलेली आहे. 

इस्लामी सत्ता महाराष्ट्रात लगेच स्थापन झाली असे नाही. स्थानिक सरंजामदार, किल्लेदार सहजासहजी मुस्लिमांना शरण गेले नाहीत. उदा. पुण्याजवळील कोंडाणा किल्ला एका कोळी किल्लेदाराने सुमारे सहा महिने लढवला आणि रसद संपली तेंव्हाच किल्ला सोडला.

एका अर्थाने मराठी राज्य सर्वार्थाने संपले. मराठी राज्याचा उदय व्हायला शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत सुमारे तीनशे वर्ष महाराष्ट्राला वाट पहावी लागली. पण महाराष्ट्राच्या इतिहासात कालांधार काही पहिल्यांदाच निर्माण झालेला नव्हता. प्रत्येक वेळेस कोणीतरी महापुरुष जन्माला आला आणि त्याने महाराष्ट्राला दास्यातून बाहेर काढले. मराठी जनतेने आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या महानायकांना साथ दिलेली आहे. महाराष्ट्राचे स्वातंत्र्य परचरणी अर्पण करणा-या रामदेवाचे नाव ज्ञानेश्वर सोडले तर एकही समकालीन संत घेत नाही याचा अन्वयार्थ आपल्याला समजावून घेतला पाहिजे.

महाराष्ट्राचा इतिहास शिवाजी महाराजांपासून सुरु होतो असा समज बाळगणेही तेवढेच चूक आहे. गौतमीपुत्र सातकर्णी, हाल सातवाहन, झंझ, सिंघम (पहिला व दुसरा), पाचवा भिल्लम यादव हेही आपले आदर्श आहेत हे विसरता कामा नये. त्यांचा इतिहास जास्तीतजास्त सर्वांसमोर कसा येईल हे पाहिले पाहिजे.

-संजय सोनवणी 


(साहित्य चपराक दिवाळी विशेषांक २०२३ मध्ये प्रकाशित)

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...