Sunday, January 21, 2024

रामायण आणि रामराज्य...



रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचा भारतीय जनमानसावर प्रचंड प्रभाव आहे. किंबहुना भारतीयांचे नैतिक जीवन या महाकाव्यांमधील पात्रांच्या वर्तन व विचारांनी प्रभावित झालेले आहे असे आपल्याला दिसून येईल. अर्थात वाचक/श्रोत्यांनी या महाकाव्यांची मूळ आवृत्ती सहसा वाचलेली नसते. त्यांच्यावर प्रभाव असतो तो त्या त्या काळातील लोकप्रिय संस्करणाचा. सांगणा-याने पात्रांना आपपापल्या विचारानुरूप दिलेल्या रूपांचा. वाल्मिकी रामायणही मुळातून सहसा कोणी वाचलेले नसते. महाभारताचेही तसेच आहे. त्यामुळे रामायणातील राम-सीता तसेच रावण हे ऐकून माहित असले आणि त्यांच्या व्यक्तित्वाबाबत व त्यांनी नेमका काय नैतिक संदेश दिला याबाबत हिरीरीने चर्चा जरी होत असल्या तरी तत्कालीन समाजजीवन नेमके कसे होते व तत्कालीन समाज नेमके कोणते नैतिक आदर्शे मानत होता याबाबत मात्र सहसा चर्चा होत नाही. याचे कारण मुळातच रामायणात येणारे समाजचित्र अत्यंत अस्पष्ट असे आहे त्यामुळे त्यावरून निश्चित अंदाज बांधता येणे जवळपास अशक्य होऊन जाते. पण लोकस्मृतीतून चालत आलेल्या रामकथेचा मात्र विलक्षण पगडा समाजमनावर आहे असे आपल्या लक्षात येईल. तरीही संशोधकांनी रामकालीन समाजव्यवस्थेबाबत वाल्मिकी रामायणाच्या आधाराने आपापले विचार मांडले आहेत. वाल्मिकी रामायणाचे परिशीलन करतांना खालील बाबी लक्षात येतात.

महाभारताची जटिलता, व्यामिश्रता रामायणात नाही. राम हा दैवी अवतार तर रावण ही खलप्रवृत्तीची व्यक्तिरेखा यांच्यात झालेला संघर्ष याभोवती आजची मुख्य रामकथा फिरते. हीच कथा लोकप्रिय तर आहेच, पण विष्णूचा अवतार म्हणून रामाभोवती एक अद्भुत वलय निर्माण झालेले आहे. अद्भुताची, देवत्वाची रुची असणारे कोणत्याही समाजात कमी नसतात त्यामुळे रामकथा सुदूर कंबोडियापर्यंतही पोहोचू शकलेली आहे. किंबहुना राम हा भारताचा सांस्कृतिक राजदूत (किंवा देवदूत) बनून भारताबाहेर पसरला असेही आपल्याला म्हणता येईल. पण त्याच वेळेस रामायण ही भारतातील एका सांस्कृतिक संघर्षाची पायाभरणी करणारा ग्रंथ आहे असेही आपल्याला स्पष्ट दिसते.

वाल्मिकीला परंपरेने आदिकवी मानले आहे. पण रामकथा ही रामायण लिहिण्यापूर्वीच वीरगीत अथवा पोवाड्याच्या रूपाने भारतात लोकप्रिय होती. वाल्मिकीने रामायण लिहिण्यापूर्वीच पहिल्या शतकात विमल सुरी यांनी पउमचरिय (पद्मचरित) हे महाकाव्य प्राकृत भाषेत लिहिले होते पण त्याचा फारसा प्रभाव लोकांवर आज उरलेला नाही. प्राचीन पोवाडे तीन प्रकारचे होते असे मानले जाते. अयोध्या व राजपरिवारातील सावत्र आईमुळे निर्माण झालेला सत्ता संघर्ष व त्यातून रामाचा वनवास, सीताहरण व रामाचा सीताशोध, आणि रामाने रावणावर मिळवलेला विजय. या कथाबीजांना घेऊन रामायणाची संस्कृत भाषेत चवथ्या-पाचव्या शतकात रचना केली गेली. हे रामायणसुद्धा मुळात पाचच कांडांचे होते. पुढे अनेक शतकांनंतर मूळ संहितेला कोणा अनामिकाने लिहिलेले बालकांड आणि उत्तरकांड जोडण्यात आले. आधीच्या पाच कांडातही फेरफार करण्यात आले आणि रामायणाचे मूळ स्वरूप बदलले गेले. आपल्याकडे कालौघात पुरातन साहित्यात या ना त्या कारणाने घालघुसड करण्याची प्रवृत्ती असल्याने रामायणाची मूळ कथा नेमकी काय असावी याबाबत केवळ तर्क करावा लागतो. रावणाचे मुळ चारित्र्य व त्याच्या जन्माचा इतिहासही काय होता हे सुद्धा आपल्याला कष्टाने शोधावे लागते. रामाचा रावणावरील विजय हा गाभा एका संस्कृतीचा दुस-या संस्कृतीवर विजय अशा तत्वविचाराचे लेपण नंतरच्या कवींनी करत आजचे रामायण बनवले असल्याने रामायण हे एका गटाला प्रिय तर दुस-या गटाला तिरस्करणीय वाटणे स्वाभाविक आहे. किंबहुना आजचा सांस्कृतिक संघर्षाचे मूळ रामायणात आहे असे मानण्याची प्रवृत्ती अनेक संशोधकांची आहे. मुळात आज प्राकृतात लिहिले गेलेले प्राचीन पोवाडे उपलब्ध नाहीत. पण जनस्मृतीने मुळचे अवशेष जपून ठेवले असल्याने रामायण मुळातून वाचले नसले तरी रामाची कीर्ती उत्तरोत्तर वाढलेलीच आहे असे आपल्याला दिसून येईल

रामायणाची अनेक सांप्रदायिक व प्रादेशिक संस्करणे आहेत. त्यातील राम व रावण वेगळेच आहेत. जैन रामायणाची अनेक संस्करणे प्रसिद्ध असून यात राम जैनांतील विशेष शक्ती असलेला विद्याधर श्रेणीचा त्रिखंडावर राज्य करणारा प्रतापी राजा आहे. तो तापसी तर आहेच पण शाकाहारीसुद्धा आहे. या रामायणानुसार रावणाची हत्या रामाहातून नव्हे तर लक्ष्मणाहातून झाली. रामाला सहकार्य करणारे वानर प्राणी नव्हे तर सभ्य माणसेच होती तर वानरमुख हे त्यांचे ध्वजावरील चिन्ह होते. एकंदरीत रावणाचे एक वेगळेच सांप्रदायिक चित्रण जैन रामकथांत आलेले आहे.

याउलट दशरथ जातकात येणा-या बौद्ध रामकथेचे आहे. या कथेतील दशरथ हा अयोध्येचा नव्हे तर बनारसचा राजा होता. रामपंडित आणि लक्ष्मणपंडित यांना वनवासात पाठवले गेले ते हिमालयात. सीता ही रामाची बहीण आहे. या रामकथेत लंका नाही किंवा रावणही नाही. म्हणजेच सीताहरणही नाही.

एकाच भूमीत निर्माण झालेल्या या मुख्य तीन संस्करणात एवढे अंतर का असावे या प्रश्नावर विद्वानांनी बरीच चर्चा केलेली आहे. बहुतेकांनी रामकथेचा वापर आपापल्या धर्मप्रचारासाठी करायचा असल्याने मुळ कथेत सोयीस्कर बदल केले गेले असावेत असे एकंदरीत मत व्यक्त झालेले आहे. अर्थात या तीनही संस्करणामागे सांप्रदायिक भावना प्रेरित असल्या तरी या कथेमागे मुळचा असा कोणतातरी स्त्रोत असला पाहिजे हे निश्चित. तो प्राचीन काळापासून समाजात लोकप्रिय असणा-या वीरगीतांत आहे हे आपण पाहिलेच.

एवढेच नव्हे तर रामकथा मुळात भारतात घडली कि पूर्व इराणमध्ये, लंका म्हणजे आजची श्रीलंका कि रावणाची लंका छत्तीसगढ अथवा ओडीशात होती यावर रामायणाचाच आधार घेऊन विद्वानांत हिरिरीने चर्चा होत असते. रामकथा खरेच होऊन गेली असे मानणारे भाविक जसे आहेत तसेच ही कथा काल्पनिक आहे असे मानणारा वर्गही आहे. या कथेतून सांस्कृतिक इतिहास व संघर्ष शोधणारे विद्वानही कमी नाहीत. सध्याच्या रामायणातील राम-रावण संघर्ष हा आर्य आणि दक्षिणेतील अनार्यांमधील संघर्ष होय असे प्रतिपादित करणारा वर्ग जसा अस्तित्वात आहे तसाच रामाचे दक्षिणेत जाणे व रावणाशी युद्ध करणे म्हणजे आर्य संस्कृतीचे दक्षिणेतील द्रविड संकृतीवर झालेले आक्रमण असेही प्रतिपादित करणारे विद्वान आहेत. अनेक साहित्यिकसुद्धा अलीकडे रामायणातील पात्रांचे आपल्या आकलनानुसार नवे अन्वयार्थ लावत आहेत. रावण व मंदोदरीही राम-सीतेप्रमाणेच कादंबरीकारांचे आवडीचे मुख्य पात्र बनले असल्याचे आपल्या लक्षात येईल. रावणावर लिहिल्या गेलेल्या कादंब-या विक्रीचे उच्चांक मोडत आहेत. डॉ. वि. भि. कोलते यांनी तर पूर्वी महात्मा रावणहा ग्रंथ लिहून रावण हा रामापेक्षा कसा श्रेष्ठ होता हे वाल्मिकी रामायणाच्याच आधारे दाखवून दिले होते.

पण भाविकांच्या दृष्टीने पाहिले तर सृष्ट आणि दुष्ट शक्तीमधील संघर्ष म्हणजे रामायण. राम हा सृष्ट भावनांचे प्रतीक तर रावण हे दुष्ट भावनांचे प्रतीक. दस-याला रावण दहन केले जाते. सृष्टाचा दुष्टावरील विजयोत्सव साजरा केला जातो तो दुष्ट शक्तीचे रावण हे एक प्रतीक मानून. त्याच्याशी मुळ रावणाच्या चारित्र्याचा काही संबंध असेलच असे नाही. जनमानसासाठी हे ठीकही असेल कारण प्रकाश आणि अंधार, पवित्र आणि अपवित्र या द्वंद्वाने सर्वच मानवजातीला व्यापलेले असून मंगलाचाच विजय व्हावा अशी मानवी भावना असणे अस्वाभाविक मानता येणार नाही. किंबहुना रामकथा ही सृष्ट आणि दुष्ट यातील संघर्ष असल्याची भावना समाजात अधिक प्रबळ आहे. जनसामान्यांच्या कल्पनाविश्वाला ऐतिहासिक तथ्यांशी फारसे घेणे देणे नसते. त्याच्या भावानिकतेचे प्रक्षेपण तो काळ्या-पांढ-या छटात करतो आणि आपली जीवनाची आदर्शे ठरवतो.

सध्या उपलब्ध असलेले वाल्मिकी रामायण मात्र सांगितले गेलेय तेच वैदिक धर्माची महत्ता ठसवण्यासाठी. रामकथेच्या लोकप्रियतेचा फायदा घेत वैदिक नितीतत्वे व धर्मतत्वे जनमाणसावर ठसवण्यासाठी रामकथा वाल्मिकी रामायणाच्या माध्यमातून, मूळ कथेत सोयीस्कर फेरबदल करून लिहिली गेली असे मानायला पुष्कळ वाव आहे. रामकाळात नसलेला आर्य आणि अनार्य असा स्पष्ट भेद वाल्मिकी रामायणात आहे. राम यज्ञांचे रक्षण करतो आणि यज्ञविरोधी राक्षसांना मारतो अथवा पराजित करतो यावर रामायणाचा जास्त भर आहे. वाल्मिकी रामायणात पुरुषप्रधान संस्कृतीचे वर्चस्व दाखवण्यासाठी मूळ कथनात फेरफार करून अनेक क्लुप्त्या करण्यात आलेल्या असून स्त्रीमहत्तेचे अवमूल्यन केले आहे जो वैदिक संस्कृतीचा तात्विक गाभा आहे. असे असले तरी हा गोधळ लक्षात येतो कारण वैदिक महत्तेचे रोपण करतानाही अनवधानाने मुळचे भाग तसेच राहून गेलेले आहेत. त्यामुळे कवीला अगदी रावणाच्या चारित्र्याबद्दल नेमके काय म्हणायचे होते हे प्रश्न निर्माण होतात. एवढेच नव्हे तर वैदिक वर्णव्यवस्थेचे माहात्म्य या काव्यात ठायी ठायी दिसून येते. वैदिक संस्कृती विरुद्ध एतद्देशीय यक्ष-असुर-राक्षस संस्कृती एवढेच नव्हे तर उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत अशी सांस्कृतिक-धार्मिक-वांशिक आणि प्रादेशिक संघर्षाची मुलभूमी म्हणजे आजचे रामायण असे म्हणावे लागेल एवढे टोक रामाच्या माध्यमातून साळसूदपणे गाठले गेलेले आहे. थोडक्यात वैदिक धर्मप्रचारासाठी लिहिले गेलेले हे काव्य आहे हे सहजपणे कोणाच्याही लक्षात येईल. या रामायणाला भारतीय संस्कृतीचा आद्य काव्यमय उद्गार म्हणता येईल असे वास्तव त्यात दिसून येत नाही.

रामकथा वेदकाळात किंवा नंतर लिहिली गेली असे मानले जाते, पण वास्तव तेही नाही. मुळची रामकथा मुळात भारतात वैदिक आर्य प्रवेशण्यापुर्वीच घडून गेली होती हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे. याचे कारण म्हणजे खुद्द राम किंवा त्याच्या परिवारातील एकही सदस्य ऋग्वेद ते ब्राह्मणांसारख्या वैदिक साहित्यात अवतरत नाही आणि याबद्दल विद्वानांनी आश्चर्यही व्यक्त केलेले आहे. पण वैदिक वसिष्ठ, विश्वामित्र, अत्री, अगत्स्यसारखे वैदिक ऋषी व त्यांचे आश्रम मात्र रामायणात समकालीन असल्याप्रमाणे ठायीठायी दिसून येतात. खरे तर वेदांची रचनाही भारतात झालेली नाही. वेदांचा काळ हा इसपू १५०० असा साधारणपणे मानला जातो. हे वैदिक ऋषी रामायणात अवतरावेत पण राम मात्र वैदिक साहित्यात अवतरू नये याचा अर्थ एवढाच होतो कि वैदिक महत्ता ठसवण्यासाठी या पात्रांचे रामकथा नव्या स्वरूपात लिहिताना कल्पनेने पुनरावतरण केले गेले आहे.  विदेहाचा जनक तेवढा उपनिषदांत अवतरतो पण हा जनक म्हणजे सीतेचा पिता जनक नव्हे. तसा उल्लेखही मिळून येत नाही. रामाचाही उल्लेख प्राचीन उपनिषदांत मिळून येत नाही. याचाच अर्थ असा कि रामकथा ही मुळात वेगळ्या संस्कृतीत घडली, तीवर लोकभाषांत अनेक गीते-पवाडे लिहिले गेले. ती कथा लोकप्रिय झाल्यावर सर्वप्रथम जैन महाकाव्य निर्माण झाले. तिस-या-चवथ्या शतकात त्या कथेचा आधार घेत बौद्ध धर्मातही या कथेचा वेगळे रूप देत वापर करण्यात आला.  वैदिक धर्मियांनीही आपली धर्मतत्वे प्रचारित करण्यासाठी तिचा आधार घेत एक काव्य लिहिले गेले ते म्हणजे चवथ्या-पाचव्या शतकातील वाल्मिकी रामायण.

राम हा वेदपूर्व असावा हे सिद्ध होण्यासाठी अनेक प्रमाणे आहेत. भारतात नागरी संस्कृती स्थिरस्थावर झाली ती पाच हजार वर्षापूर्वी. नियोजनबद्ध नगरे हे या संस्कृतीचे वैशिष्ट्य होते. रामायणातील अयोध्याही नागरी जीवनाने समृद्ध असलेले नगर आहे. उलट वैदिक आर्यांना भारतात आल्यानंतरही नागरी जीवन पसंत तर  नव्हतेच, पण ते त्याचा तिरस्कार करीत. याचे उल्लेख सूत्र साहित्यात येतात. आपस्तंब धर्मसूत्र म्हणते, “नगरांत जाणे आपण टाळूयात...” (१.३२,२१). बौद्धायन धर्मसूत्र म्हणते, “नगरात राहणा-याला कधीही मोक्ष मिळू शकत नाही. (२:३,६,३३). गौतम धर्मसूत्र म्हणते, “नगरांत चुकुनही वेदपठण करू नये.” थोडक्यात वैदिक आर्यांचा नागरी जीवनाबद्दलचा दृष्टीकोन काय होता हे आपल्या लक्षात येईल. भारतात पुरातन काळापासून नागरी जीवन हे लोकांच्या अंगवळनी पडलेले होते. वैदिक आर्यांना मात्र ते जीवन पसंत नव्हते. अयोध्या मात्र संपन्न नगर तर होतेच पण लंकेसहित अन्य नगरांचेही विपुलतेने उल्लेख आलेले आहेत. इसपूच्या चवथ्या शतकात ग्रीक भारतात आले तेंव्हा त्यांनाही पश्चिमोत्तर भारतातच असंख्य नगरे दिसली असे डायोडोरससारख्या इतिहासकाराने नोंदवून ठेवलेले आहे. वैदिक आर्याना मात्र ग्राम्य जीवन पसंत होते. त्यांनी कोठेही सत्ता स्थापन केली असेही उल्लेख वैदिक साहित्यात मिळून येत नाहीत. तसेच रामायणात येणारी नगरांची वर्णने ही बव्हंशी ऐकीव असून अतिशयोक्त व पुनरावृत्ती करणारी आहेत. नागरजीवनाचा अनुभवच नसल्याने वाल्मिकीने नागरी जीवनाचे वर्णन टाळलेले आहे. इतकेच नव्हे तर रामायणात येणारा उत्तर व दक्षिण भारताचा भूगोलही ऐकीव आणि बराचसा चुकीचा आहे हे विद्वानांनी सिद्ध केलेले आहे. त्यामुळेच रावणाची लंका नेमकी कोठे होती याबाबत मतभेद आहेत. भारतात कृषी संस्कृती प्राचीन काळापासून रुजलेली असूनही वाल्मिकी रामायणात मात्र वैदिकांचे उपजीविकेचे साधन असणारे पशुधनच संपत्तीच्या रुपात अवतरते, कृषी नाही, हेही येथे उल्लेखनीय आहे. अर्थात हे मुळचे पशुपालक असणा-या वैदिकांसाठी स्वाभाविक म्हणता येईल.  रामकथेचा विशिष्ट हेतूंनी प्रेरित होऊन विस्तार करताना भूगोलाचे अज्ञान काव्यमय प्रसंगांनी झाकण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे असे स्पष्ट दिसते. थोडक्यात राम जेव्हा  झाला तेंव्हा वैदिक आर्य भारतात आलेलेच नव्हते कारण तसे असते व खुद्द राम वैदिक संस्कृतीचा प्रसारक असता तर वैदिक साहित्यात रामाचे नाव आदराने आले असते. पण तसे झालेले नाही. एवतेव मुळची रामकथा ही वेदपूर्व काळात घडली असे म्हणणे भाग आहे. रामायणात नागरी किंवा ग्रामीण कृषीजीवनाचे प्रातिनिधिक चित्रण मिळत नाही ते त्यामुळेच. नंतरच्या काळात (इसवी सनाच्या चवथ्या शतकात) रामायण विस्तृत स्वरुपात लिहित असताना वैदिक आर्यांना गतकाळाचे पुरेसे आकलन नसल्याने या त्रुटी रामायणात राहून गेल्या असाव्यात असे म्हणता येईल.

त्यामुळे रामाने केलेले यज्ञांचे रक्षण, राक्षसांचा विनाश, वैदिक ऋषींचे समकालीन अस्तित्व व जेथेही वैदिक तत्वांचे उदात्तीकरण दिसते तो भाग मूळ रामकथेतील नाही हे समजावून घेऊनच रामकथा वाचली पाहिजे. मग राम हा विष्णूचा अवतार, शंबूक, सीताचारित्र्यावरील संशय, सीतात्याग व तिच्या दोन अग्नीपरीक्षा, शूर्पनखेचे राम-लक्ष्मणाने केलेले विदृपीकरण व वालीची कपटाने केलेली हत्या या बाबी आपसूक रद्दबातल ठरून जातात. यामुळे रामकथेच्या प्रभावावर कसलाही फरक पडत तर नाहीच पण रामाचे चारित्र्य मुळाबरहुकुम उतरण्यास मदत होते. रामाला या वरील प्रक्षेप केलेल्या गोष्टीमुळेच तत्वचिंतक आणि अभ्यासक  दोष देत असतात. पण मुळात रामकथा प्रक्षिप्त आहे व ते प्रक्षेप दूर केले पाहिजेत, अकारण रामाच्या विचारविश्वावर व स्त्रीविरोधी वर्तनावर शंका घेण्याचे कारण नाही हे लक्षात घेतले पाहिजे. रामावर चिरंजीवी प्रेम करणारे श्रद्धाळू अर्थात मूळ रामकथेशी प्रामाणिक राहून “राम-सीता” हे “शिव-शक्ती” प्रमाणेच समानतेच्या तत्वावरचे आदर्श दांपत्य असल्याचे मानतात व वाल्मिकीच्या प्रक्षेपाकडे दुर्लक्ष करतात हे आपल्या लक्षात येईल.

या पार्श्वभूमीवर मूळ रामकथा काय होती हे आपल्याला तपासून पहायचे आहे आणि मग रामराज्याची संकल्पना समजावून घ्यायची आहे. मूळ रामकथेत वनवासादरम्यान राम व रावण यांच्यात काही कारणांनी संघर्ष झाला, त्याची परिणती सीताहरणात झाली, रामाने मानवी सैन्य उभे करून त्याच्यावर स्वारी केली व पत्नीची वीरोचित सुटका केली एवढाच मुख्य गाभा मूळ रामकाव्याचा असला पाहिजे हे उघड आहे आणि तो उत्साहाने वीरकाव्याच्या रुपात गायला जात असला पाहिजे. हनुमान-वाली-सुग्रीव इ. हे वानर होते ही तर केवळ आर्यांना सुसंस्कृत दाखवण्याची वांशिक अहंकाराची क्लुप्ती आहे हेही उघड आहे. वीरकाव्य म्हणून रामकथा एवढी लोकप्रिय होती कि वाल्मिकी रामायणही तिची सर गाठू शकलेले नाही. वाल्मिकी रामायणानुसारचा राम खरेच तसा असता तर एवढी अपार लोकप्रियता त्याला प्राप्त झाली नसती.

रामराज्य ही संकल्पना समजावून घेताना आपल्याला वाल्मिकी रामायणाचा फारसा आधार घेता येत नाही. जैन व बौद्ध रामायण तसेच प्रादेशिक संस्करणात आणि लोककाव्यात अवतरणा-या रामालाही विचारात घेणे आपल्याला क्रमप्राप्त ठरते.

रामराज्य नेमके काय होते?

कल्याणकारी राज्य ही पाश्च्यात्य देशात संकल्पना अवतरली ती प्रबोधन काळात. शासनाची मुख्य कर्तव्ये काय कि ज्यायोगे प्रजेचे अधिकाधिक कल्याण होईल याभोवती ही संकल्पना फिरते. त्यामुळे अनेक नैतिक प्रश्नही निर्माण केले गेले असून “चांगले म्हणजे काय?” यापासून ते “चांगले कोणी ठरवायचे?”, “अधिकांचे अधिक सुख ही संकल्पना खरेच सुखमय ठरू शकते काय?” यासारखे गहन तात्विक प्रश्न निर्माण करून कल्याणकारी राज्याची दिशा नेमकी काय असावी यावर चिंतन केले गेले आहे. पण भारतात मात्र रामराज्य या संकल्पनेने गेली हजारो वर्ष राज्य केले आहे असे म्हणायला हरकत नाही.

रामायणात रामाच्या राज्याभिषेकानंतर भरताने वर्णन केल्यानुसार, रामराज्यात कधी दुष्काळ पडत नसे. लोक दीर्घायुषी असून बापाला कधी मुलाचे अंत्यसंस्कार करावे लागत नसत. राज्यात कोणी विधवाही नव्हती. सारे लोक वैभवात राहत असून आनंदी व समाधानी होते. चोर-दरोडेखोरांचा कोणासही उपद्रव नसून आजारपण अथवा शरीरव्यंग कोणासही भोगावे लागत नसे. अग्नी, हिंस्त्र पशु, अथवा नैसर्गिक आपत्तीचा धोका नसे. वैवाहिक जीवन सुखी असून लोक शिक्षित होते. अशा रीतीने रामकालीन जग हे सुख-समाधानाचे होते असे रामायणात म्हटले असले तरी यात राज्यव्यवस्थेचा काही सहभाग होता असे मात्र दर्शवलेले आढळत नाही. एका विशिष्ट दृष्टीकोनातील आदर्श समाजव्यवस्थेचे हे वर्णन आहे. पण लोकांना समजलेले रामराज्य मात्र खुद्द रामाने निर्माण केलेली आदर्श व्यवस्था अशा स्वरूपाचे होते. या आदर्श समाजव्यवस्थेला आधुनिक परिप्रेक्षात पाहत तशी व्यवस्था निर्माण करण्याची संकल्पना मांडण्याचे श्रेय नि:संशयपणे महात्मा गांधींना द्यावे लागते. “रामराज्य” हीच आदर्श संकल्पना मानून त्यानुसार स्वतंत्र भारत कशी वाटचाल करेल याचे विस्तृत दिशादर्शन त्यांनी करून ठेवले आहे.

रामराज्याची स्थापना हा आदर्श पुढे ठेवूनच महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे असामान्य नेतृत्व केले. त्यांच्या दृष्टीतील रामराज्य हे विशाल मानवतावादाचे समग्र रूप होते. रामाला त्यांनी एक आदर्श राजा या रुपात पाहिले. त्याला कोणत्याही एका धर्माच्या चौकटीत बांधायचा प्रयत्न केला नाही. १९ सप्टेंबर, १९२९च्या 'यंग इंडिया'मध्ये महात्मा गांधी लिहितात, 'मी रामराज्याचा अर्थ हिंदू राज्य असा समजत नाही. रामराज्य हे देवाचे राज्य आहे, असे मी मानतो. माझ्यासाठी राम आणि रहीम हे दोन्हीही एक आणि सारखेच आहेत; सत्य आणि सद्गुणांव्यतिरिक्त मी दुसऱ्या कुठल्याही देवाला मानत नाही. माझ्या कल्पनेतील राम या पृथ्वीतलावर खरोखरच होऊन गेला का, हे मला माहिती नाही. परंतु, रामायण हे खऱ्या लोकशाहीचे असे उदाहरण आहे, जिथे लांबलचक आणि महागड्या प्रक्रियांना सामोरे न जातासुद्धा समाजातील शेवटच्या नागरिकाला न्याय मिळू शकतो.' २ ऑगस्ट, १९३४च्या 'आनंद बाजार पत्रिका'मध्ये गांधीजी लिहितात, 'माझ्या स्वप्नातील रामायणात राजपुत्र आणि रंक या दोघांनाही समान अधिकारांची खात्री दिली जाते.' २ जानेवारी, १९३७च्या 'हरिजन'मध्ये ते म्हणतात, 'राजकीय स्वातंत्र्य मिळवणे याचा अर्थ आपण ब्रिटिशांचे हाऊस ऑफ कॉमन्स, रशियन राज्यव्यवस्था, इटलीतील फॅसिस्ट अथवा जर्मनीतील नाझी शासन व्यवस्थेचे अनुकरण करावे, असा नाही. आपल्याला आपले, आपले वाटणारे राज्य हवे आणि त्यालाच मी रामराज्य म्हणतो. रामराज्य म्हणजेच नागरिकांच्या नैतिकतेवर आधारलेले राज्य.' गांधीजींच्या मते, रामराज्याची राजकीय व्याख्या, 'धर्म, शांतता, सौहार्द आणि लहान-मोठे, उच्च-नीच, सर्व प्राणिमात्र आणि पृथ्वीच्यासुद्धा आनंदाचा विचार करून वैश्विक जाणिवेवर आधारलेले राज्य' अशी करता येईल.

देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या दोन महिने आधी, १ जून १९४७ रोजी गांधीजींनी 'हरिजन'मध्ये लिहिले होते, 'ऐश्वर्यात लोळणारे काही लोक आणि पुरेसे अन्नही न मिळणारे सामान्य नागरिक अशा अन्यायकारक असमानतेच्या काळात रामराज्य अस्तित्वात येणे शक्य नाही.'

रामाबद्दलची आस्था महात्मा गांधींनी रामराज्याचे एक व्यापक स्वरूप मांडून व्यक्त केली. त्यांच्याच वरील विधानांवरून लक्षात येईल कि समता आणि न्याय हे रामराज्याचे महत्वाचे लक्षण होते आणि ते पुरातन भारतीय परंपरेला साजेसे होते. मूळ रामकथेतील राम गांधीजीना आकळला कसा होता हे येथे आपल्या लक्षात येईल. गांधीजींचे रामराज्य केवळ प्रादेशिक अथवा एखाद्या राष्ट्रापुरते सीमित नव्हते तर त्याला वैश्विकतेचे परिमाण होते. रामराज्य हे त्यांच्या मते पाश्चात्य राजकीय धारांचे अनुकरण नव्हे तर शुद्ध राष्ट्रीय विचारमंथनातून रामाच्या जीवनातून आकळलेले एक नवेच सामाजिक आणि राजकीय तत्वज्ञान होते जेथे मनुष्य कल्याण हाच शासनाचा प्रधान हेतू असणार होता. थोडक्यांचे हित व्हावे आणि बहुसंख्य लोक मात्र कोणत्याही सुखापासून वंचित रहावे अशी व्यवस्था म्हणजे रामराज्य नोहे हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. लोकांच्या नैतिक धारणा हा त्यांनी रामराज्याचा पाया मानला. शासनामुळे समाज नैतिक होतो तसेच नैतिक लोकांमुळे शासकांना नैतिक व्हावेच लागते असा हा परस्परावलंबित समाज म्हणजे रामराज्य ही त्यांची व्याख्या होती.

सध्या उपलब्ध असलेल्या वाल्मिकी रामायणात आलेली वर्चस्वतावादी तत्वे मूळ रामकथेचा भाग नाहीत ही जाणीव त्यांना असंख्य भारतीयांप्रमाणे होती व त्या जाणीवेला चिंतनाचे अधिष्ठान देवून त्यांनी आधुनिक जगाला रामराज्य म्हणजे काय आणि ते कसे असले पाहिजे याचा मार्गदर्शक सिद्धांत दिला. आज जगाला अशा रामराज्याची आवश्यकता आहे हे कोणीही विचारी मनुष्य मान्य करील.

आज देशात अयोध्येला नव्या राममंदिराच्या रूपाने ते फक्त भावभक्तीचे आणि धार्मिक अहंकाराचे प्रतीक राहील कि खरेच रामराज्याच्या दिशेने पावले उचलण्याचे सुतोवाच होईल हे काळच ठरवेल. रामाचे उदात्त मानवहितैषु चारित्र्य सर्व भारतीय आदर्श मानतील कि भेदाभेदाच्या भिंती उभ्या करत हिंसेच्या तांडवात देशाला ढकलले जाईल हे सुजाण लोकांच्याच विचारक्षमतेवर अवलंबून राहील. राम आणि रामराज्य या संकल्पना जशा मुळच्या होत्या तशाच स्वीकारायच्या कि वर्चस्वतावादाने प्रदूषित झालेली संकल्पना स्वीकारून “रामराज्य” संकल्पनेचा बट्ट्याबोळ करायचा हे या देशातीलच नव्हे तर जागतिक नागरिकांनी ठरवायचे आहे.

-संजय सोनवणी

 

 

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...