मानवी जगाचा इतिहासच मुळी आक्रमणाचा, पराजितांच्या शोषणाचा आणि गुलामीचा इतिहास आहे. अठराव्या शतकात युरोपियनांकडून अमेरिकेत जवळपास दीड कोटी रेड इंडियनांचे शिर्कान तरी केले गेले किंवा युरोपियनांनी सोबत आणलेल्या साथरोगांमध्ये तरी ते बळी पडले....केवळ काही लाख रेड इंडियन प्राणी संग्रहालयात असतात तसे जीवित सोडले गेले. आफ्रिका खंडाचा वापर केला गेला ते गुलामांसाठी. ऑस्ट्रेलियातही युरोपने वसाहती स्थापन करत हा खंड बळकावला. येथील मूलनिवासी झपाट्याने संपवले गेले. अमेरिकेत व युरोपमध्ये गुलाम करून नेल्या गेलेल्या आफ्रिकंसच्या कहाण्या आजही हेलावून टाकतात एवढी अमानुष वागणूक त्यांना दिली गेली.
तत्पूर्वी रोमन साम्राज्य शिखरावर असण्याच्या काळातही जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना गुलाम करण्याची सर्रास प्रथा होती. टोळी जीवनात मानव जसा क्रूर होता तेवढाच क्रूर संस्कृतीचा विकास होत असतानाही राहिला. भारतातील स्थितीही वेगळी नव्हती. प्राचीन काळी एखादा वंश नष्ट करून टाकण्यासाठी उपखंडातर्गतच आक्रमणे झाली. महाभारतात येणारी खांडववन-दाह या पुराण-शैलीत लिहिलेल्या कथाभागात नाग वंशाचे कसे अमानवी पद्धतीने शिरकाण केले गेले याचा वृत्तांत आलेला आहे. ही मिथकाच्या स्वरूपात लिहिलेली ऐतिहासिक घटना आहे असे अनेक विद्वान मानतात.
ही आक्रमणे का होत होती याचे उत्तर मानवाच्या जगण्याच्याच प्रेरणेत बव्हंशी आहेत हे आपल्या लक्षात येईल. सुपीक भूभागाच्या किंवा विपुल नैसर्गिक साधनस्त्रोतांच्या शोधात असणारे या बाबतीत दुष्काळ असलेल्या भागातील लोक नेहमीच बुभुक्षित बनत हिंस्त्र होतात हा मानसशास्त्रीय इतिहास आहे. भारत हा नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध भूभाग असल्याने पूर्व इराण, मध्य आशिया या तशा प्रतिकूल हवामान व समृद्धीचा अभाव असलेल्या भागातील टोळ्या करून राहणा-या लोकांना भारतीय उपखंड स्वर्गच वाटत असल्यास नवल नाही. त्यामुळेच कि काय प्राचीन काळापासून मध्य आशिया, पूर्व इराण भागातून असंख्य मानवी टोळ्या भारतात स्थलांतर करत आल्या आहेत. काही स्थलांतरे शांततापूर्ण होती तर काही हिंसक. नोंदले गेलेले पहिले स्थलांतर पूर्व इराणमधून वैदिक आर्यांचे झाले. त्यांना झरथूष्ट्री धर्मांच्या अनुयायांनी हुसकावून दिल्यामुळे त्यांना भारतात आश्रय घ्यावा लागला. ऐतरेय ब्राह्मणाने ही स्मृती जपून ठेवलेली आहे. दुसरे प्राचीन स्थलांतर झाले ते मध्य आशियातून पिशाच्च टोळीचे. पुढे इराणी, ग्रीक, शक, कुशाणांनी पश्चिमोत्तर भारतात सत्ता स्थापन केल्या. कुशाण सत्ता तर जवळपास अर्ध्या देशावर पसरली होती. केवळ साम्राज्य निर्माण करायचे म्हणून कोणी सैन्य घेऊन बाहेर पडत नसे तर धनसंपत्तीची प्राप्ती होइल असा भूभाग कब्जात आणण्यासाठी असले उपद्व्याप केले जात. भूक, लालच, हाव या मुख्य प्रेरणा होत्या ज्या आपसूकच हिंस्त्रतेला जन्म देत. भारत समृद्ध असल्याने स्थलांतरीत व आक्रमकांसाठी तो स्वर्गच होता असे म्हणायला हरकत नाही.
१९४७ पर्यंत भारत राजकीयदृष्ट्या अखंड देश नव्हता हेही आपण येथे लक्षात घ्यायला हवे. भौगोलिक सलगतेमुळे आपासूक आलेली सांस्कृतिक समानता सोडली तर लोकांना राजकीय भावनेने एकत्र यावे अशी ‘राष्ट्र’ प्रेरणा मुळात अस्तित्वातच नव्हती. साम्राज्ये, राज्ये निर्माण होत ती राजकीय शक्तीच्या बळावर आणि नष्ट होत ती सत्तांमध्ये आलेल्या विकलांगतेच्या अभिशापामुळे. भारत हा गेल्या अकरा हजार वर्षांपासून कृषीप्रधान देश आहे. पाण्याची उपलब्धता व अनुकूल हवामानामुळे धनधान्याची व नैसर्गिक साधनसामग्रीची विपुलता यामुळे जगण्यासाठीचा संघर्ष अभावानेच होता. त्याउलट पूर्व इराण आणि मध्य आशियाची अवस्था होती. प्रतीकुलतेमुळे त्या भागातील लोक हे मुळातच संघर्षशील होते. भारतीय उपखंडात मात्र ही प्रतिकूलता नसल्याने साहजिकच भारतीय मानसिकता ही स्वभावता: हिंसक राहिलेली नव्हती. भारतीय तत्वद्न्यान याच मानसिकतेतून निर्माण झाले असल्याने अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेले वैदिक साहित्य वगळता त्याचा गाभा हा सर्जकतेचा, सहिष्णुतेचा व स्वागतशिलतेचा राहिलेला आहे.
यामुळे जेव्हाही अफगाणिस्तानमधून अथवा तिबेट व मध्य आशियातून आक्रमणे झाली तेव्हा त्यांना झालेला प्रतिकार हा अनेकदा तुलनात्मक दृष्ट्या सौम्य स्वरूपाचा असल्याने अनेक पराजय अटळ होते. ग्रीकांचे आक्रमण झाले तेव्हा पश्चिमोत्तर भारत व पंजाबमधील गणराज्यान्ना एकत्र करत संयुक्त आघाडी उघडून चंद्रगुप्त मौर्याच्या नेतृत्वाखाली अलेक्झांडरच्या सैन्याला एवढे त्रस्त केले गेले कि शेवटी त्याला माघारी फिरावे लागले. तरीही त्याने पंजाब व अफगाणिस्तानात आपले छत्रप प्रस्थापित केलेले होतेच. नंद साम्राज्याचा पाडाव इसपू ३२२ मध्ये केल्यानंतर चंद्रगुप्त मौर्याने पुन्हा एकदा या छत्रपान्विरुद्ध आघाडी उघडली आणि त्यांना भारतीय भूमीवरून हाकलले. यातूनच सेल्युसीद-मौर्य युद्धाची सुरुवात झाली. हे युद्ध इसपू ३०५ ते ३०३ असे दोन वर्ष चालले. सेल्युकस निकेटर (पहिला) हा सेल्युसीद साम्राज्याचा अधिपती होता. अलेक्झांडरने गमावलेले प्रांत पुन्हा जिंकून घ्यायची त्याची इर्षा होती. अफगानिस्तानावर त्याचेच राजकीय वर्चस्व होते. सिंधू नदीच्या काठी झालेल्या युद्धात चंद्रगुप्ताने त्याच्यावर विजय मिळवला. त्यावेळी झालेल्या तहात चंद्रगुप्ताने सिंध प्रांत तर आपल्या हाती घेतलाच पण हिंदुकुश पर्वतासहित दक्षिण अफगाणिस्तानचा मोठा प्रदेश मिळवला. त्यानंतर झालेल्या तहात सेल्युकसच्या कन्येशी विवाहही केला आणि त्यापोटी सेल्युकसला ५०० हत्तीही भेट दिले. या तहाने चंद्रगुप्ताचे साम्राज्य अफगाणिस्तानपर्यंत पोचले. पुढे सम्राट अशोकाने साम्राज्याचा विस्तार करत बल्ख प्रांतही आपल्या साम्राज्यात आणला. या काळात अशोकामुळे बौद्ध धर्मानेही अफगानिस्तानावर वर्चस्व मिळवले. गांधारी प्राक्रृत ही महत्वाची धर्मभाषा बनली. असंख्य बुद्ध विहार आणि बुद्धप्रतिमांची निर्मितीही अफगाणिस्तानात झाली. असे असले तरी हा भूभाग कररूपाने विशेष उत्पन्न देईल असा समृद्ध नसल्याने या भागावर प्रदीर्घ काळ सत्ता टिकवण्यात भारतीय सत्तांनी रस दाखवला नाही. या भागात सत्ता प्रस्थापित करण्याचा हेतू पुन्हा आक्रमणे होऊ नयेत एवढ्यापुरता मर्यादित होता. मुळात भारतच एवढा समृद्ध असताना त्यासाठी बाहेर पडण्याच्या अव्यापारेषुव्यापार करण्याचे दुसरे कारणही नव्हते! देशातच युद्धे करण्यात जो फायदा होता तो बाहेर पडून युद्धे करण्यात नव्हता. भारतीय सत्तांनी एकमेकांविरुद्ध केलेल्या युद्धांनी भारतीय उपखंडाचा इतिहास खच्चून भरलेला आहे.
-संजय सोनवणी
No comments:
Post a Comment